साप्ताहिक राशिभविष्य (२८ मार्च २०२१ ते ३ एप्रिल २०२१ )

weekly horoscope
weekly horoscope

जीवनज्योत तुम्ही संग बांधी !
जीवन हे पंचमहाभुतांकडूनच जगवलं जातं आणि हे पंचमहाभूतांकडून जगवलं जाणारं जीवन हे एक पचन आहे आणि हे पचन अन्नाचं दहन करत-करत दीपन होत असतं! आणि हेच दीपन जीवनाची दीप्ती होऊन या दीप्तीची जीवनरूपी ज्योत समाधानानं तेवत असते! यालाच जीवनाचं अध्यात्म म्हणतात.
अहं वैश्‍वानरो भूत्वा प्राणिनां देह माश्रितः।
असं जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारी भगवंताची गीता जीवनाचं हेच गीत गात ‘होली आयी रे आयी’ म्हणत जीवनाचं वसंतागमन करत असते. पंचमहाभूतांचं गर्भित असलेला ज्योतिषशास्त्राचा गाभा म्हणजे पचनी पडलेलं एक पंचमहाभूतांचं प्रारब्धच होय! आणि हे प्रारब्धच माणसाच्या दीप्तीचा एक चेहरा घेऊन अवतरत असतं! समाधानी माणसाचा चेहरा एक विशिष्ट योग घेऊनच अवतरत असतो आणि हा चेहरा अर्थातच पंचमहाभूतांच्या कृपेनंच प्राप्त होतो. अशी ही पंचमहाभूतांची कृपेची पुण्याई माणसाला यश, श्री, ऐश्‍वर्य, तेज सौंदर्य आणि जीवनातील समाधान देत असतं. माणसाची जीवनज्योत देवाच्या किंवा देवतांच्या कृपेनं सदैव निवांत समाधानानं तेवत राहण्यासाठी होळी पौर्णिमा साजरी केली जाते आणि मगच माणसाच्या जीवनात वसंत फुलतो!

मित्रहो, माणूस आपले जीवन पंचमहाभूतांच्या भांडवलावर जगत असतो आणि या देहरूपी भांडवलावरील व्याज भक्तीचे रंग उधळून फेडायचे असते आणि हे भक्तीचे रंग उधळून साजरी होणारी होळी पौर्णिमाच विश्‍वाच्या पंचमहाभूतांचे पर्यावरण अबाधित ठेवत असते! यंदा चंद्र-शुक्र या ग्रहांच्या भावशुद्धीत भक्तीचे रंग उधळूनच आपण सर्वांनी जगाचे पर्यावरण शुद्ध करून ‘कोरोना’ घालवूया!

धनलाभाचा कालखंड, तरुणांना संधी
मेष :
आजची पौर्णिमा चंद्र-शुक्र प्रतियुतीच्या पार्श्‍वभूमीवर होत आहे. सप्ताहाचा ट्रॅक व्यावसायिकांची प्राप्ती वाढवणाराच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक धनलाभ. मात्र जुगार टाळा. सप्ताहात कृत्तिका नक्षत्राच्या तरुणांना मोठ्या संधी येतील. परदेशस्थ तरुणांचे परदेशी भाग्योदय. उत्तम विवाहस्थळं चालून येतील. ता. २८ ते ३० हे दिवस एकूणच सर्वांना उलाढालींचे!

नोकरीत मोठा भाग्योदय होईल
वृषभ :
पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात सप्ताहारंभ होत आहे. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्ती प्रचंड फॉर्ममध्ये येतील. स्वतंत्र व्यावसायिकांच्या मोठ्या उलाढाली. ओळखी - मध्यस्थींतून चमत्कार घडतील. पती वा पत्नीची एखादी गुप्तचिंता जाईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचा हा सप्ताह नोकरीत मोठा भाग्योदय करेल. मात्र नातेवाइकांशी जपून. स्त्रीचे हट्ट पुरवा.

सरकारी कामांमध्ये यश मिळेल
मिथुन :
पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात सुरू होणारा सप्ताह बुद्धिजीवी मंडळींना मोठा शुभ. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात प्युअर सिक्वेन्स लावणारी. ता. २८ ते ३० हा कालखंड अतिशय सुसंगत. स्त्रीच्या सहकार्यातून कामे. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह सरकारी कामांतून यश देणारा. मात्र सप्ताहात वाहनं सांभाळा. 

