काव्यरस, पिंगे आणि सोलकढी... (विजय तरवडे)

विजय तरवडे vijaytarawade@gmail.com
रविवार, 21 जानेवारी 2018

शैलीदार साहित्यिक, ‘ललितबंध’कार रवींद्र पिंगे आणि माझी ओळख योगायोगानंच झाली.

सन १९८६ मध्ये मी ‘साधना’ या साप्ताहिकात एक सदर लिहीत असे. त्यातला माझा एक लेख वाचून पिंगे यांनी मला ‘साधना’च्या पत्त्यावर पोस्टकार्ड धाडलं होतं. त्यावर मी आभाराचं पत्रोत्तर पाठवलं. काही दिवसांनी पुणे विद्यार्थी गृहात त्यांचं भाषण झालं. तेव्हा भाषणानंतर मी त्यांना जाऊन भेटलो. माझी ओळख दिली. तेव्हा ते माझा हात धरून अचंब्यानं म्हणाले ः ‘‘अरे, काय सांगतोस? तू तर बच्चा आहेस. तुझा लेख वाचून मी तुला माझ्या वयाचा समजलो होतो.’’

शैलीदार साहित्यिक, ‘ललितबंध’कार रवींद्र पिंगे आणि माझी ओळख योगायोगानंच झाली.

सन १९८६ मध्ये मी ‘साधना’ या साप्ताहिकात एक सदर लिहीत असे. त्यातला माझा एक लेख वाचून पिंगे यांनी मला ‘साधना’च्या पत्त्यावर पोस्टकार्ड धाडलं होतं. त्यावर मी आभाराचं पत्रोत्तर पाठवलं. काही दिवसांनी पुणे विद्यार्थी गृहात त्यांचं भाषण झालं. तेव्हा भाषणानंतर मी त्यांना जाऊन भेटलो. माझी ओळख दिली. तेव्हा ते माझा हात धरून अचंब्यानं म्हणाले ः ‘‘अरे, काय सांगतोस? तू तर बच्चा आहेस. तुझा लेख वाचून मी तुला माझ्या वयाचा समजलो होतो.’’

आणि मग आम्ही तिथून चालत डेक्कनवरच्या रीगल हॉटेलमध्ये चहाला गेलो. गप्पाटप्पा झाल्यावर आम्ही उठलो. मी बिल देऊ लागल्यावर त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाले ः ‘‘साहित्यविश्वात एक गोष्ट सगळ्यांना ठाऊक आहे. हॉटेलमध्ये बिल कमी असेल तेव्हा पिंगे देतो. जास्त बिल असेल तेव्हा समोरच्यानं द्यायचं.’’ आणि त्यांनी बिल दिलं.

मात्र, नंतरही प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर पुढं असंख्य वेळा जेवायला-खायला जायचे प्रसंग आले, तरी प्रत्येक वेळी बिल त्यांनीच दिलं. सामिष जेवण देणारी पुण्यातली हॉटेलं मी शोधून ठेवायचो आणि त्यांना पत्रानं कळवायचो. ते पुण्यात आले की त्या हॉटेलला आम्ही भेट द्यायचो. पिंग्यांना सामिष आहार प्रिय असला तरी ते श्रीरामभक्त होते. पत्र लिहिल्यावर शेवट करताना ‘बाकी श्रीरामकृपा’ असं लिहून ते सही करत असत. पिंग्यांनी मला जी असंख्य पोस्टकार्डं धाडली, त्यात त्यांनी मला एकेरीतच संबोधलं. क्वचित केव्हातरी गमतीनं ‘विजयराव’ म्हणाले असतील.
ओळख झाल्यावर मी एकदा त्यांच्या मुंबईच्या घरी गेलो. आधी आम्ही दादरला ‘आयडियल बुक स्टॉल’मध्ये भेटलो. मला एक पेन घेऊन देण्याची विनंती मी त्यांना केली. माझ्या मनात ‘रेनॉल्ड’चं सव्वा रुपया किमतीचं पेन होतं; पण त्यांनी दुकानातल्या सेवकाला पेन दाखवायला सांगितल्यावर त्यानं छोटी छोटी तीन-चार खोकी काढली. त्यांत वेगवेगळी पेनं होती. त्यांतून पिंग्यांनी एक मस्त पेन पसंत केलं. कोरा कागद घेऊन त्यावर वळणदार इटॅलिक अक्षरात ‘श्रीराम’ असं लिहिलं आणि पेन बंद करून मला दिलं. पेनची किंमत दहा रुपये होती. ती समोर ठेवली.

