कटू घटना पंजाबातील दहशतवादाच्या

काश्मीरप्रमाणेच पंजाबही हिरवाईने नटलेला सुंदर प्रदेश आहे. तिथली माणसे सळसळती आणि उद्यमशील आहेत.
terrorism in Punjab
terrorism in Punjabsakal

- वेल्ली थेवर, vellythevar@gmail.com

दहशतवाद म्हटलं, की नव्वदच्या दशकात किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या पिढीच्या डोळ्यासमोर दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदार दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर, २००८ या दिवशी ‘गेट वे ऑफ इंडिया’ सह दक्षिण मुंबईत घातलेला तो हैदोस उभा राहतो. परंतु ऐंशी आणि नव्वदच्या दशकांत तिकडे काश्मीर खदखदत असतानाच, जवळच देशाचा आणखी एक भूभागही दहशतीचे केंद्र बनला होता.

काश्मीरप्रमाणेच पंजाबही हिरवाईने नटलेला सुंदर प्रदेश आहे. तिथली माणसे सळसळती आणि उद्यमशील आहेत. सैन्यात दाखल होऊन देशाची सेवा बजावणाऱ्यांत पंजाबी लोकांचीच संख्या सर्वांत जास्त आहे. शूर आणि दणकट शरीरयष्टीचे अशीच त्यांची ख्याती आहे.

परंतु पाकिस्तानच्या चिथावणीमुळे आणि भारताचे तुकडे पाडण्याच्या कुटिल हेतूने आखलेल्या त्यांच्या के२ (काश्मीर-खलिस्तान) नीतीमुळे ऐंशीच्या दशकाच्या मध्यावर पंजाबातील शीख अतिरेक्यांना चालना मिळाली.

धर्म आणि वंश यावर आधारित स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राच्या स्थापनेसाठी अतिरेक्यांनी चालवलेल्या या चळवळीला ब्रिटन, अमेरिका आणि प्रामुख्याने कॅनडात राहणाऱ्या मूळ भारतीय शिखांनी अधिकच बळ पुरवले. भारताबाहेर राहणारे काही शीख या कल्पनेच्या मागे कसे काय लागले आणि आजही धावत आहेत, हे खरेच एक गूढ आहे.

ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला खलिस्तानसाठी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख नेता जर्नेलसिंग भिंद्रनवालेला सुवर्णमंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरमंदिर साहबमधून बाहेर काढण्यासाठी, त्या पवित्र स्थळात भारतीय लष्कर घुसल्यामुळे शीख अत्यंत नाराज आणि क्रुद्ध झाले होते.

त्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या दंगलीत दिल्लीसह देशाच्या इतर भागात तीन हजारांवर शिखांची हत्या झाल्याने तर त्यांच्या संतापाला पारावार राहिला नव्हता. याचा बदला घेण्यासाठी १९८५ मध्ये २३ जूनला कॅनडातील मॉन्ट्रिअल शहरातून लंडनमार्गे भारताकडे निघालेल्या एअर इंडियाच्या कनिष्क विमानात एक बॉम्बस्फोट घडवून आणला गेला.

त्या विमानातील सर्वच्या सर्व ३२९ माणसे त्यात ठार झाली. यावरचा खटला कॅनडात दीर्घ काळ चालला. तथापि केवळ एक खलिस्तानी वगळता या कृत्याला जबाबदार असणाऱ्या अन्य कोणालाही कसलीही शिक्षा झाली नाही.

ऐंशीचे संपूर्ण दशक आणि नव्वदच्या दशकाची सुरुवात इतका प्रदीर्घ काळ क्रूर दहशतवादी कारवायांनी पंजाब कोलमडून गेला होता. माहिती नसेल त्यांना हेही सांगायला हवं, की पंजाबची सीमा काश्मीरला भिडलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चालू असलेला राज्यव्यापी दहशतवाद संपुष्टात येऊन दीर्घ काळ लोटल्यानंतरही तुरळक दहशतवादी घटना पंजाबात घडतच असतात.

२७ जुलै, २०१५ या दिवशी घडलेली अशीच एक घटना आज मला सांगाविशी वाटते. या घटनेतून पंजाबी माणसांचे धैर्य आणि मजबुती यांची प्रचिती आपल्याला येते.

