आठवड्याच्या भविष्यात काय लिहिलंय? जाणून घ्या : 2 जून ते 8 जून

श्रीराम भट
रविवार, 2 जून 2019

आठवड्याच्या भविष्यात काय लिहिलंय? जाणून घ्या : 2 जून ते 8 जून

सप्ताहात येणाऱ्या सोमवती अमावास्येला शनैश्‍वरजयंती आहे. अध्यात्मात कालपुरुष आणि वेदपुरुष गणले गेले आहेत. गणना करणारा हा कालपुरुष आहे आणि गणनेच्या पलीकडं असलेलं अगणित असं वेदपुरुषाचं अनंत असं अस्तित्व कालातीत आहे. कालपुरुष जीव जन्माला घालत असतो, तसंच काल आणि कर्म यांचा सांधा अर्थातच संधिकाळ "तिन्हीसांजा सखे मिळाल्या' असं म्हणत शनीला अर्थातच जीवरूपी अंधकाराला जन्माला घालत असतो. 

माणूस आणि माणसाची सावली ही कर्मरूप होय आणि ही कर्मरूप सावली राहू-केतू या छायाग्रहांच्या रूपानं जीवाचा पिच्छा पुरवत असते. फलज्योतिषात "शनिवत्‌ राहू' आणि "भौमवत्‌ केतू' असं म्हटलं जातं! कर्मक्षय झाल्याशिवाय राहू-केतू हे जीवाची पाठ सोडत नाहीत. जीवाच्या पाठीवरचं कर्माचं ओझं बाजूला झाल्यावरच कर्मक्षयाची पहाट उजाडून मग नंतर गुरुकृपारूप उष:काल होत असतो. माणूस शेकडो जन्मांचा प्रवास करत असताना फलरूप आशेच्या वहाणा (चपला) घालूनच मृत्युरूप नरकात पडत असतो. म्हणूनच फलरूप आशेच्या वहाणा बाहेर काढूनच मृत्युंजय शिवमंदिराच्या गाभाऱ्यात शिरायचं असतं. आपल्या वहाणा कुणी चोरून नेत नाही ना, याची चिंता करणारा माणूस कधीच मृत्युंजयाचं दर्शन घेऊ शकत नाही. शनी ही एक कर्मगती आहे आणि ही कर्मगती फलरूप आशेच्या वहाणा वागवत मृत्युलोकात वावरत असते. अगदी अमरपट्टा घातल्यासारखी! 

शनी हा सच्चा शिवभक्त आहे. शिवव्रत हे कठीण असतं. कारण, फलरूप आशा किंवा अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे व्रत अनुसरणाऱ्या व्रतस्थ जीवावर सदाशिव नेहमी प्रसन्न होत असतात. शिवामूठ वाहणारी पतिव्रता मृत्युंजयाशी लग्नगाठ घालू इच्छित असते आणि मृत्युंजय पती लाभल्यावर तिला कशाचीच चिंता राहत नसते. मित्र हो, सध्या गुरू हा ज्येष्ठा या नक्षत्रात भ्रमण करत आहे. ज्येष्ठा नक्षत्राचा पादत्राणांशी संबंध आहे. अशी ही त्राणाशी संबंधित असलेली पादत्राणं पायातून काढूनच "आर्तत्राण'परायण असलेल्या आदिगुरू शिवशंकराच्या मंदिराच्या मूळ गाभाऱ्यात प्रवेश करता येत असतो. असा हा आदिशंकराचा मूळ गाभारा जपणाऱ्या गुरूच्या धनू राशीतला सध्याचा शनी "आपली शिवभक्ती जपा' हेच सांगत आहे! 

वादग्रस्त वर्तन करू नका 
मेष : कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार विवाहयोगाचा. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना प्रवासयोग. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी वागताना काळजी घ्यावी. वादग्रस्त वर्तन करू नये. घरात भावा-बहिणींच्या मतभेदाची शक्‍यता. अमावास्येच्या आसपासच्या काळात काळजी घ्या. पैशाचं पाकीट जपा. 

नोकरीत पगारवाढीची चाहूल 
वृषभ : राशीतल्या शुक्राचं आगमन कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना तत्काळ फलदायी होणारं. विवाहयोग आहेत. नोकरीत पगारवाढीची चाहूल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येचं प्रभावक्षेत्र कायदेशीर कटकटींतून त्रासदायक. अमावास्येच्या आसपासच्या काळात वाहतुकीत काळजी घ्या. 

