लव्ह, लग्न आणि लोचा!

प्रेम आणि लग्न हा विषय कधीच जुना होत नसला, तरी दोघांविषयीच्या धारणा मात्र हरएक नव्या क्षणी जुन्या ठरताहेत.
love marriage and problems
love marriage and problemssakal

- विशाखा विश्वनाथ

प्रेम आणि लग्न हा विषय कधीच जुना होत नसला, तरी दोघांविषयीच्या धारणा मात्र हरएक नव्या क्षणी जुन्या ठरताहेत. जीवनशैली बदलली, राहणीमान उंचावलं, आपण हायटेक झालो हे सगळं एकीकडे; पण नातेसंबंधांच्या बाबतीतील आपलं आकलन मात्र जेवढं होतं तेवढंच आहे.

चर्चगेटला एका कॅफेत बसलेली असताना काही वाक्यं सहज म्हणून कानावर येऊ लागली. ती ऐकून समजलं, की विषय खोल आहे म्हणून मी अजून कान देऊन ऐकू लागले. एक तिशीच्या आसपासची मुलगी आणि दुसरी चाळिशीतली, दोघी नुकत्याच कॉफी आणि चिकन पफ वगैरे घेऊन गप्पा मारत माझ्या मागच्या टेबलवर बसल्या होत्या.

तिशीच्या जवळ असलेली अखंड बडबडत होती, चाळिशीतली ऐकत होती असं एकूण चित्र... तिशीतल्या मुलीचा तिच्या प्रियकरासोबत काहीतरी कमिटमेंट इश्यू झाला होता. त्यातून त्याने पुढे दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. स्वतःच्या लग्नात या मुलीलाही बोलावलं होतं. त्या निमंत्रणानंतर तिनेही लग्नात जायचं ठरवलं... ‘जायचं तर तोंड उतरवून नाही’ असा चंग मनाशी बांधून तिने सगळी तयारी केली आणि लग्नाला हजेरीही लावली.

त्या मुलाने तिची ओळख बायकोशी करून दिली. जेवणखाण झालं, फोटोसेशन झालं असा एकदम साग्रसंगीत कार्यक्रम. हा एकूण प्रसंग तिने फार समजूतदारपणे निभावून नेला होता आणि मग मनाला जे काही अर्ध-मुर्ध, टोचणारं, खुपणारं होतं ते ती शांतपणे सांगत होती. स्वतःची झालेली मानसिक दमछाक, प्रेम अगदीच जेन्युअन असल्याने अनेकांना त्याची असलेली माहिती आणि तिला लग्नात पाहून सगळे कसे शॉक होते या सगळ्याचा कोलाज म्हणजे कानावर येत असलेल्या गप्पा होत्या.

अशा इच्छा नसतानाही कानावर येणाऱ्या गप्पा असोत, ठरवून ऐकलेले पॉडकास्ट असोत, मित्र-मंडळींमध्ये होणाऱ्या चर्चा असोत, व्हॉट्सॲपवर प्रेम सप्ताहात पाहिलेले स्टेटस असोत... सगळीकडे काही अंशी काही गोष्टी सतत निदर्शनास आल्या. प्रेम आणि लग्न हा विषय कधीच जुना होत नसला, तरी दोघांविषयीच्या धारणा मात्र हरएक नव्या क्षणी जुन्या ठरताहेत.

स्त्री-पुरुष हे गणित स्त्री-स्त्री वा पुरुष-पुरुष असू शकतं हे समाजात स्वीकारायला किती काळ जावा लागेल, याचा अजिबातच अंदाज लावता येणार नाही. कारण, आपल्याकडे एक फार मोठा वर्ग असा आहे जो अजूनही प्रेमात पडलात, तर ती गोष्ट लग्नापर्यंत गेलीच पाहिजे, असा आग्रह धरतो आणि लग्न केलंत, मग ते लव्ह मॅरेज, ॲरेंज मॅरेज, लव्ह कम अरेंज मॅरेज यातलं काहीही असलं तरी एकदम ‘मेड फॉर इच अदर’ असंच तुम्ही भासवलं पाहिजे.

लव्हची गाडी लग्नावर गेली नाही, तरी आणि लग्नावरची गाडी जरा जरी ऑफ ट्रॅक झाली तरी इथे लोचा आहे, हे जगजाहीर करण्याची फार घाई सगळ्यांना झालेली आहे. जीवनशैली बदलली, राहणीमान उंचावलं, आपण हायटेक झालो हे सगळं एकीकडे; पण नातेसंबंधांच्या बाबतीतील आपलं आकलन मात्र जेवढं होतं तेवढंच आहे. किंबहुना कालसुसंगत पद्धतीने जेवढं असायला हवं, ज्या पद्धतीचं असायला हवं त्या साऱ्याचा अभाव मात्र ठळकपणे जाणवतोय. यात जुनी माणसं आणि नवी मुलं सगळेच आहेत आणि हा दोर प्रसंगानुरूप कधी इकडे खेचला जातो तर कधी तिकडे.

