कुणी ‘क्लिक’ झालं का?

आपलं समोरच्याशी जुळू शकतं ही बारीकशी शक्यता ‘क्लिक’ होण्यात सामावलेली आहे. जोडीदार म्हणून समोरच्या व्यक्तीचा विचार करावा वा न करावा, हे सारं या ‘क्लिक’ होण्यावर ठरत असतं.
Marriage
Marriagesakal

- विशाखा विश्वनाथ

आपलं समोरच्याशी जुळू शकतं ही बारीकशी शक्यता ‘क्लिक’ होण्यात सामावलेली आहे. जोडीदार म्हणून समोरच्या व्यक्तीचा विचार करावा वा न करावा, हे सारं या ‘क्लिक’ होण्यावर ठरत असतं. त्यासाठी प्रत्येकाचे ठोकताळे असतात. बहुतकरून आपल्या डोक्यातल्या आदर्शवादी कल्पनांनी जोडीदाराचं चित्र रंगवलेलं असतं, त्यातून क्लिक झालं की नाही, हे आकाराला येतं. कित्येकदा आधी ठरवून ठेवलेल्या कुठल्याच गोष्टी या क्लिक झालेल्या माणसात अजिबात नसतात. या वळणावर नात्यांचा खरा कस लागतो...

ती प्रौढ अविवाहित, लग्नासाठी बरीच स्थळं पाहून होतात त्यातली. काही तिला पसंत पडत नाहीत, काही गोष्टी जुळून येत नाहीत. अशात एक नवी भेट ठरते आणि मग ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी भेटीच्या ठिकाणी बरीच वाट पाहून झाली तरी तो काही पोहोचत नाही. मग तिची घालमेल वाढते. मनावर मळभ दाटू लागतं आणि तेव्हाच देखणा, रुबाबदार, निळा शर्ट घातलेला तो येतो.

तिच्या मनातलं मळभ पांगू लागतं. या एकूण प्रसंगाचं वर्णन ती ‘मनात सतार वाजली की, नाही वाजली ’, ‘खडा लागला’ अशा काहीशा आशयाचं करते. हे मेघना पेठे यांच्या ‘आये कुछ अब्र’ या कथेतल्या काही भागाचं वर्णन आहे. यातलं वाजू लागली सतार किंवा खडा लागला म्हणजे, आत्ताचं क्लिक होणं. सिंगल असलेले लग्नासाठी अपेक्षित जोडीदार शोधत असताना अजून शोध का संपत नाही, याचं कारण विचारलं जातं तेव्हा, ‘कुणी क्लिक नाही झालं’ हे उत्तर ठरलेलं असतं.

आपलं समोरच्याशी जुळू शकतं ही बारीकशी शक्यता क्लिक होण्यात समावलेली असते. जोडीदार म्हणून समोरच्या व्यक्तीचा विचार करावा वा न करावा हे सारं या क्लिक होण्यावर ठरत असतं. त्यासाठी प्रत्येकाचे आपले ठोकताळे असतात. बहुतकरून आपल्या डोक्यातल्या आदर्शवादी कल्पनांनी जोडीदाराचं चित्र रंगवलेलं असतं, त्यातून आकाराला येत राहतं. साधारण लग्नासाठी वर वा वधू संशोधन मोहीम सुरू होते, तेव्हा कसं स्थळ अपेक्षित आहे, यावर चर्चा होतात. त्यातून हे ठरतं. हे ठरलेलं घेऊनच मुलं-मुली, आई-वडील आपली शोधमोहीम सुरू ठेवतात.

जसजसं उपवर मुलं-मुली या प्रकाराला सरावतात, तसे ते या अपेक्षित स्थळाविषयीचे आपले हट्ट, हेके दूर सारतात. पहिल्या काही चर्चांमध्ये त्यांनी घरच्यांना सांगितलेल्या आपल्या जोडीदाराच्या अपेक्षा हळूहळू बदलत जातात. त्यात परिपक्वता येत जाते आणि मग क्लिक होणारी व्यक्ती ही या मांडलेल्या अपेक्षांपेक्षा वेगळी असते. एखादी व्यक्ती साधारण पहिल्या तीन भेटीत क्लिक होऊन जाते.

