उथळ आणि सखोल

उथळ आणि सखोल

आपला प्रतिसाद काय असायला हवा यावर आपल्याकडून बऱ्याचदा विचार होत नाही. जरी तो झाला तरीदेखील तो सखोल झालेला असेलच याची खात्री असत नाही. त्यामुळे वरवरच्या विचारांच्या आधारे दिलेला आपला प्रतिसाद पूर्णपणे खरा असतोच असे नाही. उथळपणे दिलेल्या प्रतिसादांचा परिणामही तसाच वरवरचा असतो. आपण मात्र घटना आणि तिला दिलेला प्रतिसाद याच्या आंदोलनांवर सतत झुलत राहतो. आपले हे झुलणे आपल्या आयुष्याचा हिंदोळा बनवून टाकते.

समुद्राच्या पाण्यामध्ये एकसारखी हालचाल सुरू असते. कधी लाटा येतात, तर कधी भरती येते. आलेली लाट बघता बघता मोडून पडते आणि दुसरी लाट तिच्यावर स्वार होते. हळूहळू वाढत जाणारी भरती तिच्या चरम सीमेपर्यंत वाढते. तिथून पुढे ओहोटीचा अंमल सुरू होतो. म्हणजे समुद्राचे हे पाणी एकसारखे चढ उतारांचा खेळ खेळत राहते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा चढउतारांचा खेळ समुद्रातल्या या खेळासारखाच असतो.

समुद्राच्या पाण्याला सातत्याने हेलकावत ठेवणाऱ्या लाटा, भरती-ओहोटी हा काही समुद्राच्या पाण्याचा स्वधर्म नाही. समुद्राचे पाणी स्वत:हून ही आंदोलने निर्माण करीत नाही. समुद्राबाहेरची शक्ती समुद्राच्या पाण्यावर एकसारखा प्रभाव टाकत असते. या प्रभावाला प्रतिसाद म्हणून समुद्राचे पाणी लाटांच्या रूपाने आंदोलीत होत राहते. बाहेरची ही शक्तीच समुद्राच्या पाण्यामध्ये भरतीचा मोठा फुगवटा निर्माण करते. त्याच फुगवट्याला ओहोटीचा उतारही देते. 

समुद्रावरून मुक्तपणे वाहणारा वारा समुद्राच्या पाण्यात लाटांची निर्मिती करतो. या वाऱ्याच्या ताकदीमुळे समुद्राचे पाणी स्वत:ला काही काळ वर फेकते आणि पुन्हा आपल्या मूळ जागी जायचा प्रयत्न करते. समुद्रावरचा हा वारा पाण्याला आंदोलीत करायला कारणीभूत ठरतो. समुद्राचे पाणीही वाऱ्याच्या वेगाला प्रतिसाद म्हणून आंदोलनांवर स्वार होते. चंद्र, सूर्य यांच्या आकर्षण शक्तीचा परिणाम म्हणून भरती आणि ओहोटी निर्माण होते.

चंद्र, सूर्याचे आकर्षण समुद्राच्या पाण्याला उचलून धरते. जणू काही समुद्राचे मनच उचंबळून येते; पण हे आकर्षण कमी झाले की, पुन्हा समुद्राचे पाणी आपल्या मूळ पातळीवर जाऊ लागते. ही ओहोटी असते.  समुद्रातल्या लाटा अथवा भरती-ओहोटी हा प्रतिसादाचा परिणाम आहे. बाह्य घटनांनी टाकलेल्या प्रभावाखाली समुद्राचे पाणी स्वत:ला आंदोलीत करत राहते. बघणाऱ्याला मात्र हे पाणी स्वत:च हालचाल करत आहे असे वाटते. आपल्या आयुष्यातही लाटा आणि भरती-ओहोटीसारखी आंदोलने सतत सुरू असतात. ही आंदोलने आपणच निर्माण करीत आहोत, असे आपल्याला वाटत असते; पण तो आपला मोठा भ्रम असतो. घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा प्रभाव आपल्यावर पडतच असतो. त्या प्रभावानुसारच आपला प्रतिसादही बदलत असतो. प्रतिसादाच्या स्वरूपानुसार आपल्या आयुष्यातील आंदोलनांची तीव्रता कमी जास्त होत जाते. 

