अखिल विश्वाची फर्स्ट लेडी !

सर्वच स्त्रियांच्या वाट्याला शूद्रत्व येणं ही भारतीय इतिहासाच्या संदर्भात एक आम बाब आहे. पण श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांचं जीवन म्हणजे याच स्त्रियांच्या हाती शिक्षण नावाचं अस्त्र आलं की काय चमत्कार घडतो.
vijaya lakshmi pandit
vijaya lakshmi panditsakal

- अ‍ॅड. निखिल संजय रेखा, nikhil17adsule@gmail.com

‘विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।

नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले’

महात्मा ज्योतिबा फुल्यांचं हे वचन अतिशय सुपरिचित आहे. धर्मशास्त्रांनी घातलेल्या अनेकविध घातक निर्बंधांनी शूद्रातिशूद्रांच्या जीवनात हेतुपुरस्सर घडवून आणलेल्या हानिकारक घटनाक्रमाचं चित्रण फुल्यांनी या रचनेत केलेलं आहे. या निर्बंधांमुळेच शूद्रांना शिक्षण नाकारलं गेले. त्याचा परिणाम म्हणून बुद्धी, नीती, विकास, संपत्ती या सर्वांचाच ऱ्हास होऊन अंततः शूद्रातिशूद्रांची पुरती अधोगती झाली.

सर्वच स्त्रियांच्या वाट्याला शूद्रत्व येणं ही भारतीय इतिहासाच्या संदर्भात एक आम बाब आहे. पण श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांचं जीवन म्हणजे याच स्त्रियांच्या हाती शिक्षण नावाचं अस्त्र आलं की काय चमत्कार घडतो, याचं मूर्तिमंत उदाहरण होय. मनू भगवान या विद्वान इतिहासकारानं विजयालक्ष्मी पंडित यांच्या विस्तृत चरित्रग्रंथाच्या स्वरूपात एक अत्यंत प्रतिभासंपन्न प्रबंध आपल्याला उपलब्ध करून दिला आहे.

देशाच्या इतिहासात श्रीमती पंडित यांचं स्थान आज तळटिपांपुरते मर्यादित झालं आहे. मोजक्या स्त्रीवादी इतिहासकारांचा अपवाद वगळता सर्वच उदारमतवादी इतिहास लेखकांच्या लेखनात त्या अभावानंच नजरेस पडतात. इतिहास लेखनातील ही त्रुटी मिटवण्याचा प्रयत्न या चरित्राद्वारे भगवान यांनी केला आहे. चरित्रनायिकेच्या जीवनाचं चित्रण करतानाच हे पुस्तक त्या काळाचंही दर्शन घडवतं.

घरातले सगळे लाडानं त्यांना नान म्हणत. तेव्हापासून ते श्रीमती पंडित या नावानं त्या जगविख्यात होईपर्यंतचा सारा प्रवास या पुस्तकात वर्णिला आहे. भारत नावाच्या कल्पनेचा गाभा आकाराला आणण्यात महत्त्वाचा सहभाग असलेल्या दिग्गज व्यक्ती त्यांच्या अवतीभोवती असूनही आपलं स्वत्व जपण्याचा त्यांचा प्रवास, त्यांची प्रखर बुद्धिमत्ता, अव्याहत वाचन, लेखन, अनुभव आणि विचारपद्धती यांद्वारे दक्षतापूर्वक घडवलेल्या मूल्य जाणिवांमुळं बनलेलं खास त्यांचंच असं अनन्यसाधारण व्यक्तित्व असे सारे तपशील या पुस्तकाच्या पानापानांत विखुरलेले आहेत. छोटी नान हळूहळू स्वत:च भारत या कल्पनेच्या शिल्पकारांपैकी एक तर बनतेच पण पुढं अत्यंत यशस्वीरीत्या ही कल्पना ती वैश्विक पातळीवरही घेऊन जाते.

काटेकोरपणे केलेल्या संशोधनाचा परिपाक असलेल्या या पुस्तकात अभ्यासपूर्ण तपशिलांचं वैपुल्य आहे. त्याद्वारे स्वातंत्र्य आंदोलनाचे नवनवे कंगोरे आपल्या लक्षात येतात. एक नवी दृष्टी आपल्याला लाभते. स्त्रीची बुद्धिमत्ता कमी प्रतीची असते हा पूर्वापार चालत आलेला सामाजिक समज आहे.

