शहाणी सकाळ

नात्यातल्या मर्यादा जाणून, एकमेकांची सोबत करू इच्छिणाऱ्या तरुणांच्या मनाचा विचार केला तर ‘शहाणी सकाळ’ प्रत्येक नव्या नात्यात पाहायला मिळेल.
शहाणी सकाळ

- विशाखा विश्वनाथ

नात्यातल्या मर्यादा जाणून, एकमेकांची सोबत करू इच्छिणाऱ्या तरुणांच्या मनाचा विचार केला तर ‘शहाणी सकाळ’ प्रत्येक नव्या नात्यात पाहायला मिळेल. जुन्या नात्यांना नवी झळाळी देईल. ते नैतिकतेची शहाणीव स्वतःपाशी बाळगून असतील.

नातेसंबंध जोडताना वा मोडताना ते तडकाफडकी निर्णय घेणारे नाहीत. त्यांना त्यांच्या नैतिक जबाबदारीचं भान आहे. मागच्या पिढीने मोठेपणा दाखवून नातेसंबंधातली ही नवी जडणघडण समजून घेतली तर ‘सैराट’ची वारंवार होणारी पुनरावृत्ती थांबेल.

चार दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, परीक्षकाच्या भूमिकेतून एका स्पर्धेला जाण्याचा योग आला. १० स्पर्धकांनंतर एक मुलगी आली. खुर्चीवर बसली आणि तिने कथाकथनाला सुरुवात केली. सादरीकरण चोख होतं. आकर्षक, नियमांचं उलंघन न करणारं. त्यामुळे संपूर्ण सात मिनिटे मन आणि मेंदू यांचा फोकस एकच एक होता, तिचा परफॉर्मन्स आणि त्या कथेतलं कथानक.

एका तरुण मुलीला एक टेलिफोन कॉल येतो. ती त्यानंतर अतिशय आनंदात असते. आवडती फुलं फुलदाणीत ठेवते. दरम्यान, आपल्याला कळतं, येऊन गेलेला लॅण्डलाईनवरचा कॉल तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा होता. तो कामानिमित्त तिच्या शहरात आहे. आणि त्याने सांगितलंय की, तो आज रात्रीच्या जेवणाला आणि राहायलाही इकडेच यांच्या घरी असणार आहे.

तिच्या आनंदाला पारावार उरत नाही. तिचे वडील आनंदी असण्याचं कारण विचारतात. ती उत्साहात सांगते आणि ते नेमकं तिला सांगतात की, ‘मी आणि आई विकेण्डसाठी फार्म हाऊसवर जातोय.’ ही हिरमुसली होते, तिचा भावी नवरा या उपऱ्या शहरात हक्काने कुठं राहील याविषयीची खंत तिला वाटते. वाटणारी खंत ती व्यक्तही करते.

तिचे वडील यावर शांतपणे म्हणतात, ‘तो आपल्याकडे नाही येणार तर कुठं येणार. तुझं म्हणणं बरोबर आहे. येऊ दे त्याला.’’ कथानायिका यावर उत्तरते, ‘पण तुम्ही आणि आई तर...’ पुढचा संवाद... ‘तुम्ही सुज्ञ आहात. त्याला येऊ दे.’ लग्नाआधी आपल्या भावी जोडीदारासोबत वेळ घालवता येईल, या कल्पनेने नायिका सुखावते.

अभिसारीकेच्या भूमिकेतून नायकाची वाट पाहते. दरम्यान, पुन्हा एक कॉल होतो. आई-वडील घरी नसण्याविषयी ती नायकाला सांगते. ‘तू येशील ना’ विचारते. वाट पाहत राहते. जरा वेळाने पुन्हा कॉल होतो. नायकाने निरोप ठेवलेला असतो, ‘जेवून घे. १२ वाजेपर्यंत वाट पाहा, तोवर मी आलो नाही तर येणार नाही समज.’ नायिका त्रागा करते. नायक येत नाही.

पहाटे सूर्योदयाच्या वेळी डोअरबेल वाजते. हातात दोघांना आवडणारी निशिगंधाची फुलं घेऊन आलेला नायक दारात उभा असतो. कथा ‘शहाणी सकाळ’ आणि कथाकार शं. ना. नवरे.

परीक्षण करताना मी कथेची निवड हा एक निकष ठेवला होता. तो कन्टेंट म्हणून नव्हे तर आजच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वातावरणात मुलं काय निवडतायत हे मला महत्त्वाचं वाटतं म्हणून. निकाल लावत असताना आमची म्हणजे आम्हा तिन्ही परीक्षकांची या कथेवर वेगळी चर्चाही झाली.

