साप्ताहिक राशिभविष्य (२३ मे २०२१ ते २९ मे २०२१)

माणूस एक अंतःकरण धरून असतो आणि या अंतःकरण धरून असलेल्या माणसाचे वर्म या अंतःकरणातच दडून असते ! माणसाचे अंतःकरण दुखावले जाते किंवा सुखावले जाते.
Weekly Horoscope
Weekly HoroscopeSakal

संसाराचे मर्म हवे तुज?

माणूस एक अंतःकरण धरून असतो आणि या अंतःकरण धरून असलेल्या माणसाचे वर्म या अंतःकरणातच दडून असते ! माणसाचे अंतःकरण दुखावले जाते किंवा सुखावले जाते. सध्याचे कलियुग हे अंतःकरण सुखावणारं राहिलं नाहीये. सध्या माणसाच्या वर्मीच घाव बसून त्याचे अंतःकरण दुखावण्याचे प्रसंग सतत घडत असतात.

पुण्य परउपकार पाप ते परपीडा।

आणिक नाही जोडा दुजा यासी ।।१।।

सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म।

आणिक हे वर्म नाही दुजे ।।२।।

गति ते चिंमुखी नामाचे स्मरण।

अधोगति जाण विन्मुखा ।।३।।

संतांचा संग तोचि स्वर्गवास।

नर्क तो उदास अनगळा ।।४।।

तुका म्हणे उघडे आहे हित घात।

जया ते उचित करा तैसे ।। ५।।

- संत तुकाराम

संत तुकारामांच्या वरील अभंगाचे सार हेच संसाराचे वर्म आहे किंवा मर्म आहे. जो पापपुण्याचं कर्म आणि सुखदुःखाचं वर्म जाणतो तोच अंतःकरण जपणारा संतसमागमी किंवा भगवंताचा खरा भक्त होऊ शकतो ! मित्रहो, सप्ताहात ता. २६ मे म्हणजे बुधवारी बुद्धपौर्णिमा आहे. रवी रोहिणी नक्षत्रात आणि चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना होणारी ही बुधवारची बुद्धपौर्णिमा अलौकिकच म्हणावी लागेल. रोहिणी हे एक मृगजळ आहे. मन जपणारा हा चंद्रलोक मृगजळाचा आभासच निर्माण करणारा समजला जातो. त्यामुळेच रोहिणी हे चंद्राचे नक्षत्र समजलं जातं. चंद्रलोकालाच या मृगजळाची ग्रहणं लागतात. ज्यावेळी संसाररूपी मृगजळाचा भास नाहीसा होऊन खरं संसाराचे सार किंवा मर्म माणसाला गवसतं त्या वेळीच बुद्धीला विवेकाचा ओलावा प्राप्त होऊन तो आत्मनिष्ठ होत भगवंताची जवळीक साधत खरी बुद्धीची बुद्धपौर्णिमा साजरी करतो! त्यामुळेच यंदाच्या बुधवारी येणाऱ्या बुद्धपौर्णिमेला संसाराचे मर्म जाणून घेऊया! तेसुद्धा सध्याच्या संसाराच्या वैशाखवणव्यात!

महत्त्वाकांक्षा पूर्ण होणारा कालखंड

मेष : सप्ताहातील विशिष्ट ग्रहस्थिती वादग्रस्त मंडळींनी सांभाळावी. सहवासातील मूर्खांशी संवाद नको. विशेषतः भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. २५ व २६ मे चे पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र सांभाळावेच. बाकी अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २४ व २५ हे दिवस विशिष्ट महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारे. मात्र एकतर्फी प्रेमप्रकरण नको ! शनिवारी भांडणं नको.

विशिष्ट मानसन्मान चकित करतील

वृषभ : सप्ताहातील ता. २६ मे चे न दिसणारे चंद्रग्रहण संमिश्र स्वरूपाची फळे देईल. घरातील आजारी व्यक्तींची काळजी घ्या. बाकी मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी हा सप्ताह पर्वणीसारखा! विशिष्ट मानसन्मान चकित करेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २६ मे च्या पौर्णिमेजवळ व्यावसायिक लाभ. सप्ताहात गर्भवतींनी सांभाळावे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे घबाड. मुलाखतींतून यश.

तरुणांना नोकरीत छान वातावरण

मिथुन : सप्ताहात अकारण गुप्तचिंता सोडा. ता. २६ मे च्या पौर्णिमेजवळ एक विचित्र मानसिक व्हायरस राहील. काहींना नुकसानीचे भय सतावेल. सप्ताहात भावंडांशी विसंवाद होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या तरुणांना सप्ताहाचा शेवट नोकरीत छानच. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २७ व २८ हे दिवस शुभ ग्रहांचे बॅटिंग फिल्ड ठेवतील. उपक्रम राबवाच.

