स्वर मोहरताना...

स्वर मोहरताना...

संगीतकारानं आता तांत्रिक कौशल्यही आत्मसात करावं अशी अपेक्षा असते. मलाही ते आवडायचं. सुरवातीला माझा बराचसा वेळ रेकॉर्डिंग स्टुडिओमध्येच जात असे. त्यानंतर जाहीर कार्यक्रम करायला मी सुरवात केली. रसिकांचाही त्याला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. आता अशा कार्यक्रमात नवीन गाणं सादर करण्याचं आव्हान खुणावत राहतं.

आधुनिक संगीतकारानं निव्वळ पेटीवरती उत्तम चाल लावण्याशिवाय तांत्रिक कामगिरीही बजावली पाहिजे अशी त्याच्याबद्दल स्वाभाविक अपेक्षा असते. त्याला आधुनिक पद्धतीचं संगीत संयोजन जमलं पाहिजे, ध्वनिमुद्रण आणि ध्वनिमिश्रण यामध्येही तो पारंगत असला पाहिजे. थोडक्‍यात, कलाकार म्हणून तो कितीही परिपूर्ण असला तरी एक तंत्रज्ञ म्हणूनही तो तितकाच सुसज्ज हवा. या सर्व तांत्रिक प्रक्रियांसाठी व्यावसायिक तंत्रज्ञ संगीतकाराच्या दिमतीला हजर असतात. पण योग्य म्हणजे हवा तो परिणाम साधण्याकरिता कलाकृतीतले घटक एकमेकांशी विशिष्ट पद्धतीनं जुळून यावेत, यासाठी संगीतकारालाच सतर्क राहावं लागतं आणि त्यासाठी सर्व तांत्रिक बाबींचं सखोल ज्ञान असणं अगदी आवश्‍यक आहे. निव्वळ संगणकावरची आज्ञावली (सॉफ्टवेअर) वापरता येणं किंवा त्यातल्या ठरलेल्या मूलभूत गोष्टी आजमावता येण्याइतपत मर्यादित ज्ञान उपयोगाचं ठरत नाही. तंत्रातली सखोल समीकरणं, त्यांच्या मागं दडलेलं विज्ञान आणि मग प्रयोगातून तर्कशुद्ध सादरीकरण असा कौशल्यपूर्ण परिणाम साधण्याचं आव्हान पेलता आलं पाहिजे. उदाहरणार्थ, गायकाच्या आवाजाचा प्रतिध्वनी हा ठेक्‍याच्या ‘लयी’ सोबत अंकीय नियमावलीतून संलग्न होण्यासाठी ताल, लय आणि प्रतिध्वनी यातलं गणिताचं शास्त्र कळलं पाहिजे. हे जर कळलं असेल तरच पुढच्या शब्दांवर आधीच्या शब्दांचं प्रतिबिंब उमटत नाही आणि शब्दोच्चारांची स्पष्टता जपली जाते. आवाजाला ओलावा देऊनही ऐकणाऱ्याला गाण्यातले प्रत्येक शब्द ठळक ऐकू येतात. प्रतिध्वनीचं प्रमाण कमी-अधिक झाल्यानं गाणं हे अनुक्रमे कोरडं किंवा धूसर होऊ शकतं. हे आणि यासारखी अनेक तांत्रिक कोडी सोडवण्यासाठी संगीत-शास्त्रासोबत संगणकाचा वापर कसा करायचा यावर प्रभुत्व मिळवावंच लागतं. त्यातून कलाकृतीला झळाळी येऊन व्यावसायिकतेची एक वेगळीच पातळी गाठता येते. अशा नैपुण्याची आस असणारा संगीतकार कलाक्षेत्रापेक्षा कलेत अधिक रमतो, रंगमंचावर मिरवण्यापूर्वी रेकॉर्डिंगच्या स्टुडिओमध्ये अधिक दक्ष होतो.

