पुराणांचा आशय

‘पुराण’ या विशेषणाचा अर्थ आहे जुनं. पुराण म्हणजे कोणताही जुना वृत्तान्त किंवा पुरातन संहिता. पुढं हे विशेषण विशिष्ट संहितांसाठी विशेषनाम म्हणून वापरलं जाऊ लागलं.
Contents of the Puranas
Contents of the Puranassakal
Summary

‘पुराण’ या विशेषणाचा अर्थ आहे जुनं. पुराण म्हणजे कोणताही जुना वृत्तान्त किंवा पुरातन संहिता. पुढं हे विशेषण विशिष्ट संहितांसाठी विशेषनाम म्हणून वापरलं जाऊ लागलं.

- विवेक देबरॉय, saptrang@esakal.com

‘पुराण’ या विशेषणाचा अर्थ आहे जुनं. पुराण म्हणजे कोणताही जुना वृत्तान्त किंवा पुरातन संहिता. पुढं हे विशेषण विशिष्ट संहितांसाठी विशेषनाम म्हणून वापरलं जाऊ लागलं. एखादी संहिता ‘पुराण’ म्हणवली जाण्यासाठी ती पंचलक्षणांनी युक्त हवी. ‘सर्ग’, ‘प्रतिसर्ग’, ‘वंश’, ‘मन्वंतर’ आणि ‘वंशानुचरित्र’ या पाच बाबी तीत समाविष्ट असायलाच हव्यात. याविषयीचं स्पष्ट विधान आपल्याला ‘मत्स्यपुराणा’त आढळतं. ब्रह्माचा दिवस संपून जेव्हा त्याची रात्र सुरू होते तेव्हा साऱ्याचाच विनाश किंवा अंत घडून येतो. तद्नंतर पुनःश्च नवनिर्मिती होते. आपल्यापैकी अनेकांनी ‘चौदा भुवने’ किंवा ‘चौदा लोक’ ही कल्पना ऐकलेली असणार.

या चौदा लोकांत सात ऊर्ध्वलोक आणि सात अधोलोक असतात. सात वरच्या प्रदेशातील जगे आणि सात खालच्या. ‘भूलोक’, ‘भूवर्लोक’, ‘स्वर्लोक’, ‘महर्लोक’, ‘जनलोक’, ‘तपोलोक’ आणि ‘ब्रह्मलोक’ ही सात वरची जगे म्हणजेच ‘ऊर्ध्वलोक’ होत. (‘ब्रह्मलोका’लाच ‘सत्यलोक’ असंही म्हणतात). ‘अतळ’, ‘वितळ’, ‘सुतळ’, ‘रसातळ’, ‘महातळ, ‘तळातळ’ आणि ‘पाताळ’ हे सात अधोलोक होत. मात्र, काही वेळा ‘पाताळ’ हाच शब्द खालच्या सातही जगांसाठी समुच्चयबोधक म्हणून वापरला जातो. ब्रह्माचा एक दिवस संपताच जेव्हा विनाश घडतो तेव्हा ‘भूलोक’, ‘भूवर्लोक’, ‘स्वर्लोक’ आणि ‘महर्लोक’ यांचाच फक्त सर्वनाश होतो. ‘जनलोक’, ‘तपोलोक’ आणि ‘ब्रह्मलोक’ या विनाशातून वाचतात. ब्रह्माच्या एका दिवसात १४ मन्वंतरं असतात ही माहिती आपण घेतल्याचं तुम्हाला आठवतच असेल. आपण सध्या ‘वैवस्वत मन्वंतरा’त आपलं जीवन व्यतीत करत आहोत. ‘वैवस्वत मनू’ या मन्वंतराचा प्रमुख आहे, म्हणून हे त्याच्या नावानं ओळखलं जातं.

‘देव’ किंवा त्या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप या शब्दाचा अर्थ तरी काय? आपल्या कल्पनेतील देव आणि देवता हा याचा अर्थ घेणं योग्य ठरणार नाही. देव याचा इथं अर्थ आहे प्रकाशमान असलेला. देव हा शब्द ‘दिव्’ या धातूपासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ ‘प्रकाशणे’ असा आहे; म्हणूनच तर आपण ‘दिवा’ हा शब्द वापरतो. आणि, ‘प्रकाश’ देणाऱ्या सूर्याला ‘दिवाकर’ म्हणतो.

