खपणारी पुस्तकं (विजय तरवडे)

विजय तरवडे vijaytarawade@gmail.com
रविवार, 20 मे 2018

सत्तरच्या दशकात दरमहा दीडेक डझन रहस्यकथा प्रकाशित होत असत. न्यूजप्रिंट कागदावर छापल्या जाणाऱ्या सरासरी 96 ते 144 पानांच्या या पुस्तकांचं कुठंही परीक्षण किंवा जाहिरात येत नसे. या पुस्तकांची आवृत्ती एका महिन्यात विकली जाई.

सत्तरच्या दशकात दरमहा दीडेक डझन रहस्यकथा प्रकाशित होत असत. न्यूजप्रिंट कागदावर छापल्या जाणाऱ्या सरासरी 96 ते 144 पानांच्या या पुस्तकांचं कुठंही परीक्षण किंवा जाहिरात येत नसे. या पुस्तकांची आवृत्ती एका महिन्यात विकली जाई.

प्रसारमाध्यमांचा, समीक्षकांचा, ग्रंथालयांचा, सरकारी अनुदानांचा-योजनांचा आधार असूनही व्हाईट प्रिंट कागदावर छापली जाणारी ललित पुस्तकं या वेगानं खपत नसत. नवं पुस्तक बाजारात आलं की पुण्या-मुंबईतल्या प्रमुख दुकानांत सरासरी तीनशे प्रती "ऑन सेल' अटीवर ठेवल्या जात. तीन ते सहा महिन्यांत या प्रती विकल्या जाऊन प्रकाशकांना पैसे मिळत. पुस्तकाच्या छापील किमतीवर दुकानदारांना 33 टक्के कमिशन दिलं जाई. लेखक मोठा असेल तर त्याच्या पुस्तकाच्या तीनशेहून जास्त प्रती खपत. "पुस्तकं महाग आहेत म्हणून खपत नाहीत,' असा जप मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. आम्ही शाळेत होतो तेव्हाची गोष्ट..."रा. ज. देशमुख आणि कंपनी'नं वि. स. खांडेकरांच्या "ययाती' आणि "अमृतवेल' या कादंबऱ्यांच्या स्वस्त आवृत्त्या प्रकाशित केल्या होत्या. "ययाती'च्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटलं होतं ः "मराठी वाचकाला "ययाती' एक रुपयात द्यावी, असं माझं स्वप्न होतं.' ना. सी. फडके आणि दत्त रघुनाथ कवठेकर यांच्या दोन कादंबऱ्यांचा संच, समग्र राम गणेश गडकरी वगैरे पुस्तकं सवलतीच्या दरात उपलब्ध होती. सवलतीच्या दरात म्हणजे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी वाचकांनी सवलतीची किंमत दुकानात किंवा प्रकाशकांकडं देऊन आपली प्रत राखून ठेवायची. या पद्धतीला वाचकांचा प्रतिसाद उत्तम असायचा. आधीच नोंदणी झालेली असल्यानं पुस्तक प्रकाशित झालं की त्याची जवळपास सगळी आवृत्ती संपायची. उरलेल्या प्रती छापील किमतीनुसार विकल्या जात. बालगंधर्व रंगमंदिरात ना. सी. फडके यांचं एक व्याख्यान होतं. व्याख्यानाला तिकीट नव्हतं; पण राम गणेश गडकरी यांच्या "संगीत एकच प्याला' या नाटकाची स्वस्त आवृत्ती (किंमत एक रुपया) काउंटरवर होती. एक प्रत विकत घेतली की ती डोअर कीपरला दाखवून आत प्रवेश मिळत होता. काही वर्षांपूर्वी हॅरी पॉटरच्या कथांची पुस्तकं घेण्यासाठी बालकांनी आणि पालकांनी दुकानांसमोर रांगा लावल्याच्या बातम्या वाचल्या होत्या. तसं दृश्‍य मराठी पुस्तकांसाठी पाहिल्याचं आठवत नाही. मात्र, सन 1977 किंवा 1978 मध्ये बाबा कदम यांच्या तीन कादंबऱ्या एकदम प्रकाशित होणार होत्या. जवळपास सगळ्या दैनिकांच्या पहिल्या पानांवर खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात मोठ्या जाहिराती झळकल्या होत्या. प्रकाशनाच्या दिवशी अप्पा बळवंत चौकातल्या पुस्तकविक्रीच्या एका प्रसिद्ध दुकानासमोरच्या रस्त्यावर मोठी रांग होती. रांगेत किरकोळ विक्रेते आणि वाचनालयांचे चालक मोठाल्या पिशव्या घेऊन उभे होते.

