मूल्यगर्भ आणि काव्यात्म निबंध vishwas vasekar writes book pipani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Book Pipani

मूल्यगर्भ आणि काव्यात्म निबंध

- विश्र्वास वसेकर, saptrang@esakal.com

ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी गो. वि. करंदीकरांबद्दल असे म्हटले आहे की त्यांच्या ललितगद्यात जुना लघुनिबंध आणि अलीकडचे ललितगद्य असे दोन्ही प्रकारचे लेखन आढळते. हेच विजय शेंडगे यांच्या ‘पिपाणी’ मधील ललितगद्याबद्दल म्हणता येईल. ‘सोन्याची सावली’, ‘सावलीची तहान, ‘उतरंड’, ‘पेन हरवला आहे, ‘हरवलेला संस्कार, ‘रिकामं मखर’, ‘खुर्च्या’ हे निबंध खांडेकर, फडके, काणेकर यांच्या पठडीत शोभणार आहेत. सहज घडलेला एखादा प्रसंग घ्यायचा त्याला लेखकाच्या विचारांची डूब दयायची आणि त्यातून जीवनविषयक चिंतन मांडायचे ही उपरोक्त तिघांची लेखन पद्धती.

‘अल्फा ऑफ द फ्लो’ या लघुनिबंध-काराच्या परंपरेत लिहिलेले आणि त्या साच्याला गिरवणारे मराठी लघुनिबंध १९५० पूर्वीच्या मराठी साहित्याने पाहिले. या निबंधाने स्वतःच स्वतःची एक मर्यादा आखून दिली होती. ठरवून स्वीकारलेल्या एका तंत्रात या लेखकांनी निबंधाला जणू कोंडून ठेवले होते. मराठी साहित्यामध्ये १९ व्या शतकाच्या पाचव्या दशकात नवसाहित्याची जी लाट आली तिच्यात हे सगळे वाहून गेले.

नव्या धाटणीचे ललितगद्य याच ‘पिपाणी’ संग्रहात विजय शेंडगे यांनी लिहिले आहे. पूर्वीच्या तंत्रशरणतेला झुगारून आपल्या लेखनाला तरल, मुक्त आणि काहीसे काव्यात्मक बनविण्यात शेंडगे यांना यश आले आहे. नव्या ललितगद्यात आत्मनिष्ठा आणि आत्मनिवेदन यांना महत्व आल्याने या ललितगद्यातला ‘मी’ जीवनविषयक सूक्ष्म चिंतन करणारा असा तो असल्यामुळे मानवी जीवनातल्या त्याच्या भाषेलादेखील एक महत्त्व आले आहे.

सुरुवातीला ‘पिपाणी’ मधील लघुनिबंधाच्या पठडीतल्या ललितगद्याचा उल्लेख केला. तरी पूर्वीच्या पद्धतीचे लघुनिबंध लिहिणे हे काही पाप किंवा चूक होऊ शकत नाही. किंबहुना गो. वि. करंदीकरांसारखे विजय शेंडगे यांच्या बाबतीत झाले असेल. नाव काहीही द्या सगळे लघुनिबंध ही शेंडगे यांची मनस्वी आणि उत्कट निर्मिती आहे. आणि ती करताना त्यांची आत्मनिष्ठा कुठेही ढळलेली नाही याकडे मला लक्ष वेधायचे आहे. दुसरी गोष्ट खुद खांडेकर, फडके, काणेकर यांचे सगळे लघुनिबंध मी आवडीने वाचले आहेत आणि त्यातले काही पाच पाच वर्ष वर्गात शिकवताना अध्यापनाचा उच्च दर्जाचा आनंद ही घेतला आहे.

शेंडगे यांच्या लेखनाचा मात्र मी अधिक गौरवाने उल्लेख करेन. ‘पंखावरचा विश्वास’ हे एक मला आवडलेले ललितगद्य आहे. चिमणा-चिमणी आणि त्यांची दोन पिल्लं यांच्यासंबंधीचे हे ललितगद्य एक किंचित कथानकही आपल्याला देत असले तरी ते मूलतः ललितगद्यच आहे. ही दोन पिल्लं मोठी गोड आणि विलक्षण आहेत. माणसाविषयी त्यांचे फार सुंदर आणि सूक्ष्म निरीक्षण आहे. शेंडगे यांच्या प्रतिमेच्या दर्शनाने आपण स्तिमीत होतो.

हा विषय लेखकाने कुठल्याकुठे नेऊन ठेवला आहे. आपल्या चिंतनाला केवढी उंची प्राप्त करून दिली आहे...! शेंडगे यांचे अनेक निबंध आपल्या लेखनाला मूल्यगर्भ प्राप्त करून देणारे आहेत. ‘dp मधलं प्रेम’ हा एकाचवेळी मूल्यगर्भता आणि काव्यात्मता प्राप्त झालेले सर्वांग सुंदर ललितगद्य. लग्नाला २७ वर्षे पूर्ण झाल्याचा एक कथात्मक संदर्भ या लेखाला आहे. यातल्या सर्वंच लेखांमध्ये आशयाचा आणि रंजकतेचा समन्वय झालाय.

पुस्तकाचं नाव : पिपाणी

लेखक : विजय शेंडगे

प्रकाशक : संस्कृती प्रकाशन, पुणे

(०२०- २४४९७३४३, ९८२३०६८२९२)

पृष्ठं : १६०

मूल्य : २५० रुपये.

टॅग्स :Booksaptarang