एक होतं घर !

आमच्या पणजोबांनी बांधलेल्या घराचा काही भाग नवीन बांधकाम करण्यासाठी काळजावर दगड ठेवून पाडायचा निर्णय काही दिवसांपूर्वी झाला.
Home
HomeSakal

- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com

आमच्या पणजोबांनी बांधलेल्या घराचा काही भाग नवीन बांधकाम करण्यासाठी काळजावर दगड ठेवून पाडायचा निर्णय काही दिवसांपूर्वी झाला. घराचा मुख्य दरवाजा तसाच ठेवून मागची बाजू पाडण्याचं ठरलं. गेली साठ-सत्तर वर्ष खंबीरपणानं उभ्या असलेल्या भिंती एका क्षणात जमीनदोस्त होणार होत्या. त्या घरात उमटलेल्या माझ्या लहानपणीच्या आठवणींच्या पाऊलखुणा पुसणार या विचारानं मी बेचैन झालो होतो.

घर पाडण्याच्या पूर्वसंध्येला मी आमच्या खोलीत गेलो, चोहोबाजूला नजर फिरवली, भिंती, दरवाजे, दिवळी, कपाटं, खिडक्यांवरून मायेनं हात फिरवला. कुणीतरी आपल्या खूप जवळचं दूर जात असल्याची भावना मनात दाटत होती. त्यातूनच वरती पत्र्याकडं लक्ष गेलं आणि मोठा हुंदका आला. त्या रात्री मी खोलीत एकटाच रडत बसलो.

जेव्हा जुनं घर सोबत होतं आम्ही त्यात राहत होतो, तेव्हा काहीच नव्हतं वाटत पण अचानक ते पाडायचं आहे हे समजल्यापासून मन अस्वस्थ झालं होतं. ज्या घरातल्या फरशीवर मी रांगलो, चालायला शिकलो, झोपलो ते सगळं बदलणार होतं. मातीच्या भिंतींवर आता काँक्रिटचं अतिक्रमण होणार होतं आणि शहाबादी फरशीवर मार्बल लावलं जाणारं होतं.

गावातली लोकं शहराकडं चालली, त्यामुळं जुने वाडे, गढ्या ओस पडू लागल्या. सध्याच्या मुलींच्या अपेक्षा पाहता जे गावातच राहिले, त्यांना त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी नवीन घर बांधणं ही प्राथमिकता वाटू लागली. वडिलांकडं ज्या मुली पत्र्याच्या घरात राहत होत्या, त्यांना लग्नानंतर बंगल्यात राहण्याची स्वप्नं पडू लागली.

अशी स्वप्न पाहण्यात किंवा इच्छा ठेवण्यात गैर काही नाही. पण आयुष्यभर कष्ट करून जर आपल्या वडिलांना अजून घरावरचे पत्रे काढता येत नसतील तर मग ऐन पंचविशी-तिशीतल्या पोरांकडे बंगला पाहिजे या अपेक्षेनं कित्येक तरुणांना कमावता होण्याआधीच कर्जबाजारी करून ठेवलंय.

ग्रामीण भागातील मातीची घरं अजूनही शाबूत आहेत, आपल्या आजच्या पिढीसह पुढच्या एकदोन पिढ्यांनाही आसरा देण्याचं सामर्थ्य त्या घरांत आहे. पण भुईवरून स्टाइल फरशीवर जाण्याचे फॅड बांधकाम करण्याची क्षमता नसणाऱ्यांनाही निर्णय घ्यायला भाग पाडतंय, हे दुर्दैव.

विटांवर विटा चढवता येतात पण त्या घरातल्या भिंतींवर, फरशीवर, पत्र्यावर, देवळ्यांवर, कपाटांवर उमटलेल्या आठवणींच्या पाऊलखुणा पुसताना पाहणं वेदनादायी असतं. स्मृती निरंतर कवटाळून ठेवण्यासाठी मी जुन्या घराचं चित्रीकरण करून ठेवलंय. नवीन घराच्या भिंतीवर जुन्या घराचा फोटो अभिमानानं लावेन. आजोबांनी बांधलेल्या चिरेबंदी वाड्यात राहायला आता नव्या सुना तयार नाहीत.

इच्छा नसतानाही वाडवडिलांची ही स्मृती जमीनदोस्त करून त्यावर काँक्रीटचा बंगला, स्टाइल फरशी आणि किचन बांधल्याशिवाय पर्याय नाही उरला. मुळात आईवडील आणि लेकरांना जुन्या घरात राहण्याची अडचण नसते पण हल्ली मुलाचं लग्न करायचं म्हटलं, की त्याला चांगलं घर असायला हवं ही मुलींची पहिली अट असते. मग तुमची ऐपत असो वा नसो, तुम्ही गृहकर्ज काढा अथवा उसने घ्या पण नवी सून नव्याच घरात येणार हा ट्रेंड सेट होतोय.