माझ्यासाठी संगीत कला म्हणजे एक विलासी बाब आहे; एक प्रकारची लक्‍झरी आहे ! आपल्या गाण्यातून श्रोत्यांना कलात्मकतेचा आनंद तर मिळालाच पाहिजे, पण त्यासोबत एक चैनीचा, ऐशो-आरामाचा असा एक्‍झॉटिक अनुभवही त्यांना मिळाला पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी प्रयोगशील पण नीट नेटकं असं ध्वनिमुद्रण करण्याकडं माझा कल असतो. म्हणून रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये अधिक वेळ द्यावा लागतो आणि बरीच एनर्जीही तिथं खर्च होते. असं करताना श्रोत्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणारा रंगमंचाचा योग नेहमीच जुळून येईल असं होत नाही. असा ‘सुवर्णयोग‘ जुळून येण्यासाठी काही काळ थांबावंच लागतं. समांतर संगीत कक्षेत रमणाऱ्या संगीतकारांपेक्षा व्यावसायिक करमणूक क्षेत्रात मग्न असलेल्या संगीतकारांचं वेळापत्रक त्यांना रंगमंचावर कमी आणि रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये अधिक गुंतवून ठेवतं. रंगमंचावरून सादरीकरण करताना आपल्यासमोर श्रोत्यांची संख्या असण्यापेक्षा आपल्या ‘चाहत्यांची’ बहुसंख्या असावी असं मला वाटत होतं. त्यामुळं यशस्वी गाणी रचूनही कारकिर्दीच्या पहिल्याच टप्प्यात मी रंगमंचावर जाण्याची घाई केली नाही. सादरीकरण शोभिवंत होण्यासाठी आपल्या खात्यात किमान १५ ते २० लोकप्रिय गाणी असावीत असं वाटत होतं. त्याआधी घाई करायची नाही असं मी ठरवलं. माझे सहकारी गायक महाराष्ट्रभर दौरे करत असताना माझ्या गाण्यांना मिळणारा सकारात्मक प्रतिसाद अगदी उत्साहानी कळवायचे; कोणत्या गाण्याची फर्माईश झाली, कोणत्या गाण्याला कसा आणि कितीदा वन्स मोर मिळाला असे रोमांचक किस्से त्यांच्याकडून नियमित कळायचे. पण स्वतः अनुभव न घेतल्यामुळे मला ती अतिशयोक्ती वाटायची. हळू-हळू ही गायक मंडळी मला आग्रह करू लागली, की मी त्यांच्यासोबत या करमणुकीच्या महोत्सवरुपी इव्हेंट्‌स ना हजर राहिलं पाहिजे. पण मिश्र कार्यक्रमांच्या यादीत मिळणाऱ्या १५ ते २० मिनिटांच्या ‘एंट्री’ मध्ये मला रस नव्हता. आपला स्वतंत्र ‘काँन्सर्ट‘ ज्यासाठी आपले चाहते गर्दी करतात, अशी किमया घडून येणं यातचं संगीतकाराचं खरं यश असतं. विनामूल्य गाण्याचे कार्यक्रम किंवा नृत्य-नाट्य-संगीत महोत्सव यासाठी लोकं गर्दी करतात तो त्यातून मिळणाऱ्या मिश्र करमणुकीच्या अनुभवासाठी; पण एका संगीतकाराच्या नावावर लागणाऱ्या त्याच्या स्वतःच्या खासगी मैफिलीला त्यानं त्याच्या कामातून कमावलेल्या नावलौकिकाप्रमाणेच प्रतिसाद मिळतो; जे अधिक आव्हानात्मक आहे. तुम्हाला आयता श्रोतावर्ग मिळणं आणि तुम्ही तुमचा श्रोतृवर्ग मिळवणं यात खूप मोठा फरक आहे. तसंच, लोकांना जे परिचित आहे ते आणि तेवढंच गाण्यापेक्षा आपण जे संगीत करतो ते लोकांना आवडणं आणि त्यांनी ते स्वीकारणं ही प्रक्रिया वेळ खाणारी असली तरी अतिशय समाधानकारक असते.

