स्वागत नव्या पुस्तकांचे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मागाल ते मिळेल
प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद (०२४०- २३३२६९२) / पृष्ठं - ३०४ / मूल्य - २९९ रुपये

मागाल ते मिळेल
प्रकाशक - साकेत प्रकाशन, औरंगाबाद (०२४०- २३३२६९२) / पृष्ठं - ३०४ / मूल्य - २९९ रुपये

‘आस्क अँड इट इज गिव्हन’ या गाजलेल्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. ईस्थर आणि जेरी हिक्‍स यांनी मूळ पुस्तक लिहिलं आहे आणि डॉ. अरुण मांडे यांनी अनुवाद केला आहे. अब्राहमच्या वचनांवर आधारित कार्यशाळा घेणाऱ्या लेखकद्वयानं अतिशय छोट्या छोट्या गोष्टींतून तुमचं संपूर्ण आयुष्यच कसं बदलून जाऊ शकतं, ते दाखवून दिलं आहे. अतिशय साध्या, सरळ; पण प्रभावी गोष्टी पुस्तकात समाविष्ट आहेत. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आपल्याच हातात आहे, सरावानं आपण आनंदी आणि सर्जनशील बनू शकतो, भावनिक स्पंदनं आपणच प्रक्षेपित करत असतो आणि ग्रहण करत असतो, अशा छोट्या छोट्या सूत्रांवर आधारित विवेचनामुळं पुस्तक उपयुक्त ठरतं. नातेसंबंध, आरोग्य, आर्थिक व्यवहार, करिअर अशा सगळ्या गोष्टींवर परिणाम होण्यासाठी त्याचा उपयोग होईल.

 देह दानाचे मंदिर
प्रकाशक - श्री. म. जोशी (९४२२०३३७५३) /
पृष्ठं - १२८/ मूल्य - १०० रुपये

देहदानाबाबत हल्ली समाजात खूप जागृती आली असली, तरी प्रत्यक्षात त्याबाबत माहिती खूपच कमी आहे. अनेक वेळा वेळ निघून गेल्यावर त्याची उपयुक्तता समजते. देहदान या विषयामध्ये जागृतीचं काम करणारे श्रीकृष्ण जोशी यांनी या विषयाशी संबंधित लेख, माहिती, बातम्या यांचं संकलन या पुस्तकात केलं आहे. नेत्रदान, त्वचादान, अवयवदान, देहदान, मृत्युपत्र, वैद्यकीय इच्छापत्र, वैयक्तिक विमा अशा सगळ्या गोष्टींविषयी या पुस्तकात माहिती आहे. देहदान कोण करू शकतं, त्यासाठी काय करावं लागतं, त्याचं वैद्यकीय-सामाजिक महत्त्व, कायदेशीर बाबी, कुटुंबीयांच्या जबाबदाऱ्या अशा गोष्टींविषयी पुस्तकात माहिती देण्यात आली आहे. वेगवेगळे अर्ज, दूरध्वनी क्रमांक, प्रेरणादायी व्यक्तींच्या माहिती अशा गोष्टीही पुस्तकात समाविष्ट आहेत. देहदान या विषयाशी संबंधित माहिती देणारं आणि प्रेरणा देणारं असं हे पुस्तक.

मराठवाड्यातील मंदिर शिल्पाविष्कार
प्रकाशक - अपरांत प्रकाशन, पुणे (९४०३६०५७८३) /
पृष्ठं - १५८/ मूल्य - ५०० रुपये

इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव यांनी लिहिलेलं हे पुस्तक. त्यांनी मराठवाड्यातल्या मंदिरांवर संशोधन केलं आणि त्याच विषयावर तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाची पीएच. डी. मिळवली. आठ-दहा वर्षं प्रचंड भटकंती करून, अवशेषांचा धांडोळा घेऊन त्यांनी हा इतिहास उभा केला. डॉ. देव यांनी केलेल्या या संशोधनाला आता पुस्तकरूप मिळालं आहे. मराठवाड्यातल्या मंदिरांचा दस्तावेज असंच त्याला म्हणता येईल. या मंदिरांचं वैशिष्ट्य, त्यांचं वेगळेपण, सौंदर्य त्यांनी उलगडून दाखवलं आहे. ऐतिहासिक पार्श्‍वभूमी, प्राचीन मंदिरस्थापत्य, प्रारंभकाळातली मंदिरं, चालुक्‍य शैलीतली मंदिरं, उत्तर यादव आणि हेमाडपंती मंदिरं अशा वेगवेगळ्या विभागांतून मंदिरांचा परिचय करून दिला आहे. त्यांच्या मूळ पुस्तकाचा डॉ. कल्पना रायरीकर यांनी अनुवाद केला आहे.

फुटपाथ ते नोटरी
प्रकाशन - ग्रंथाली, मुंबई (०२२-२४२१६०५०) /
पृष्ठं - १४६ / मूल्य - १८० रुपये

गरिबीतून संघर्ष करत नोटरी बनलेल्या सागर नावाच्या नायकाची कहाणी चितारणारी ही कादंबरी. सुजाता लोखंडे यांनी ती लिहिली आहे. ही कादंबरी त्यांच्या दिराच्याच जीवनावर आधारित आहे. मूळ कहाणीतला संघर्षाचा, भावनांचा गाभा कायम ठेवून लोखंडे यांनी तिला नाट्यमय शैलीत बांधलं आहे. विदर्भातल्या एका गावातला सागर गरिबीतून, कौटुंबिक संघर्षातून बाहेर पडतो, स्वत-ला सिद्ध करतो, त्याची ही कहाणी. सागरचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.

आषाढ बार
प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन, मुंबई (०२२- २२७३०६७९) / पृष्ठं - ८६/ मूल्य - १२५ रुपये

‘आषाढ बार’ हे रंगभूमीवर गेल्या वर्षी आलेलं ताजं नाटक आता पुस्तकरूपातही आलं आहे. महाकवी कालिदास, शूद्रक, मोहन राकेश आणि आजच्या पिढीतला सिद्धार्थ नावाचा एक लेखक-दिग्दर्शक एकत्र भेटतात चर्चांचा एक वेगळाच पट उभा करतात. मकरंद साठे यांनी ताकदीनं लिहिलेल्या या नाटकाच्या बरोबर शांता गोखले यांनी त्याचं इंग्लिशमधून केलेलं समीक्षण आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचं त्याच्याबाबतचं मनोगत याही गोष्टी आल्यामुळे तोही एक वेगळा ‘प्रयोग’ ठरला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सदैव अग्रगामी महार रेजिमेंट
प्रकाशक - सुंदर पब्लिकेशन अँड डिस्ट्रिब्युटर्स, पुणे (९८८१०८४३०२)/
पृष्ठं - ९०/ स्वागतमूल्य - ७० रुपये

लष्करातल्या महार रेजिमेंटचं नाव अनेकांना माहीत असलं, तरी तिच्याबद्दल सविस्तर माहिती खूपच कमी लोकांना असते. सुधाकर खांबे यांनी हे लक्षात घेऊन या रेजिमेंटचा इतिहास, या रेजिमेंटचं स्वरूप, तिच्या वाटचालीतले सोनेरी टप्पे, अनेक जवान, अधिकाऱ्यांनी केलेली कामगिरी, शौर्यपदकं अशा अनेक गोष्टींबाबत लिहिलं आहे. विशेषत- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या रेजिमेंटबाबत केलेला पाठपुरावा, त्यांचं आणि या रेजिमेंटचं नातं यावर त्यांनी भर दिला आहे. अनेकांशी बोलून, संदर्भ साहित्य तपासून त्यांनी हे पुस्तक तयार केलं आहे.

