जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 8 ते 14 डिसेंबर

bhavishya
bhavishya

आजचा सूर्योदय महत्त्वाचा! 
भूत, वर्तमान आणि भविष्य यांच्या त्रांगड्यात सापडलेलं कलियुगातलं माणसाचं जीवन अक्षरशः फरफटत जात असतं. भूतकाळातला दुर्गंध आणि भविष्यातल्या भयकल्पनांचं घोंघावणं या बाबी माणसाचा वर्तमानकाळ राजधानी दिल्लीसारखा अतिशय महाप्रदूषित करत असतात. कलियुग हे अतिशय कल्मषपूरित युग आहे. कलियुग हा एक मोठा झंझावात आहे आणि या झंझावातात माणसाच्या मनाची धांपकांप किंवा देहाचा महाताप थर्मामीटर फोडून सतत बाहेर येऊ पाहत असतो! परतत्त्वाचा स्पर्श विसरून कलियुगातल्या माणसाचा पारा सतत चढलेलाच असतो. 

भवाच्या भयातून आणि भविष्याच्या चिंतेतून भवपार होण्यासाठी द्वापारयुगाच्या आणि कलियुगाच्या संधीवर भगवद्गीता सांगितली गेली. आज मार्गशीर्ष शुक्‍ल एकादशी. अर्थातच मोक्षदा एकादशीच्या दिवशीच भगवद्गीता सांगितली गेली. युगांतरी सर्वप्रथम सूर्याला (विवस्वानाला) श्रीकृष्णानं गीता सांगितली. त्यामुळेच यंदाच्या रविवारी येणाऱ्या मोक्षदा एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे! भगवद्गीतेच्या चिंतनानं सृष्टीच्या आरंभीचीसुद्धा पापं धुऊन निघतात असं म्हटलं जातं! 
पंचमहाभूतं, अहंकार, बुद्धी, इंद्रियं, त्यांचे विकार आणि त्यांच्या विकृतींतून निर्माण झालेल्या वृत्ती (इच्छा) तसेच राग, द्वेष, 

सुख-दुःखांच्या कल्पना इत्यादींद्वारे खदखदणारी जीवदशा हा सध्या मोठा नरक होऊ पाहतोय! अशा परिस्थितीत भगवद्गीता हाच मोठा आधार आहे. सृष्टीचा आदिसंकल्प हा भगवंताचाच आहे आणि या आदिसंकल्पातला मुंगीसारखा सूक्ष्म स्पंद मानवी देहात स्पंदित होत असतो. तेच आपलं हृदय होय आणि या हृदयीच्या आत्मारामाला आठवत आपण आपली प्रापंचिक शेती एखाद्या कुळकऱ्याप्रमाणे केली पाहिजे, तरच प्रपंचाला परमार्थ जोडला जाऊन आपलं जीवन भक्तीचा मळा होऊ शकतं. 

