स्वागत नव्या पुस्तकांचे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

शेळीपालन तंत्र आणि व्यवस्थापन

शेळीपालन तंत्र आणि व्यवस्थापन
शेळीपालन व्यवसायातल्या महत्त्वाच्या बाबी डॉ. तेजस शेंडे यांनी या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. पशुपालन व्यवसायातली सद्यःस्थिती, शेळीपालन सुरू करण्यापूर्वी काय करायचं, शेळ्यांचा निवारा, शेळ्यांची निवड, प्रजनन, नोंदवहीचं महत्त्व, आहार, अर्थशास्त्र, प्रथमोपचार अशा अनेक गोष्टींची माहिती त्यात देण्यात आली आहे. शेळीपालनाबरोबरच अनुषंगिक गोष्टींची माहितीही देण्यात आली आहे. हायड्रोफोनिक्‍स चारानिर्मिती तंत्र, राज्यातले मुख्य आठवडी बाजार, बॅंकांकडून मिळणारं अर्थसाह्य, शेळी संशोधन संस्था अशा गोष्टींचीही त्यात माहिती आहे. वेगवेगळे तक्ते, आकृत्या, छायाचित्रं या गोष्टींचा वापर केल्यामुळे पुस्तक परिपूर्ण झालं आहे. शेतकऱ्यांना शेळीपालन व्यवसायात हमखास यश मिळवण्यासाठी या पुस्तकात दिलेल्या कानमंत्रांचा आणि माहितीचा उपयोग होईल.

प्रकाशक ः सकाळ प्रकाशन, पुणे (०२०-२४४०५६७८) / पृष्ठं ः १५२/ मूल्य ः १९० रुपये

डॉ. बाबासाहेबांच्या आठवणी
भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाचे, विचारांचे, व्यक्तिमत्त्वाचे अनेक पदर उलगडून दाखवणारं हे पुस्तक. ज्ञानेश्‍वर ढावरे यांनी त्याचं संपादन केलं आहे. बाबासाहेबांच्या आठवणी उलगडून दाखवणारा एक सुगावा विशेषांक सुमारे तीस वर्षांपूर्वी विलास आणि उषा वाघ यांनी प्रसिद्ध केला होता. त्यातल्या काही लेखांचं आणि त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या काही आठवणींचाही पुस्तकात समावेश आहे. शंकरराव खरात, डॉ. भालचंद्र फडके, राधाबाई वराळे, तारानाथ पाटील, वसंत राजस, प्रा. ज्योती लांजेवार, भीमराव साळवे, नि. आ. कदम, सुहास सोनवणे, वसंत वाघमारे अशा अनेकांनी बाबासाहेबांविषयी लिहिलं आहे. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचं विविधांगी दर्शन त्यांतून होतं.

प्रकाशक ः सुगावा प्रकाशन, पुणे (०२०-२४४७८२६३) / पृष्ठं ः १७० / मूल्य ः १५० रुपये

बाई - एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास
ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या नाट्य कारकिर्दीचा आणि व्यक्तित्वाचा वेध घेणारं हे पुस्तक. विजयाबाईंच्या शिष्य मंडळींनी, सुहृदांनी त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. ‘बाईंची गॅंग’ या नावानं ओळखले जाणाऱ्या महेश एलकुंचवार, नाना पाटेकर, दिलीप कोल्हटकर, विक्रम गोखले, सुहास जोशी, रिमा, विजय केंकरे, नीना कुलकर्णी, अमृता सुभाष अशा अनेकांनी विजया मेहता यांचं व्यक्तिचित्र तयार केलं आहे. वेगवेगळ्या कलाकृती तयार होतानाची प्रक्रिया, बाईंचं कौशल्य, त्या-त्या वेळचे अनुभव अशा गोष्टी त्यामुळे उलगडतात. विजया राजाध्यक्ष, महेश एलकुंचवार यांनी घेतलेल्या एका मुलाखतीचा पुस्तकात समावेश आहे. भास्कर चंदावरकर यांनी लिहिलेल्या एका लेखाचा अनुवादही या पुस्तकात समाविष्ट आहे. याशिवाय पु. ल. देशपांडे, श्री. पु. भागवत, दामू केंकरे, डॉ. श्रीराम लागू, भक्ती बर्वे अशा दिग्गजांनी बाईंबद्दल यापूर्वी लिहिलेल्या लेखांचं संकलनही पुस्तकात आहे. अंबरीश मिश्र यांनी संपादन केलं आहे.

प्रकाशक ः राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९)/ पृष्ठं ः १८२/ मूल्य ः ३०० रुपये
 

Web Title: welcome-new-books