एका कवितेच्या निमित्तानं... (विद्या सुर्वे-बोरसे)

Vidya-Surve
Vidya-Surve

हे जग खूप सुंदर आहे. या जगातले लोक अशक्य वाटणाऱ्या मोहिमा आखतात आणि यशस्वी होतात. कुठं काही तरी अपघात घडतो आणि तशी घटना पुन्हा घडू नये यासाठी इतर अनेक हात कार्यरत होतात. कुठल्याशा झाडावर पाखरांची अंडी पाहून पूल बांधणं थांबवणारे, झाड तोडावं लागू नये म्हणून ते तसंच ठेवून रस्त्याला वळण देणारे लोक आपल्या आजूबाजूला आहेत. या लोकांना मुलांच्या कोवळ्या नजरेतली स्वप्नं दिसतात. ओठांवरचं निरागस स्मित दिसतं. अशा लोकांमुळे जीवनात तेज आणि निखळ हास्य आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

झमरुदा मुहंमद मीर ही उर्दू आणि काश्मिरी साहित्याची अभ्यासक-संशोधक आहे.  श्रीनगरच्या पुढं ऐंशी किलोमीटरवर सोपोरोमध्ये ती राहते. सोपोरो हे जिल्ह्याचं शहर आहे. शहरापासून तिची कॉलनी आठ किलोमीटरवर आहे. दिवाळीपाडव्याला तिला फोन केला. तिनं केलेले काश्मिरी कवितांचे अनुवाद वाचनात आले होते. तिच्यामुळे थेट काश्मिरीतून पन्नास कवी मराठीत भाषांतरित झाले आहेत. या अनुवादित कवितांचं पुस्तक लवकरच प्रकाशित होणार असल्याचं तिनं सांगितलं. काश्मिरी कवितांचे अनुवाद वाचताना एक अस्वस्थपणा, दिवाळीच्या झगमगत्या रोषणाईतही, मनभर पसरत गेला.
विचार करतो मी
कशाला पाठ टेकवून बसू
मला तर माझ्या घराच्या
भिंतींचीही भीती वाटते.

या हमदम काश्मिरी यांच्या ओळी वाचल्यानंतर एकदम धक्काच बसतो. झमरुदाशी मी बराच वेळ बोलत राहिले. ती काश्मीरखोऱ्यातल्या जीवनाविषयी बोलत राहिली. उत्तरेकडे गुलमर्गपरिसरात बर्फ कोसळत असल्यानं तिच्या भागात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. तापमान शून्याच्या खाली गेलं आहे. कांगडी पेटवून तिच्याभोवती कुटुंबातले लोक दिवसभर बसून असतात. पाणी तापवणं, घर ऊबदार ठेवणं ही कसरत प्रत्येकाच्या घरी सुरू असते. झमरुदा शाळेविषयी बोलली, तिच्या बालपणाविषयी बोलली. गेल्या वर्षी अकाली निधन झालेल्या आईविषयी बोलली. ‘मीही लवकरच उर्दूची प्राध्यापिका होईन’ असंही तिनं तिच्या या स्वप्नांविषयी सांगितलं.

झमरुदाचा जन्म सन १९९३ चा. तिच्या जन्मापूर्वीच काश्मीरचं सर्वांगसुंदर रूप बदलून गेलं होतं. पंडितांनी खोरं सोडलं होतं. खोरं अशांत झालं होतं. प्रत्येकाच्या मनात भय दबा धरून होतं. संध्याकाळनंतर घरांचे दरवाजे बंद झाले की ते नंतर रात्रभर उघडले जात नसत. तिच्या लहानपणी तर घरातला उजेड बाहेर जाणार नाही यासाठी खिडक्यांच्या तावदानांवर काळे पडदे ओढले जात. ती बोलत राहिली तेव्हा भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान या युद्धांच्या काळातल्या, आजीनं सांगितलेल्या आठवणी एकदम तरंगून वर आल्या. त्या काळात आपल्याकडेही घरातला प्रकाश बाहेर जाणार नाही याची काळजी लोक घेत असत. झमरुदा भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घालत मोकळी होत राहिली आणि मी समकाळाची अस्वस्थ कविता ऐकत आहे असंच मला वाटत राहिलं. शाळेविना घराघरात अडकून पडलेल्या हजारो बालकांचे आवाज तिच्या बोलण्यातून ऐकू येत राहिले.

