लोकोत्तर दलाई लामा

विजय नाईक
सोमवार, 8 मे 2017

भारत सरकारनेही मला अरूणाचल भेटीस मज्जाव केला नव्हता. पण, मी तिथं असताना चीनी सैनिकांनी हल्ला केला असता, तर मात्र मला माघारी फिरावे लागले असते. तिबेटी लोकांना बौद्धधर्म हा खऱ्या स्वातंत्र्याचे प्रतीक वाटतो. तिबेट चीनचा भाग आहे, हे मी मान्य करतो. पण आम्हाला हवी आहे, ती स्वायत्तता व बौद्ध धर्माचे रक्षण.

तिबेटचे धर्मगुरू तेन्झिन गॅत्सो उर्फ दलाई लामा हे एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे. तिबेटचे ते चौदावे दलाई लामा. 1935 मध्ये जन्मलेले दलाई लामा 82 वर्षांचे आहेत. त्यांचा पीतवर्णीय गोरा चेहरा अतिशय तुकतुकीत तर आहेच, परंतु त्यावर कायमची प्रसन्नता व स्मितहास्य झळकलेले असते. 22 वर्षे वय असताना 58 वर्षांपूर्वी ते भारतात आले. चीनच्या दृष्टीने वादग्रस्त असलेल्या अरूणाचल प्रदेशला अलीकडे दिलेल्या भेटीनंतर ते दिल्लीत आले होते.

"भारताने तिबेटमध्ये भूराजकीय, आर्थिक व सांस्कृतिकदृष्ट्या सक्रीय राहिले पाहिजे"" अशी भूमिका जनसंघाचे नेते, माजी संसद सदस्य व तिबेटचे समर्थक कै मनोहरलाल सोंधी आग्रहाने मांडायचे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त दलाई लामा यांना 27 एप्रिल रोजी "इंडिया इंटरनॅशनल सेंटर"मध्ये झालेल्या एका समारंभात 2016 चे "प्रोफेसर मनोहरलाल सोंधी प्राईज फॉर इंटरनॅशनल पॉलिटिक्‍स" बहाल करण्यात आले. या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी व माजी परराष्ट्र सचिव ललित मानसिंग उपस्थित होते.

त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी अनेक विषयांचा धांडोळा घेतला. मुद्दे स्पष्ट केले. ते उद्बोधक आहेत. अरूणाचल भेटीबाबत बोलताना ते म्हणाले, "भारत सरकारनेही मला अरूणाचल भेटीस मज्जाव केला नव्हता. पण, मी तिथं असताना चीनी सैनिकांनी हल्ला केला असता, तर मात्र मला माघारी फिरावे लागले असते. तिबेटी लोकांना बौद्धधर्म हा खऱ्या स्वातंत्र्याचे प्रतीक वाटतो. तिबेट चीनचा भाग आहे, हे मी मान्य करतो. पण आम्हाला हवी आहे, ती स्वायत्तता व बौद्ध धर्माचे रक्षण. आज 400 दशलक्ष चीनी लोक बुद्धधर्माचे अनुयायी आहेत. तिबेटमधील जनता आजही माझ्याबरोबर आहे. चीनी अधिकारी तिबेटी लोकांना त्रास देतात.त्यांना न्याय मिळत नाही. चीनमधील जहालमतवादी मला "ट्रबल मेकर" म्हणतात. चीन व उत्तर कोरिया अद्यापही डोळ्यावर झापड टाकलेले देश आहेत. पण, प्रदीर्घ काळ त्यांना तसे राहता येणार नाही."" दलाई लामा स्वतःला मार्क्‍सवादी म्हणतात. ""मार्क्‍सवादात कामगारवर्गाबाबत कणव आढळते. मार्क्‍सवाद व समाजवाद दोन्ही चांगले. पण, त्यांचा विपर्यास केला रशियाच्या लेनिननं."

पंधराव्या दलाई लामाच्या संभाव्य अवताराबाबत बोलताना स्मितहास्य करीत ते म्हणाले, "काही वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या भेटीवर असताना "न्यूयॉर्क टाईम्स"च्या वार्ताहराने मला तोच प्रश्‍न विचारला, तेव्हा चष्मा काढून मी त्याला म्हणालो, "माझ्या चेहऱ्याकडे पाहून सांग, मी लौकरच स्वर्गवासी होणार, असं तुला खरच वाटतय का?" त्यावर तो हसत उत्तरला, "नाही नाही." पुन्हा त्याने प्रश्‍न विचारला नाही."" स्मितहास्य करीत त्यांनी पुस्ती जोडली-"आय विल लीव्ह लॉंगर दॅन चायनीज कम्युनिझम!" "दलाई लामाचे पद सुरू ठेवायचे की नाही, याचा निर्णय तिबेटी जनतेला घ्यावयाचा आहे. लामा प्रथा कधी उपयुक्त असते, तर कधी जाचक..2001 मध्ये मी निवृत्तीची प्रक्रिया सुरू केली व 2011 मध्ये पूर्णतःनिवृत्त झालो. 5 व्या दलाई लामापासून सुरू झालेली "दलाई लामा प्रथा" माझ्यादृष्टीने संपुष्टात आली आहे. ती कालबाह्य झाली आहे." चीनने नेमलेल्या पंचन लामाबाबत ते म्हणतात, " काही जणांच्या मते ते जिवंत आहेत. पण, मला त्याबाबत काही ठाऊक नाही."

