विजय हरी वाडेकर (विजय तरवडे)

विजय तरवडे vijaytarawade@gmail.com
रविवार, 14 जानेवारी 2018

गेल्या पिढीतले कथाकार आणि ‘राजस’ या मासिकाचे संपादक विजय हरी वाडेकर यांच्याशी माझी ओळख एका मजेदार योगायोगानं झाली. त्या वेळी मी नोकरीत नवीन होतो आणि माझी पुण्याला नुकतीच बदली झाली होती. एके दिवशी जेवणाच्या सुटीत मी माझी वही काढून काहीतरी लिहायचा प्रयत्न करत होतो. परांजपे नावाच्या माझ्या साहेबांनी ते पाहिलं आणि आस्थेनं चौकशी केली. मी लेखक व्हायचा प्रयत्न करतोय हे समजल्यावर त्यांना आनंद झाला. ज्ञानेश्वर आगाशे यांच्याशी त्यांचा परिचय होता. त्यांनी आगाशे यांच्या नावानं एक चिठ्ठी लिहून दिली आणि मी त्यांना भेटावं असं मला सुचवलं.

गेल्या पिढीतले कथाकार आणि ‘राजस’ या मासिकाचे संपादक विजय हरी वाडेकर यांच्याशी माझी ओळख एका मजेदार योगायोगानं झाली. त्या वेळी मी नोकरीत नवीन होतो आणि माझी पुण्याला नुकतीच बदली झाली होती. एके दिवशी जेवणाच्या सुटीत मी माझी वही काढून काहीतरी लिहायचा प्रयत्न करत होतो. परांजपे नावाच्या माझ्या साहेबांनी ते पाहिलं आणि आस्थेनं चौकशी केली. मी लेखक व्हायचा प्रयत्न करतोय हे समजल्यावर त्यांना आनंद झाला. ज्ञानेश्वर आगाशे यांच्याशी त्यांचा परिचय होता. त्यांनी आगाशे यांच्या नावानं एक चिठ्ठी लिहून दिली आणि मी त्यांना भेटावं असं मला सुचवलं. लक्ष्मी रस्त्यावरच्या ‘कॉमनवेल्थ’ इमारतीत ‘बृहन्महाराष्ट्र’च्या कचेरीत मी आगाशे यांना भेटायला गेलो. चिठ्ठी वाचून त्यांनी मेहुणपुऱ्यातल्या ‘मंदार प्रिंटर्स’च्या कचेरीत मला पाठवलं. तिथं ‘राजस’चे कार्यकारी संपादक विजय हरी वाडेकर यांची भेट झाली. त्यांना मी चिठ्ठी  आणि माझी कवितांची वही दिली. त्यांनी ती अनेक दिवस नुसतीच ठेवून घेतली. मी अनेक दिवस खेटे मारत राहिलो. असाच एकदा मी जात असताना दक्षिणमुखी मारुतीसमोर पानाच्या दुकानाशी सुहास शिरवळकर आणि उत्तम शिरवळकर भेटले. वाडेकरांचं नाव ऐकून तेही माझ्या बरोबर आले. उत्तम आणि वाडेकर सर जुने दोस्त.

‘‘चहा मागवू का?’’ असं वाडेकर सरांनी विचारल्यावर उत्तम त्यांना सलगीनं म्हणाला ः ‘‘अरे, या लेकराच्या कविता छाप की आता. अजून किती दिवस उबवणार आहेस’’?
‘‘आजच्याच अंकात टाकल्यात,’’ असं म्हणत वाडेकर सरांनी पुढ्यातला ताजा अंक माझ्या समोर सरकवला. शेवटच्या पानावर माझ्या तीन कविता छापलेल्या होत्या. जरा वेळ स्वतःच्याच कविता निरखून पाहिल्यावर ‘कवितेचं मानधन मिळतं का?’ असं मी भीत भीत विचारल्यावर वाडेकर सर गडगडाटी हसले. मानधनावरून त्यांनी एक किस्सा सांगितला. विद्यार्थी असताना वाडेकर सर कॉलेजच्या वाङ्‌मय मंडळाचे चिटणीस होते. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या पुण्यातल्या कादंबरीकाराला त्यांनी एका कार्यक्रमाच्या उद्‌घाटनाला बोलावलं. तीस रुपये मानधन देण्याचं निश्‍चित झालं. कादंबरीकार वेळेवर आले. वाडेकर सरांनीच त्यांचं स्वागत केलं. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी चहापान झालं. त्या वेळी वाडेकर सरांनी त्या कादंबरीकारांना जरा दबकतच सांगितलं ः ‘‘तुम्हाला तीस रुपये मानधन द्यायचं कबूल केलं होतं; पण पंधराच रुपये जमले आहेत. बाकीचे नंतर नक्की आणून देईन’’.
त्यावर कादंबरीकार काही बोलले नाहीत. कार्यक्रम सुरू झाला. कादंबरीकार बोलायला उठले. बघता बघता त्यांच्या रसाळ शैलीनं समोरचे विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. ...आणि बोलता बोलता कादंबरीकार अचानक मध्येच थांबले. ते म्हणाले ः ‘‘संयोजकांनी कबूल केलेल्या मानधनाची निम्मीच रक्कम मला मिळाल्यामुळं मी माझं भाषण इथंच थांबवतो...’’ आणि ते चक्क खाली बसले.
***

