...दिसतो कसा आननी! (विजय तरवडे)

विजय तरवडे vijaytarawade@gmail.com
रविवार, 3 जून 2018

लेखक आणि वाचक यांची पहिली भेट लेखकाच्या वाङ्मयात होते. तिथं सूर जुळले तर "तो दिसतो कसा आननी?' हे कुतूहल जागं होतं. प्रत्यक्ष भेटीत काही विपरीत न घडलं तर वाचकाकडून लेखकावर प्रेमाचा वर्षाव सुरू होतो. लेखकाकडून या प्रेमाला कसा प्रतिसाद मिळतो यावर त्या वाचकाच्या कुटुंबातल्या वाचनसंस्कृतीचं यशापयश अवलंबून असतं. "लोणावळा टाइम्स' या साप्ताहिकाचे संपादक वा. मो. बांदेकर दरवर्षी "लोभस' दिवाळी अंक प्रकाशित करत. अंकासाठी लेखन करणाऱ्या सर्व लेखकांना-चित्रकारांना लोणावळा इथं दोन दिवसांसाठी सहकुटुंब घेऊन जात.

लेखक आणि वाचक यांची पहिली भेट लेखकाच्या वाङ्मयात होते. तिथं सूर जुळले तर "तो दिसतो कसा आननी?' हे कुतूहल जागं होतं. प्रत्यक्ष भेटीत काही विपरीत न घडलं तर वाचकाकडून लेखकावर प्रेमाचा वर्षाव सुरू होतो. लेखकाकडून या प्रेमाला कसा प्रतिसाद मिळतो यावर त्या वाचकाच्या कुटुंबातल्या वाचनसंस्कृतीचं यशापयश अवलंबून असतं. "लोणावळा टाइम्स' या साप्ताहिकाचे संपादक वा. मो. बांदेकर दरवर्षी "लोभस' दिवाळी अंक प्रकाशित करत. अंकासाठी लेखन करणाऱ्या सर्व लेखकांना-चित्रकारांना लोणावळा इथं दोन दिवसांसाठी सहकुटुंब घेऊन जात.
उच्च दर्जाच्या हॉटेलातल्या झकास खोल्या, उत्तम भोजन आणि लोणावळ्यात फेरफटका असा कार्यक्रम असे. दोन वर्षं त्यांच्या आतिथ्याचा लाभ मी घेतला. एकदा माझ्याकडून एक भलताच प्रमाद घडला. ह. मो. मराठे यांच्याशी गप्पा मारताना मी कौतुकानं या उपक्रमाबद्दल बोललो. उद्देश हा की "किर्लोस्कर'मध्ये त्याला प्रसिद्धी मिळावी; पण माझं बोलणं ऐकून हमो चिडल्यासारखे झाले. त्यांनी मला उपक्रमाबद्दल खोदून खोदून विचारलं. प्रतिक्रिया काहीच दिली नाही. नंतर समजलं की हमोंनीही त्या वर्षी "लोभस'साठी लेखन केलं होतं आणि कसं कोण जाणे त्यांना आमंत्रण द्यायचं राहून गेलं होतं. बांदेकरांनी नंतर त्यांची कशी समजूत काढली ते समजलं नाही. बांदेकरांमुळंच लोणावळ्याच्या संमेलनात शरद देशपांडे या साहित्यप्रेमीशी ओळख झाली आणि स्नेह जडला. शरदराव त्यांच्या "सेतू'च्या जाहिरातींसाठी कॉपीरायटिंग करत. त्या मजकुरावर पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे यांच्यावरच्या प्रेमाची मुद्रा स्पष्ट दिसते. पुलंवर शरदरावांचा विशेष जीव. ऐंशीच्या दशकात त्यांच्या मनात एक कल्पना आली. एक वर्षभर आपल्या घरी दरमहा एका आवडत्या साहित्यिकाला जेवायला सपत्नीक बोलावून त्यांचा आदरसत्कार करायचा. वर्षअखेरीस म्हणजे शेवटच्या महिन्यात पुलंना आणि सुनीताबाईंना बोलवायचं. पहिल्या महिन्यात त्यांनी श्री. ज. जोशी यांना आमंत्रित केलं होतं. तो प्रकल्प शेवटपर्यंत पोचला की नाही हे समजलं नाही. त्या काळात पुण्याच्या पश्‍चिम भागातले काही मराठी दुकानदार आपल्या व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी आणि स्नेहबंध जोडण्यासाठी नियमितपणे एकत्र जमत. कधी एकमेकांच्या घरी किंवा कधी एखाद्या भोजनगृहात. यात मामा हसबनीस, एल. डी. भावे, ए. व्ही. भट, सुरेश प्रभुणे, अरविंद पटवर्धन, अरुण जोगळेकर, दिनशा साठे, सुधाकर जोशी आदी मंडळी असत. त्यांच्या समूहाचं नाव होतं "सप्तर्षी'. सप्तर्षी समूहानं दरमहा एका साहित्यिकाला आपल्या संमेलनात भोजनार्थ आमंत्रित करायला सुरवात केली. त्यानुसार मंगला गोडबोले, रमेश मंत्री, रवींद्र पिंगे आदी साहित्यिकांना निमंत्रित केलं गेलं. "सप्तर्षी'च्या अशा एका मासिक संमेलनात राम शेवाळकर आणि शान्ता शेळके आल्या होत्या. शान्ताबाईंना सोबत म्हणून मीही निमंत्रित होतो.