समतावादी समाजशिक्षक (उल्का कळसकर)

vidyarthi sahayak samiti founder achyut rao apte
vidyarthi sahayak samiti founder achyut rao apte

विद्यार्थी सहाय्यक समितीचे संस्थापक डॉ. अच्युतराव आपटे यांची जन्मशताब्दी (आठ नोव्हेंबर १९१९ ) नुकतीच सुरू झाली आहे. त्यानिमित्त त्यांच्या आणि समितीच्या कार्य-कर्तृत्वाचा परिचय...

डॉ. अच्युतराव आपटे यांचा जन्म कर्नाटकातल्या जमखंडी इथं ता. आठ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. प्राथमिक शिक्षण जमखंडी इथं घेऊन अच्युतराव महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. सर परशुराम भाऊ महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. पेशव्यांचे सरदार पटवर्धन यांची जमखंडी ही संस्थाननगरी. पटवर्धन सरदारांनी स. प. महाविद्यालयाला त्या काळी देणगी दिलेली होती. 

गणित हा अच्युतरावांच्या आवडीचा विषय होता. त्याच विषयात एमए होऊन नंतर ते उच्च शिक्षणासाठी फ्रान्सला गेले. तिथल्या पॅरिस विद्यापीठाची डॉक्‍टर ऑफ सायन्स (पीएच.डी.) मिळवून ते भारतात परतले. त्याआधी विद्यार्थिदशेत असताना त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाच्या ‘चले जाव’ आंदोलनात भाग घेतला होता. त्यासाठी त्यांना सन १९४३-४४ मध्ये कारावासही भोगावा लागला होता.

अच्युतरावांची राहणी महात्मा गांधीजींप्रमाणेच साधी होती. नीतितत्त्वांचं आचरण व सेवाभाव त्यांच्या ठायी होता. गांधीजींचे अनुयायी हरिभाऊ फाटक यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्योत्तर काळात अच्युतरावांनी सन १९५६ मध्ये ‘विद्यार्थी सहाय्यक समिती’ची स्थापना केली. त्या वेळी त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये सुमित्राताई केरकर, ग. प्र. प्रधान, भाई वैद्य, शांताताई मालेगावकर, निर्मलाताई पुरंदरे, वसंतराव गिंडी, राजाभाऊ पटवर्धन यांचा समावेश होता. भारतातल्या विद्यार्थिवर्गासाठी काही भरीव करण्याची प्रेरणा अच्युतरावांना फ्रान्समध्ये असताना मिळाली. 

पुणं हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जात असल्यामुळे ग्रामीण भागातून अनेक गुणवान, हुशार व होतकरू विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येत असत. त्यांना खासगी वसतिगृहांचे दर परवडत नसत. (आजही हीच परिस्थिती आहे). त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून अच्युतरावांनी विद्यार्थी सहाय्यक समितीची स्थापना केली. ग्रामीण भागाची, तिथल्या माणसांची दुःखं तळमळीनं जाणून घेणारा समाजसेवक अशीच अच्युतरावांची ओळख होती.

अनाचार, भ्रष्टाचार आदी बाबींपासून ग्रामीण भागातला विद्यार्थी मुक्त असावा, त्याला राजकारणापेक्षा विद्याव्यासंगात आनंद मिळावा, त्यानं नीतीमूल्यं मानून आपला विकास करावा, अशी तळमळ अच्युतरावांना होती.

‘इन्व्हेस्ट इन मॅन’ ही संस्थाही अच्युतरावांनी सन १९६० मध्ये स्थापन केली होती.  संत ज्ञानेश्वरमहाराजांनी दिलेल्या ‘हे विश्वचि माझे घर’ या संदेशानुसार सन १९६७ मध्ये त्यांनी ‘फ्रान्स मित्रमंडळ’ची स्थापना केली. ज्ञानप्रबोधिनी, स्नेहसदन, एसओएस बालग्राम, फिनिक्‍स एज्युकेशन ट्रस्ट व ग्रामीण भागात कार्य करणारी ‘अफार्म’ संस्था अशा इतरही विविध संस्थांशी अच्युतरावांचा संबंध आला. 