पंजाबच्या रस्ते वाहतूक महामंडळाची गुरुदासपूरची बस काश्मीरमधून गुरुदासपूरकडे निघाली होती. केवळ ३७ किमी प्रवास बाकी होता. गुरुदासपूर हा पंजाबचा एक सीमावर्ती जिल्हा आहे. लांबचा प्रवास झाला असला, तरी चालक अतिशय दक्ष होता. सकाळची वेळ होती. अकस्मात चालकाला तीन दहशतवादी थेट रस्ता अडवून उभे असलेले दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर बुरखे होते आणि हातात बंदुका होत्या.

चालकाच्या हातात ७५ प्रवाशांचे प्राण होते. काहीही करून ते प्राण त्याला वाचवायचे होते. दहशतवादी प्रवाशांना ओलीस ठेवतील किंवा प्रसंगी मारूनही टाकतील. क्षणार्धात निर्णय घेणे भाग होते. पण अनेक वर्षे रक्ताचे पाट वाहत असलेल्या पंजाबातच नानक चंद नावाच्या या चालकाने आपले आयुष्य घालवले होते.

घेतलेल्या साऱ्या अनुभवांतून उसळलेल्या त्या वीजक्षणी स्वतःवर रोखलेल्या त्या तीन बंदुकांकडे नानक चंदने सपशेल दुर्लक्ष केले, गाडी पटकन चौथ्या गिअरमध्ये टाकली आणि बेधडकपणे समोरील अतिरेक्यांच्या जवळपास अंगावरच घातली. चालकाचे हे अनपेक्षित साहस पाहून अतिरेक्यांना धक्काच बसला. अंगावर येणाऱ्या बसला चुकवण्यासाठी उडी मारून ते तिच्या मार्गातून बाजूला झाले आणि लगेच त्यांनी बसच्या दिशेने गोळीबाराचा वर्षाव सुरू केला.

परंतु त्याची जराही पर्वा न करता नानक चंदने बस वळवली आणि चटकन खाली वाकत तो गाडी चालवतच राहिला. दुर्दैवाने अनेक प्रवासी जखमी झाले होते. परंतु जवळच्या सरकारी हॉस्पिटलकडे पोहोचेपर्यंत नानक चंदने गाडी मुळीच थांबवली नाही. हॉस्पिटलच्या आवारात शिरून सगळ्या जखमी प्रवाशांना त्याने तेथील डॉक्टरांच्या हवाली केले.

हे दहशतवादी पाकिस्तानातून आले होते. त्यांनीही हार मानली नाही. जवळच दीनानगर बायपास जवळ असलेल्या एका ढाब्यापाशी एका मारुती ८०० गाडीचा मालक गाडी पार्क करून उभा होता. ताबडतोब त्याच्यावर गोळीबार करून अतिरेक्यांनी ती गाडी पळवली. हे घडत असताना त्या रस्त्यावरच्या एका विक्रेत्याने आपल्या गिऱ्हाइकाला खाली पाडल्याबद्दल अतिरेक्यांना जाब विचारण्याचे अजब धाडस दाखवले.

परिणामी त्याला आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर अतिरेक्यांनी ती गाडी दीनानगर पोलीस स्टेशनवर आणली आणि तिथे त्यांनी आपल्या एके ४७ बंदुकांतून अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

या वेळी त्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधीक्षक बलवंतसिंग उपस्थित होते. दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केल्याचे वृत्त वायरलेसवरून त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. या हल्ल्यासंदर्भात करावयाच्या कारवाईची योजना पोलिस स्टेशनच्या मागच्या आवारात ते आखत होते. तेवढ्यात त्यांच्यावर हा असा थेट हल्ला झाला.

ताबडतोब दहशतवादी आणि पोलिस यांच्यात परस्परांवर घनघोर गोळीबार सुरू झाला. बलजितसिंग आणि त्यांच्या पोलिसांनी एका दहशतवाद्यास ठार केले. मात्र या चकमकीत स्वतः बलजितसिंगही गंभीर जखमी झाले आणि त्यातून त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.