पैसे बाळगून असणाऱ्यांचे सोडा पण गरीब मात्र यात पुरता कर्जबाजारी होऊन जातोय, हे गावखेड्यातले भीषण वास्तव आहे. एका दगडातल्या मूर्ती सोबत आपल्या भक्तीमुळं किती जवळीकता निर्माण होते. ती मूर्ती निर्जीव दगडात कोरलेली असली, तरी त्याबद्दलच्या आपल्या भावना सजीव असतात तसंच काहीसं घराबद्दलही असतं. ती दिसायला जरी दगड, माती, विटा असल्या, तरी सजीव भावनांचे ते निर्जीव अवयव असतात. त्यांच्याशी संवादही होऊ शकतो.

‘कास्ट अवे’ या हॉलिवूड चित्रपटात एका फुटबॉलला डोळे, नाक आणि तोंड काढून त्यातला नायक त्या बॉलसोबत संवाद साधत असतो. त्या फुटबॉलला त्याने ‘विल्सन’ असं नाव दिलेलं असते. निर्मनुष्य बेटावर फक्त विल्सन हाच त्याचा मित्र असतो. दूर समुद्रात अनेक वर्ष तो त्याच्याशीच गप्पा मारत वेळ घालवत असतो.

जेव्हा अचानक तो फुटबॉल हरवतो तेव्हा नायक ढसढसा रडतो. यातून तात्पर्य एवढंच सांगायचंय, की निर्जीव वस्तूलाही जीव लागू शकतो. सायकल असो, गाडी असो, घर असो वा दुकान. कधी ना कधी त्यात आपला जीव अडकतोच. त्यांना मागं सोडून पुढं जाताना हृदय आपसूकच सद्‍गदित होतं.

जुन्या शहरातली काही जुनी माणसं सोडली तर बाकी सगळे गावाकडची जुनी घरं सोडून नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्तानं शहरात विस्थापित झालेली माणसंच असतात. पैशापाण्यासाठी जरी ते शहरात राहत असली, तरी त्यांचंही एक मन गावातल्या घरात रुतून बसलेलं असतंच. सध्याचा प्रदूषणाचा वाढता स्तर, लोकांपेक्षा जास्त झालेली गाड्यांची संख्या, अपुरे रस्ते या कारणांमुळं भविष्यात ‘गड्या आपला गाव बरा’ म्हणण्याची वेळ येईल.

आज जसं गावात राहणाऱ्या बहुतांशी जणांना पुण्या-मुंबईला आपलं घर असावं वाटतं. काही वर्षांनी याच शहरांची हवा इतकी प्रदूषित झालेली असेल की त्यांना गावाकडं आल्याशिवाय पर्याय उरणार नाही. शेवटी पैशानं करोड रुपयाचे घर विकत घेता येईल पण फुफ्फुसात जाणारी आख्ख्या शहरातली हवा शुद्ध करण्याइतपत अजून माणूस श्रीमंत झाला नाही.

शहरं तर सगळी नव्यानं उभारली गेली आहेत पण संस्कृतीचा ऐतिहासिक पाऊलखुणा अजूनही गावखेड्यात सापडतात. हळूहळू त्या गावाचं गावपण नष्ट होऊन त्यांना शहरांची झुल चढत आहे. विकास नावाच्या अनुकरणीय संकल्पनेत गावागावातले मातीचे रस्ते आता काँक्रिटमय झालेत. त्यात घरं तरी कशी मागं राहतील. नव्या पिढीनं मालिकांत पाहिलेल्या घरांमुळं आता त्यांना आपल्याच बापजाद्यांच्या घराची लाज वाटू लागली आहे.

आता पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी आपल्याकडं जुन्या घरांचे फक्त फोटो असतील. अजून काही वर्षांनी आपले नातवंडं-परतवंड काँक्रिटची घरं पाडून मातीची घरे बांधताना दिसतील. शेवटी जुनं तेच सोनं असतं. ऊन-वारा-पावसापासून संरक्षण करत आजवर आपल्याला लहानाचं मोठं केलेल्या पण नव्या पिढीच्या आग्रहाखातर स्वतःचं बलिदान दिलेल्या महाराष्ट्रातील तमाम जुन्या घरांना, वाड्यांना हा लेख समर्पित.

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com