स्वागत नव्या पुस्तकांचे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

असा हा राजहंस
प्रकाशक - अनुबंध प्रकाशन, पुणे (anubandhprakashan.pune@gmail.com) /  पृष्ठं - ३१२ / मूल्य - ३२५ रुपये

असा हा राजहंस
प्रकाशक - अनुबंध प्रकाशन, पुणे (anubandhprakashan.pune@gmail.com) /  पृष्ठं - ३१२ / मूल्य - ३२५ रुपये

बालगंधर्व म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस यांचे बंधू व्यंकटेश श्रीपाद राजहंस यांचं हे आत्मचरित्र. ‘गंधर्व नाटक मंडळी’त काम करणाऱ्या व्यंकटेशरावांनी अर्थातच आपल्या बंधूविषयीच जास्त लिहिलं आहे. या बंधूंचं बालपण, कुटुंबातल्या व्यक्ती, नारायणरावांचं घडत जाणं, त्यांचा संगीत रंगभूमीवरचा प्रवास, गंधर्व नाटक मंडळीची स्थापना, तिची वाटचाल अशा सगळ्या गोष्टी पुस्तकात येतात. अनेक प्रसंगांचे साक्षीदार असल्यामुळं अर्थातच त्यांच्या कथनाला जास्त वजन येतं. व्यंकटेशरावांनी सुमती दसनूरकर यांच्या आग्रहावरून अनेक वर्षांपूर्वी वह्यांमध्ये लेखन करून ठेवलं होतं. मधल्या काळात ते राहून गेलं. आता ते प्रकाशात आलं आहे. डॉ. माधवी वैद्य यांनी संपादन केलं आहे. दसनूरकर, व्यंकटेशरावांच्या कन्या नीलांबरी बोरकर यांचेही लेख पुस्तकात समाविष्ट आहेत.

लॉर्ड्‌स ते वानखेडे व्हाया डेझर्ट स्टॉर्म
प्रकाशक - हर्षद बर्वे बुक्‍स, औरंगाबाद (harshadbarvebooks@gmail.com) /  पृष्ठं - १९२ / मूल्य - ४५० रुपये

केदार ओक या क्रिकेटवेड्या तरुणानं लिहिलेलं हे पुस्तक. फेसबुकवर तो लिहीत गेला आणि क्रिकेटप्रेमींचा प्रतिसाद त्याला मिळत गेला. त्यातूनच पुस्तकाची कल्पना त्याच्या डोक्‍यात आली आणि त्यानं तिला मूर्तरूप दिलं. १९७१ ते २०१७ असा काळ त्यानं घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या सामन्यांवर त्यानं लिहिलं आहे. अर्थात हे प्रत्येक सामने खूप महत्त्वाचे नसतीलही; पण केदारला ज्या सामन्यांत वेगळेपण दिसलं, काही छान गोष्टी सापडल्या, त्यांच्यावर त्यानं लिहिलं आहे. किस्से, खेळाडूंची त्यानं चितारलेली स्वभाववैशिष्ट्यं, वेगवेगळी निरीक्षणं अशा गोष्टींमुळं त्याचं कथन रंजक झालं आहे.

अमाप
प्रकाशक - पामीर पब्लिकेशन्स, पुणे (०२०-२५४३६३६७)/ पृष्ठं - ६४ / मूल्य - १०० रुपये

प्रा. अरविंद आणि अंजली पटवर्धन यांचं हे आत्मकथन. या उभयतांनी स्वत-ची जडणघडण, संसार यांविषयी लिहिलं आहे. कामानिमित्तानं त्यांना इथियोपिया, नायजेरिया आदी देशांत राहायला मिळालं. तिथले अनुभव त्यांनी लिहिले आहेत. परदेशातून परत आल्यावर भारतात केलेली गुंतवणूक, घरासाठीचे व्याप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम, पुस्तकं आदींविषयीही त्यांनी लिहिलं आहे.

काठावरचं पांढरं घर
प्रकाशक - स्पर्श प्रकाशन, राजापूर, जि. रत्नागिरी (७४४७४८०४२४)/ पृष्ठं - ८० / मूल्य - ११० रुपये

रशियन बालसाहित्य अद्भुत गोष्टी, चमत्कृती, भावरम्यता यांनी नटलेलं असतं. याच साहित्यातल्या काही जुन्या कथांचा अनुवाद अमित पंडित यांनी केला आहे. वर्षानुवर्षांपासून आपल्याला माहीत असलेल्या इतर परीकथांच्या जवळ जाणाऱ्या आणि तरीही वेगळं काही सांगू पाहणाऱ्या या कथा लहान मुलांना आवडतील.

