व्हिएतनाममधील भगवतीदेवी

भगवतीदेवी
भगवतीदेवीsakal
Updated on

व्हिएतनाममधील प्रसिद्ध ‘मी सन’ या ठिकाणी असलेल्या प्राचीन शिवमंदिरांची माहिती आपण मागील लेखात पाहिली. शिवक्षेत्र असलेल्या ‘मी सन’बरोबरच व्हिएतनाममध्ये भगवती किंवा ‘पो नगर’ नावाच्या देवीचंसुद्धा तितकंच महत्त्व होतं. व्हिएतनाममध्ये आजही पूजल्या जाणाऱ्या या भगवतीदेवीबद्दल आणि तिच्या मंदिराबद्दल आज जाणून घेऊ या.

भगवती कौठारदेवी

भगवतीदेवीचं हे प्रसिद्ध मंदिर व्हिएतनाममधील सध्याच्या ‘न्हत्रँग’ या शहरात समुद्रकिनाऱ्यालगतच्या छोट्या टेकडीवर आहे. प्राचीन व्हिएतनाममधील कौठार नावाच्या प्रदेशात हे स्थान येत असे. इसवीसनाच्या आठव्या शतकात व्हिएतनाममधील सत्यवर्मन राजानं येथे सत्यमुखलिंगनामक शिवलिंगाची स्थापना केली होती. साधारणपणे आठव्या शतकापासून (आजपासून बाराशे वर्षांपूर्वी) शिवलिंगाबरोबरच भगवतीदेवीचे उल्लेख येथील शिलालेखांत आढळू लागतात.

इसवीसनाच्या नवव्या शतकाच्या मध्यातील एका शिलालेखात शिवलिंगाबरोबरच या भगवतीदेवीचा उल्लेख ‘कौठारदेवी भगवती’ असा केलेला आहे. वर उल्लेखिल्यानुसार, प्राचीन कौठार प्रदेशात हे स्थान असल्यानं त्या प्रदेशाची देवता म्हणून तिला कौठारदेवी म्हटलं जात होतं. या काळातच तिचं स्वतंत्र मोठं मंदिर निर्माण झालं असावं.

यानंतरच्या काळात मात्र देवालयाच्या आवारातील शिलालेखांत, स्थानिक राजांनी भगवतीदेवीला दान दिल्याचे उल्लेख अधिक आढळतात. त्यावरून येथे सत्यवर्मन राजानं स्थापन केलेल्या शिवलिंगापेक्षा भगवतीदेवीचं महत्त्व हळूहळू वाढलं असावं.

मागील लेखात पाहिल्यानुसार, व्हिएतनाममधील ‘मी सन’ हे शिवक्षेत्र तेथील राजांसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. त्याबरोबरच रक्षणकर्ती देवता म्हणून ‘न्ह त्रँग’ येथील भगवतीदेवीचंही महत्त्व राजांच्या लेखी वाढू लागलंं होतं. साधारणपणे एक हजार वर्षांपूर्वी ‘मी सन’ येथील शैव स्थान आणि ‘न्ह त्रँग’ येथील भगवतीदेवीचं स्थान अशी ‘शिव’ आणि ‘शक्ती’ यांची दोन स्थानं व्हिएतनाममधील राजांसाठी अत्यंत महत्त्वाची होती. या भगवतीदेवीचा उल्लेख शिलालेखांत कुठंही, पार्वती किंवा उमा, या नावानं केलेला नसला तरी अभ्यासकांच्या मतानुसार, ती शिवपत्नी पार्वती हिचं एक रूप म्हणूनच पूजली जात असावी.

‘मी सन’ येथील भद्रेश्वर आणि ‘न्ह त्रँग’ येथील भगवतीदेवी या दोन्ही देवता प्राचीन चंपा राज्यात रक्षणकर्त्या आणि पालनकर्त्या देवता म्हणून पूजल्या जात असत. या स्थळांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, ‘मी सन’ हे शंकराचं स्थान पर्वतीय प्रदेशात आहे, तर भगवतीदेवीचं मंदिर समुद्रकिनाऱ्याजवळ आहे.

‘पो नगर’ देवता

नऊशे वर्षांपूर्वीपासून या भगवतीदेवीचा उल्लेख शिलालेखांतून ‘याँ पु नगर’ या नावानंही होऊ लागला होता. ‘नगराची देवता’ या अर्थाचा हा स्थानिक चाम भाषेतील शब्द तेथील संस्कृत शिलालेखांतही वापरला गेला. याचंच रूपांतर नंतर ‘पु नगर’ या नावात झालं. आजही हे मंदिर ‘पो नगर’ देवतेच्या नावानं ओळखलं जातं.

व्हिएतनाममधील ‘चाम’ वंशातील विविध राजांनी या भगवतीदेवीची मूर्ती स्थापन केल्याचे उल्लेख तेथील प्राचीन शिलालेखांत येतात. एक हजार वर्षांपूर्वी, म्हणजे इसवीसनाच्या दहाव्या शतकाच्या सुरुवातीला, तेथील इंद्रवर्मन राजानं भगवतीदेवीची सोन्याची मूर्ती स्थापन केली होती. त्यानंतर परत साधारणपणे पन्नास वर्षांनी कम्बोडियातील ‘ख्मेर’ वंशाच्या राजांनी आक्रमण केल्यानं ‘पो नगर’ देवतेची नवीन मूर्ती स्थापन करावी लागली होती. कदाचित्, या ख्मेर आक्रमणात मूळची सोन्याची मूर्ती चोरीस गेली असावी.