मात्र, मन्वंतर बदललं की हे देवही बदलतात. इंद्र ही एक उपाधी आहे. ते काही विशेषनाम नाही. हे इंद्रही मन्वंतरानुसार बदलतात. सद्यकालीन इंद्राचं नाव आहे ‘पुरंदर’. पुरंदर म्हणजे शत्रूंच्या अनेक पुरांचा - म्हणजेच नगरांचा - नाश करणारा. यानंतर येईल ते ‘सावरणी मन्वंतर’ असेल. आणि, ‘बळी’ हा ख्यातकीर्त राजा त्या मन्वंतराचा इंद्र असेल. विष्णूनं आपल्या वामनावतारात ज्याला पाताळात गाडलं होतं तोच हा बळीराजा. मन्वंतरानुसार सप्तर्षीही बदलतात. या माहितीवरून पुराणाच्या ‘मन्वंतर’ या चौथ्या भागात काय काय असेल याची आपल्याला कल्पना करता येईल. देव किंवा ऋषी हेही काही अमर नसतात हे आता आपल्याला कळलेलं आहे.

त्यांच्या जीवनाचा कालावधी आपल्या मानानंं बराच मोठा असेल; पण त्यांचाही नाश होतोच. ते काही अमर नाहीत. ‘वंश’ या तिसऱ्या भागात देव आणि ऋषी यांची वंशावळ सांगितलेली आहे. ‘प्रतिसर्ग’ म्हणजे ब्रह्माचा दिवस संपताच होणारा सर्वविनाश आणि ब्रह्माची रात्र संपताना होणारं नवनिर्माण. ब्रह्माला स्वतःलासुद्धा ठराविक जीवनकाल आहे बरं. तो काळ आहे एक हजार वर्षांचा. हा कालावधी संपला की आपण ज्याला ‘ब्रह्म’ या नावानं ओळखतो त्याचाही अंत होईल. सारंच नष्ट होतं. ‘जनलोक’, ‘तपोलोक’, ‘ब्रह्मलोक’ हेही नष्ट होतात. मग साऱ्याचा होतो एक अमर्याद जलविस्तार आणि त्यावर शयन करून नारायण आपली योगनिद्रा घेतो.

‘सर्गा’मध्ये या वैश्विक निर्मितीचं आणि विनाशाचं सविस्तर वर्णन केलेलं असतं. आणि, मग राहतं ते ‘वंशानुचरित्र’. ‘सूर्यवंश’ आणि ‘चंद्रवंश’ हे दोन प्रसिद्ध वंश होते. सारेच्या सारे राजे या दोहोंपैकीच एका वंशात जन्मलेले होते. ‘वंशानुचरित्रा’त साऱ्या वंशावळी आणि त्यातील विविध राजांचं आचरण वर्णिलेलं आहे. प्रत्येक पुराणात हे असे पाच भाग असतातच; पण केवळ ‘विष्णुपुराणा’तच हे पाच भाग सांगून झाले की ते संपतं. त्यात पुढं आणखी काही लिहिलेलं नसतं. इतर पुराणं मात्र एखाद्या विश्वकोशासारखी आहेत. त्या पुराणांत आपण आचरत असलेल्या धर्माच्या सगळ्या बाबी येतात. ही इतर सारी पुराणं पंचलक्षणांच्या पलीकडे जाऊन बहुलक्षणी होतात.

हेही सांगायला हवं की, या अठरा पुराणांचं वर्गीकरण करण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपल्या पवित्र त्रिमूर्तीत ब्रह्मा हा निर्माता, विष्णू हा पालनकर्ता आणि शिव हा विनाशकर्ता मानला गेला आहे. ज्या पुराणांत निर्मितीवर प्रमुख भर असतो ती ब्रह्माच्या नावांनी (‘ब्रह्म’, ‘ब्रह्मांड’, ‘ब्रह्मवैवर्त’, ‘मार्कंडेय’) ओळखली जातात. जिथं निर्मितीवर प्रमुख भर असतो ती ‘वैष्णव पुराणं’ म्हणून ओळखली जातात (‘भागवत’, ‘गरुड’, ‘कूर्म’, ‘मत्स्य’, ‘नारद’, ‘पद्म’, ‘वामन’, ‘वराह’, ‘विष्णू’). ज्या पुराणांत शिवाला मुख्य स्थान असतं ती ‘शैव पुराणं’ म्हणून ओळखली जातात (‘अग्नी’, ‘लिंग’, ‘शिव’, ‘स्कंद’, ‘वायू’).

