
Lalbaug Parel
Sakal
वीणा जामकर - saptrang@esakal.com
आतापर्यंत मी केलेल्या चित्रपटांपैकी सर्वात आव्हानात्मक आणि कायम लक्षात राहणारी भूमिका म्हणजे महेश मांजरेकर सरांनी दिग्दर्शित केलेल्या ‘लालबाग परळ’मधील ‘मंजू’. या चित्रपटात मी गिरणी कामगाराच्या मुलीची भूमिका साकारली होती, जे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. ही भूमिका मिळायच् या मागे एक सुंदर आठवण आहे. मी रुपारेल कॉलेजमध्ये शिकत असताना विजय तेंडुलकरांची ‘काळोख’ ही एकांकिका केली होती. त्या मृगजळ स्पर्धेत मला पुरस्कार मिळाला होता आणि त्याचे आयोजक सचिन खेडेकर सर होते. त्यांनी माझा अभिनय पाहिला आणि दुसऱ्याच दिवशी हॉस्टेलवर मला फोन करून सांगितलं, ‘‘आजच महेश मांजरेकर सरांना भेटून ये.’’ तेव्हा पहिल्यांदाच मी महेश सरांना मेहबूब स्टुडिओमध्ये भेटले. त्या वेळी ते अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘विरुद्ध’ या चित्रपटाचं शूटिंग करत होते. तिथेच मला पहिल्यांदा अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, संजय दत्त यांसारख्या दिग्गज कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली.