ग्लोबल टाईम्स, दलाई लामा आणि चीन 

सोमवार, 14 ऑगस्ट 2017

एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या विद्यमाने 9 ऑगस्ट रोजी झालेल्या समारभात राजेंद्र माथूर स्मृतिव्याख्यान देताना तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी डोकलममधील संघर्षग्रस्त परिस्थितीबाबत बोलताना "हिंदी चीनी भाई भाई"ची पुनरावृत्ती करण्याशिवाय मार्ग नाही, तसेच, दोन्ही देश एकमेकांना नेस्तनाबूत करू शकणार नाही."" असे सांगितले.

बीजिंगमधून प्रसिद्ध होणारे इंग्रजी दैनिक "ग्लोबल टाईम्स" गेले अनेक दिवस भारतावर आग ओतत आहे. त्यातील संपादकीय, लेख व बातम्यातून डोकलम ट्रायजंक्‍शनबाबत भारतावर प्रक्षोभक टीका होतेय. तरी भारताने संयम व आशा सोडलेली नाही. "शिष्टाचाराच्या मार्गातून प्रश्‍न सोडविला जाईल," असे वारंवार सरकारतर्फे सांगण्यात येते. सीमित युद्ध झाल्यास काय परिस्थिती असेल, कसा हल्ला होईल, पायदळ, वायुदल कसा हल्ला चढवू शकते, व चीन व भारत कोणकोणत्या परिसरात परस्परांच्या लष्कराची कोंडी करू शकतात, याचे विश्‍लेषण लष्करी तज्ञ खुलेपणे वेगवेगळ्या वाहिन्यांवर करीत आहेत. दरम्यान, शांघायमधील दैनिकाच्या प्रतिनिधीबरोबर काल भेट झाली. तेव्हा त्यानेही "ग्लोबल टाईम्स"मधून होणाऱ्या टीकेचा उल्लेख केला. तो म्हणाला,"" टॅब्लॉइड आकाराचे हे दैनिक इंग्रजी व चीनी भाषेतून प्रसिद्ध होत असून, त्याचे अंक घेऊन लोक चवीने वाचताहेत. त्यामुळे नोकरदार वर्ग व तरूणात भारताविषयी दुराग्रह निर्माण होतोय. विशेष म्हणजे, दोन्ही देशांनी एकमेकाबरोबर मैत्री वाढविण्याचा गेले पंधरा ते वीस वर्षे जाणीवपूर्वक प्रयत्न केला, तो डोकलमबाबत झालेल्या मतभेदांवरून संपुष्टात येणार काय,अशी शंका वाटू लागली आहे. पण, "ग्लोबल टाईम्स" चीनमधील सामान्य लोकांच्या वाचनात येत नाही, त्यामुळे चीनी जनतेत आजही भारताविषयी आत्मियता आहे. युद्ध दोन्ही देशांना परवडणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी चीनबरोबर मैत्री वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. तथापि, दलाई लामा यांची वक्तव्ये व हालचाली यामुळे चीनी नेत्यात अस्वस्थता आहे, हे खरे."

आणखी एक माहिती देताना त्याने सांगितले, की काही महिन्यांपूर्वी एअर इंडियाने परदेशी पत्रकारांना भारतातील प्रेक्षणीय स्थळे दाखविण्यासाठी नेले होते. त्यात चीनच्या "शिनहुआ" या प्रमुख वृत्तसंस्थेच्या दोन महिला पत्रकार होत्या. दौऱ्या दरम्यान, पत्रकारांनी म्हैसूरला भेट दिली. तेथे प्रसिद्ध वृंदावन उद्यान, राजमहाल आदी पाहिले. म्हैसूर व बंगलोर नजिक तिबेटहून आलेल्या शरणार्थींच्या छावण्या आहेत. म्हैसूरमध्ये त्यांचे (तिबेटींचे) एक सुंदर देवालय आहे. ते पाहाण्यास पत्रकार गेले. तेथील छायाचित्रेही "शिनहुआ"च्या महिला पत्रकारांनी टिपली. याची माहिती "शिनहुआ"ला कळताच, त्यांना भारतातून माघारी बोलाविण्यात आले. तिबेटी शरणार्थी ही चीनच्या दृष्टीने संवेदनशील बाब आहे. न जाणो, चीनी पत्रकार तिबेटी शरणार्थींच्या संपर्कात आले, तर त्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडायचा. अथवा, शरणार्थींबाबत पत्रकारांच्या मनात सहानुभूती निर्माण व्हावयाची. म्हणूनच, भारतातील चीनी पत्रकारांच्या हालचालींवर चीन नजर ठेवून असतो. चीनमधील वृत्तपत्रे, वृत्तसंस्था व रेडिओ यांचे मिळून भारतात दहा पत्रकार आहेत. 