दरम्यान, या हल्ल्याची बातमी गुरुदासपूरजवळ तिब्री येथे तैनात असलेल्या आपल्या पायदळाच्या ब्रिगेडपर्यंत पोहोचली होती. त्यांनी वेस्टर्न कमांडला याबाबत सावध केले. पायदळात एक जलद प्रतिक्रिया टीम (Quick Reaction Team, QRT) असते. या टीमला तयार राहण्याचा इशारा देण्यात आला. जवळचे एअर फोर्स स्टेशन पठाणकोट या शेजारच्या जिल्ह्यात होते. आपल्या सैन्याच्या तिथल्या हेलिकॉप्टर्सनी हवाई टेहळणी सुरू केली.

तत्कालीन पंजाब पोलिस प्रमुख सुमेधसिंग सैनी यांनी मात्र असा आग्रह धरला, की पंजाब पोलिसांची SWAT टीमच यासंबंधी आवश्यक कारवाई करेल. हा प्रसंग घडण्याच्या तीनच वर्षे अगोदर अशी विशेष शस्त्र आणि रणनीती तुकडी (Special Weapons and Tactics Team) बनवण्यात आली होती.

एव्हाना आपले सैन्य पोलिस स्टेशनमध्ये घुसायच्या बेतात होते. त्यांनी एका दहशतवाद्यावर गोळीबारही केला होता. पण SWAT टीमच ही कारवाई पार पाडेल, या पोलिस प्रमुखांच्या आग्रहामुळे अधिकार क्षेत्राचा प्रश्न उपस्थित झाला आणि आपल्या सैन्याला घाईघाईने मागे परतावे लागले.

हे दहशतवादी ठार करण्यासाठी SWAT ची २८ माणसे कारवाईत उतरवावी लागली. कारवाईदरम्यान दहशतवाद्यांकडील अन्नाचा आणि शस्त्रांचा साठा संपेल आणि मग आपल्याला एक तरी दहशतवादी जिवंत पकडता येईल या आशेपोटी ही कारवाई अकरा तास इतका प्रदीर्घ काळ लांबली. जिवंतपणी आपल्या हाती पडायची या लोकांची मुळीच इच्छा नाही हे लक्षात आले तेव्हा कुठे या टीमने पूर्ण ताकदीनिशी सर्वंकष हल्ला करून त्या सर्वांना ठार केले.

ऐंशीच्या दशकातील पंजाबमधील दहशतवादाचा इतिहास माहीत असलेल्या कोणालाही सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या या बसेसना कसे लक्ष्य केले जाई हे नक्की आठवेल. भरलेल्या बसमधून प्रवाशांना बाहेर काढले जाई आणि सगळेच्या सगळे प्रवासी ठार केले जात. त्यांची ही पद्धत आमच्या स्मरणातून अजून गेलेली नाही. त्या दिवशी बस चालवत असलेल्या नानक चंदने घाबरगुंडी वळून बस तिथेच थांबवली असती, तर कितीतरी अधिक लोकांना त्या वेळी प्राणाला मुकावं लागलं असतं.

त्या दिवशीच्या प्राणरक्षक नायकांची नावे घेताना नानक चंद, SWAT किंवा हौतात्म्य प्राप्त झालेले बलजितसिंग आणि इतर तीन पोलिस यांचीच नावे घेऊन थांबता येणार नाही. आपल्याला त्यात दर्शनकुमारचेही नाव घ्यावेच लागेल. तो रेल्वेचा लाइनमन होता आणि त्याने विलक्षण दक्षता दाखवून २०० प्रवाशांचे प्राण वाचवले. दीनानगरचा हल्ला झाला तिथून केवळ पाचच किलोमीटरवर परमानंद रेल्वे स्टेशन आहे.