समाजाचं मानसशास्त्र बदलत असल्याने प्रियकर-प्रेयसीचे, जीएफ-बीएफ झाले. कॅज्युअल रिलेशनशिप आल्या त्यात, ही कथा आऊट डेटेड आहे, असं एक मत होतं. तेव्हाच मला ही कथानिवड जास्त महत्त्वाची वाटली. त्यातला विषय आवडला आणि सगळ्यात महत्त्वाचं बोल्ड आणि भडक काहीही न लिहिता, त्यातला निरागसपणा टिकवून ठेवत पुढं जाणारं कथानाट्य.

तितक्याच अदबीने त्या विद्यार्थिनीने केलेलं सादरीकरण. सगळीच मोकळीक असणाऱ्या आजच्या काळात तिने केलेली कथानिवड विचारमंथन करायला लावणारी आहे. स्त्री तिच्या आयुष्यात विश्वास दाखवणारा आणि राग, रोष, प्रेम व्यक्त करताना मर्यादेचा काठ न ओलांडणारा पुरुष शोधत असते. हे कळत-नकळत तिच्या निमित्ताने अधोरेखित झालं.

नायिकेचे वडील आणि कथानायक यांच्यात शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्याही पलिकडले मोमेंट आहे. त्यांच्यात थेट संवाद नाही; पण मुलीच्या बापाने, होणाऱ्या जावयाला जोखलं आहे आणि कथानायक जावयाच्या भूमिकेत त्याच्या भावी सासऱ्यांनी घेतलेल्या परीक्षेत पास झालाय. विश्वासाला खरा उतरलाय.

हे असे परीक्षेचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात तेव्हा तेव्हा निवडीला महत्त्व असतं. तुम्ही काय बोलता, सादर करता, मिरवता कशाविरुद्ध आणि कुणाच्या बाजूने उभं राहणं पसंत करता हे तुमच्या सामाजिक बांधिलकीविषयी, शाश्वत जीवन मूल्यांविषयी खूप काही सांगून जातं.

नीतिमत्तेचं भान हरपत जाणाऱ्या, लग्नसंस्थेकडे कलुषित दृष्टीने पाहणाऱ्या वा पाहायला लावणाऱ्या आजच्या वर्तमानात नैतिकतेचं भान ठेवणारे कथानायक पुढे आणले गेले तर नक्कीच मर्यादेचा काठ न ओलांडणारा पुरुष प्रत्येकीच्या वाट्याला बाप, भाऊ, नवरा, मुलगा या सगळ्या भूमिकांमध्ये नक्की येईल.

नात्याचं प्रमाणिकरण आणि प्रेम सिद्ध करण्याचा अट्टहास कित्येक मुलींना, त्यांच्या कुटुंबांना उद्‌ध्वस्त करतो. साथीदार होण्याची इच्छा बाळगणं, एकमेकांचे जोडीदार होण्याची स्वप्नं पाहणं या सगळ्यात चूक काहीच नाही; पण ते करत असताना आक्रमक होणं, स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा घेऊन गरज नसताना बंड पुकारून, विरोध पत्करून आत्मघातकी वागणं धोकादायक आहे हे समजून घ्यायला हवं.

नात्यातल्या मर्यादा जाणून असणाऱ्या, आपला वकूब ठाऊक असणाऱ्या, पण एकमेकांची सोबत करू इच्छिणाऱ्या तरुणांच्या मनाचा आई-वडिलांनी जर विचार केला तर अशी ‘शहाणी सकाळ’ प्रत्येक नव्या नात्यात पाहायला मिळेल. जुन्या नात्यांना नवी झळाळी देईल.

फार नसतील, अगदी मोजके असतील, पण असे कितीतरी जीव कदाचित तुमच्याही बाजूला असतील, जे ही नैतिकतेची शहाणीव स्वतःपाशी बाळगून आहेत. म्हणून नातेसंबंध जोडताना वा मोडताना तडकाफडकी निर्णय घेत नसतील. याचा अर्थ ते आणि त्यांच्या भूमिका तकलादू नाहीत. त्यांना त्यांच्या नैतिक जबाबदारीचं भान आहे.

अशा तरुणांनी कच खाण्याआधी मागच्या पिढीने मोठेपणा दाखवून नातेसंबंधातली ही नवी जडणघडण समजून घेतली तर ‘सैराट’ची वारंवार होणारी पुनरावृत्ती थांबेल. लग्नसंस्थेला बळकटी मिळेल. हसरी कुटुंबं, ओघाने निकोप समाज घडायला मदत होईल, पण सगळ्यासाठी आधी निवड आणि पारख फार महत्त्वाची. मग ती स्पर्धेसाठी निवडलेली कथा असो वा आयुष्याचा जोडीदार.

बाकी नातेसंबंध जोडताना सर्वांनीच जरा धीराने घेतलं तर एक एक ‘शहाणी सकाळ’ आपल्या प्रत्येकाच्या दारात उभी आहेच.

vishakhavishwanath11@gmail.com

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ विजेत्या साहित्यिक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com