जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 17 ते 23 नोव्हेंबर

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 17 ते 23 नोव्हेंबर

अशी राष्ट्रपती राजवट आणा! 
आकाशातला अवकाश वेटाळून माणूस आपलं जीवन कंठत असतो, त्यामुळेच ‘काळ कंठणारा तोच माणूस’ असं म्हटलं तर काहीच हरकत नाही. माणूस म्हणजे विशिष्ट काळ सजवणारी किंवा उपभोगणारी एक राजवटच म्हणावी लागेल. आकाशातली ‘स्पेस’ घेऊन आपल्या नाम-रूपात्मक चार्टर्ड्‌ विमानातून भ्रमण करणारा माणूस म्हणजे ‘ख’ नावाच्या आकाशातील खेचरच म्हणावा लागेल! शिवाय, असंसुद्धा म्हणता येईल की आकाशाच्या अवकाशरूपी पोकळीत काळरूपी घरटं करून राहणारा माणूस म्हणजे चिवचिवाट करणारा किंवा कावकाव करणारा पक्षीच होय! 

आकाशात अनंतकाळापासून काळाची सत्ता राबत आहे. आकाशाच्या अनंत किंवा विशाल अशा सभागृहात काळभैरवांचं प्रशासन कार्यरत असतं. देव, मनुष्य आणि राक्षस अशा त्रिवर्गातला सत्तासंघर्ष या वरील आकाशातील काळरूपी सभागृहात सतत चालत असतो. आकाशातील अस्तित्व देवांचं असो, मनुष्यांचं असो किंवा राक्षसांचं असो; अस्तित्व टिकवण्यासाठीची धडपड हाच निसर्गातील एक स्थायीभाव म्हणावा लागेल आणि या अस्तित्वाला आधार हा काळाचाच असतो, म्हणूनच ब्रह्मदेवालाही काळात किंवा कालकुपीत अडकावं लागलं. त्यामुळेच तर ‘ब्रह्मदेवाचा दिवस’ ही कल्पना अस्तित्वात आली! 