त्या स्टेशनजवळच्या रेल्वे पुलावर दर्शनकुमारला पाच प्रेशर बॉम्ब ठेवलेले आढळले. या पुलावरून त्यानंतर केवळ पाचच मिनिटांत पठाणकोट - अमृतसर ट्रेन जाणार होती. दर्शनकुमारने असाधारण जागरूकता आणि प्रसंगावधान दाखवले, तत्परतेने सावधगिरीचे इशारे दिले आणि होणारा अपघात टाळला. केवळ नियतीची कृपा म्हणूनच त्यातील सगळे प्रवासी बचावले. त्या दिवशी त्या तीन दहशतवाद्यांना सोडून आणखी सात माणसे कामी आली. त्यात चार कर्तव्यदक्ष पोलिस होते. त्याशिवाय पंधरा माणसे कमी-अधिक प्रमाणात जखमी झाली.

केंद्रीय गृह मंत्रालयाने नंतर यासंबंधी एक निवेदन दिले. त्यानुसार हे दहशतवादी पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे होते. त्यांच्या ताब्यातून मिळालेल्या जी. पी. एस संचातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शकरगढ या पाकिस्तानी गावाच्या जवळच असलेल्या घरोट या खेड्याच्या सीमेवरील एका सुरक्षित घरातून ते आल्याचे उघड झाले. तिथून ते पूर्वेकडे गेले.

नंतर रावी नदीची एक उपनदी पार करून ते पाकिस्तानी सीमेपलिकडील बामियाल या भारतीय गावाकडे आले. तिथे पंजाब व जम्मू-काश्मीरला जोडणाऱ्या महामार्ग १ए वर त्यांनी एक बस पकडली. ही बस अनेक पोलीस चेकपॉइंट्सवरून जात असल्याने प्रत्यक्ष बसमध्येच काही दु:साहस करण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी केला नाही.

वर उल्लेख केलेल्या SWAT टीमला एका खासगी सुरक्षा समूहाकडून इस्राएलच्या विशेष कृती पथकाच्या धर्तीवर प्रशिक्षण दिले गेले होते. त्यांच्याकडे SIG असॉल्ट रायफल्स असत. लेवल २दर्जाचे संरक्षण देणारा आघातविरोधी नखशिखांत घट्ट पोशाख त्यांच्या अंगावर असे. कमी वजनाचे बुलेट प्रूफ जॅकेट, हेल्मेट, रेडिओ सेट, ग्लॉक १७ पिस्तूल वगैरे भरपूर साहित्य बरोबर घेता येईल अशा कार्गो पँट्स असा सगळा त्यांचा जामानिमा असे.

त्यांच्या पाठीवरील बॅग मध्ये वायुरोधक मास्क, लेसर गन्स, गॅस गन्स आणि पेपर गन लाँचर या गोष्टी असत. वेग आणि चपळाई वाढावी म्हणून ते सैनिकांसाठी बनवलेले खास बूट वापरत. राज्य पोलिस प्रमुखांच्या निर्देशानुसार अगदी प्रथमच NSG (राष्ट्रीय सुरक्षा गार्ड्स) आणि प्रत्यक्ष सैन्यालाही SWAT पासून आणि त्यांच्या कारवाईपासून चार हात दूर ठेवण्यात आलं होतं. कोणत्याही बंडखोरीचा मुकाबला आपण स्वत:च्या बळावर करू शकतो असा संदेश यातून इतर राज्यांनाही मिळत होता.

या प्रसंगानंतरही पठाणकोट हल्ल्यासारख्या आणखीही काही घटना पंजाबात घडल्या आहेत. अलिकडेच झालेल्या हरदीपसिंग निज्जर या खलिस्तानी फुटीरतावाद्याच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर पंजाबची ही कथा मी आता तुम्हाला सांगितली. कॅनडामधील सरे या शहरातील एका गुरुद्वारात हा फुटीरतावादी मारला गेला.

या हत्येवरून कॅनडा व भारत या दोन्ही देशांत राजनैतिक खडाजंगी चालली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्येशी संबंध असल्याचा आरोप भारतावर केलेला आहे. पंजाबमध्ये शांतता नांदत राहो, हीच आशा आपण सारे जण मनी बाळगू या.

अनुवाद: अनंत घोटगाळकर

anant.ghotgalkar@gmail.com

(लेखिका ज्येष्ठ पत्रकार असून मुंबईतल्या नागरी जीवनावर तसेच गुन्हेगारी विश्‍वातल्या घडामोडींवर लेखन करतात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com