‘‘मॅजेस्टिक बुक स्टॉल’चे प्रसिद्ध प्रकाशक केशवराव कोठावळे यांनी पुण्यात घर बांधलं तेव्हा वास्तुशांतीसाठी अनेकांना बोलावलं होतं. त्यात वाडेकर सरही होते. घराची भव्य गच्ची पाहून वाडेकर सर म्हणाले ः इथं ‘साहित्यिक-गप्पा’ आयोजित करता येतील आणि लोकांना त्या आवडतीलही.’’ केशवरावांनी नंतर तिथं ‘साहित्यिक-गप्पा’ आयोजित केल्या आणि खरोखरच त्या लोकप्रिय झाल्या. केशवरावांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेल्या ‘ललित’ मासिकाच्या विशेषांकात वाडेकर सरांच्या या विधानाचा उल्लेख असलेली चौकट आहे. मात्र, ‘साहित्यिक-गप्पां’ची कल्पना आपणच केशवरावांना सुचवल्याचा दावा गेल्या दशकापासून अनेक लेखकांनी आणि प्रकाशकांनी करायला सुरवात केली आहे!
***

‘राजस’ मासिकात एकदा कविता छापून आल्यावर आणि मैत्री जमल्यावर मी वाडेकर सरांकडं अनेकदा जाऊन गप्पाष्टकं रंगवली. मात्र, नंतर कधीही त्यांच्याकडं का लिहिलं नाही, ते ठाऊक नाही; पण १९८८ मध्ये काही मित्रांनी मिळून पु. ल. देशपांडे यांच्यावर खास अंक काढला  तेव्हा वाडेकर सरांनी अंकासाठी सुवर्ण सहकारी बॅंकेची जाहिरात मिळवून दिली होती. राजस मासिकाचे मालक आणि मुख्य संपादक ज्ञानेश्वर आगाशे यांना मी आयुष्यात एकदाच आणि अक्षरशः एक-दीड मिनिट भेटलो. नंतर वाडेकर सरांच्या तोंडून त्यांचे उल्लेख मात्र अनेकदा ऐकले. ‘राजस’ बंद पडल्यावर काही दिवसांनी मी वाडेकर सरांना भेटायला गेलो होतो, तेव्हा त्यांनी आगाशे यांची मिश्‍किल प्रतिक्रिया सांगितली. ‘राजस’मध्ये दर्जेदार आणि प्रायोगिक लेखनाला आवर्जून प्रसिद्धी मिळत असे. साहित्यात रस असणाऱ्या सध्याच्या पिढीला ‘अंतर्नाद’ बंद पडल्याबद्दल जशी हळहळ वाटत असेल, तशी हळहळ तेव्हाच्या साहित्यरसिकांना ‘राजस’ बंद पडल्यावर वाटत असे. ‘राजस’ बंद पडल्यावर गावोगावाहून नव्या-जुन्या साहित्यिकांची आणि रसिकांची खेद व्यक्त करणारी पत्रं ‘राजस’च्या पत्त्यावर आली होती. जवळजवळ तीनशेच्या आसपास पत्रं... ती पत्रं घेऊन वाडेकर हे आगाशे यांना भेटायला गेले.  ‘‘अंक बंद पडल्यामुळं लोक फार नाराज झाले आहेत. नवोदितांपासून ते मातब्बर साहित्यिकांपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेकांची इतकी पत्रं आलीत. मासिक बंद करू नये म्हणून सगळे आग्रह करत आहेत,’’ वाडेकर सर आगाशे यांना म्हणाले. ‘‘त्यातली किती पत्रं वर्गणीदारांची, विक्रेत्यांची आणि जाहिरातदारांची आहेत’’? आगाशे यांनी विचारलं. वाडेकर सरांकडं उत्तर नव्हतं.
***

वाडेकर सरांच्या कचेरीतच चित्रकार जयंत ताडफळे यांच्याशी माझी ओळख झाली होती. देशपांडे नावाचे एक सहकारी कुंडली पाहून (पैसे न घेता) भविष्य सांगत असत. १९८९ पासून सलग तीन वर्षं मी प्रमोशनसाठी मुलाखतीला जात होतो. देशपांडे यांनी माझ्या प्रमोशनबाबत केलेली भाकितं अचूक निघाली! त्यांनी ज्या वर्षी सकारात्मक भाकीत केलं, त्याच वर्षी मला प्रमोशन मिळालं! ताडफळे आणि देशपांडे भेटून आता अनेक वर्षं झाली आहेत...

Web Title: vijay tarawade write article in saptarang