साप्ताहिक राशिभविष्य (ता. २१ मार्च २०२१ ते २७ मार्च २०२१)

weekly horoscope
weekly horoscope

कलियुगाच्या वाळवंटातलं मॅरेथॉन!
श्रद्धा धरून ठेवणारा एक केंद्रबिंदू या विश्‍वात अस्तित्वात आहे. यालाच आदिसंकल्प म्हणतात आणि हा आदिसंकल्पच पिपीलिकेपासून ब्रह्मदेवापर्यंत मूळ धरून असतो. त्यामुळेच भूतळी पिपीलिकासुद्धा आपले घर बांधते. ‘मुंगीचेही मनोरथ भगवंत जाणतो’ याचा अर्थ तोच आहे. अनंत ब्रह्मांडांना व्यापून असलेला हा आदिसंकल्प एका लहानशा ब्रह्मांडात असलेल्या एका पिपीलिकेप्रमाणे असलेल्या आपल्या ग्रहमालेतही ओलावा धरून आहे. ‘सुहृदं सर्व भूतानाम्‌’ असलेला हा भगवंताचा ओलावा ज्या वेळी संपतो त्या वेळीच कलियुगाचे रखरखीत वाळवंट सुरू होते आणि हा ओलावा शोधण्यासाठी काम-क्रोध- द्वेष यांनी भडकलेले कलियुगातील सर्प मृगजळाच्या मागे धावतात!

भगवंताचा आदिसंकल्प हा सत्यसंकल्पच होय आणि हा सत्यसंकल्प श्रद्धेचा हुंकार असल्यासारखाच आहे! कृत, जेता, द्वापार आणि कलियुग ही युगे चारी वाणींशीच संबंधित आहेत. कृत युग परावाणीशी संबंधित आहे. त्रेता युग पश्‍यंतीशी संबंधित आहे, द्वापार युग मध्यमेशी संबंधित आहे आणि आता कलियुगात माणसाच्या वैखरीचा विखार वाढला आणि मग या कलियुगात आदिसंकल्पाच्या या श्रद्धेचा ओलावा पूर्ण नष्ट होऊन माणूस काम-क्रोध-मत्सरांच्या रखरखीत वाळवंटातून चटके खात चालू लागला आणि अजूनही चालतच आहे!

मित्रहो, ग्रहमालेतील चंद्र, शुक्र हे ग्रह आदिसंकल्पाचा ओलावा धरून ठेवणारे ग्रह आहेत. त्यामुळेच दिवसा जन्म घेणाऱ्यांचा शुक्र मातृकारक होतो आणि रात्री जन्म घेणाऱ्यांचा चंद्र मातृकारक होतो. सप्ताहात रवी-शुक्र युतीयोग होत आहे. सध्याच्या कलियुगात दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करणारा माणूस या आदिसंकल्पाच्या सत्यसंकल्पाचा ओलावा पूर्णपणे विसरलाय. यंदाचा फाल्गुनोत्सव हेच सांगत आहे, की या आदिसंकल्पाच्या सत्यवाणीचा जिव्हाळ्याचा ओलावा आपल्या सुहृदांना घेऊन आपल्या हृदयात शोधूया आणि या कलियुगाचे रखरखीत वाळवंट पार करूया. अर्थातच मृगजळाला टाळून !

सुवार्तांमुळं जल्लोष
मेष :
राशीच्या हर्षलच्या पार्श्‍वभूमीवर मंगळ-राहूचा तडका भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना जाणवू शकतो. व्यावसायिक देणीघेणी सांभाळून करा. संशयास्पद व्यवहार टाळा. बाकी आश्‍विनी नक्षत्रास ता. २६ चा दिवस वैयक्तिक सुवार्तांतून जल्लोषाचा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार संध्याकाळ पुत्रोत्कर्षाची.

व्यावसायिक तेजीचा सप्ताह
वृषभ :
रवी-शुक्र युतीयोग सप्ताहावर मोठा अंमल करेल. मोठ्या व्यावसायिक तेजीचा सप्ताह. मात्र मौल्यवान वस्तू जपा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह विशिष्ट कलागुणांच्या माध्यमातून प्रकाशात आणणारा. मात्र व्यसने सांभाळा. भावंडांशी वाद नकोत. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी जुनाट व्याधींच्या पार्श्‍वभूमीवर सप्ताहात जपावे.

नोकरीच्या अफलातून संधी
मिथुन :
आजचा रविवार मृग नक्षत्राच्या व्यक्तींना भाग्यसूचक. गाठीभेटींतून मोठी कामे होतील. एकूणच रवी-शुक्र युतीयोग सप्ताहात आर्थिक विवंचना घालवेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या अफलातून संधी येतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना वीकएंड मोठ्या सन्मानाचा. प्रिय व्यक्तींचा गोड सहवास. मात्र पित्तप्रकोप सांभाळा.

