तेरा साथ हैं तो...

तेरा साथ हैं तो...

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम ‘वर्ल्ड कप’च्या सेमी फायनलमध्ये मोडला. या घटनेचे जगभरातील क्रिकेटप्रेमी साक्षीदार होते.

- विशाखा विश्वनाथ

आयुष्यात यश कधीतरीच येतं, त्यासाठी अनेक कठीण आव्हानांशी लढावं लागतं. त्यातही अनेकदा अपयशच हाती लागतं. अशा अपयशाच्या काळात सावली बनून सोबत करणारा सहचर असेल, तर आनंदाचं गाव फार लांब राहत नाही. साहचर्याची अशी अनेक उदाहरणं आपल्या वैयक्तिक आयुष्यात आदर्शवत ठरतात.

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम ‘वर्ल्ड कप’च्या सेमी फायनलमध्ये मोडला. या घटनेचे जगभरातील क्रिकेटप्रेमी साक्षीदार होते. गेल्या बुधवारी ‘वानखेडे’वर झालेल्या विराटच्या विक्रमाइतकीच चर्चा झाली ती स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सचिनची, त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टची आणि आनंदाने, अभिमानाने टाळ्या वाजवणाऱ्या अनुष्का शर्माची.

Find someone who breaks records and not promises, असं विराट-अनुष्काच्या फोटोसह लिहिलेलं एक क्रिएटिव्ह कॅम्पेन एका मॅट्रिमोनी अॅपने अगदी अर्ध्या तासात उभं केलं. तिचं त्याच्यासाठी असणं, त्याच्यासोबत असणं हा कौतुकाचा विषय बनला.

इथून पुढची प्रत्येक खेळी ही विराटचा नवा विक्रम ठरणार आहे, यात कुठलीच शंका नाही. नवऱ्याच्या करिअरमधल्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी त्याला ‘चिअर’ करणारी अनुष्का असो वा आलिया भटला ‘गंगूबाई काठियावाडी’साठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या क्षणाचा फोटो काढणारा रणबीर कपूर असो की त्याच सोहळ्यात प्रोटेक्टिव्ह होत आलियाच्या खांद्यावर हात ठेवून चालतानाचा दोघांचा फोटो असो...

खूप खूप मागे जाऊन परदेशातील उदाहरण घ्यायचं झालं तर तेव्हाचे मिशेल आणि बराक ओबामा असो... ही सगळी साहचर्याची उदाहरणं आहेत. आदर्शवत वाटणारे, प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक आयुष्यात असावेसे वाटणारे हे क्षण आहेत.

देश वा आंतरराष्ट्रीय पातळीवर सहजीवनाच्या बाबतीत आदर्शवत वाटणाऱ्या, तरुणांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करणाऱ्या, नुकत्याच प्रेमात पडलेल्यांना रोमियो-जुलिएटची रिप्लेसमेंट वाटणाऱ्या जोडप्यांच्या आयुष्यातले हे प्रसंग प्रातिनिधिक आहेत. त्यांना डोक्यावर घेणारे वा त्यांच्यावर वेळप्रसंगी टीका करणारे आपण सारेच एका दूरस्थ किनाऱ्यावरून त्यांच्याकडे पाहतोय.

असं असूनही आपल्याला खुणावत काय असेल तर सार्वजनिक आयुष्यात त्यांचं सहचर म्हणून एकमेकांसोबत असणं. त्यांची कार्यक्षेत्रंच मुळात मोठ्या प्रमाणात लोकांसमोर येतील, अशी आहेत. त्यामुळे साहजिक त्याकडे नजरा जाणार, हे फार स्वाभाविक आहे. म्हणूनच त्यांचे सहजीवन हा सामान्य माणसासाठी कुतूहलाचाही विषय ठरतो.

त्यांनी एकमेकांना दिलेली साथ साऱ्यांनाच आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपल्या जोडीदाराकडून अपेक्षित आहे. किंबहुना कित्येकांच्या आयुष्यात ती आहेदेखील; पण असे मोठे सोहळे सामान्य माणसांच्या करिअरमध्ये येत नसल्याने ते अधोरेखित होत नाहीत आणि म्हणूनच दुर्लक्षित राहून जातात.