विशाल वैश्विक पटलावर पसरलेला श्रीमती पंडित यांचा अद्‍भुत प्रवास जाणून घेत असताना या समजाला सुरुंग लागतो. एक चुकीचं मिथक उद्ध्वस्त होतं. हे परिवर्तनकारी दर्शन घडवणाऱ्या प्रकरणांनीच माझ्या मनावर सर्वाधिक मोहिनी टाकली.

अखिल भारतीय महिला परिषदेतील त्यांचा सक्रिय सहभाग, संयुक्त प्रांतातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री बनण्याचा त्यांना मिळालेला बहुमान, भारताच्या संविधान सभेतील त्यांचा प्रवेश इथपासून ते युनोमध्ये अटलांटिक चार्टर फाउंडेशन आकाराला आणण्यातील त्यांचा पुढाकार इथपर्यंत श्रीमती पंडित यांचं सारं कार्य अगदी डोळे दिपवणारं आहे.

बंगालच्या दुष्काळादरम्यान त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमातून त्यांच्या अंतःकरणातील सहभाव आणि जनहिताप्रतिची असीम कळकळ प्रत्ययाला येते. या वेळी आलेल्या वेदनादायी अनुभवातूनच पुढं रशियाशी गहू आणि चहा संदर्भातील आणि अमेरिकेशी गहू करार करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेचा वापर करून आपल्या देशातील अन्नधान्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी या दोन्ही करारांद्वारे केला.

श्रीमती पंडित यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर केलेल्या कामाच्या विवरणामुळंच हे पुस्तक पुढं पुढं वाचण्याची माझी उत्सुकता वाढत गेली. आपली वक्तृत्वशैली आणि हजरजबाबीपणा यांच्या जोरावर त्या श्रोत्यांना भारावून टाकत. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मोठमोठ्या व्यक्ती त्यांच्या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित राहत.

पठडीत न बसणारी त्यांची असाधारण कार्यपद्धती पाहूनच त्यांच्याबद्दल ‘‘मी आजवर पाहिलेली सर्वांत जबरदस्त स्त्री’’ असे उद्‍गार एलिनॉर रुझवेल्ट यांनी काढले होते. खरं तर श्रीमती पंडित यांना एखाद्या विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित ठेवताच येणार नाही कारण त्यांच्या हृदयात अखिल मानवजातीबद्दलची आस्था धडधडत असे.

वंशभेद किंवा दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी राजवट यांची भारताच्या वतीनं त्यांनी केलेली कठोर निर्भर्त्सना, विशेषतः जनरल स्मट्स यांच्याशी झालेल्या चर्चेत न्याय, नैतिकता आणि सार्वजनिक कायदा यांच्या समर्थनार्थ त्यांनी केलेला युक्तिवाद या साऱ्याचं प्रत्ययकारी चित्रण या पुस्तकात केलं आहे.

भारत ही संकल्पना मूलतः कोणत्या तत्त्वांच्या बाजूनं उभी असते, हे समजून घेण्यात ज्याला म्हणून रस आहे त्या प्रत्येकानं युनोतील भारतीय शिष्टमंडळाची धुरा श्रीमती पंडित यांनी कशी वाहिली याचं सखोल वाचन करायला हवं. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रणासाठीची पॅरिस आचारसंहिता, नरसंहारविरोधी करार तसेच अत्याचारप्रतिबंधक करार आकाराला आणण्यातील त्यांची भूमिका मोलाची होती.

आफ्रिकन-अमेरिकन लोकांच्या हक्कासाठी त्यांनी संघर्ष केला, इस्रायल व पॅलेस्टाइन राष्ट्रनिर्मिती तसेच आपत्ती काळात मानवतावादी साहाय्य या संबंधीचे ठराव क्र. १८१ व १८२ घडविण्यात त्यांचा सहभाग होता. यूनोच्या आम सभेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर काटेकोरपणे त्यांनी निष्पक्ष भूमिका घेतली.