समुद्राच्या पाण्यात येणाऱ्या लाटा अथवा भरती-ओहोटी याविषयी एका गोष्टीपासून मात्र आपण जवळपास अनभिज्ञच आहोत. समुद्राच्या पाण्यातील या हालचाली काही विशिष्ट भागातच प्रभावी असतात. जिथे समुद्राचे पाणी उथळ असते, तिथे लाटा आणि भरती-ओहोटीची आंदोलने तीव्रपणे जाणवतात. म्हणूनच तर समुद्र किनाऱ्याच्या भागात लाटांची हालचाल आणि भरती-ओहोटीचा खेळ लक्षणीयरीत्या दिसून येतो.

खोल समुद्रात लाटा अथवा भरती-ओहोटी या घटनांचे अस्तित्वच नगण्य असते. खोल महासागराचे पाणी वाऱ्याच्या वेगाला दादच देत नाही. वाहणारा वारा मग निमूटपणे समुद्रावरून किनाऱ्याकडे प्रतिसादाच्या अपेक्षेत वाहत सुटतो. चंद्र, सूर्य यांच्या आकर्षणालाही सखोल महासागराचे पाणी भुलत नाही. त्यामुळे भरतीसारखे उचंबळून येणे आणि ओहोटीसारखे पुन्हा स्वत:च्या मूळ जागी जाणे हा खेळच सखोल महासागराच्या पाण्याला लुभावत नाही. महासागराच्या पाण्याची सखोलता जेवढी जास्त असते तेवढा त्याच्यावर बाहेरच्या शक्तींचा होणारा परिणाम नगण्य होत जातो. जणू काही महासागराची ही सखोलता स्वत:च्याच खोलीमध्ये मग्न झालेली असते. 

आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना दिलेल्या प्रतिसादातून आंदोलने निर्माण होत राहतात. त्या आंदोलनांची तीव्रता आपल्या आयुष्याविषयीच्या खोलीवर अवलंबून असते. आपली समज जेवढी उथळ तेवढी ही आंदोलने तीव्र असतात. तेवढाच आपल्यावर त्यांचा होणारा परिणामही जास्त असतो. हा उथळपणा तसाच राहिला तर या चढ उतारांच्या आंदोलनांवर झुलणे, हेच आपले आयुष्य होऊन बसते. उथळपणातूनच घेतलेले निर्णय पुन्हा आपल्याला आणखी उथळ करायला भाग पाडतात. 

आयुष्याची खोली वाढत चालली की, मग घडणाऱ्या घटनांना आपण देत असलेला प्रतिसादही बोथट होऊ लागतो. वाढत्या खोलीनुसार घटनांकडे पाहण्याची दृष्टीही बदलत जाते. जसजशी आयुष्याची खोली वाढत जाईल, तसतसे आंदोलनांचे वेड कमी होत जाते. वाढणारी खोली बाहेरचे आघात सहजच झेलून घेते. वाढलेल्या खोलीमुळे आघातांचा परिणामही हळूहळू कमी होऊ लागतो. उथळपणाकडून सखोलतेकडे जसजसा प्रवास होऊ लागतो तसतसे आपण आंदोलनाच्या खेळाकडून अगाध शांततेच्या स्थितीकडे जाऊ लागतो. 

स्वत:च्या आयुष्याची खोली वाढविण्यासाठी आपल्याला स्वत:वरच मेहनत घ्यावी लागते. बाहेरच्या साधनांनी ही खोली वाढवता येत नाही. त्यासाठी आपल्याला स्वत:च्या आतच डोकावत राहावे लागते. स्वत:मधील उथळपणात साचलेला गाळ एकसारखा फावड्याने बाहेर काढून फेकावा लागतो.

जन्मभराच्या विविध प्रतिसादांनी तयार झालेला हा गाळ सहजासहजी बाहेर निघत नाही; पण आपण चिकाटी ठेवली, तर उथळपणाकडून सखोलतेकडे जाणारा हा आपला प्रवास एका निश्‍चित गतीने सुरू राहतो. स्वत:तला उथळपणा आपण जितक्‍या लवकर मान्य करू, तितक्‍या लवकर सखोलतेकडे जाणारा प्रवास सुरू होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com