साडेसातशे वर्षांपूर्वी येथील जयइंद्रवर्मन राजाची कन्या रत्नावली सूर्यदेवी हिनं या ठिकाणी ‘भगवती कौठारेश्वरी’ हिच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी दान दिल्याचाही उल्लेख आढळतो. याशिवाय, राजकन्येनं या मंदिराच्या आवारात भगवती मातृलिंगेश्वरीचं मंदिर उभारलं होतं. ते नंतरच्या काळात नष्ट झालं. विविध काळांत येथील राजांनी, त्यांच्या अधिकाऱ्यांनी या भगवतीदेवीला सोन्याचे मुकुट, सोन्याचं छत्र, दागिने, सोन्या-चांदीची पूजापात्रं दान दिल्याचे उल्लेख शिलालेखांत आढळतात.

‘पो नगर’ मंदिर

व्हिएतनाममधील ‘न्ह त्रँग’ या शहरात समुद्राकाठच्या छोट्या टेकडीवर ‘पो नगर’ मंदिरसमूह आहे. या टेकडीवर चढून जाताना मध्ये जोत्यावर बारा मोठे खांब दिसतात. येथे असलेल्या मूळ मंडपाचे हे खांब असावेत; परंतु त्या मंडपाचं छत आता नष्ट झालं आहे. या मंडपाच्या समोरील पायऱ्या चढून गेल्यावर आपण मंदिरांच्या प्रांगणात पोहोचतो.

प्रांगणात आपल्याला भगवतीदेवीच्या मुख्य मंदिराच्या आजूबाजूला इतरही मंदिरं दिसतात. ती मंदिरं म्हणजे काही राजांनी येथे स्थापन केलेली शंकर, गणेश तसेच भगवती मातृलिंगेश्वरी यांची मंदिरं होत. ही सर्व मंदिरं पूर्वाभिमुख आहेत. यातील काही मंदिरांचा वीस वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला.

या प्रांगणात २३ मीटर उंच असलेलं सर्वात मोठं मंदिर भगवती कौठारदेवीचं किंवा ‘पो नगर’ देवीचं आहे. चौकोनी गाभारा आणि त्यावर शिखर असलेलं हे मंदिर चाम स्थापत्यशैलीनुसार विटांनी बांधलेलं आहे. मात्र, मंदिराच्या दाराची चौकट दगडी आहे. या दाराच्या चौकटीवर दानलेख कोरलेले दिसतात. दाराच्या चौकटीच्या वरील भागात पाषाणात घडवलेली देवीची एक मूर्ती बसवलेली आहे.

या मंदिरात प्रवेश केल्यावर गाभाऱ्यात साधारणपणे सव्वा मीटर उंचीची दशभुजा भगवतीदेवीची पाषाणातील मूर्ती दिसते. देवीची ही मूर्ती आसनावर बसलेली असून तिच्या हातांत धनुष्य-बाण-चक्र-गदा इत्यादी आयुधं दिसतात. या आयुधांवरून ही मूर्ती दशभुजा दुर्गेची असावी असं अभ्यासकांचं मत आहे. मूर्तीच्या मागील बाजूला मकरतोरण कोरलेलं दिसतं.

भगवतीदेवीची ही मूळ मूर्ती अंदाजे एक हजार वर्षं जुनी असावी असं तिचं शिल्प, दागिने आणि वस्त्र यांच्या शैलीवरून लक्षात येतं. नीट निरखून पाहिल्यावर या मूर्तीची मान काहीशी उंच दिसते आणि चेहरा नंतरच्या काळातील ‘व्हिएत’ शैलीनुसार असल्याचं लक्षात येतं. मस्तकाच्या आणि मानेच्या मध्ये असलेल्या जोडावरून हे मस्तक मूळ मूर्तीचं नसल्याचं आणि नंतरच्या ‘व्हिएत’ राजांच्या राजवटीत या मूर्तीवर बसवलं गेलं असल्याचं समजतं.

उत्तरेतून आलेल्या व्हिएत राज्यकर्त्यांनी चंपा हे राज्य जिंकल्यावर या देवीला त्यांच्या देवतांमध्ये सामावून घेतलं. त्यानंतर ‘पो नगर’ देवीच्या व्हिएत भाषेतील नवीन नावासह नवीन आख्यायिका निर्माण झाल्या. तिच्याशी संबंधित कथांतून, ती समुद्राच्या फेसापासून निर्माण झालेली देवी होती, असं वर्णन येतं. तिची मूळ लाकडी मूर्ती समुद्रातून तरंगत किनाऱ्यावर आली होती अशी आख्यायिका सांगितली जाते. स्थानिक रहिवाशांसाठी ती भूमिदेवता आहे. तिनंच पहिल्यांदा या किनाऱ्यावरील रहिवाशांना शेती, पशुपालन शिकवलं असं तिच्याबद्दलच्या कथांतून समजतं. त्यामुळे आजही व्हिएतनाममधील ‘व्हिएत’ आणि चामवंशीय रहिवासी आपल्या पालनकर्त्या ‘पो नगर’ देवतेची पूजा करतात. ‘शिव’ आणि ‘शक्ती’ यांची ही महत्त्वाची क्षेत्रं दूरवरील व्हिएतनाममध्ये निर्माण झाली होती आणि अनेक शतकं तेथील राजे, त्यांचा परिवार, अधिकारी तिथं मंदिरं निर्माण करत होते, मंदिरांना दान देत होते यावरून भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा व्हिएतनाममध्ये किती खोलवर रुजली होती हे लक्षात येतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com