मित्र हो, ज्योतिषशास्त्र हे देववृंदाला घेऊन जीवनात भक्तीचे सूर काढण्याचा प्रयत्न करतं आणि तेच खरं ज्योतिष! जीवनाची अशी सुरावट करणाऱ्यांना ‘सुर’ म्हणतात आणि ही सुरावट बिघडवणाऱ्यांना ‘असुर’ म्हणतात. त्यामुळेच ‘मासानाम मार्गशीर्षोस्मि’ अशा या मार्गशीष महिन्यात आपण भगवद्गीतेचा सूर आळवू या! 
=========== 
एका सुंदर पर्वाचा आरंभ 
मेष :
भरणी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात विशिष्ट ऐतिहासिक निर्णय घेतील. अर्थातच जीवनाचं एक सुंदर पर्व सुरू होईल. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात होणारा शनी-शुक्र-प्लूटोचा त्रिग्रहयोग गुरुभक्तांना मोठी प्रचीती देईल. उद्याचा सोमवार अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय शुभलक्षणी. 
=========== 
संतसंग कधीही सोडू नका 
वृषभ :
राशीतील पौर्णिमा रवी-नेपच्यून योगातून विचित्र लोकांचा सहवास घडवू शकते. मात्र, तुम्ही संतसंग कधीही सोडू नका. बाकी, मृग नक्षत्राच्या तरुणांना पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात नोकरीतून परदेशगमन घडेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा चोरी-नुकसानीची. किल्ल्या जपा. दस्ताऐवज जपा. 
=========== 
आध्यात्मिक वैभवाचा लाभ 
मिथुन :
राशिचक्रातले अतिशय अद्भुत असे अनुभव घेणारी रास. शुक्र-शनी-प्लूटो हा त्रिग्रहयोग पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ज्ञानसंपन्न करेल. आध्यात्मिक वैभवाचा लाभ घडेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात नोकरीच्या मोठ्या संधी. स्त्रीच्या संमोहनात अडकू नका. 
=========== 
वातावरण प्रदूषित, काळजी घ्या 
कर्क :
ग्रहांचा ट्रॅक सप्ताहात जरा विरोधी राहील. वर बघून नव्हे तर खाली बघून चाला! सप्ताहातल्या रवी-नेपच्यून योगाच्या पार्श्‍वभूमीवरील पौर्णिमा आसमंतातील पशू-पक्षी, जीवजंतू आणि शेवटी माणसं यांच्या माध्यमांतून मोठी ऍलर्जिक किंवा प्रदूषित राहील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी रामरक्षा म्हणावी! 
=========== 
वाहन काळजीपूर्वक चालवा 
सिंह :
राशिचक्रातील पौर्णिमेची भव्य-दिव्य स्पंदनं खेचून घेणारी रास राहील. मात्र, वाहन चालवताना काळजी घ्या. एकूणच, या सप्ताहात विशिष्ट कला, छंद या माध्यमांतून तुम्हाला सूर गवसेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा मान-मरातबाची. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अपत्यलाभ. 
=========== 
कुलदेवतेचं स्मरण करा 
कन्या :
सप्ताहातला शनी-शुक्र-प्लूटो हा त्रिग्रहयोग काहींच्या संचितातल्या ठेवी मॅच्युअर करेल! घरातल्या पुत्र-पौत्रांच्या चिंता जातील. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र हस्त आणि चित्रा या नक्षत्राच्या व्यक्तींना सर्व उपक्रमांतून अनुकूलच राहील. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात कुलदेवतेचं स्मरण करा. 
=========== 
नोकरीत कर्तृत्व गाजवाल 
तूळ :
हा सप्ताह तुम्हाला मोठं धैर्य देईल. सप्ताहात चंद्रकलांचा प्रवास सुंदर राहील. उद्याचा सोमप्रदोष अतिशय शुभलक्षणी. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात मोठा भावोन्मेष अनुभवतील. नोकरीत कर्तृत्व गाजवाल. काहींचे वास्तुप्रवेश होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना कोर्टप्रकरणात यश मिळेल. आई-वडिलांची काळजी घ्या. 
=========== 
नोकरदारांना अनुकूल ग्रहमान 
वृश्‍चिक :
पौर्णिमेच्या आसपासच्या काळात शुभग्रहांची सरशी राहील. नोकरदारांसाठी सुंदर ग्रहमान. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींच्या संचितातल्या ठेवी या सप्ताहात मॅच्युअर होतील. पुत्र-पौत्रांची कार्यं ठरतील. मात्र, पत्नीचं हृद्गत ओळखा आणि तिला मान द्या. या सप्ताहात अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींची मोठी चैन राहील! 
=========== 
कोर्टप्रकरणं मार्गी लागतील 
धनू :
सप्ताहातली ग्रहसमीकरणं ऐतिहासिक स्वरूपाचीच आहेत. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात तरुणांचं ‘खुल ‌जा सिम् ‌सिम्’‌ होणार आहे. एखादं स्पर्धात्मक यश मिळेल. व्यावसायिक कोर्टप्रकरणं संपतील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठं यश देणारा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्हिसा मिळेल. 
=========== 
नोकरीतली चिंता दूर होईल 
मकर :
पौर्णिमेच्या आसपासच्या काळात नोकरीतली विशिष्ट चिंता दूर होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह वैयक्तिक उत्कर्षाचाच. पतीचा वा पत्नीचा भाग्योदय. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींची धनचिंता सोमवारी दूर होईल. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात कलाकारांना यश-प्रसिद्धी मिळेल. 
=========== 
गुंतवणुकीतून लाभ होईल 
कुंभ :
या सप्ताहात चंद्रकलांचा उत्कर्ष पौर्णिमेच्या आसपासच्या काळात परमावधी गाठेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती शनी-शुक्र-प्लूटो या त्रिग्रहयोगाचा पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मोठा लाभ उठवतील. दुर्मिळ असे विवाहयोग येतील. काहींचा वास्तुप्रवेश. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून लाभ. कर्जवसुली होईल. 
=========== 
कायदेशीर कटकटी संपतील 
मीन :
शुभ ग्रहांची मंत्रालयं तुमच्यासाठी २४ बाय ७ खुली राहतील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा कराच. विशिष्ट कायदेशीर कटकटी संपतील. मात्र, घरगुती वादात पडू नका. पौर्णिमेच्या आसपासच्या काळात वैवाहिक जीवनात काळजी घ्यावी. बाकी, रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमन घडेल. कलाकारांना यश-प्रसिद्धी मिळेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना स्नायुपीडेची शक्यता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com