भारताशी अभेद्य संबंध राहतील; अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत

Shaida Mohammad Abdali
Shaida Mohammad Abdali

"भारताशी संबंध कमी करण्याबाबत जगातील कोणत्याही राष्ट्राने (पाकिस्तान) सांगितले, तरी आम्ही त्याकडे लक्ष देणार नाही. ते अभेद्य आहेत, असे आमचे ठाम मत आहे."" असे अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत शायदा महंमद अब्दाली यांनी इथे सांगितले. ""पाकिस्ताने संबंध कमी करण्यास सांगितले, तर आपली प्रतिक्रिया काय असेल,"" असे विचारले असता, त्यांनी वरील उत्तर दिले. 

"इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पॉंडन्टस्‌" या संस्थेबरोबर झालेल्या वार्तालापात ते बोलत होते. ते म्हणाले, की अलीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहीद अब्बासी यांनी अफगाणिस्तानला भेट दिली, तेव्हा पाकिस्तानातून अफगाणिस्तानात अतिरेकी हल्ले होऊ नये, यासाठी पावले टाकले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, प्रत्यक्षात काही फरक पडलेला नाही. उलट, सीमेवरील अतिरेकी टोळ्यांना प्रोत्साहन मिळत असून, वेगवेगळी नावे धारण करून ते हल्ले करीत आहेत. पाकिस्तानातील ओरकझाई टोळ्यातील 70 टक्के अतिरेकी "दाएश (आयसीस)" च्या नावाखाली हल्ले करीत आहेत. 2017 मध्ये अतिरेकी कारवायांचे प्रमाण 14 टक्‍क्‍यांनी वाढले. सुमारे 20 दहशतवादी गट अस्तित्वात आहेत. बडाकशान ते छत्राला या प्रांतात तालिबानच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी सेनेची एकिकृत कमांड स्थापन करण्यावर भर दिला जात आहे. अफगाणिस्तानच्या घटनेच्या चौकटीच तालिबानला सत्तेत सहभाग दिला जाईल,"" असे स्पष्ट करून अब्दाली म्हणाले, की आमच्या जनतेला कोणत्याही परिस्थितीत तालिबानचे पुनरागमन नको आहे. 

ते म्हणाले, "अफगाण सेनेच्या सक्षमीकरणासाठी भारताकडून मोठे साह्य मिळत असून, सुमारे चार हजार अफगाणी सैनिकांना भारताने प्रक्षिण दिले. सध्या एक हजार सैनिक भारतात प्रशिक्षण घेत आहेत. लष्करी सामग्रीही आम्हाला मिळत आहे. दोन्ही देशांदरम्यान स्थापन झालेल्या संयुक्त संरक्षण आयोगाची पहिली बैठक लौकरच काबुलमध्ये होईल. येत्या काही महिन्यात चार एम- आय-35 हेलिकॉप्टर्स भारताकडून अफगाणिस्तानला मिळणार आहेत. तसेच, बेलारूसकडून खरेदी केलेल्या हेलिकॉटर्सच्या संदर्भात भारताने अर्थसाह्य केले. अमेरिकेने "अपाचे" हेलिकॉप्टर्स देऊ केली आहेत. 

"वाघा सीमेमार्फत व्यापार भारत- अफगाणिस्तान दरम्यान व्यापाराचे प्रमाण नगण्य झाले आहे. अफगाणी व्यापारी त्यासाठी उत्सुक नाही. कारण, भारतातून येणाऱ्या मालाला अफगाणिस्तानमध्ये पाठविण्यास जाणूनबुजून उशीर केला जातो. अफगाण-पाकिस्तान व्यापाराचे प्रमाण 2 अब्ज डॉलर्सवरून केवळ 500 दशलक्ष डॉलर्सवर आले आहे, यावरून घसरण ध्यानी यावी. इराणमधील छाबहार बंदराचा भारत व अफगाणिस्तानला मोठा लाभ होतोय. बंदर विकासात पोलंड आदी देशांनीही साह्य देऊ केले आहे. अलीकडे,या बंदरातून भारताने 800 वाघिणीं गहू अफगाणिस्तानला पाठविला. तेथून होणाऱ्या व्यापाराचे प्रमाण 700 दशलक्ष झाले आहे. काबुल व कंदाहारमधून हवाईमार्गे दिल्ली व मुंबईला लक्षावधी रूपयांचा सुकामेवा, केशर आदी अलीकडे धाडण्यात आले. भारताच्या साह्याने अफगाणिस्तानच्या 31 प्रातांतून 116 विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत,"" अशी माहिती त्यांनी दिली. 

"अमृतसर व बाकू येथे हार्ट ऑफ एशियाच्या झालेल्या परिषदेतून दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अनेक पावले पडली,"" असे सांगून अब्दाली म्हणाले, की काबुलमध्ये अलीकडे झालेल्या भारत-अमेरिका -अफगाणिस्तान या त्रिदेशीय समितीतही अफगाणिस्तानचा विकास व वाढता दहशतवाद यावर तपशीलवार चर्चा झाली. ""तालिबानविरूद्ध प्रदीर्घ लढा द्यावा लागेल, असे मत व्यक्त करण्यात आले. त्यादृष्टीने, 2018 ते 2022 या चार वर्षांसाठी एक योजना आखण्यात आली आहे. योजनेनुसार, अफगाणिस्तानच्या वायुदलाची क्षमता चौपट, खास सेनेची संख्या दुप्पट करून लष्कराचे ऐक्‍य व आधुनिकीकरण साधले जाईल. अफगाणिस्तानच्या सेनेतील अनेक ज्येष्ठ जनरल्स सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी आलेल्या तरूण सेनाधिकाऱ्यांना भारतात प्रशिक्षण दिले जात आहे. 

"तुर्कमेनिस्तान- अफगाणिस्तान -पाकिस्तान - भारत"" या नैसर्गिक वायू वाहून नेणाऱ्या पाईपलाईन (तापी) चे बांधकाम (1814 कि.मी) सुरू असून, 2019 पर्यत ती सुरू होईल, असा अंदाज आहे. अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा वेग 3 टक्के आहे," असे सांगून एका प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले, की रशियाने पाकिस्तानशी जवळीक वाढविली असली, तरी भारत व मित्रदेश परस्पर सहकार्याच्या भूमिकेपासून विचलीत होणार नाहीत. अफगाणिस्तानच्या विकासात भारत महत्वाची भूमिका बजावित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com