मोदींची ‘आसियान’ शिष्टाई

मोदींची ‘आसियान’ शिष्टाई

नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधानपदाच्या शपथविधी समारंभासाठी ‘सार्क’ संघटनेतील आठ सदस्यराष्ट्र प्रमुखांना आमंत्रित केले होते. शेजारी देशांशी निकटचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी केलेली ही अभिनव शिष्टाई होती. तशीच शिष्टाई येत्या २६ जानेवारी २०१८ रोजी देशाला दिसणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मोदी यांनी ‘आसियान’ संघटेतील दहा सदस्य देशांच्या अध्यक्षांना आमंत्रित केले आहे. संघटनेच्या सदस्य देशांमध्ये इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलॅंड, ब्रुनेई, कंबोडिया, लाओस, म्यानमार व व्हिएतनाम यांचा समावेश होतो. मोदी यांच्या ‘ॲक्‍ट ईस्ट’ धोरणाचे हे पुढचे पाऊल असेल. त्यासाठी जोरदार तयारी सुरू असून, माजी परराष्ट्र सचिव ललित मानसिंग यांनी या संदर्भात अलीकडेच कलिंग इंटरनॅशनल फाउंडेशनची स्थापना केली. त्याचे उद्‌घाटन पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाले. 

कलिंग राजांच्या साम्राज्यात महानदी व गोदावरी नद्यांमधील व पूर्वेकडील सागरी प्रदेशाचा समावेश होता. तसेच त्यात ओडिशाव्यतिरिक्त उत्तर आंध्र प्रदेश व अलीकडेच आकाराला आलेल्या छत्तीसगड व तेलंगण या नवनिर्मित राज्यांतील भागांचा समावेश होता. कलिंग युद्धानंतर हा प्रदेश मौर्य सम्राटांच्या ताब्यात आला. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री (कै.) बिजू पटनाईक यांनी १९४७ मध्ये सुरू केलेल्या हवाई सेवेचे नाव ‘कलिंग एअरलाईन्स’ होते. मानसिंग यांच्या मते, ‘आसियान’ देश व ईशान्येकडील सात राज्यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व व्यापारी दृष्टीने जवळ आणण्याचा प्रयत्न कलिंग प्रतिष्ठान करणार आहे. ‘आसियान’ राष्ट्रप्रमुखांची शिखर परिषद जानेवारीत दिल्लीत होईल. ‘आसियान’ची स्थापना १९६७ मध्ये झाली. ‘आसियान’ व भारत संबंधांना २०१७ मध्ये (वाटाघाटीतील भागीदार म्हणून) २५ वर्षे, शिखरस्तरीय परिषदांना १५ वर्षे व व्यूहात्मक भागीदारीला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.  
मानसिंग म्हणाले, की कलिंग साम्राज्याचा प्रभाव इंडोनेशिया, कंबोडियामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. तेथे हिंदू संस्कृतीचा प्रचार झाला. आजही जकार्ताच्या प्रमुख चौकात अर्जुनाचे भव्य शिल्प दिसते, तर कंबोडियातील अंकोरवॅटची मंदिरे भारत व पूर्व आशियातील संबंधांची साक्ष देतात. बालीतील रामायण जगप्रसिद्ध आहे. मलेशियातील क्वालालंपूरनजीकचे हनुमान मंदिर, नवी शासकीय राजधानी पुत्रजया, थायलॅंडमधील राजे अदुल्यदेज भूमीबल, त्यांचे पुत्र व विद्यमान नरेश महावज्रलोंकम बोधिंद्रदेबयावरणंकुन आदी नावे ही हिंदू संस्कृतीचीच देणगी आहे. फिलिपिन्सच्या भारतातील राजदूत मा तेरेसिता सीदाझा म्हणाल्या, की फिलिपिनो भाषेत सुमारे ८०० संस्कृत शब्द आजही वापरात आहेत. पूर्व आशियातील अनेक देश हिंदू व बौद्ध धर्म व संस्कृतीची साक्ष देतात. चीन व मंगोलियामध्येही बौद्धधर्मीयांची मोठी संख्या आहे. दक्षिण आशिया, हिंदी व प्रशांत महासागर या परिसराला व्यूहात्मक महत्त्व आले आहे. पूर्व आशियाचे आर्थिक व मानसिक ऐक्‍य घडवून आणण्यासाठी परस्परसंबंधाव्यतिरिक्त पायाभूत रचनाही आवश्‍यक आहे. तथापि, त्यात भारत चीनच्या बऱ्याच मागे आहे, असा सूर फाउंडेशनच्या उद्‌घाटनानंतर झालेल्या परिसंवादात व्यक्त झाला. 