"सवलतीच्या दरात बुकिंग' या प्रकाराची नंतर लाटच आली. त्याचं कारण वेगळं होतं. अनेक दुकानदार विक्रीसाठी ठेवलेल्या पुस्तकांचा हिशेब आणि खपलेल्या पुस्तकांचे पैसे देताना हेलपाटे मारायला लावत. सवलतयोजनेत मात्र वाचकांनी दुकानात आधीच पैसे भरलेले असत. ते पैसे दिल्याशिवाय प्रकाशक त्यांना पुस्तकांच्या प्रती देत नसे. त्यामुळे वसुली सोपी होई. एरवी दुकानदार पुस्तकांच्या विक्रीवर 33 टक्के कमिशन घेत. सवलतयोजना असेल तर सवलतीच्या किमतीवर 25 टक्के कमिशनची प्रथा होती.

कधी कधी प्रकाशक भव्य योजना आखायचे. योजना प्रामाणिक असली तरी घोटाळा होई. एका चांगल्या प्रकाशन संस्थेनं हजारभर पानांची भव्य ऐतिहासिक कादंबरी प्रकाशित करायला घेतली. कादंबरीच्या मुखपृष्ठावर ख्यातनाम परदेशी चित्रकाराचं पेंटिंग वगैरे. बालगंधर्वांच्या नाटकाप्रमाणे सगळा भव्य मामला.

मोठ्या प्रमाणावर प्रतींची मागणी वाचकांकडून नोंदवली गेली; पण छपाई रखडली. नियोजित तारखेला पुस्तक प्रकाशित झालं नाही. काही वाचकांनी कुरकुर केली; पण खूप मोठी तक्रार अशी काही झाली नाही. कादंबरी किंचित उशिरा; पण मोठ्या दिमाखात प्रकाशित झाल्यावर प्रकाशन संस्थेनं विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्या वेळी संस्थेनं दिलेला खुलासा मजेदार होता. त्यांच्या खुलाशानुसार, छपाई सुरू करताना बाजारात 30 बाय 40 या आकाराचा मोठा कागद उपलब्ध होता. मात्र, मुद्रकानं 20 बाय 30 या आकारातल्या छोट्या कागदाचा आग्रह धरला. तो कागद मिळेपर्यंत सहा महिने उशीर झाला.

आता गंमत अशी की 30 बाय 40 कागदाची घडी करून दोन तुकडे केले की ते 20 बाय 30 या आकाराचे होतात. प्रकाशकांनी बाजारातून मोठा कागद आणून तो मध्ये कापायला हरकत नव्हती; पण हे स्पष्टीकरणही वाचकांनी स्वीकारलं. कारण, पुस्तक अतिशय दर्जेदार होतं.

त्या वेळी साधारण पुस्तकं खपायला वेळ लागायचा. काही प्रकाशक युक्ती करत. पुस्तक छापून बाइंडिंग केल्यावर किंमत वगैरे तपशील असलेलं शीर्षकाचं पान वेगळं छापून त्यावर चिकटवायची युक्ती केली जायची. हजार पुस्तकं छापली की त्यातल्या 300 प्रतींवर हे पान चिकटवून त्या बाजारात ठेवल्या जायच्या. त्या प्रती संपल्यावर पुन्हा नवं शीर्षकपान छापून त्यावर "दुसरी आवृत्ती' असं म्हणून उरलेल्या प्रतींवर ते पान चिकटवून नव्या वाढीव किमतीत प्रती विकायला ठेवल्या जायच्या. "सहा महिन्यांत पहिली आवृत्ती संपली म्हणजे पुस्तक थोर आहे,' असा ग्राहकांचा गैरसमज होत असे. काही प्रकाशक न खपलेल्या पुस्तकांची मुखपृष्ठं आणि नावंदेखील बदलून विकायला ठेवत. खासगी नोकरीत असलेल्या माझ्या एका मित्राची आई हौशी लेखिका होती. त्यानं नोकरी सोडून प्रकाशन सुरू केलं. लगेच आईनं त्याला हजारपानी कादंबरी लिहून दिली! आईचीच कादंबरी असल्यानं ती नाकारणं शक्‍य नव्हतं. कादंबरी छापल्यावर त्यानं पहिल्या 100 प्रती कशाबशा विकल्या आणि उरलेल्या प्रतींवर "दुसरी आवृत्ती' असं छापून त्या विकायला पाठवल्या. आईला वाटलं की आपली कादंबरी सहा महिन्यांत संपली म्हणजे आपण भलत्याच लोकप्रिय झालोत! आईनं नवीन कादंबरी लिहायला घेतली. मित्रानं प्रकाशनसंस्था तातडीनं बंद केली आणि आईला आवरलं. पुन्हा तो नोकरीच्या ठिकाणी रुजू झाला...

Web Title: vijay tarawade write article in saptarang