आताच्या तिशीतल्या मुलांना बंधन नको, जबाबदारी घ्यायला नको, तडजोड नको, ही मोठ्यांची त्यांच्याविषयीची रास्त असलेली ओरड एकीकडे आणि मानवी आयुष्याला स्थैर्य प्राप्त करून देणारी समाजमान्य व्यवस्था म्हणजे लग्न हे एकमेव सत्य मानून ते स्वतःच्या हातात पूर्णपणे येत नसतानाही आपल्या मुलांना मात्र या संस्थेतील इतिपासून अंतापर्यंत सारं काही गवसलंच पाहिजे, या हट्टाने पेटून उठलेले तेच पालक असोत, त्यांच्या त्यांच्यातच जोरदार संघर्ष चालू असतो.

मुलांचं लग्न करणं हे आयुष्याचं अंतिम ध्येय काही एक वर्षं ते उराशी घट्ट कवटाळून असतात आणि त्या काळात मुलांनी लग्नाला नाही म्हणणं, त्यांच्या स्वतःच्या काही अपेक्षा असणं या सगळ्या गोष्टी त्यांना लोचा वाटू लागतात. इतकंच काय, मुलांनी लग्न करूनही मूल होऊ देण्याचा, कधी होऊ देण्याचा, वा न होऊ देण्याचा निर्णय घेतला, तर तोही पालकांना लोचाच वाटतो.

ॲरेंज मॅरेजमध्ये सांगून आलेल्या स्थळाला मुलं त्यांच्या काही कारणांमुळे नाही म्हणत असतील, तरी पालकांना वाटतं की यांचं कुठेतरी अफेअर असणार. अशा निष्कर्षाप्रत पालक इतके चटकन येतात की विचारायला नको. त्यांचं भावविश्व लव्ह-लग्न-लोचा या आणि एवढ्याच तीन संकल्पनांभोवती फिरत राहतं.

आता नको नंतर, हे मनासारखं नाही, ते पटत नाही, असं करत करत आणि त्याही आधी घरी चालत नाही म्हणून स्वतःला मनापासून कुणी आवडलेलं असतानाही प्रेमापासून कैक मैल दूर ठेवत, मन मारत राहणाऱ्या तरुणांची तिशीच्या उंबरठ्यावर असतानाची असह्यता, लग्नाला पर्याय शोधत असताना होणारी दमछाक आणि लग्न म्हणजे तडजोड हे सततचं मोठ्यांचं सांगणं हे सगळं वर्षानुवर्षे सुरूच आहे; तरी त्यातून समाज म्हणून आपण अजिबात काहीच शिकत नाही.

नव्या जीवनशैलीतही लग्नसंबंधांची जुनीच समीकरणं लावू पाहतोय. लग्न म्हणजे तडजोड किंवा कुठल्याही दुसऱ्या माणसासोबत राहायचं तर जुळवून घेणं आलंच, हे खरं असलं तरी ही तडजोड कुठल्या बाबतीत असावी, हे मुलांनी ठरवायचं असतं, पालकांनी नाही हे अजून आपल्या पचनी पडत नाही. त्यामुळे ‘लिव्ह इन’ला सतत ‘लिव्ह इट’ या एकाच एक दृष्टिकोनातून भिरकावलं जातं, तर जे समाजाने नाकारलं ते आपण कवटाळलंच पाहिजे म्हणून तरुणांकडून उराशी बाळगलं जातं.

याचा मध्यममार्ग काढायचा असेल, तर लव्ह आणि लोचा या दोघांविषयीचा टॅबू दूर करून, विवेकी आणि मुक्त प्रेमाविषयी भरभरून बोललं गेलं पाहिजे, त्याविषयीचे पूर्वग्रह बोलून दूर केले पाहिजेत. जे लग्नापर्यंत पोहोचतं तेच खरं प्रेम. त्याआधी जोडीदार शोधण्यासाठी मुलांनी केलेली सगळी धडपड किंवा लग्नापर्यंत न पोहोचू शकलेली प्रेमकहाणी म्हणजे अनैतिक हे सगळं पुसून काढलं पाहिजे.

vishakhavishwanath11@gmail.com

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ विजेत्या साहित्यिक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com