भारत-चीनविषयी राजदूत गौतम बंबावाले यांची 'पुणे कृती योजना' 

Gautam Bambawale
Gautam Bambawale

चीन, भूतानमधील भारतीय माजी राजदूत व पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावाले यांनी चीनबरोबर संबंध वृद्धिंगत करण्यासाठी 1 मार्च 2019 रोजी "पुणे योजना" सुचविली आहे. हे तीन देश व भारत यांचे संबंध वा दुरावा भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. दक्षिण आशियातील राजकारण या चार देशांभोवती अनेक वर्षे फिरते आहे. त्यातील भूतानबरोबरचे संबंध सौहार्दाचे असले, तरी पाकिस्तानबरोबरचे संबंध पुलवामामधील दहशतवादी हल्ला व बालाकोटमधील भारताची कारवाई, यामुळे विकोपाला गेले असून, चीनशी असलेल्या संबंधांचा तराजू कधी उजवीकडे तर कधी डावीकडे झुकतोय. 

पुलवामामधील दहशतवाद्यांचा हल्ला व भारताने केलेली कारवाई याबाबत त्यांना वाटते, की राष्ट्रसंघाच्या ठराव क्रमांक 1267 अन्वये पाकिस्तानी दहशतवादी व जैश-ए-महंमदचा म्होरक्‍या मसूद अझहर याला दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी चीनने तयारी दर्शविली नसली,तरी भारताने व्यावहारिक दृष्टिकोन ठेवल्यास आपण चीनला निश्‍चित वळवू शकू. त्यासाठी भारतीय शिष्टाईला अधिक जोर लावावा लागेल. भारत, चीन,ब्राझील व दक्षिण आफ्रिका हे देश आज एका व्यासपीठावर आले असून, अनेक जागतिक समस्यांबाबत ते एकत्रित विचार व्यक्त करीत आहेत. ही पार्श्‍वभूमी महत्वाची आहे. 

दिल्लीतील "इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पॉन्डट्‌स" या संस्थेच्या सातव्या वार्षिक बीज भाषणादरम्यान बंबावाले यांनी सुचविलेल्या पुणे कृती योजनेच्या तपशीलानुसार, 1) चीनबरोबर उच्च पातळीवर संवाद साधावा, म्हणजे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या या वर्षी होणाऱ्या भारत दौऱ्यात पंतप्रधांबरोबर होणाऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी अनुकूल वातावरण तयार होईल. 2) सामंजस्य वाढविण्यासाठी भारत व चीनच्या लष्करांदरम्यान वाढती देवाणघेवाण करावी. 3) चीनच्या पर्यटकांना भारताकडे आकर्षित करण्यासाठी सार्वजनिक व खाजगी क्षेत्र, तसेच पर्यटन व्यावसायिकांनी जोमाने प्रयत्न करावे.4) भारतीय चित्रपट व योगाभ्यासाचा चीनमध्ये प्रसार व प्रचार व्हावा, यासाठी खास प्रयत्न हवे. 5) चीनी विद्यार्थ्यांनी भारतीय विद्यापिठातून शिक्षण घेण्यासाठी चालना द्यावी. 6) भारतीय रेल्वेच्या स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यासाठी संयुक्त वित्तीय प्रारूप तयार करावे 6) आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा अलायन्सचे सदस्य बनण्यासाठी चीनला तयार करावे व 7) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनबरोबर सहकार्य वाढवावे. 

बंबावाले फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी. अस्सल पुणेकर. "इंडिया-चायना रिलेशन्स- डोकलम टू वूहान अँड बियॉंड" या विषयावर बोलताना ते म्हणाले,"" "पुणे योजने"ची दखल केंद्राला घ्यावी लागेल. भारत व चीन या दोन मोठ्या अर्थव्यवस्था पूर्ववैभव प्राप्त करण्याच्या मार्गावर असल्याने जगालाही त्यांची दखल घ्यावी लागेल. संघर्षात्मक धोरणाला तिलांजली देऊन स्पर्धा व सहकार्य या दोन पातळींवर दोन्ही देश मार्गक्रमण करतील, "असे मला वाटते. तीन महिन्यापूर्वी ते बीजिंगहून परतले. त्यांनी पुण्यात स्थाईक होण्याचे ठरविले असून, पुण्यातील सिंबियॉसिस आंतरराष्ट्रीय विश्‍वविद्यालयात शिष्टाई, आंतरराष्ट्रीय संबंध व शासनप्रक्रिया या विषयांचे अध्यापन करीत आहेत. 