या प्रतिपादनात सत्याचा काही अंश असला तरी प्रत्येक पुराणात ‘ब्रह्मा’, ‘विष्णू’, ‘शिव’ या तिघांचंही अस्तित्व असतं आणि त्या तिघांनाही पुरेसं महत्त्वाचं स्थान आहेच. म्हणून, विष्णू आणि शिव यांच्यातील सापेक्ष श्रेष्ठत्वाच्या कल्पनेपलीकडे या वर्गीकरणानं फारसं काही साध्य होत नाही. दुसऱ्या प्रकारचं वर्गीकरण याहून अधिक संदिग्ध आहे. ते सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांवर आधारित आहे. उदाहरणार्थ : पद्मपुराणाच्या उत्तरखंडात शिवानं पार्वतीला सांगितलेल्या काही श्लोकांत अशा स्वरूपाच्या थोड्या ओळी आहेत. त्यानुसार ‘भागवत,’ ‘गरुड’, ‘नारद’, ‘पद्म’, ‘वराह’ आणि ‘विष्णू’ ही सत्त्वगुणांनी मंडित पुराणं आहेत. ‘भविष्य’, ‘ब्रह्म’, ‘ब्रह्मांड’, ‘ब्रह्मवैवर्त’, ‘मार्कंडेय’ आणि ‘वामन’ ही रजोगुणांनी युक्त पुराणं आहेत; तर ‘अग्नी’,‘कूर्म’, ‘लिंग’, ‘मत्स्य’, ‘स्कंद’ आणि ‘शिव’ ही तमोगुणयुक्त पुराणं मानण्यात आलेली आहेत.

आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असतं की, पुराणांची आपल्याला जाण आहे. खरं तर आपल्याला पुराणातील काही कथा तेवढ्या माहीत असतात. पुराणांविषयी इतर काही माहिती फारशी नसते. अर्थात्, विविध पुराणांमध्ये बऱ्याच परस्परविसंगतीही आहेत. वेगवेगळ्या पुराणांत एकाच कथेचे वेगवेगळे अवतार आढळू शकतात. म्हणून, मी जर एखाद्या कथेचा उल्लेख केला, आणि तो मी करणारच आहे, तर प्रत्येक वेळी संबंधित कथा मी कोणत्या पुराणातून घेतली आहे हेही मी सांगत जाईन. बहुतेक लोक एखाद्या भाषेत पुराणाच्या संक्षिप्त आवृत्त्या वाचतात. त्यामुळे त्यांना काही कथा तर माहीत असतात; पण पूर्णावृत्तीत असलेल्या इतर बऱ्याच गोष्टींना ते मुकतात. त्यामुळे या संहितांचं विश्वकोशात्मक स्वरूप त्यांना दिसत नाही. मी संस्कृतमधून इंग्लिशमध्ये आलेल्या पुराणाच्या पूर्णावृत्तीचं बंगालीत भाषांतर करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. याला आम्ही नाव ठेवलंय : ‘पुराणप्रकल्प’. ‘पेंग्विन’ ही नामांकित प्रकाशनसंस्था हे भाषांतर प्रकाशित करत आहे. ‘भागवत’, ‘मार्कंडेय’, ‘ब्रह्म’, ‘विष्णू’ आणि ‘शिवपुराणा’ची भाषांतरं आजवर प्रसिद्ध झालेली आहेत.

‘ब्रह्मांडपुराणा’चं भाषांतर मी लिहून पूर्ण केलंय; पण त्याच्या प्रकाशनाला अद्याप थोडा अवकाश आहे. आता ‘मत्स्यपुराणा’चं भाषांतर सुरू आहे.

पूर्णावृत्तीतील भाषांतराचा कितपत उठाव होईल याबद्दल प्रकाशक या नात्यानं ‘पेंग्विन’च्या मनात साशंकता होती; म्हणून, सुरुवात आम्ही ‘भागवतपुराणा’पासून केली. हे सर्वसामान्यतः लोकांच्या सर्वाधिक परिचयाचं पुराण आहे. पुढच्या वेळी या सदरात आपणही ‘भागवतपुराणा’पासूनच आरंभ करू.

(अनुवाद : अनंत घोटगाळकर)

anant.ghotgalkar@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com