चुंबक

विश्‍वनाथ पाटील
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

आपल्या आतमध्ये असणाऱ्या चुंबकाची शक्ती जसजशी वाढू लागते तसतसा बाहेरच्या चुंबकांचा आपल्यावर असणारा प्रभाव कमी होऊ लागतो. स्वत:च्या आत दडलेला चुंबक जेव्हा क्रियाशील होतो तेव्हा बाह्य चुंबकाची आपल्याला गरजच भासत नाही. आपले स्वत:चे चुंबकीय क्षेत्र जसजसे विस्तारत जाते, तसतसे आपले इतरांच्या प्रभावाचे अवलंबित्व नाहीसे होऊ लागते. स्वत:च्या चुंबकीय शक्तीची जाणीव होऊन ती शक्ती विस्तारत नेण्यासाठी सतत कार्यमग्न असणे हेच यशाचे गमक आहे.

विचार प्रक्रिया, आपली कृती यावर बाहेरच्या अनेक गोष्टींचा प्रभाव पडत असतो. आपले निर्णयही अशा प्रभावातूनच घेतले जात असतात. आपल्यावर ज्या वस्तू, व्यक्ती अथवा विचारांचा पगडा असतो, त्यानुसारच आपले आचार- विचार आणि निर्णय घडत असतात. पगडा जितका प्रभावी असतो तितके आपण त्यानुसारच वागत राहतो. एका पगड्यापेक्षा दुसरा पगडा जास्त प्रभावी झाला की, आपल्या वागण्यातही बदल होतो.

बाह्य प्रभावाखाली आपले जगणे ठरवत जाणे अथवा त्यामध्ये बदल करत जाणे या गोष्टी हळूहळू आपल्याला परावलंबी बनवत असतात. इतरांच्या प्रभावाने मोहित होऊन आपल्या जगण्याला दिशा देण्याचा केलेला प्रयत्न ही एक प्रकारे गुलामीच असते; पण आपण अशा गुलामीत आहोत, याची कसलीच जाणीव नसल्यामुळे आपल्याला ते आपले जगणे स्वत:चेच आहे असे वाटत असते. 

एखादा चुंबक त्याच्याकडे लोह धातूपासून तयार झालेल्या विविध वस्तू खेचून घेण्याचे काम करतो. वस्तुंच्या तुलनेत चुंबक किती मोठा आहे, त्यानुसार त्या वस्तू कमी-जास्त प्रमाणात त्या चुंबकाकडे खेचल्या जातात. चुंबकाचा आकार जितका मोठा तितकी त्याची आकर्षण शक्तीही जास्त असते. अशा मोठ्या चुंबकाचे आकर्षणाचे क्षेत्रही मोठे असते. महाकाय चुंबक दूर अंतरापर्यंत अनेक मोठ्या वस्तूंना आपल्याकडे आकर्षित करून घेत असतो. 

चुंबकाच्या प्रभावाखाली असणाऱ्या लोह धातूच्या वस्तू हळूहळू काही प्रमाणात चुंबकीय गुणधर्म दाखवू लागतात. त्यांच्यातही इतर वस्तूंना खेचून घेण्याचे चुंबकत्व येऊ लागते. मोठ्या चुंबकाच्या प्रभावाखाली असणाऱ्या इतर लोह धातूच्या वस्तूंना आलेले हे चुंबकत्व पराधिन असते; पण त्या वस्तूंना त्याची कल्पनाच असत नाही. मोठा चुंबक जोपर्यंत क्रियाशिल आहे, तोपर्यंत या छोट्या तात्पुरत्या चुंबकांचे कार्य चालू राहते. मोठा चुंबक अचानक गायब झाला अथवा त्या वस्तूच त्या मोठ्या चुंबकाच्या प्रभाव क्षेत्रातून बाहेर गेल्या की, त्यांच्यातील चुंबकत्व नाहीसे होते.

आपणही अशा प्रकारचे तात्पुरते चुंबकत्व कधी ना कधीतरी अनुभवलेले असते. ज्या प्रभावाखाली आपण असतो त्याच प्रभावाचे एक छोटे रूप बनून आपण जगत राहतो. तो प्रभाव संपला की, आपणही आपले ते तात्पुरते चुंबकत्व गमावतो. बाहेरच्या चुंबकावर अवलंबून राहण्याची आपली ही वृत्ती आपल्यामध्ये असण्याचे कारण अगदी सोपे आहे. आपल्याला आपल्या आतमध्ये चुंबकीय शक्ती सुप्तावस्थेत लपलेली आहे याची जाणीव नसते. शिवाय आपल्यातील चुंबकीय शक्ती वाढवायची कशी हेही ठाऊक नसते. 
प्रभावी व्यक्तिमत्त्वांप्रमाणे आपण स्वत: प्रभावी होऊ शकतो. आपल्या आतमध्ये दडलेला सुप्तावस्थेतील चुंबक त्यासाठी जागा करावा लागतो. त्याची चुंबकीय शक्ती हळूहळू वाढवत न्यावी लागते. आपल्यात लपलेला चुंबक आपल्या बाहेर कितीही शोधला तरी तो सापडणार नाही. हे बाहेरचे शोधणे थांबवून आपल्या आतमध्ये तीव्रतेने शोध घेतला तर हा चुंबक नक्की सापडतो. 

विजेचा प्रवाह जितका ताकदवान असेल तितके त्याने निर्माण केलेले चुंबकीय क्षेत्रही प्रभावी असते. आपल्या आतील चुंबकाचा प्रभाव वाढविण्यासाठी आपला अंतर्गत प्रवाहही वाढवावा लागतो. आपल्या आतमधील हा प्रवाह ज्ञानाच्या रूपाने सदैव वाहत असतो. अनुभवाच्या पातळीवर या ज्ञानरूपी प्रवाहाची ताकद जसजशी वाढत जाते तसतसे त्या प्रवाहामुळे निर्माण झालेले चुंबकीय क्षेत्रही विस्तारत जाते. 

आपल्या आतमध्ये असणाऱ्या चुंबकाची शक्ती जसजशी वाढू लागते तसतसा बाहेरच्या चुंबकांचा आपल्यावर असणारा प्रभाव कमी होऊ लागतो. स्वत:च्या आत दडलेला चुंबक जेव्हा क्रियाशील होतो तेव्हा बाह्य चुंबकाची आपल्याला गरजच भासत नाही. आपले स्वत:चे चुंबकीय क्षेत्र जसजसे विस्तारत जाते, तसतसे आपले इतरांच्या प्रभावाचे अवलंबित्व नाहीसे होऊ लागते. स्वत:च्या चुंबकीय शक्तीची जाणीव होऊन ती शक्ती विस्तारत नेण्यासाठी सतत कार्यमग्न असणे हेच यशाचे गमक आहे. तेच खरे यश आहे.

vishvanath16@gmail.com

Web Title: Vishwanath Patil article

टॅग्स