तुम्हालाही जमेल मॅनेजमेंट
प्रकाशक - सक्‍सेस पब्लिकेशन्स, पुणे (०२०- २४४३३३७४) / पृष्ठं - २१२ / मूल्य - २२५ रुपये

कारखाना क्षेत्रात अगदी फिटरपासून ते कार्यकारी संचालक या पदापर्यंत प्रवास केलेले अविनाश भिडे यांनी लिहिलेलं हे पुस्तक. व्यवस्थापन हा विषय त्यांनी मांडला असला, तरी या पुस्तकात त्यांनी मांडलेला प्रत्येक धडा भिडे यांच्या अनुभवातून सिद्ध झालेला आहे. वेगवेगळ्या प्रसंगांतून ते काय शिकले आणि लोकांनी काय शिकलं पाहिजे, हे त्यांनी खूप नेमकेपणानं मांडलं आहे. एक साधा वॉटर कूलर व्यवस्थापनाच्या धोरणाचा भाग कसा होऊ शकतो इथपासून ते ‘रिव्हर्स इन्व्हॉयसिंग’पर्यंत अनेक गोष्टी भिडे यांनी मांडल्या आहेत. प्रत्येक प्रसंग किंवा अनुभवानंतर त्यांनी एकाच वाक्‍यात त्यांना अवगत झालेला व्यवस्थापन सिद्धांत सांगितला आहे. त्यामुळं पुस्तक वाचनीय, प्रेरक झालं आहे.

बालक
प्रकाशक - वरदा प्रकाशन, पुणे (०२०- २५६५५६५४) /
पृष्ठं - १५२ / मूल्य - १५० रुपये

‘द चाइल्ड’ या इंग्लिश पुस्तकाचं हे मराठी रूपांतर वासुदेव गोविंद आपटे यांनी केलं आहे. बालकांच्या संगोपनाशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश या पुस्तकात आहे. बालकांशी संबंधित वेगवेगळी वैद्यकीय माहिती, संगोपन करताना येणाऱ्या अडचणी, समज-गैरसमज, बालकांचं वागणं, पालकांनी करण्याचा विचार अशा अनेक गोष्टी पुस्तकात समाविष्ट आहेत. अनेक गोष्टींविषयी शास्त्रीय विवेचन करण्यात आल्यामुळं अनेक गोष्टी समजायला सोप्या जातात. बालकांची प्रकृती आणि संवर्धन, अर्भकाची जोपासना, बालकांचे स्नायू, मनोभावना, बुद्धी, इच्छाशक्ती, त्यांच्या सवयी अशा अनेक गोष्टींचा पुस्तकात समावेश आहे.

----------------------------------------------------------------------------------
सकाळ इअरबुक
प्रकाशक - सकाळ प्रकाशन, पुणे (०२०-२४४०५६७८) / पृष्ठं - ३८४ / मूल्य - ३५० रुपये

स्पर्धा परीक्षांसाठी वेगवेगळ्या विषयांवर नेमकी माहिती मिळणं गरजेचं असतं. हीच गरज लक्षात घेऊन ‘सकाळ प्रकाशन’नं २०१६ या वर्षासाठीच्या ‘इअर बुक’ची निर्मिती केली आहे. या वर्षातल्या सगळ्या घडामोडी साररूपानं या पुस्तकात समाविष्ट आहेत. या वर्षातल्या राजकीय घडामोडी, केंद्र सरकारशी संबंधित आणि राज्य सरकारशी संबंधित निर्णय, न्यायालयीन निर्णय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, कृषी, विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण, क्रीडा, पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, महत्त्वाच्या निवडी, निधनं अशा गोष्टींचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे. वेगवेगळ्या घटनांशी संबंधित संदर्भही त्यांच्या खालीच दिले असल्यामुळे जाणकाराला आणखीही माहिती घेता येऊ शकते. त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनीही आपापल्या विषयांतल्या घडामोडींचं विश्‍लेषण केलं आहे. अनेक प्रकारच्या माहिती या पुस्तकात असल्या, तरी त्या नेमकेपणानं आणि अनेक ठिकाणी निव्वळ मुद्द्यांच्या स्वरूपात देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या समजणं सोपं जातं. काही ठिकाणी आकडेवारी, आलेख यांचाही वापर करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसह इतरांनाही उपयोगी पडेल, अशी ही वार्षिकी आहे.