उत्तम मॅंडरीन चीनी व जर्मन भाषा जाणणारे बंबावाले यांनी परराष्ट्र सेवेत 1984 मध्ये प्रवेश केला. 1985 ते 1991 मध्ये ते बीजिंग व हॉंगकॉंगमधील भारतीय दूतावासात होते. 2007 ते 2009 दरम्यान ते ग्वांगझाव येथे भारतीय कॉन्सुल जनरल होते. तसेच, मंत्रालयात पूर्व आशिया विभागाचे सह सचिव व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यालयात राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण व आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांचे उपप्रमुख म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. 1993 ते 94 दरम्यान अमेरिका विभागाचे संचालक व बर्लिनमधील सांस्कृतिक केंद्रात त्यांनी पब्लिक डिप्लोमसी विभागाची जबाबदारी हाताळली. परराष्ट्र मंत्रालयातील 34 वर्षांच्या सेवेपैकी चीनशी त्यांचा संबंध तब्बल 15 पेक्षा अधिक वर्षे आला. भारतातील मोजक्‍या चीनविषयक तज्ञांत त्यांची गणना होते. 

भारत व चीनच्या संबंधांची तुलना ते अमेरिका व मेक्‍सिकोशी करतात. दोन्ही संबंध नाजूक व गुंतागुंतीचे आहेत. अनेक मुद्यांवर एकमेकांची मतभिन्नता व त्याविषयीची मते तीव्र आहेत. ""चीनशी धीराने वाटाघाटी केल्या पाहिजेत,"" असे सांगून,"" सीमाप्रश्‍न सोडवायचा असेल, तर तेथे शांतता प्रस्थापित करण्याने बरेच काही साध्य होईल. सीमेवर तणाव निर्माण होऊ नये, यासाठी दोन्ही सेनादले आखून दिलेल्या प्रमाणित कार्यपद्धती ( स्टॅन्टर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) नुसार कार्य करीत आहेत. तरीही, 2013 मधील डेपसंग, 2014 मधील चुमर, 2017 मधील डोकलम येथे चीनी लष्कर आक्रमक व घुसखोर झाले कसे? वस्तुतः गेल्या वीस, पंचवीस वर्षात चीनप्रमाणे भारतीय सेनेलाही सीमाभागात चांगले रस्ते उपलब्ध आहेत. परिणामतः चीनी सेनेच्या आपण निकट तर आलो आहोतच. तथापि, ठरविलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीला तडा जाणारी एखादी हालचाल जरी झाली, तरी काही क्षणातच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होते. वर उल्लेखिलेल्या तीन घटनांत "चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए)" सीमेवरील "जैसे थे" स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला व भारतीय सेनेने तात्काळ प्रत्युत्तर देऊन त्यांचा शिरकाव बंद केला. चीनच्या पीएलएसाठी माझा सल्ला असा आहे,की त्यांनी सामान्य स्थिती राखण्यासाठी "जैसे थे" स्थितीत ढवळाढवळ करू नये,""अशी पुस्ती त्यांनी जोडली. 

वुहानमधील पंतप्रधान मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या "वन ऑन वन" अनौपचारिक शिखर परिषदेचे वैशिष्ठ्य म्हणजे पंतप्रधानांना -राष्ट्राध्यक्षाच्या पातळीवर नेणे, हे होय. चीनचे पंतप्रधान ली कशांग असले, तरी चीनचे सर्वेसर्वा नेते होत शी जिनपिंग. भारतात शासकीय निर्णय घेतात ते पंतप्रधान. आपल्याकडे राष्ट्रपतीपद अलंकृत असते. चीनमध्ये तसे नाही. शिवाय वूहानची निवड करण्यात आली, याचे कारण मोदी यांना वूहानला भेट द्यावयाची होती. गुजरातचे मुख्यमंत्री असताना चीनमधील जगातील सर्वात मोठे थ्री गार्जेस या धरणाला भेट दिली होती. ते वूहानजिक आहे. शिखर परिषदेच्या वेळी बंबावाले वूहानमध्ये उपस्थित होते. ते म्हणाले, ""दोन सर्वोच्च नेते अनौपचारिक वातावरणात तब्बल आठ ते दहा तास एकमेकांना भेटणे, ही बाबच मुळी अनपेक्षित होती. त्यामुळे दोघांची जवळीक व दोन्हीकडे असलेल्या जटिल समस्यांतून कसा मार्ग काढायचा, याबाबत सामंजस्यही वाढले. परस्परांच्या देशांचा इतिहास, संस्कृती, समाज व दुतर्फा असलेल्या मतभेदांबाबत ते खुलेपणे बोलले. संबंध सुधारावयाचे असतील, तर केवळ नेतृत्वाच्या पातळीवर देवाणघेवाण होऊन चालणार नाही. नव्या संकल्पना, आधुनिक तंत्रज्ञान, नवे उत्पादन व वस्तू यांची व वैचारिक स्तरावर देवाणघेवाण व्हावयास हवी. चीनमध्ये बॉलिवुडचे चित्रपट व योगाभ्यास अतिशय लोकप्रिय आहेत. भारतीय योगाभ्यासाने चीनच्या आरोग्य क्षेत्रातील अनेक प्रश्‍न सोडविले आहेत."" 