‘धीरा पोटी फळे रसाळ गोमटी’ या म्हणीप्रमाणं रंगमंचावर कार्यक्रम सादर करण्याचा सुवर्णयोग माझ्यासाठी  २०१३ मध्ये जुळून आला. ठाणे इथं कार्यरत असलेल्या ‘इंद्रधनू’ या प्रतिष्ठित संस्थेनं ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या संमतीनं मला ‘सुधीर फडके पुरस्कार’ घोषित केला आणि पुरस्कार सोहळ्यानंतर मी माझ्या गाण्यांचा कार्यक्रम करावा असा प्रस्ताव मांडला. ही खरोखरच माझ्यासाठी सुवर्णसंधी होती. तसंही गेली २- ३ वर्ष फेसबुकवर अनेक चाहते मी माझ्या गाण्यांचा कॉन्सर्ट कधी करणार याची सतत चौकशी करत होते. त्यांना होकार कळवायची हीच संधी होती. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये ‘उंच माझा झोका’ या नावानं मी माझा पहिला जाहीर कार्यक्रम सादर केला. त्याला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो. मी संगीतरचना केलेली गाणी माझे सहकारी गायक गायचे व मला जे काही सांगायचे ते सगळं खरं असल्याचे पुरावे मला या कार्यक्रमात मिळत होते; कळत नकळत, कुलवधू, उंच माझा झोका, त्या वर्षी गाजलेलं ‘होणार सून मी ह्या घरची’ या शीर्षकगीतांपासून, ‘ते तुझ्याविना आणि ‘नाही कळले कधी’ या मालिकागीतांपर्यंत व घन आज बरसे, पोरी तू कमाल सारख्या अल्बम गीतांपासून ते आभास हा, भिजून गेला वारा, अवखळ से स्पर्श, सर सुखाची श्रावणी, या चित्रपट गीतांपर्यंत सगळी गाणी श्रोते आमच्यासोबत गात होते. आम्ही व्यासपीठावर गाण्याचे शब्द वाचून गाणी सादर करत होतो, पण श्रोत्यांना मात्र ही सगळी गाणी शब्द-चाली सकट तोंडपाठ होती. हा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असं मला वाटलं नव्हतं. तिथून मग श्रोत्यांना प्रत्यक्ष भेटायचा उत्साह मला आला आणि आत्मविश्वासही जागा झाला. पुढच्या वर्षी निवेदिका उत्तरा मोने यांनी माझ्यासमोर काही कॉन्सर्टस चा प्रस्ताव मांडला आणि ‘स्वर मोहरले’ या संकल्पनेचा जन्म झाला. या कॉन्सर्टसमध्ये गाण्यासाठी गायक मंगेश बोरगावकर आणि गायिका सावनी रवींद्र यांची निवड झाली. वाद्यमेळ अभिनव असावा अशी माझी अट होती. मूळ गाण्यापेक्षा हटके पद्धतीने किंवा लाउंज म्युझिकच्या वातावरणात गाणी स्टेज वर सादर व्हावीत म्हणून रितेश ओहोळ (इलेट्रिक गिटार), अभिजित भदे (ड्रम मशीन), नितीन शिंदे (तालवाद्ये), अमृता ठाकूरदेसाई आणि दर्शना जोग (कीबोर्ड व पियानिका) यासारखे कर्तबगार वादक सज्ज झाले. २०१४- १५ मध्ये मुंबई, वसई, पुणे, नागपूर आणि मिरज इथं आमचे कॉन्सर्टस झाले. प्रत्येक कॉन्सर्ट यशस्वी ठरला. सगळीकडंचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मन भारावून जायचं. मिरजमध्ये झालेल्या कॉन्सर्टच्या आधी तिथल्या मिरज एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या शाळेनं त्यांच्या विद्यार्थिनी आणि आमची भेट घडवण्यासाठी एका विशेष सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्या सोहळ्याचा अनुभव विलक्षण होता. शाळेतील एक हजार लहान मुलींनी आमच्या सुरात सूर मिसळला होता. त्या निरागस लहानग्या मुलींकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा एक अवर्णनीय अनुभव होता. आपण जी संगीत रचना करतोय ती लोकांना आवडतीय आणि त्याची पोचपावती थेट त्यांच्याकडून मिळवण्यात काय आनंद आहे ते मला आता समजू लागलं, आवडू लागलं. पुढं स्वर मोहरलेचं ‘रेशीमगाठी’ आणि आता ‘सावर रे मना’ या नव्या शीर्षकांमध्ये रूपांतर झालं. सातत्यानं नवी गाणी येत असल्यानं काही जुनी गाणी वगळून त्यात या नव्या गाण्यांची पडणारी भर ह्यामुळे कॉन्सर्टचं स्वरूप निरस न राहता अभिनव होत चाललंय याचं मला समाधान वाटतं. आम्हालाही प्रत्येक कॉन्सर्टमध्ये नव्याने लोकप्रिय झालेलं गाणं सादर करण्याचं आव्हान खुणावतं. शब्दांनी तार सप्तकात तान घ्यावी, सुरांनी खर्जातलेही अर्थ उलगडावेत आणि आपल्या गाण्यानं रसिकतेला साद घालत मुक्त बरसावं; जेव्हा अशी मैफिल रंगते तेव्हा रसिकांसोबत आमचंही भान हरपतं, आणि हा अनुभव पुन्हा पुन्हा आपल्या वाटेला यावा असं वाटतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com