पिंगे यांच्या एका चाहत्याच्या घरी लग्न होतं. लग्नात आलेल्या पाहुण्यांना परतीचे आहेर देण्यासाठी त्या चाहत्यानं "देवाघरचा पाऊस' या पिंगे यांच्या पुस्तकाच्या 300 प्रती विकत घेतल्या होत्या. लेखकावरचं प्रेम त्या चाहत्यानं अशा रीतीनं व्यक्त केलं होतं. सत्तरच्या दशकातली एका मित्राची हकीकत आहे. आपण त्याला अनिल म्हणू या. तो नोकरीच्या शोधात होता. नोकरी मिळत नव्हती. वेळ घालवण्यासाठी तो वाचन करायचा. त्या हताश मनःस्थितीत ह. मो. मराठे यांची "निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' ही कादंबरी त्याला अतिशय आवडली. अनेक पारायणं करून त्यानं ती जवळपास मुखोद्गतच केली. नंतर हमोंना पोस्टकार्ड पाठवलं. हमोंनी भारावून जाऊन त्याला एक मोठं पत्र पाठवलं व चहाला बोलावलं. अनिलबरोबर मी सोबत म्हणून गेलो. त्यानिमित्तानं हमोंशी ओळख झाली. हमोंनी त्याला कादंबरीतले अधलेमधले परिच्छेद विचारले आणि खात्री करून घेतली. एका हॉटेलात आम्ही चहा घेतला. घरी परतताना अनिल जणू काही हवेतच तरंगत होता. काही दिवसांनी त्याला स्वतःला लेखन करावंसं वाटलं. त्यानं आपल्या कथा हमोंना पाठवल्या. त्यांनी साभार परत केल्या; पण इतरत्र त्या प्रकाशित झाल्या. पुढं अनिलला समजलं की सुहास शिरवळकरांच्या संग्रहातला एक जुना बुलवर्कर (त्या काळी लोकप्रिय असलेलं व्यायामाचं उपकरण) विक्रीसाठी आहे. शिरवळकरांच्या रहस्यकथांविषयी अनिलला आकर्षण असल्यानं त्यानं पुन्हा मला बरोबर घेतलं आणि आम्ही शिरवळकरांच्या वाड्यात गेलो. बुलवर्कर विकत घेतला. अनिलनं दोन रहस्यकथा लिहून शिरवळकरांकडं अभिप्रायासाठी दिल्या. प्रतिकूल अभिप्राय मिळाल्यावर तो निराश झाला. नंतर काही वर्षं त्यानं विविध पुस्तकविक्रेत्यांकडं नोकऱ्या केल्या. इंटरनेटचा उपयोग शिकला. "रूपांतरित' रहस्यकथा, थरारकथा लिहू लागला. स्वतः खर्च करून छापू लागला. पुस्तकविक्रीचं तंत्र ठाऊक असल्यानं यशस्वी रहस्यकथाकार बनला.

गंमत म्हणजे, त्याचं इंग्लिश भाषेवर प्रभुत्व नाही. इंग्लिश बेस्ट सेलर्सच्या मलपृष्ठांवर असलेला मजकूर तो शब्दकोशाच्या साह्यानं कसाबसा वाचतो. पुस्तक थोडंसं चाळतो. कथानक आणि त्यातल्या पताकास्थानाचा (climax) साधारण अंदाज आला, की स्वतःच्या कल्पनेनं रंग भरून तो "अर्धस्वतंत्र' कादंबरी रचू शकतो! सुतानं जसा स्वर्ग गाठावा तसा तो ब्लर्बनं आशय गाठतो! त्यामुळं त्याच्यावर वाङ्मयचौर्याचा आरोप करता येणार नाही. कादंबरीलेखन-छपाई-वितरण यावर त्याचा संसार व्यवस्थित सुरू आहे. त्या अर्थी त्याच्या कादंबऱ्या बऱ्यापैकी खपत असणार. एका वाचकाचा यशस्वी लेखक झाला तो असा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay tarawade write article in saptarang