प्रतीक्षा कथले ही दोन मुलांची आई आहे. तिचा बालमानसशास्त्राचा अभ्यास आहे. बालकांच्या शालेय शिक्षणाविषयी, त्याच्या गरजांविषयी ती तासभर सोदाहरण बोलू शकते. तिच्या शब्दाशब्दातून बालकांविषयी आस्था पाझरते. एखादी गोष्ट शांतपणे, ठामपणे आणि मुद्देसूद पटवून देण्याचं सामर्थ्य तिच्याकडे आहे. आम्ही ऱ्होंडा बर्नच्या ‘सिक्रेट’ या पुस्तकाविषयी चर्चा केली. तेव्हा ती म्हणाली, ‘संत ज्ञानेश्वरमहाराजांनी ‘अवधान’ असा शब्द वापरला आहे. पाहणं आणि दिसणं याचा सूक्ष्म भेद त्यांनी लक्षात आणून दिला आहे. रस्त्यावरून जाताना पूर्वी मला लहान मुलं कधी दिसायची नाहीत; पण मी आई झाले आणि अचानक जिकडे तिकडे लहान लहान मुलं नजरेस पडू लागली.

अरे! हे मूल रस्त्यावर एकटंच काय करतंय? त्याची आई कुठं आहे? असे प्रश्न एकटं मूल दिसताच पडू लागतात. रस्त्यावर भीक मागणारी मुलं पूर्वी नसतील असं नाही; पण अलीकडे ती प्रकर्षानं दिसतात आणि ‘यांच्यासाठी काहीतरी करायला हवं, या पद्धतीचं अभावग्रस्त जगणं बालकांच्या वाट्याला येऊ नये,’ असं वाटत राहतं. आपण ज्या समाजात राहतो तिथं, मुलांना बालपण जपता येईल, असं पर्यावरण निर्माण करणं ही जबाबदारी सर्वांची आहे. आपल्या आजूबाजूची भुकेकंगाल मुलं आपल्याला दिसतात का? आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत?’ प्रतीक्षा यांना पडलेले प्रश्न रास्त आहेत.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अशी अनवाणी लेकरं आपल्या खांद्यावर बसवली आणि त्यांना शाळा दाखवली. ज्यांना कोणतंच भविष्य नव्हतं, ज्यांच्या डोळ्यात कोणतंच स्वप्न नव्हतं अशी मुलं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे वकील, डॉक्टर आणि प्राचार्य झाली. कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर मामासाहेब जगदाळे, कर्मवीर काकासाहेब वाघ अशी थोर व्यक्तिमत्त्वं महाराष्ट्रात एकेकाळी होऊन गेली. त्यांनी खेडोपाडी ज्ञानगंगा पोहोचवली. ते होते म्हणून हजारो पिलांना आकाशभरारी घेता आली. आपल्या पंखांखाली ही धरित्री मिरवता आली. सुधाकर पवार, बा. रा. जगताप, द. ता. भोसले, राहुल पाटील, लीला शहा, भारती रेवडकर, व. न. इंगळे, प्रभाकर नानकर, रा. ना. चव्हाण यांनी वाड्या-तांड्यांवर आणि आदिवासी पाड्यांवर शिक्षणाची केंद्रे पोहोचवणाऱ्या ज्ञानर्षींविषयी चरित्रपर लेखन केलं आहे. आपण मोठे लोक आहोत असं समजणाऱ्या पालकांनी यातल्या एक-दोन लेखकांची पुस्तकं अवश्य वाचायला हवीत. मोठ्या माणसांनी ‘मोठेपणा’चा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे.