मोठे व्यावसायिक लाभ होतील

कर्क : आजचा रविवार सप्ताहाचे एक पॅकेजच घोषित करेल. धडपडू नका. यंत्र, विद्युत व वाफ इत्यादींपासून जपा. पौर्णिमेच्या प्रभावात घरातील लहान मुलं सांभाळा. गर्भवतींनी सावधानता बाळगावी. बाकी पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे व्यावसायिक लाभ देईल. जुन्या गुंतवणुकींतून लाभ. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीचिंता. शनिवार कलहजन्य.

गैरसमज टाळा, स्त्रियांशी जपून वागा

सिंह : सप्ताह चाणाक्ष मंडळींना लाभ देणारा. काही मंडळी परिस्थितीचा लाभ उठवतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २४ ते २६ हे दिवस जीवनात प्युअर सीक्वेन्स लावून देतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी आचारसंहिता पाळावी. मघा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र गैरसमजातून वादळं उठवेल. स्त्रीशी जपूनच!

विवाहाचे योग, प्रसन्नता राहील

कन्या : पौर्णिमेचा सप्ताह शनी आणि मंगळ यांच्या विशिष्ट स्थितीतून सार्वजनिक गोष्टींतून उपद्रवाचाच. सप्ताहात कामगारपीडा होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र घरी वा दारी वादात ओढणारे. बाकी हस्त नक्षत्राच्या तरुणांनी पौर्णिमेजवळ विवाहासाठी अँटिने रोखावे. आजचा रविवार मोठा प्रसन्न.

तरुणांची उमेद वाढेल

तूळ : ता. २६ मे चे न दिसणारे पौर्णिमेचं ग्रहण आपणास दखलपात्रच राहील. प्रलोभनं टाळा. घरातील आजारी व्यक्तींची काळजी घ्या. बाकी ता. २३ व २४ हे दिवस गुरूभ्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर तरुणांची उमेद वाढवणारेच. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विशिष्ट यशातून फ्लॅशन्यूजमध्ये आणणारा.

सप्ताह पर्वणीसारखा, गॉडफादर मिळेल

वृश्‍चिक : व्यावसायिकांना हा सप्ताह पर्वणीसारखा राहील. एखादा गॉडफादर लाभेल. पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र गाठीभेटींतून फलदायी होणारे. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना चांगल्या कालखंडरुपी ऑक्‍सिजनचा पुरवठा. मात्र घरातील वृद्धांना सांभाळा. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २३ व २४ हे दिवस शुभ ग्रहांची उत्तम कनेक्‍टिव्हिटी ठेवतील.

नोकरीत शुभ ग्रहांची मदत

धनु : हा सप्ताह शनी आणि मंगळाच्या विशिष्ट स्थितीतून सीसी कॅमेऱ्याखाली ठेवेल. कोणाच्या नजरेस येऊच नका. घरात गप्प बसा. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र भावनिक पातळीवरून सांभाळा. बाकी मूळ नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट शुभ ग्रहांच्या लॉबीतून नोकरीत चांगला. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लाभ. पूर्वाषाढा व्यक्तींचे प्रेमप्रकरण रंगेल !

छंद किंवा उपक्रम प्रसिद्धी देतील

मकर : आज राशीत वक्री होणाऱ्या शनीचा वटहुकूम अंमलात येईल. घरात शांतच राहा. बाकी तरुणांना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र शिक्षण, कला, छंद वा वैयक्तिक उपक्रमांतून फ्लॅशन्यूजमध्ये आणणारेच. फालतू गोष्टी मनाला लावून घेऊ नका. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींसाठी व्यावसायिक लाभ. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना स्त्रीच्या कौतुकाचा लाभ.

नोकरीत व परदेशात भाग्योदय

कुंभ : आपले स्वतःचं घर सांभाळा. बाकी बाहेरचं जग आपण सप्ताहात चांगलेच ताब्यात घेणार आहात. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राचे तरुण सप्ताहात चांगलीच बाजी मारतील. परदेशात भाग्योदय. उद्याचा सोमवार शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहमंडलातून आणि वायुमंडलातून चांगलाच ऑक्‍सिजन देईल. नोकरीत अचानक भाग्योदय. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी विवाहस्थळं येतील.

पौर्णिमेनंतर नावीन्यपूर्ण वातावरण

मीन : सप्ताह वक्री शनीच्या पार्श्‍वभूमीवर काही लक्षणं दाखवू शकतो. वादग्रस्त मुद्दे टाळा. तरुणांनी पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात हातापायाच्या इजा जपाव्यात. बाकी पौर्णिमेनंतरचे सर्व दिवस नावीन्यपूर्ण असेच राहतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्ती सर्व पातळींवरून आपला प्रभाव दाखवतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा परिचयोत्तर विवाह उद्याचा रविवार ऑनलाइन क्‍लिक होणारा. कर्जवसुली होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com