या साऱ्या बाबी सर्वांनीच अभ्यासायला हव्यात. पारदर्शकता, सचोटी, कामाबद्दलची ओढ, चिकाटी, संकुचित विचारांच्या पलिकडल्या मूलभूत मानवी मूल्यांवरचा त्यांचा अढळ विश्वास यामुळेच तर ‘अखिल विश्वाची फर्स्ट लेडी’ अशा सार्थ संबोधनानं त्या गौरविल्या जातात.

त्या भारताच्या रशियामधील पहिल्या राजदूत बनल्या. त्यानंतर अमेरिका, मेक्सिको आणि ग्रेट ब्रिटनमध्येही त्यांनी राजदूत म्हणून काम पाहिलं. ब्रिटनमध्ये विन्स्टन चर्चिल हा सहजासहजी दाद देणारा माणूस नसूनही त्यांच्याशी त्यांचे चांगले संबंध जुळले आणि अखेरीस त्या स्पेनला गेल्या. त्यांची ही कारकीर्द म्हणजे परराष्ट्र धोरणाच्या विद्यार्थ्यांसाठी एक वस्तुपाठच आहे. याच काळात भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आणि अलिप्ततावादी चळवळीचा पाया रचला गेला.

इस्रायल - पॅलेस्टाइन पेचप्रसंगात भारतानं घेतलेली भूमिका समजून घेतली, तर त्यापासून बरेच काही शिकता येईल. तिथं दोन राष्ट्रे निर्माण करण्याचा तोडगा स्वीकारला गेला पण भारतानं द्विराष्ट्रीय संघराज्य बनवण्याचा तोडगा सुचवला होता. कोरियन पेचप्रसंगात भारतानं कुशलतापूर्वक घेतलेल्या भूमिका, हंगेरियन समस्येची किंवा सुवेझ कालव्यावरून निर्माण झालेल्या समस्येची भारतानं केलेली हाताळणी या साऱ्यातून राहून गेलेल्या फटी चातुर्यानं कशा बुजवाव्यात याचे उपयुक्त धडे आपल्याला मिळतील.

जगभर अशी अपेक्षेहून अधिक दर्जेदार कामगिरी बजावत असतानाही त्या भारतात परत येतात. त्यानंतर काही काळ लोटल्यावर मूलभूत भारतीय मूल्यांची जोपासना करण्यासाठी पुन्हा लोकसभेच्या सदस्य बनून त्या देशांतर्गत राजकारणाच्या धकाधकीत पडतात. पुढं खुद्द आपल्या प्रिय भाची इंदिरा गांधी यांच्या विरोधात त्या ठाम भूमिका घेतात, तेव्हा धर्मनिरपेक्षता, समतावाद आणि लोकशाही या मूलभूत तत्त्वांवरच्या त्यांच्या दृढ श्रद्धेची खरीखुरी प्रचिती येते.

राष्ट्र आणि राष्ट्राची तत्त्वं पणाला लागली असताना रक्ताच्या नात्यांना आणि वैयक्तिक संबंधांना दुय्यम स्थान दिले पाहिजे, हे त्या आपल्या आचरणातून दाखवून देतात. आज एकसाची आणि अक्राळविक्राळ भारताची कल्पना नव्यानं आकाराला आणली जात आहे.

त्यामुळं घटनात्मक नैतिकता, बहुस्वरता, बहुसांस्कृतिकता या आपल्या देशाच्या मूलभूत मूल्यांना धोका उत्पन्न झाला आहे. अशा काळात अत्यंत काळजीपूर्वक आणि बारकाईनं संशोधन करून लिहिलं गेलेलं हे संदर्भघन चरित्र प्रत्येकानं वाचायलाच हवे. खरा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर इतिहास म्हणून आपल्यासमोर येणारी मुखवटा घातलेली मिथकं वाचण्याऐवजी हे पुस्तक सर्वांना वाचायला दिलं पाहिजे.

(अनुवाद : अनंत घोटगाळकर) anant.ghotgalkar@gmail.com

(लेखक हे आयआयटी-दिल्ली आणि सामाजिक न्याय मंत्रालय इथं वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com