विराट आणि अनुष्काचं उदाहरण घ्यायचं झालं तर जुना विक्रम मोडण्याच्या आणि नवा रचण्याच्या क्षणाची ‘ती’ साक्षीदार होती खरी... पण कोणे एके काळी विराटच्या कारकिर्दीच्या चढत्या आलेखात अचानक एक खळगा आला तेव्हा भारतीय क्रिकेटप्रेमींच्या नजरेत ‘ती’ व्हिलनदेखील होती. तिची त्याला साथ देण्याची धडपड, स्टेडियममधली उपस्थिती चेष्टेचा विषय ठरत होती. त्याही काळात ते दोघे ठाम राहिले, एकमेकांच्या सोबत राहिले आणि म्हणूनच आजचं त्यांचं असणं अधिक उठावदार झालं... नजरेत भरलं. या दोघांच्या सहजीवनातली ही दोन्ही वळणं आपल्याला दिसू शकतात. वास्तविक ती प्रत्येकाच्या सहजीवनात आलेली असतात.

सामान्य माणसांच्या आयुष्यातही उत्तुंग यशाची शिखरं येतात. कधी एखादा कौटुंबिक अडचणींचा तीव्र उतार येतो, त्यांच्या करिअरची इनिंग तितकीशी जोरदार चालू नसते. तेव्हा तेव्हा त्यांचा जोडीदार त्यांच्या सोबत खमका साथीदार म्हणून उभा असतोच.

सामान्य माणसांच्या आयुष्यातले हे चिअर लीडर्स मोठ्या स्क्रीनवर दिसत नाहीत; पण आयुष्याच्या चित्रपटात आई-वडिलांनंतर जर सर्वार्थाने सोबत करणारं आणि आपल्या पाठीशी उभं असणारं कोण, असा विचार केला तर फार महत्त्वाच्या सीनमध्ये आपल्याला तेच दिसतात. हा चिअर लीडर बहुतकरून तुमचा जोडीदारच असतो. तो आसपास असताना ‘तेरा साथ हैं तो, मुझे क्या कमी हैं’ हा विश्वास आपल्या मनात असतो, हेही तितकंच खरं.

फक्त कधी तरी तो आहे हे दाखवण्यासाठी एखादी छोटी कृती आपल्याकडून घडावी लागते. ती वेळोवेळी घडत राहिली की करिअरची सेकंड इनिंग सुरू करताना येणारे प्रॉब्लेम, अचानक आलेले आयुष्यातले तीव्र उतार, डळमळीत झालेला आत्मविश्वास सगळ्यातून आपण सहिसलामत बाहेर येतो. ही दिलेली सोबत, केलेली साथ जोडीदाराकडून घडणारी निःस्वार्थ कृती असते.

सहचर म्हणून एकमेकांचे यश आणि अपयशात सोबत राहणं, एकमेकांना धीर देणं, हवी तेव्हा स्पेस देणं आणि गरज पडेल तेव्हा त्या स्पेसला न जुमानताही आपल्या पार्टनरच्या मनातलं जाणून घेता येणं, या आणि अशा कितीतरी छोट्या छोट्या कृतींतून नातं बहरत असतं.

सेलिब्रिटीजच्या आयुष्यातला झगमगाट सामान्यांच्या हातापासून कोसो दूर असला, तरी ते चालत असलेल्या प्रकाशवाटा आपण स्पष्टपणे पाहू शकतो. म्हणूनच आपण सेलीब्ज कपलसारखं होऊ शकत नसलो, तरी प्रातिनिधिक उदाहरणात असलेल्या जोडीदारांची सोबत आपल्याला मोहित करून जाते. स्त्रीने पुरुषाच्या, पुरुषाने स्त्रीच्या मागे उभं राहण्याची ही गोष्ट नाही. ही गोष्ट आहे, चांगले सहचर होऊन जोडीदाराला समजून घेण्याची.

कारण, नात्यात दूरचा पल्ला गाठताना, करिअरमध्ये यशस्वी होताना आयुष्यातल्या हिरव्या जागा या आपल्या साथीदारामुळे अधिक घनगर्द होत असतात, सावल्या गारवा देणाऱ्या होतात. त्या सावलीत ‘तेरा साथ हैं तो...’सारखं विश्वासाचं गाणं अधूनमधून गुणगुणलं तर आनंदाचं गाव फार लांब राहत नाही.

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ विजेत्या साहित्यिक आहेत.)

vishakhavishwanath11@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com