भाग्यबीजं पेरणारा सप्ताह 
मिथुन : राशीचा मंगळ अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना काटेरी फळं देणारा. भाजण्या-कापण्यापासून काळजी घ्या. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींच्या नैराश्‍यात हा सप्ताह भर घालण्याची शक्‍यता. संयमानं घ्या. काल्पनिक भय-भीतीचा पगडा राहील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आजचा रविवार व्यावसायिक भाग्यबीज पेरणारा. 

शेजाऱ्यांशी जपून वागा 
कर्क : मंगळाचं भ्रमण अमावास्येच्या आसपासच्या काळात काहींना 
हितशत्रुपीडेचं. शेजाऱ्यांशी जपून राहा. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना आजची रविवारची संध्याकाळ अतिशय नावीन्यपूर्ण. सहकुटुंब मौज-मजा कराल. बुधवारची संध्याकाळ विचित्र गुप्त चिंतेची. बाकी, शनिवारी घरात काही कार्य ठरेल. 

महत्त्वाच्या कामांना वेग येईल 
सिंह : मघा नक्षत्राच्या व्यक्तींना हा सप्ताह अतिशय दमदार फळं देईल. महत्त्वाच्या कामांना वेग येईल. ओळखी-मध्यस्थीतून मोठे व्यवहार होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचा सोमवती अमावास्येच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी बेरंग होऊ शकतो. स्त्रीशी वाद नकोत. काळजी घ्या. सप्ताहाचा शेवट पुत्रचिंता दूर करेल. 

नोकरीतली बदली टळेल 
कन्या : उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना वैयक्तिक सुवार्ता कळतील. नोकरीतली बदली टळेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट अतिशय शुभ. सरकारी कामांत यश. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना बुधवारची संध्याकाळ प्रतिकूल. गैरसमजातून भांडणाची शक्‍यता. काळजी घ्या. 

पोलिसांशी हुज्जत टाळा 
तूळ : सोमवती अमावास्या सार्वजनिक ठिकाणी प्रतिकूल. पोलिसांशी हुज्जत टाळा. खरेदी करताना काळजी घ्या. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशमनाचा योग. व्हिसा मिळेल. पुत्रचिंता जाईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. 

कौटुंबिक वाद वाढवू नयेत 
वृश्‍चिक : हा सप्ताह अमावास्येच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिकूल अनुभवांचा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी अतिशय काळजीपूर्वक वागावं. अरेरावी टाळावी. कौटुंबिक वादांना वेगळी वळणं नकोत. बाकी, अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक संदर्भातून शुक्रभ्रमण जबरदस्त क्‍लिक होईल. खरेदी-विक्रीचे व्यवहार मार्गी लागतील. 

विद्युत्‌-उपकरणांपासून जपा 
धनू : अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात टार्गेट होणारी रास. विद्युत्‌-उपकरणांपासून जपा. घरातल्या लहान मुलांना सांभाळा. गर्भवतींसाठी ही सोमवती अमावास्या संवेदनशील राहील. काळजी घ्या. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना एखादं राजकीय शत्रुत्व सतावेल. बुधवारची संध्याकाळ प्रतिकूल. काळजी घ्या. 

व्यावसायिक भाग्योदयाचा काळ 
मकर : धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाची सुरवात अतिशय सुंदर. व्यावसायिक भाग्योदय. उत्सव-प्रदर्शनांतून अर्थप्राप्ती. सप्ताहाचा शेवट पुत्रोत्कर्षातून धन्यतेचा अनुभव देणारा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सोमवती अमावास्या मंगळाच्या पार्श्‍वभूमीवर मित्रसंगतीतून दगाफटक्‍याची. काळजी घ्या. गावगुंडांपासून सावध राहा. 

रक्तदाबावर नियंत्रण ठेवा! 
कुंभ : तुमची रास सप्ताहातली बरीचशी सुरक्षित रास आहे. बुध-शुक्रांची भ्रमणं उत्तम प्रभाव टाकतील. आजचा रविवार याचीच लक्षणं दाखवेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात नोकरीत ताण पडेल. रक्तदाबावर नियंत्रण ठेवा! शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीचं बोलावणं येईल. 

उपक्रम मार्गी लागतील 
मीन : सप्ताहात शुक्रभ्रमण कलाकारांना अतिशय शुभफलदायी होईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वैयक्तिक सुवार्तांचा. झगमगाट होईल! नवे व्यावसायिक उपक्रम मार्गी लागतील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना बुधवारची संध्याकाळ कलहजन्य. राजकारणी व्यक्तींपासून सावध राहा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weekly Horoscope and Panchang for 2 June to 8 June