मालक हसले आणि म्हणाले ः ‘‘पैसे ठेवा तुमच्याच खिशात.’’ आणि त्यांनी ती नोट बळे बळे पिंग्यांना परत दिली. नंतर लोकलनं आम्ही विले पार्ले इथं त्यांच्या घरी जेवायला गेलो. त्या दिवशी त्यांच्या मुलीला चित्रा हिला बॅंकेत नोकरी लागल्याची बातमी समजली होती. घरातलं वातावरण खुशनुमा होतं!  जेवायला बसल्यावर मी ताटातले सगळे पदार्थ ओळखले; पण एका वाटीत गुलाबीसर पेय होतं.
‘‘हे काय आहे?’’ असं मी त्या पेयाविषयी विचारलं.
‘‘काय विचारतोस? अरे, ही सोलकढी. तू कधी पाहिली नाहीस?’’
‘‘नाही. आज पहिल्यांदाच बघतोय.’’काहीशा साशंकतेनंच मी वाटी तोंडाला लावली आणि तो द्रवपदार्थ मला आवडलादेखील.
***

पिंग्यांच्या खुसखुशीत-चुरचुरीत शैलीवर लुब्ध असलेले असंख्य चाहते होते. त्यातले साहित्यिक होऊ इच्छिणारे चाहते कुठंतरी संधी मिळावी म्हणून त्यांच्या मागं टुमणं लावत. भाबडेपणापायी पिंग्यांना कुणाची भीड मोडवत नसे. एक मजेदार प्रसंग आठवतो. एका नवोदित कवयित्री-कम-सुगरण-कम-चाहतीनं त्यांना जेवायला बोलावलं. मासळी आणि सोलकढीचा बेत होता. ‘गाड्याबरोबर नळ्याची जत्रा’ या न्यायानं पिंग्यांनी मलाही बरोबर घेतलं. त्या वेळी माझ्याकडं ‘लुना डबल प्लस’ होती. तीवर बसून ‘ढूर्र ढूर्र’ करत आम्ही कवयित्रीच्या घरी पोचलो. औपचारिक आगतस्वागत झालं. तिच्या पतिराजांशी परिचय झाला. तिनं आम्हाला पाणी आणून दिलं. पाणी प्यायल्यावर पतिराज उठले आणि ‘‘तुम्ही बसा, मी जरा एक काम उरकून येतो,’’ असं म्हणून आतल्या खोलीत निघून गेले. कवयित्री स्वयंपाकघरात. बाहेर आम्ही दोघं गप्पा मारत बसलेलो. जरा वेळानं कूकरच्या शिट्टीचा आवाज आला. फोडण्यांचे आवाज आणि सुगंध आले. पोटातली भूक तरारून वर आली. काही वेळानं कवयित्री बाहेर आली.

‘‘सगळं तयार आहे. कूकरची शिट्टी निघेल, तोवर हे येतील; मग आपण लगेच जेवायला बसू. पिंगे, मी तुम्हाला तोवर माझी वही दाखवते,’’ कवयित्री म्हणाली.  
तिनं आम्हाला एकेक म्हणता म्हणता मोठाल्या चार कविता ऐकवल्या. त्यातल्या काही ओळी आळवून आळवून म्हटल्या.
मधूनच ‘या ओळीतली कल्पना पाहा हं, कशी निराळी आहे,’ असंही आम्हाला बजावलं. कवितेत वापरलेल्या आपल्या काही प्रतिमा कशा कुसुमाग्रज वगैरेंच्या तोडीच्या आहेत, असंदेखील नम्रपणे आमच्या नजरेला कवयित्रीनं आणून दिलं. चौथी कविता संपल्यावर पाचवी कविता सुरू करणार, इतक्‍यात पतिराजांची करारी आवाजातली हाक आली ः
‘‘अजून किती वेळ आहे?’’
‘‘हो, सगळं तयार आहे. या तुम्ही’’, तिनं सांगितलं.
पतिराज आले. आम्ही जेवायला बसलो. पतिराज माझ्या शेजारीच बसले. जेवताना बोलत असताना आसमंतात पसरलेल्या वासावरून लक्षात आलं, की कवयित्री आमच्या गळी काव्यरस उतरवत असताना पलीकडच्या खोलीत पतिराज सोमरस प्राशन करत होते. पिंग्यांच्या सहवासातले असे अनेक मजेदार किस्से, गमतीदार प्रसंग आहेत...ते अधूनमधून सांगीनच...

Web Title: vijay tarawade write article in saptarang