मित्र हो, या सप्ताहात ता. १९ नोव्हेंबर रोजी काळभैरवजयंती आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा एक वैश्‍विक श्‍वास आहे आणि हा काळपुरुषाचा श्‍वास अखंड सुरू आहे. या काळपुरुषाच्या दीर्घ अशा श्‍वासातील पूरक, रेचक किंवा कुंभक यांच्यात अनंत ब्रह्मांडांचे उदयास्त होत असतात. सत्‌ आणि असत्‌ यांच्या पलीकडे असणारं एक अस्तित्व अनंत आकाशाला गिळून कायमचं ध्यानस्थ बसलं आहे, त्यामुळेच ते कालातीत आहे. असं कालातीत होणं म्हणजेच आपल्या आत्मभुवनी खऱ्या आत्मराजाची राष्ट्रपती राजवट आणणं होय! 
============ 
उतावीळ होऊ नका! 
मेष :
गुरुभ्रमणाच्या विशिष्ट स्थितीचा विवेकबुद्धीनं लाभ घ्या. सप्तमस्थ मंगळाच्या आगमनाचं भान ठेवा. उतावीळ होऊ नका. भावनिक शॉर्टसर्किट होऊ देऊ नका! अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींच्या संचितातील ठेवी ता. १९ ते २१ या दिवशी मॅच्युअर होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टाच्या कामात यश. 
============ 
राजकीय उचापती नकोत! 
वृषभ :
मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील ग्रहमान सुरवातीला जबरदस्त क्‍लिक होणारं. तरुणांचा भाग्योदय. परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सामाजिक विरोधाला सामोरं जावं लागेल. नका करू राजकीय उचापती! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार स्त्रीचिंतेचा. 
============ 
जनसंपर्कातून मोठे लाभ 
मिथुन :
गुरूचं राश्‍यंतर झालंच आहे. आता शुक्राचं राश्‍यंतर गुरूच्या प्रभावात झगमगाट करेल! ता. १९ ते २१ हे दिवस तुमच्या राशीला उत्तम पॅकेजचेच. जनसंपर्कातून मोठे लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीशक्तीचं अर्थातच देव-देवतांचं पाठबळ राहील! पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पगारवाढ. 
============ 
भावनांचं शॉर्टसर्किट नको! 
कर्क :
हा सप्ताह मंगळ आणि हर्षल यांच्या ‘स्ट्रॅटेजी’तून ‘फील्ड ऍरेंजमेंट’ करणारा! शारीरिक, मानसिक आणि व्यावहारिक पथ्यं पाळा. सप्ताहात पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींची उलघाल वाढवणार आहे. भावनांचं शॉर्टसर्किट होऊ देऊ नका! रस्त्यावर जपा. नोकरीत बॉसचा अहंकार सांभाळा! 
============ 
शरदाचं चांदणं फुलेल! 
सिंह :
सप्ताहातलं शुक्राचं राश्‍यंतर गुरूचं वैभव आणखीच प्रकट करेल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी जीवनात येणाऱ्या संधींचा गांभीर्यानं विचार करावा. ता. २० व २१ हे दिवस शरदाचं चांदणं फुलवणारे! प्रेमिकांच्या घट्ट गाठी-भेटी. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार कंटाळवाणा. स्त्रीशी कटकट होण्याची शक्यता. 
============ 
गृहसौख्याचं पर्व सुरू 
कन्या :
सप्ताहाच्या प्रारंभी शुक्राचं भ्रमण चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी व्यावसायिक उलाढालींचं. वादग्रस्त येणी येतील. काहींना सेलिब्रिटींचा सहवास. जुन्या गुंतवणुकीतून लाभ. शुक्राच्या राश्यंतरातून उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींच्या गृहसौख्याचं पर्व सुरू होईल. 
============ 
संयमानं, धीरानं वागा 
तूळ :
राशीचा मंगळ चित्रा नक्षत्राच्या व्यक्‍तींना शत्रुत्वाच्या पार्श्‍वभूमीवर वा अन्य वादग्रस्त पार्श्‍वभूमीवर काही लक्षणं दाखवेल. संयम पाळा. धारीनं वागा. बाकी, सप्ताहातील गुरू-शुक्राची स्थिती कला, छंद वा इतर बौद्धिक उपक्रमांतून तुम्हाला उत्तम साथ देणारी. सप्ताहातील ता. २० व २१ हे दिवस तुमच्या राशीला सर्व प्रकारे शुभलक्षणी. 
============ 
सरकारी कामं फत्ते होतील 
वृश्‍चिक :
या सप्ताहात ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शरदाचं चांदणं सुखावून जाईल! विशिष्ट सरकारी कामं फत्ते होतील. घरातील तरुणांचा भाग्योदय होईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० व २१ नोव्हेंबर हे दिवस गुरू-शुक्राच्या पॅकेजमधून उत्तम बजेट घोषित करतील. 
============ 
तरुणांचं नैराश्‍य जाईल 
धनू :
सप्ताहात गुरू-शुक्र सहयोगाचा एक उत्तम अध्याय सुरू होईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती ‘टेक्‌ ऑफ’ घेतील. तरुणांचं नैराश्‍य जाईल. उत्तम फ्रेंड-फिलॉसॉफर-गाईड जीवनाच्या प्रवासात भेटतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार प्रवासात बेरंगाचा. पाकीट सांभाळा. 
============ 
सार्वजनिक जीवनात जपून! 
मकर :
सप्ताहात नैसर्गिक पाठबळ राहणार नाही. प्रवासाच्या वेळा सांभाळा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना संसर्गजन्य ज्वरपीडा सतावेल. सप्ताहाचा शेवट सार्वजनिक जीवनातून कटकटीचा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा प्रारंभ घरगुती सुवार्तांद्वारे प्रसन्न करणारा. 
============ 
नवी उभारी येईल 
कुंभ :
ग्रहांची समीकरणं तुम्हाला उत्तरोत्तर अतिशय चांगल्या प्रकारे फलदायी होतील. सप्ताहातील गुरू-शुक्र सहयोगाचं पॅकेज एक बजेट घोषित करेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नवी उभारी येईल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० व २१ हे दिवस वैयक्तिक उपक्रमांतून जबरदस्त क्‍लिक होतील. 
============ 
नोकरीत प्रशंसा होईल 
मीन :
रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहाचा प्रारंभ सर्व प्रकारे उत्तम फलदायी होईल. प्रिय व्यक्तींची चिंता जाईल. नोकरीत प्रशंसा होईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ व २२ हे दिवस सुखद धक्का देणाऱ्या सुवार्तांचे. तरुणांचं परदेशगमन. मात्र, हाता-पायाच्या दुखापतींची काळजी घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com