जागतिक शांततेबाबत ते चिंतित आहेत. कोणत्याही धर्माचे अधिष्ठान दया, अनुकंपा, मानवता हे आहे. परंतु, 20 व्या शतकात पाहावे तेथे धर्माच्या नावाखाली हिंसाचार, हत्या सुरू आहे. विद्यमान पिढीने खूप समस्या निर्माण केल्या आहेत. जागतिक वातावरणात काही तरी बिनसलय. भविष्यात आपल्याला काय हवे आहे, याची स्पष्ट दृष्टी आपल्याला हवी. आशावाद व निर्णयक्षमता यांची गरज आहे. माझ्या हयातीत कदाचित हे साध्य होणार नाही. पण 21 वे शतक कसे असावे, याचा विचार तरूण पिढीला करावा लागेल. त्यांच्या मते जागतिक शांततेत सर्वाधिक भर टाकली, ती युरोपीय महासंघाने. कारण, त्यांतील राष्ट्रांना दोन जागतिक युद्धांची झळ बसली. त्यामुळे त्यांना शांततेचे महत्व कळले. भारताने प्राचीन विद्याभ्यासाचे पुनरअध्ययन करावयास हवे, जातीव्यवस्थेला तिलांजली द्यावी. नालंदा परंपरेचे पुनरूज्जीवन करावे, ऑस्ट्रेलियाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करुन समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याचे प्रयत्न करावयास हवे. तर सहारा वाळवंटातून सौरऊर्जेचे प्रकल्प उभारून अनेक देशांच्या विजेची गरज भागविता येईल," असे ते सुचवितात.

दलाई लामा रोज रात्री तीन वाजता उठतात. नंतर तब्बल पाच तास ध्यान करतात. विनोदाने ते म्हणतात, "दॅट शार्पन्स माय माईंड, सो दॅट आय कॅन "चीट" मोअर पीपल (हसतात)" मानवी बुद्धीची अधिष्ठान आहे मनःशांति. शिवाय कोणत्याही गोष्टीचे विश्‍लेषण करावयाचे, तर मन व डोकं ठिकाणावर हवं."

दलाई लामा यांना काही वर्षांपूर्वी मी धर्मशाला येथे भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी सांगितले होते, की आजवर भारत व चीनमध्ये तिबेट हे बफर राष्ट्र होते. परंतु, चीनने केलेल्या आक्रमणानंतर परिस्थिती बदलली. चीनने ल्हासापर्यंत रेल्वे आणली असून, त्यातून चीनचे सैन्य केव्हाही भारताच्या सीमेवर येऊ शकते. आम्हाला आमच्या "भन" या धर्माचे संरक्षण हवे आहे. भारताने दिलेल्या आश्रयाबद्दल ते आदराने बोलतात. भारताचे ऋण मानतात. तसेच, "चीनविरूद्ध सशस्त्र उठाव केला पाहिजे," हा भारतातील तिबेटी युवकांचा आग्रह त्यांना मान्य नाही कारण तो प्रॅक्‍टिकल नाही, असे ते मानतात. त्यांचा सारा भर शांततामय मार्गाने समस्या सोडविण्यावर आहे. बौद्धधर्मातील अहिंसेच्या तत्वावर त्यांची श्रद्धा आहे. तो मार्ग त्यांनी सोडलेला नाही.

या प्रसंगी अरूण शौरी यांनी त्यांच्या गळ्यात शाल घातली. "पण ती मोठी आहे, तेव्हा मला एकट्याला नको," असे म्हणत दलाई लामा यांनी ती शेजारी उभे असलेले अरूण शौरी व ललित मानसिंग यांच्याही खांद्यावर टाकली. शौरीही एक चपखल वाक्‍य बोलून गेले,"दलाई लामा यांच्याकडे कोणतेही शस्त्र नाही, आक्रमकता नाही व शांततेच्या मार्गाने त्यांचा संघर्ष चालू आहे, तरीही चीनसारख्या लष्करीदृष्ट्या बलाढ्य देशाने त्यांना घाबरावे, हे मात्र समजत नाही."

Web Title: Vijay Naik writes about Tibetan spiritual leader Dalai Lama