संवादक्रांती
प्रकाशक - सकाळ प्रकाशन, पुणे/
पृष्ठं - १६०/ मूल्य - १६५ रुपये

गेल्या दीड-दोन दशकांत झालेल्या इंटरनेटच्या प्रसारानं आणि त्यानंतर आलेल्या स्मार्टफोननं प्रचंड मोठी क्रांती घडवून आणली आहे. सोशल मीडिया हा लोकांच्या जगण्याचा भाग बनला आहे. फेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्‌विटर यांसारख्या माध्यमांमुळे जणू संवादाचा स्फोटच होतो आहे. या सर्व गोष्टींचा वेध घेणारं हे पुस्तक. ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीच्या वर्धापन दिनानिमित्त योजलेल्या पुरवणीतल्या लेखांना या निमित्तानं पुस्तकरूप मिळालं आहे. विजय भटकर, अतुल कहाते, जयदेव डोळे, ज्ञानेश्‍वर मुळे यांच्यासह विविध मान्यवरांनी संवादक्रांतीच्या वेगवेगळ्या आयामांबाबत चर्चा केली आहे. शेतीपासून प्रशासनापर्यंत आणि वैद्यकीय क्षेत्रापासून चित्रपट क्षेत्रापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांवर होणारे परिणाम पुस्तकातून उलगडतात. या संवादक्रांतीच्या निमित्तानं होणाऱ्या सामाजिक, मानसिक बदलांचंही विश्‍लेषण पुस्तकात आहे. ‘सकाळ माध्यमसमूहा’चे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी संपादन केलं आहे.

----------------------------------------------------------------------------------
साभार पोच

  •  मनमितवा / कविता संग्रह / कवयित्री, प्रकाशक - उमा मोकाशी, आंबेगाव बुद्रुक, पुणे (९९७५११११९१) / पृष्ठं - ८६ / मूल्य - ७० रुपये
  •  उमलत्या कळ्या / कविता संग्रह / कवी - नंदकुमार कुलकर्णी (९९६०४८८२०१) / प्रकाशक - पुष्पक प्रकाशन, पुणे (०२०- २४४८३०६२) / पृष्ठं - ९६ / मूल्य - १०० रुपये
  •  राजकारण / नाटक / नाटककार - विवेक वाटवे (९८२२४८८३८६) / प्रकाशक - संकल्प प्रकाशन, मुणांगवाडा, बार्देश- गोवा (९०११०८०३८६) / पृष्ठं - ८०/ मूल्य - १२० रुपये
  •  स्वामीजी / स्वामी पुरुषोत्तमानंद सरस्वती यांच्याविषयी मनोगतं / संकलन - चंद्रकांत केदारी / प्रकाशक - उद्वेली बुक्‍स, ठाणे (पश्‍चिम) (०२२- २५८१०९६८) / पृष्ठं - १०४ / मूल्य - १०० रुपये
  •  श्रीकृष्णाष्टकम/ आद्य शंकराचार्यांच्या स्तोत्राचं निरूपण / निरूपण, प्रकाशक - जय गणेश देवी (९७६३७९२१२८, ८८०५९५९८२५) / पृष्ठं - २५० / मूल्य - २७० रुपये
  •  चिकन सूप फॉर द सोल (बॅकपेन) / पाठदुखीविषयी शास्त्रीय माहिती / लेखक - जोनाथन ग्रीर, जॅक कॅनफिल्ड, मार्क व्हिक्‍टर हॅन्सन/ अनुवाद - डॉ. वसू भारद्वाज / पृष्ठं - १००/ मूल्य - १२० रुपये

----------------------------------------------------------------------------------

Web Title: welcome new books