बंवावाले यांना भारत व चीनच्या व्यापारातील असंतुलन घटण्याची शक्‍यता दिसत नाही. उलट, वाढण्याची शक्‍यता आहे. त्यांच्या मते, ""बासमती व गैरबासमती तांदूळ, साखर, चहा, सापोता आदी परंपरागत वस्तू आपण निर्यात करतो. त्याचे प्रमाण वाढले, तरी संतुलन होणार नाही. आपण चीनकडून मोबाईल फोन्स , संगणक, लोहखनिज व लोखंड, विद्युत क्षेत्रासाठी लागणारी सामग्री,व अन्य असंख्य उत्पादित वस्तू आयात करतो.. आपल्या निर्यातीपेक्षा त्याचे प्रमाण कितीतरी अधिक आहे. व्यापारी तूट कमी करावयाची असेल, तर फार्मास्युटिकल्स व सॉफ्टवेअर निर्यातीबरोबरच खाजगी व सरकारी प्रयत्नाने चीन्यच्या पर्यटकाला भारताकडे वळविण्याचे काम करावे लागेल."" 

""2020 अखेर आपण 1.5 दशलक्ष चीनी पर्यटकांना भारत दर्शन घडवू शकतो. बिहार गयामधील बौद्ध सर्कीट, देशातील उत्तम वनसृष्टी, समुद्र किनारे, ऐतिहसिक वास्तू, हिमालय, अन्य पर्वतराजी व निसर्गसौंदर्य सारे काही आहे. चार मुख्य शहरांपैकी भारताच्या अन्य शहरांचा झालेला विकास हे ही पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. त्यातून आपल्या पर्यटन व्यवसायाला केवळ चालनाच मिळणार नाही, तर देशातील असंख्य लोकांना आपण रोजगाराची नवीन साधने उपलब्ध करून देऊ शकू. भारताच्या शैक्षणिक क्षेत्रात चीनी विद्यार्थ्याना आकर्षित केले, तर त्यांचा अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलिया या देशांकडे जाणारा ओघ आपण थोपवू शकू. शिवाय चीनी तरूणांना उत्तम इंग्रजी भाषा शिकविण्याचे अमीषही आपण दाखवू शकतो. भारतात अनेक उत्तमोत्तम विद्यापिठे आहेत. चीनी विद्यार्थ्यासाठी तीन वर्षांचा पदवी कार्यक्रमही आखता येईल. आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा संघटनेतही चीनला सामील करून घ्यावे लागेल. जपान व सौदी अरेबियाही या संघटनेच्या सदस्यत्वासाठी उत्सुक आहेत. 

आणखी एका क्षेत्रात चीन भारताचे साह्य करू शकतो. ते म्हणजे, भारतातील रेल्वे स्थानकांचे अत्याधुनिककरण. चीनमधील रेल्वे स्थानके एखाद्या विमानतळासारखी दिसतात. त्यासाठी संयुक वित्तीय रचना, भांडवल उभारणी कशी करता येईल, याचा विचार होणे आवश्‍यक आहे. भारत व चीनने आफगाणिस्तानमध्ये संयुक्त रित्या प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले, तसेच, प्रकल्प अन्य देशात सुरू करण्याबाबत दुतर्फा समझोता झाल्यास दोन्ही देशांचे व्यावहारीक पातळीवरील ऐक्‍य व सामंजस्य वाढेल. 

बंबावाले यांच्यामते, "भारताने तिबेटमधून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा आदी नद्यांवर चीन बांधत असलेल्या धरणांबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. कारण, तेथून प्रवाह वळविला अथवा थांबविला,तर बांग्लादेश व भारताच्या इशान्य राज्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडू शकतो. 

जागतिक पातळीवर सर्वात वेगाने प्रगती करणारे व सर्वाधिक लोकसंख्येचे देश म्हणून भारत व चीन ओळखले जातात. सारांश, दोन्ही देशांत परस्परांच्या सहकार्याच्या क्षेत्रात प्रचंड संधि आहेत. ते करताना विभिन्न राजकीय प्रणाली असूनही देशाचे हितसंबंध राखीत मानवतेचे कल्याण करण्याचे उद्दिष्ट ते साधू शकतील. बंबावाले म्हणाले, "भविष्याकडे पाहता भारत व चीन यांची वाटचाल "सहकार्य व स्पर्धा" या द्विसूत्रीतून होईल, असे मला वाटते."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com