‘ग्रामीण विद्यार्थ्यांचा विकास’ हा त्यांचा ध्यास होता. कोणत्याही पक्षापेक्षा, विचारापेक्षा वा धार्मिक पंथ-संप्रदायापेक्षा समाजहितासाठी निरपेक्ष अन्‌ सेवाशील वृत्तीनं केलेलं कार्य त्यांना महत्त्वाचं वाटत असे. त्यामुळेच त्यांना कुणी ‘समाजवादी विचारवंत’,  कुणी ‘गांधीवादी समाजसेवक’ म्हणत असत; परंतु ते ‘समतावादी समाजशिक्षक’ होते. सर्वांबद्दल प्रेम बाळगून व काही मूल्यं उराशी बाळगून विचार करणारे ते ‘आचारवंत’ होते. शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक यांच्याशी ‘शिक्षण’ या विषयावर त्यांची सातत्यानं चर्चा चालत असे. परिणीमी, शिक्षणाला पूरक; परंतु शिक्षणव्यवस्थेबाहेर असं कार्य ते उभं करू शकले. त्यांनी आपली संस्था शासकीय अनुदानावर विसंबून ठेवली नाही. ते शासनावर अवलंबून नव्हते. आपले प्रयोग अखंडपणे आखण्याची आणि ते पार पाडण्याची क्षमता त्यांच्यात होती. विद्यार्थी सहाय्यक समितीची आर्थिक बाजू बळकट करण्याचं काम रमाकांत तांबोळी यांनी केलं व आजही ते हे काम करत आहेत. त्यामुळेच ‘समिती-परिवार’ ते उभा करू शकले. नव्या कल्पना देणारी मंडळी त्यांनी जोडली. अच्युतराव नव्यांना जोडत व जुन्यांनाही प्रेमानं राखत. त्यांचं तत्त्व अतिशय साधं होतं. ‘कुणालाही मदत करताना संबंधिताचा स्वाभिमान राखून करता आली तरच ती करावी, त्यांनीही ती मदत इतरांना करावी व पुढं जावं...ग्रामीण विद्यार्थी शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे, असं समाजाला जोपर्यंत वाटेल तोपर्यंत संस्थेला कधीही काहीही कमी पडणार नाही आणि तेच संस्थेचं यश असेल,’ असं अच्युतराव म्हणत असत. त्यामुळे आज समितीचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी अच्युतरावांची धुरा अतिशय अभिमानानं व बाणेदारपणे वाहत आहेत व हा जगन्नाथाचा रथ पुढं नेत आहेत. ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष, तसंच विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांचं व इतर ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं, विश्‍वस्तांचं मार्गदर्शन आणि पाठिंबा समितीच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींना मिळत आहे. 

सभोवतालच्या वातावरणातून, समाजाकडून, शासनाकडून प्रत्येकाला बरंच काही मिळालेलं असतं, त्याचं मूल्यमापन करता येत नाही. मात्र, समितीचं काम करायला मिळणं ही त्याची परतफेड करण्याचा छोटासा प्रयत्न आहे, अशी सगळ्यांची भावना असते. आज अशी जाणीव असलेल्या माणसांची संख्या खूप कमी आहे.

अच्युतरावांची उद्दिष्टपूर्ती झाली आहे का, या दृष्टिकोनातून विचार केल्यास विद्यार्थी सहाय्यक समिती ही सर्व शिक्षणसंस्थांपुढं आदर्श आहे; परंतु दुर्दैवानं तिचं अनुकरण केलं गेलेलं नाही, असं म्हणावं लागतं. योगाभ्यास, स्वच्छता, स्वावलंबन व श्रमप्रतिष्ठा ही तत्त्वं, विविध कला आत्मसात करणं, आसपासच्या वस्तीत जाऊन शक्‍य ते काम करणं, ‘कमवा व शिका’द्वारे आपलं शिक्षण करणं अशी चतुःसूत्री अच्युतरावांनी विद्यार्थ्यांना दिली होती व आजही ती पाळली जाते. अच्युतरावांनी सुरू केलेल्या कार्याचा विविध अंगांनी विकास होण्याच्या अमाप शक्‍यता आम्हा विश्‍वस्तांना दिसत आहेत, जाणवत आहेत व खुणावत आहेत.

शिक्षित महिलांविषयीची भूमिका...
अच्युतरावांची शिक्षित महिलांबद्दल एक भूमिका होती. महिलांच्या शिक्षणाबद्दल ते जितके आग्रही होते, तितकेच ते महिलांनी आपलं ज्ञान समाजोपयोगी कामांसाठी सातत्यानं वापरावं, असं त्यांना वाटत असे. त्यामुळेच सुमित्राताई केरकर, शांताताई मालेगावकर व निर्मलाताई पुरंदरे यांनी त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं. ‘शिक्षित महिलांनी गंभीर व वैचारिक ग्रंथ नियमितपणे वाचावेत, असं वाचन त्यांच्या जीवनाला व कामाला उपकारक ठरतं,’ असं अच्युतराव नेहमी म्हणत असत. अच्युतरावांच्या सामाजिक कार्यात आपला थोडाफार हातभार जरी लागला तरी आपण धन्य झालो, असं वाटतं. अच्युतराव हे कार्य करण्याचं एक प्रेरणास्थान आहेत. त्यांनी उभं केलेलं कार्य व समाजसेवेचा सुगंध सतत दरवळत ठेवणं व प्रकाश सतत तेवत ठेवणं हेच त्यांना खरं अभिवादन होय. ग्रामीण व गरीब युवकांना बौद्धिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीमध्ये सहभाग मिळवून देण्याचं हे कार्य अविरतपणे सुरू ठेवावं लागेल. अच्युतरावांनी घालून दिलेला आदर्श पुढील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही. त्यांच्या स्मृतीस ‘समिती-परिवारा’तर्फे नम्र अभिवादन!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com