‘बिम्स्टेक’ ( बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टिसेक्‍टोरल अँड टेक्‍निकल इकॉनॉमिक को-ऑपरेशन), मेकाँग गंगा सहकार्य प्रकल्प, कुनमिंग इनिशिएटिव्ह (बीसीआयएम - बांगला देश, चीन, म्यानमार व भारत), ‘सार्क’ संघटना आदींच्या माध्यमातून विभागीय सहकार्य वाढविण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी त्यातील मेकाँग-गंगा सहकार्य प्रकल्प व ‘कुनमिंग इनिशिएटिव्ह’ बरेच मागे पडले आहे. शिवाय सापत्नभावाने वागविले जाते, ही अनेक वर्षे ईशान्येकडील राज्यांत खोलवर रूजलेली भावना कमी करण्यात सरकारला यश आलेले नाही. रस्ते, रेल्वे व जलमार्ग वाढविण्याकडे केंद्राने दुर्लक्ष केल्याची खंत आहे. ती दूर करण्यासाठी सरकारला गांभीर्याने प्रयत्न करावे लागतील. नंतरच, ‘ॲक्‍ट ईस्ट’ धोरण खऱ्या अर्थाने राबविता येईल, असे मत व्यक्त करण्यात आले.

 भारत व ‘आसियान’ यांच्यातील व्यापारी संबंध हळूहळू सुधारत आहेत. ‘आसियान’ हा भारताचा चौथ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार असून, २००५ मध्ये असलेले दुतर्फा व्यापाराचे प्रमाण ४४ अब्ज डॉलरवरून २०१६ मध्ये ७७ अब्ज डॉलरवर गेले. ते २०२२ अखेर २०० अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट आहे.

 ‘आसियान’ची एक लाख ७० हजार किलोमीटरची सागरी सीमा पाहता समुद्राखालून खनिज तेल व नैसर्गिक वायू वाहून नेणाऱ्या पाइपलाइन उभारता येतील, असे मत या वेळी मांडण्यात आले. दुतर्फा गुंतवणुकीसाठी विशेष प्रयत्न व्हावयास हवेत. ‘आसियान’ देशांमध्ये जाऊन तेथे उद्योग उभारणाऱ्या भारतीयांचे खुल्या दिलाने स्वागत होत नाही, याबाबत खंत व्यक्त करण्यात आली. पंतप्रधानांच्या कार्यालयातील मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या माहितीनुसार, मोदी सरकारने ईशान्येकडील राज्यांच्या विकासाला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, पायाभूत रचनेसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २६ मे २०१७ रोजी पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्वात लांब (९.१५ कि.मी) आसाम व अरुणाचल प्रदेशाला जोडणाऱ्या लोहित नदीवरील भूपेन हजारिका सेतूचे (ढोला ते सादिया) उदघाटन केले. त्रिपुराहून बांगला देश दरम्यान पहिली रेल्वेगाडी लवकरच प्रवास करणार आहे. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटप्रमाणे ईशान्येकडील राज्यांत आणखी एक संस्था सुरू करण्यात येईल व बॉलिवूडच्या चित्रपट निर्मात्यांना चित्रणासाठी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातील. सुमारे १९ जलमार्गांतून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. लवकरच दिल्लीतील प्रसिद्ध ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ सारखे ‘नॉर्थ-ईस्ट इंटरनॅशनल सेंटर’ स्थापन करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com