विवाहाचे योग जुळून येतील
कर्क :
राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये आपला शेअर तेजीत येणार आहे. सतत सुवार्तांतून फ्लॅशन्यूजमध्ये राहाल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ग्रहांचे फिल्ड फलंदाजीस योग्य राहील. मात्र प्रेमाचे चाळे नकोत. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना एकादशीचा गुरुवार संध्याकाळी शुभ. विवाहविषयक गाठीभेटींतून मार्गस्थ करणारा.

परदेशगमानाची संधी
सिंह :
मंगळ-राहू सहयोगाचा व्हायरस अंमल करेलच. कोर्टप्रकरणे उद्‌भवू देऊ नका. पोलिसप्रकरणे सांभाळा. बाकी तरुणांना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट विशिष्ट स्वप्नं पूर्ण करणारा. नोकरीच्या मुलाखतींतून यश. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरी मिळेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग !

भाग्योदय आणि योग्य व्यक्तींच्या भेटी
कन्या :
रवी-शुक्र युतीयोगाचे पॅकेज सप्ताहावर पूर्ण अंमल करेल. सप्ताह नैसर्गिक अनुकूलता ठेवेल. योग्य व्यक्तींच्या गाठीभेटी ऐनवेळी लाभप्रद होतील. वैवाहिक जीवनातील विशिष्ट भाग्योदय यंदाच्या होळीत रंग भरेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी. हस्त नक्षत्राच्या 
व्यक्तींसाठी ‘होले होले’ आणि चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ‘खुलजा सिम्‌ सिम्’चा कालखंड

तरुणांसाठी सुवार्तांचा कालखंड
तूळ :
मंगळ-राहू सहयोगाचा विषाणू कार्यरत राहीलच. जुगार टाळाच. व्यसनी, असत्यवचनी आणि लालची व्यक्तींपासून सावध. बाकी शुभ ग्रहांचा एकप्रकारचा गुप्त अंमल राहीलच. विशाखा नक्षत्राच्या व्यक्ती त्यांचा लाभ घेतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा आरंभ आणि शेवट घरात तरुणांच्या सुवार्तांचा!

हातात हुकमाची पाने असतील
वृश्‍चिक :
सप्ताहात ग्रहांच्या विशिष्ट खेळांतून हुकमी पाने हातात येतील. त्याचा लाभ घ्याच. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीतून लाभ. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ व २७ हे दिवस छप्पर फाडके देणारे ! ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २५ चा दिवस मानसन्मानाचा.

व्यावसायिक घबाड मिळेल
धनू :
वृद्धांनी सप्ताहात जुनाट व्याधी सांभाळाव्यात. बाकी रवी-शुक्र युतीयोगाचे पॅकेज मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या शेवटी मस्त क्‍लिक होईल. तरुणांनो, लाभ घ्याच. उत्तराषाढा व्यक्तींना शनिवारी व्यावसायिक घबाड मिळेल. पूर्वाषाढा व्यक्तींसाठी वास्तुयोग. पुत्रोत्कर्ष.

न्यायालयीन कामकाजात यश मिळेल
मकर :
बाहेरच्या जगात आपणासाठी रवी-शुक्र युतीयोगाचे एक ग्रासकोर्ट राहील. मंत्रालयातील कामे होतील. एखादा भूखंड सोडवून घ्याल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक घबाडयोग चकित करतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ व २५ हे दिवस कोर्टप्रकरणांतून यश देणारे. नोकरीत रुबाब वाढेल.

आर्थिक आघाडीवर सहकार्य लाभेल
कुंभ :
सप्ताहातील रवी-शुक्र सहयोगाचे पॅकेज आर्थिक रसद पुरवणारे. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट गुप्तचिंता घालवणारा. तरुणांचे शैक्षणिक प्रश्‍न सुटतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती यंदाच्या होळीपौर्णिमेजवळ रंग बरसे करणार आहेत. पूर्वाभाद्रपदास परदेशात मोठी संधी मिळेल. मात्र स्त्रीशी जपून.

कर्तृत्वास उजाळा देणारा कालखंड
मीन :
राशीतील रवी-शुक्र योगाचे ग्रासकोर्ट एकूणच आपल्या कर्तृत्वास उजाळा देणारे. पूर्वाभाद्रपदा आणि उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना फलंदाजीस साथ देणारे ग्रासकोर्ट. ता. २४ ते २६ पर्यंतचे तीन दिवस प्रत्येक वन डे जिंकून देणारे. घरात स्त्रीवर्गाकडून कौतुक होईल. मात्र श्‍वानदंशापासून सावध ! रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी जास्त जपावं.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com