अवघड सोपे होऊ लागले...

एक वेळ समाजासोबत लढणे सोपे असते; पण घरातील लढाई जिंकणे कठीण असते.
same-sex relationships
same-sex relationshipssakal

- वरुण सिंग, varunsingh171985@gmail.com

एक वेळ समाजासोबत लढणे सोपे असते; पण घरातील लढाई जिंकणे कठीण असते. जेव्‍हा वडीलच तुमच्या समलिंगी संबंधांना स्वीकारतात, तेव्‍हा मात्र तुम्हाला पुढची प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी अधिक बळ मिळते. चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतेच एका मुलाखतीत म्हटले होते की, माझा मुलगा समलिंगी संबंधात असल्यास ते मला मान्य आहे.

एलजीबीटीक्यू कम्युनिटीतील बहुतांश सदस्य हे अनेक कारणांमुळे पुढे येत नाहीत. त्यातील मोठे कारण म्हणजे त्यांचे कुटुंबीयच त्यांना समजून घेत नाहीत हे आहे. भारतासारख्या देशात समलिंगींचे आयुष्य हे खडतर ठरते. त्यातच कुटुंबीयांनीच त्यांना स्वीकारले नाही तर ते आणखी कठीण बनते.

२०१० मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने भारतामध्ये पहिल्यांदाच कलम ३७७ रद्द केले, तेव्‍हा ती ऐतिहासिक घटना ठरली होती. पहिल्यांदाच समाजातील हा घटक खुलेपणाने समोर आला होता. दहा हजारांहून अधिक लोक एकत्र आले होते. २०१० पूर्वी ते ओळख लपवत होते. त्याला अनेक कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे समाजाला लागलेला कलंक म्हणून त्यांना हिणवले जात होते.

दुसरे कलम ३७७ अंतर्गत गुन्हेगार ठरवण्याची भीती त्यांना वाटत होती. मात्र उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने एलजीबीटीक्यू कम्युनिटीसाठी अनेक गोष्‍टी बदलल्या. दोन समलिंगी व्‍यक्तींच्या संमतीने या संबंधांना गुन्हेगारी ठरवणे बेकायदा ठरवले. मात्र डिसेंबर २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा कलम ३७७ लागू केल्याने या कम्युनिटीला धक्का बसला होता.

अखेर सप्टेंबर २०१८ मध्ये हे कलम पुन्हा रद्द केले. त्यानंतर एलजीबीटी कम्युनिटीने पुन्हा सुटकेचा नि:श्‍वास सोडला. तेव्‍हापासून आतापर्यंत अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे मांजरेकर यांच्यासारखा पिता आता आपल्या मुलाविषयी थेट वक्तव्‍य करू शकतो.

अनेकांचे असे म्हणणे आहे की, मांजरेकर यांना बॉलीवूड आणि मनोरंजन क्षेत्राची पार्श्वभूमी असल्यानेच ते इतरांपेक्षा एवढ्या खुलेपणाने या विषयावर बोलू शकतात. एलजीबीटीक्यू कम्युनिटीविषयी, त्यांच्या मुंबई आणि इतर शहरांमध्ये होणाऱ्या परेडविषयी माहिती नसणारेच असे म्हणू शकतात.

या परेडमध्ये ही मुले आपल्या पालकांसोबत चालतात. हे पालक बहुतांशी मध्यमवर्गीय असतात. आपला मुलगा जसा आहे, तसा त्याला त्यांनी स्वीकारलेला असतो. त्यांचा संघर्ष हा मांजरेकरांपेक्षा खूपच भिन्न स्वरूपाचा असतो. अनेक प्रश्‍न त्यांची वाट पाहत आहेत हे माहिती असूनही हे पालक आपल्या मुलांना स्वीकारतात.

एलजीबीटी व्‍यक्तीला सोसाव्‍या लागलेल्या अवहेलनेबाबत प्रत्येक जण बोलत असतो; मात्र जेव्‍हा मुलाची समाजासमोर वेगळी ओळख उघड होते, तेव्‍हा पालकांना सहन कराव्‍या लागणाऱ्‍या वेदनांकडे सहज दुर्लक्ष केले जाते. मुलांनाही अनेक प्रश्‍न पडतात. त्यात आपण समलिंगी का झालो, हा त्यांचा प्रश्न असतो.

अनेकदा पालकही आपला मुलगा समलिंगी आहे हे स्वीकारण्यापूर्वी स्वत:ला आपले काय चुकले, असा प्रश्‍न विचारतात. काही जण त्यांच्या पालनपोषणाबाबतही शंका घेतात. म्हणूनच जेव्‍हा या मुलाचे वडील किंवा आई मोकळेपणाने त्यांना समलिंगी म्हणून स्वीकारतात, तेव्‍हा अनेक पातळ्यांवर स्वत:शी लढलेले असतात आणि जिंकतातही.

मांजरेकर यांनी आपल्या वक्तव्‍याच्या माध्यमातून समाजासाठी एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या मुलाच्या लैंगिक भावनांबाबत काहीच स्पष्‍टता नसतानाही त्यांनी या संबंधांना मान्यता दिली आहे. मांजरेकर ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात, त्या समाजातील अनेक पालकांचे जीवन काही प्रमाणात सुकर होण्यास मदत होणार आहे.

भारतात समलिंगी असणे हा कधीच गुन्हा नव्‍हता. लिंगविषयक कायदा हाच मुळात गुन्हा होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने तोही रद्द केला आहे. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी जे वातावरण होते, ते आजच्या घडीला पूर्णपणे वेगळे आहे. ही या मुलांच्या पालकांसाठी खूपच दिलासादायक बाब आहे. त्यांच्या मुलांवर आता कोणीही गुन्हेगाराचा शिक्का मारणार नाही, ही त्यांच्यासाठी समाधानाची बाब आहे.

एलजीबीटीक्यू कम्युनिटीच्या सदस्यांना समाजाची स्वीकृती हवी आहे. त्यासाठी बहुतेकांच्या समाजाकडून फार मोठ्या अपेक्षाही नाहीत. त्यांना केवळ समान वागणुकीसाठी समाजाचे समर्थन हवे आहे. समलिंगी महिला किंवा पुरुषांना आजही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचे विशेष कारण म्हणजे समाज त्यांच्याकडे वेगळ्या नजरेतून पाहत आहे.

पण हळूहळू अनेक गोष्‍टी बदलत आहेत. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांच्या समर्थनासाठी पुढे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. गे आणि लेस्बियन मुलांच्या पालकांचे ग्रुपही अस्तित्वात आले आहेत. मागील काळात त्यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत. ज्यात त्यांनी आपल्या मुलांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांबाबत आवाज उठवला आहे.

जेव्‍हा एखाद्या गोष्‍टीविषयी एखादा सेलिब्रिटी पुढाकार घेतो, तेव्‍हा सर्वसामान्य लोक ती वेगाने स्वीकारतात. म्हणूनच जेव्‍हा अभिनेता आणि चित्रपट निर्माता असलेले मांजरेकर यांच्यासारखी व्‍यक्ती काही वक्तव्‍य करते, तेव्‍हा लोक ते सहज नक्कीच घेत नाहीत.

(लेखक हे वरिष्‍ठ पत्रकार असून ते दोन दशकांपासून ‘एलजीबीटीक्यू’च्या समस्या सातत्याने मांडत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com