पुढच्या भेटी अनुरूपता शोधण्यात जातात. या वेळी क्लिक होण्याचा उपयोग पुढचे उपद्‍व्याप करावे की करू नये, यासाठी होतो. अनुरूप आहोत हे समजल्यावर, मुलांना करावे लागणारे पुढचे व्याप वेगळेच असतात. कित्येकदा आधी ठरवून ठेवलेल्या कुठल्याच गोष्टी या क्लिक झालेल्या माणसात अजिबात नसतात. या वळणावर नात्यांचा खरा कस लागतो.

कुणी क्लिक झालं का? या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर या वळणावर आलं तर घरचे आणि मित्रमंडळी लगेच उलटप्रश्न विचारतात. अरे, तुला हवा होता तसा हा माणूस नाहीच, तरी हा क्लिक झाला कसा? या प्रश्नामुळे गोंधळ उडतो. पुढे आपण स्वतःला प्रश्न विचारत राहतो, शंका घेत राहतो. हा एवढा गोंधळ मित्रमंडळी आणि घरचे यांनी उलटप्रश्न केल्यामुळे होत असतो. आपल्या मुलाला, मित्राला, मैत्रिणीला, मुलीला क्लिक झालेली व्यक्ती योग्य असू शकते, हा विश्वास जर जवळच्या माणसांनी दाखवला तर खूप वेळ वाचू शकतो.

क्लिक झाल्यावरही माणसाला सतत भेटून बोलणं, त्यासाठी वेळ काढणं आणि हे लग्न करण्याच्या अंतिम निर्णयावर येईपर्यंत करत राहणं महाकठीण काम आहे. घरून सतत प्रश्न विचारले जातात. एकदा सांगितलं ना, की समोरचं स्थळ आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही तरी का भेटता? अशा वेळी घरचे अडून बसलेत, आता पुढे काय करायचं, या एकाच गोष्टीवर ते भेटणारे दोघं किस पाडत असतात.

एका वेळेनंतर वय २७-२८, ३०-३२ झालं तरी आपले आई-वडील आपल्याला ओळखतात. त्यांना आपण कळतो, ते नाही म्हणतायत म्हणजे खरंच ओळखण्यात चुकत असू आपण. त्यांचं म्हणणं डावलून हवं त्या मुलाशी/मुलीशी लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम राहणं म्हणजे त्यांना खोटं ठरवणं. हे संवेदनशील, कुटुंबवत्सल आणि ज्या पद्धतीचं कंडिशनिंग झालेलं असतं, त्या विवेकी मुलांच्या बाबतीत होतं.

आई-बापाचं मत बदलणं, चौकटीपलीकडचा विचार करणं, बेधडक निर्णय घेणं अवघड होऊन जातं. त्यांनी ते करायचं ठरवलं, तरी आजूबाजूची माणसं सतत तेच तेच बोलून, विचारून भंडावून सोडतात. राग, चिडचिड, फस्ट्रेशन, सगळं फार टोकाला जातं. आपण आपल्या मर्यादा सांभाळून प्रेम करतो, चौकटी मोडून टाकत नाही, मुळात आपल्याला मर्यादा कळतात, हेच चूक आहे, असं सगळं वाटू लागतं.

मुलांना कुणी क्लिक झालं, अनुरूप वाटलं, मुलांनी घरी सांगितलं की त्यांच्यावर विश्वास दाखवणं हाच यावर उपाय आहे. सोबतच आपल्या मुलाने, मुलीने या आधी चार जणांची लग्नासाठी शिफारस नव्हती केली, हे ध्यानात घेऊन समोरच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. उपवर मुलगा आणि मुलगी हे विवाह संस्थेतले अनन्यसाधारण महत्त्व असलेले घटक अधिक सजग झालेले आहेत. त्यामुळे त्यांना क्लिक झालेल्या अर्थात योग्य वाटलेल्या जोडीदाराला डावलून पुढे जाण्याने काहीही मोठं हाशील होणार नाही.

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.)

vishakhavishwanath11@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com