विजयाचे चौकार -षटकार माराल
कर्क :
पौर्णिमेचे पॅकेज पूर्णपणे कन्झ्युम कराल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती विजयी चौकार - षटकार मारतील. वास्तुविषयक प्रश्‍न मार्गी लावाल. राजकारणी व्यक्तींना वश कराल. मात्र गर्दीत  जाऊ नका. प्रवासात भुरट्या चोऱ्यांपासून सांभाळा. शनिवार बेरंगाचा. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ घरात मोठ्या सुवार्तांचा.

मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या
सिंह :
सप्ताहात पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात बुध-नेपच्यून सहयोगाचा एक व्हायरस राहील. खरेदी-विक्रीत सांभाळा. मौल्यवान वस्तूंची हरवाहरवीपासून काळजी घ्या. घरातील वृद्धांची काळजी घ्या. बाकी पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं फिल्ड आदर-सत्कारांतून लाभ देणारे. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ चा रंगपंचमीचा दिवस बेरंग करणारा. स्त्रीशी गैरसमज टाळा.

नोकरीत पगारवाढ होईल
कन्या :
पौर्णिमा आपल्या राशीस ग्रहांचे सेनाधिपत्य देऊन आपण सप्ताह गाजवाल. माणसं चक्क आपली आदरयुक्त भीती घेतील. घ्या कामे करून ! मात्र रंग उधळायला गर्दीत जाऊ नका! हस्त नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात श्रीमंतांच्या यादीत नेईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्ष धन्य करेल. नोकरीत पगारवाढ !

कलागुणांना वाव मिळेल
तूळ :
पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र वृद्धांनी सांभाळावेच. बाकी तरुणांना पौर्णिमेजवळचा रवी-शुक्र सहयोग कलागुणांना वाव देणारा. परदेशी प्रसिद्धी होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शैक्षणिक व्हिसा मिळेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २८ ते ३० हे दिवस माणसांचा उत्तम सहवास घडवतील. सोशल डिस्टन्सिंग ठेवा. मात्र श्‍वानदंशापासून सांभाळा.

नव्या व्यावसायिक संधी मिळतील
वृश्‍चिक :
पौर्णिमेचं फिल्ड शुभ ग्रहांच्या पार्टीला वाव देणरंच ! सप्ताह व्यावसायिकांचे आडाखे यशस्वी करणारा. नवे व्यावसायिक पर्याय उपलब्ध होतील. ता. २८ ते २९ हे दिवस शुभ ग्रहांचा फास्टट्रॅक ठेवतील. म्हणाल ते होईल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींवर नक्षत्रलोक प्रसन्न राहील. अनुराधा नक्षत्रास रंगपंचमी बेरंगाची.

कलावंतांचा भाग्योदय
धनू :
पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात शुभ ग्रहांची गुप्त रसद पुरवली जाईलच. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना न बोलता लाभ होईल. तरुणांच्या मुलाखती यशस्वी होतील. उद्याचा सोमवार मोठ्या सुवार्तांचा. मात्र रंगपंचमीचा दिवस प्रवासात बेरंगाचा, अकारण हुज्जतीची शक्यता. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा मोठ्या आदर-सत्काराची. कलावंतांचे भाग्योदय.

वैवाहिक जीवनात वसंत फुलेल
मकर :
पौर्णिमेजवळ ग्रहांचे छान सेटिंग राहील. तरुणांना छानच सूर गवसेल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरुवात अतिशय तालबद्ध आणि सुसंगत राहील. वैवाहिक जीवनातील वसंत फुलू लागेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह कला, छंद माध्यमातून यश-प्रतिष्ठेचा. मात्र रंगपंचमी अनारोग्यातून बेरंगाची. पथ्ये पाळाच.

संकष्टी संकटे दूर करेल
कुंभ :
पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात बुध-नेपच्यून योगाचे आवर्त राहील. आहारविहारादि पथ्ये पाळाच. गर्दी टाळा. बाकी शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र शुभ ग्रहांशी कनेक्‍टिव्हिटी ठेवेल. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ. वैवाहिक जीवनातून रंगपंचमी साजरी कराल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्रास ता. ३१ मार्चची संकष्टी संकटविमोचन करणारी.

व्यावसायिक वसुली होईल
मीन :
पौर्णिमेजवळ चंद्र-शुक्र प्रतियुतीतून प्रेमसंजीवनी प्राप्त होईल. नोकरीतील वातावरण मोठे प्रसन्न राहील. प्रेमिकांची प्रेमस्पंदनं स्वीकारली जातील. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना  ता. ३० व ३१ हे दिवस आत्यंतिक प्रवाही. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी रंगपंचमीजवळ रंगबरसे कालखंड. मात्र लहान मुलांना जपा.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com