या ठिकाणी आणखी एक गोष्ट आठवते. 1979 मध्ये पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत युनियनच्या सरकारने मला सांस्कृतिक संबंधांच्या अंतर्गत सोव्हिएत युनियनला भेट देण्यासाठी आमंत्रित केले होते. जुलै 1980 मध्ये सोव्हिएत युनियनमध्ये ऑलिंपिक क्रीडास्पर्धा व्हावयाच्या होत्या. मी ऑक्‍टोबर 1979मध्ये मॉस्कोला गेलो. त्या दिवसात सोव्हिएत सरकारने प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते व सरकारचे टीकाकार आंद्रे साखारोव व पत्नी येलेना बॉनर यांना त्यांच्याच निवासस्थानी स्थानबद्ध करून ठेवले होते. लिओनिड ब्रेझनेव्ह अध्यक्ष होते. साखारोव्ह यांच्या निवासस्थानावरून माझी ये-जा चालू असायची. परंतु, घराभोवती सशस्त्र सैनिकांचा पहारा असायचा. ऑलिम्पिकच्या निमित्ताने जगभरातील पत्रकार मॉस्कोत येणार व त्यापैकी काही साखारोव्ह यांना भेटण्याचा निश्‍चित प्रयत्न करणार. मुलाखत देण्यास मुभा दिली, तर ब्रेझनेव्ह सरकार, जाचक कम्युनिस्ट सत्ता, एकपक्षीय हुकूमशाही व सोव्हिएत युनियनमधील सामान्य लोकांची काय स्थिती आहे, हे साखारोव बोलणार व त्याचा बोभाटा जगभर होईल, याची कल्पना नेते व केजिबी या गुप्तचर संघटनेला असल्याने सरकारने ""साखारोव्ह कुणीही पाश्‍चात्य पत्रकार भेटू शकणार नाही,"" याची खबरदारी घेतली होती. बव्हंशी साम्यवादी व हुकूमशाही प्रणाली असलेल्या देशात पत्रकारितेच्या संदर्भात हीच स्थिती आहे. चीनमध्ये सारी वृत्तपत्रे व वृत्तसंस्था सरकारी मालकीची असल्याने त्यातील कामकाजाचे नियम ठरलेले असतात. काही वर्षांपूर्वी चीनला दिलेल्या भेटीत "पीपल्स डेली"च्या संपादकांबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी स्पष्ट सांगितले, की वृत्तपत्रात काय छापणार आहे व काय छापलेले आहे, याची माहिती सरकारला द्यावी लागते. धोरणाबाबत सरकारकडून मार्गदर्शन मिळते. 

एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या विद्यमाने 9 ऑगस्ट रोजी झालेल्या समारभात राजेंद्र माथूर स्मृतिव्याख्यान देताना तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी डोकलममधील संघर्षग्रस्त परिस्थितीबाबत बोलताना "हिंदी चीनी भाई भाई"ची पुनरावृत्ती करण्याशिवाय मार्ग नाही, तसेच, दोन्ही देश एकमेकांना नेस्तनाबूत करू शकणार नाही."" असे सांगितले. तथापि, लष्करी तज्ञांच्या मते, नजिकच्या भविष्यात संबंधांची वाटचाल त्याकडे होण्याची सुतराम शक्‍यता नाही. खुद्द दलाई लामा यांना आता ल्हासाला जावेसे वाटत नाही. विनोदाने ते म्हणाले, ""ल्हासाचं तापमान अतिंथंड. त्याचा डोक्‍यावर "परिणाम" होतो. त्यापेक्षा भारतातील उकाड्यात राहिलेलं बरं. शिवाय, इथे स्वातंत्र्य आहे. भारतात येऊन अर्धशतक होतय, येथील हजारो वर्षांची परंपरा, नालंदा परंपरेचे मला अतिशय आकर्षण आहे. आय ऍम ए सन ऑफ इंडिया."" स्मितहास्य करीत ते म्हणाले, की आम्ही लोकशाही अनुसरली आहे. त्या दृष्टीने आम्ही चीनपेक्षाही (प्रगतीशील) पुढे आहोत. ""काय सांगावे, चीन आमचे अनुकरण करील!"" ""सध्या सुमारे दहा हजार तिबेटी भिख्खू भारताचे प्राचीन ज्ञान व विज्ञान यांचे अध्ययन करीत असून, चीनमध्ये देखील चारशे दशलक्ष नागरीक बौद्धधर्मिय आहेत, '' अशी माहिती त्यांनी दिली. चीनमधून अधिकाधिक विद्यार्थ्यांना भारतात शिक्षणासाठी बोलाविण्याचा सल्ला दिला. "तसे केल्यास लोकशाहीचे महत्व त्यांना कळेल," असाही संकेत त्यांनी दिला. "भगवान गौतमी बुद्धाशी संबंधित प्रार्थनास्थळांना भेट देण्यासाठी चिनी पर्यंटकांना प्रोत्साहन द्यावे," अशीही त्यांची सूचना. "गेल्या काही वर्षात चीन बदललाय,"" असे सांगून दलाई लामा म्हणाले, की चीनमधील दुकाने, रेस्टॉरन्ट्‌समधून चीनी माणसं नेत्यांवर टीका करायलाही हल्ली धजावू लागलेत, ही समाधानाची बाब होय.

Web Title: Vijay Naik writes about Global Times, Dalai Lama and China