प्राचार्य डॉ. व्ही. एस. मोरे यांच्याशी कार्यालयीन कामकाजामुळे परिचय झाला. पहिल्याच भेटीत त्यांची कार्यतत्परता आणि वंचित समूहांविषयीची कणव ठळकपणे जाणवली. परिचितांमध्ये ते ‘मामासाहेब’ म्हणून ओळखले जातात. मामा हे आपल्याकडे आईकडचं नातं आहे. इतर अनेक नात्यांपेक्षा ते हक्काचं आणि जवळचंही असतं. डॉ. मोरे हे प्राचार्य म्हणून विविध महाविद्यालयांत कार्यरत राहिले, ते अनेकांचे ‘मामासाहेब’ झाले. शालेय स्तरापासून पदव्युत्तर पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, कला-साहित्य या क्षेत्रांपासून ते क्रीडा आणि व्यवस्थापनाच्या संदर्भातल्या उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे असणारे असे प्राचार्य तुरळक आहेत. त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीचा सुवर्णमहोत्सव साजरा होत आहे, त्यानिमित्तानं छोट्या छोट्या गावांतून देश-विदेशांत स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आल्या. एक सुहृदय शिक्षक सहजपणे एक नवं विश्व कसं घडवतो याचं उदाहरण या प्रतिक्रियांमधून मिळत राहिलं.
हे सगळं आठवलं...कारण, सुप्रसिद्ध हिंदी कवी राजेश जोशी यांच्या एका कवितेचा अनुवाद ‘कवितांजली’ या संग्रहातून वाचनात आला.

धुक्यात बुडालेल्या सडकेवरून
मुलं कामावर जात आहेत
पहाटे पहाटे
‘मुलं कामावर जात आहेत.’
वर्तमानातील सगळ्यात भयंकर ओळ आहे ही
भयंकर आहे,  ही ओळ बातमीसारखी वाचली जाणं
ती वाचायला हवी एखाद्या प्रश्नासारखी
‘कामावर का जात आहेत मुलं?’
अंतराळात उडून गेलेयत काय सगळे चेंडू?
वाळव्यांनी खाऊन टाकलीत काय सगळी पुस्तकं?
भूकंपात उद्ध्वस्त झाल्यात काय सगळ्याच शाळांच्या इमारती?
सगळी मैदानं, उद्यानं आणि घरांची अंगणं
संपलीयत काय एकाएकी?  
तर मग शिल्लकच काय राहिलंय या जगात?

जोशी यांच्या या कवितेनं विचारलेले प्रश्न आतवर सलत गेले, त्यांची बोच जाणवत राहिली आणि या एका कवितेच्या निमित्तानं झमरुदा, प्रतीक्षा, मामासाहेब आणि कर्मवीर...एकामागोमाग एक आठवत गेले.

हे जग खूप सुंदर आहे. ‘आज के आनंद की जय हो!’ या जयजयकारानं अनेकांची पहाट प्रसन्न होते. लोक गंगास्नान करतात. उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. स्वप्नांचे इमले रचतात. अशक्य वाटणाऱ्या मोहिमा आखतात आणि यशस्वी होतात. कुठं काही तरी अपघात घडतो आणि तशी घटना पुन्हा घडू नये यासाठी इतर अनेक हात कार्यरत होतात. कुठल्याशा झाडावर पाखरांची अंडी पाहून पूल बांधणं थांबवणारे, झाड तोडावं लागू नये म्हणून ते तसंच ठेवून रस्त्याला वळण देणारे लोक आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांच्या मनाच्या सौंदर्यावर माझा विश्र्वास आहे. या लोकांना मुलांच्या कोवळ्या नजरेतली स्वप्नं दिसतात. ओठांवरचं निरागस स्मित दिसतं. प्रतीक्षा हा शब्दच तिथं ‘आशा’ या सकारात्मक अर्थानं येतो. त्यांच्यामुळे जीवनात तेज आणि निखळ हास्य आहे.

आयुष्यातला एखादा क्षण अविस्मरणीय असतो, तो आपल्याला मुळातून बदलून टाकतो. ‘अवधान’ असलं की अनेक प्रश्नांची उत्तरं गवसतात. पुस्तकात एक जग आहे आणि पुस्तकाबाहेर निराळं जग आहे. ‘पुस्तकातून पाहिलेली माणसे’ आजूबाजूला असतातच, त्यांच्यासाठी आपल्या हातात कृतज्ञतेचं एक फूल हवं आहे. 

विस्कळित वाटणारे दुवे नीट जोडले तर एक नवं वस्त्र आकाराला येईल. मुलांवर आपुलकीची, स्नेहाची माया पांघरणारं वस्त्र. छोट्या छोट्या कथा एकत्र जोडल्या तर मुलांसाठीची एक गोष्ट तयार होईल. कधीच न संपणारी गोष्ट.   

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com