शिंपेतले आकाश
प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९)/ पृष्ठं - १९८/ मूल्य - ३५० रुपये

मूळच्या पुण्याच्या आणि त्यानंतर अमेरिकेत वास्तुरचनाकार म्हणून काम करून आता निवृत्त झालेल्या श्रीनिवास माटे यांचं हे आत्मचरित्र. माटे स्वत- दृश्‍यकलेच्या माध्यमात काम करणारे असल्यामुळं यांनी पुस्तकाला दृश्‍यात्मक आठवणींचं स्वरूप दिलं आहे. त्यामुळं शब्दांबरोबर ओघानं छायाचित्रंही, चित्रंही येतात आणि पुस्तकाची मांडणीही कलात्मक, आगळीवेगळी आहे. माटे यांनी लहानपण, कुटुंबीय, शिक्षण, संसार, अमेरिकेतलं जीवन, कामाशी संबंधित प्रसंग, सर्जनशील गोष्टी, मुलांची जडणघडण अशा सगळ्या गोष्टींबाबत लिहिलं आहे. अध्यात्माशी त्यांचं नातं, चित्रकला, कविता यांच्याविषयीही त्यांनी लिहिलं आहे. काही कविता आणि चित्रंही पुस्तकात समाविष्ट आहेत.

अचानक
प्रकाशक - ग्रंथाली, माटुंगा (पश्‍चिम), मुंबई (०२२-२४२१६०५०)/ पृष्ठं - २६२ / मूल्य - ३०० रुपये

स्मिता भागवत यांनी लिहिलेली ही कादंबरी. भारत-पाकिस्तान फाळणीत वासनेचं तांडव अनुभवलेल्या, कोवळ्या वयातच समंजस झालेल्या संदीप शहा नावाच्या नायकाची ही कहाणी. परिस्थितीच्या चटक्‍यांनी टोकाच्या स्वाभिमानी आणि एकांकी झालेल्या या संदीपला दांपत्य जीवनात अपयश येतं आणि त्याची बोच त्याला अस्वस्थ करत राहते. त्याच्या या मनोवस्थेचं चित्रण भागवत यांनी नेमक्‍या पद्धतीनं केलं आहे. वास्तवाचा स्पर्श असलेली ही कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते.

सफर अंदमानची
प्रकाशक - स्नेहल प्रकाशन, पुणे (०२०-२४४५०१७८)/ पृष्ठं - २६४ / मूल्य - ३०० रुपये

अंदमान या द्वीपसमूहाची सांगोपांग माहिती देणारं हे पुस्तक. प्र. के. घाणेकर यांनी त्या भागातल्या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्या आहेत. त्या भागाचा इतिहास, तिथं बघायच्या गोष्टी, प्रवासाविषयीचं नेमकेपण आदी गोष्टी घाणेकर यांनी लिहिल्या आहेत. अनेक ठिकाणांचं तपशीलवार वर्णन असल्यामुळं प्रत्यक्ष तिथं जाऊ पाहणाऱ्यांना उपयोग होईल. तिथला अधिवास, मूळ रहिवासी, निसर्ग, पर्यावरणविषयक वैशिष्ट्यं आदींविषयीही त्यांनी अभ्यासपूर्ण रितीनं लिहिलं आहे.

ना पूर्व ना पश्‍चिम
प्रकाशक - ग्रंथाली, मुंबई (०२२-२४२१६०५०) / पृष्ठं - १५० / मूल्य - २५० रुपये

डॉ. बाळ फोंडके यांनी लिहिलेलं हे प्रवासवर्णन. संशोधनाच्या निमित्तानं डॉ. फोंडके यांना जगभर फिरता आलं. नेहमीच्या स्थळांबरोबर अनवट वाटाही त्यांनी धुंडाळल्या. त्यामुळं पर्यटनाच्या आनंदाबरोबर वैज्ञानिक ज्ञानातही भर पडली. अशा दोन्ही प्रकारच्या अनुभवांविषयी त्यांनी लिहिलं आहे. अंटार्क्‍टिका, ग्रेट बॅरिअर रिफ, मिलफर्ड साऊंड, न्यूझीलंड, मेलबर्न, सिंगापूरचं ज्युराँग बर्ड पार्क, न्यू वॉटर, भीमबेटका, बुर्ग फ्रॅंकेस्टाइन अशा अनेक ठिकाणांविषयी त्यांनी लिहिलं आहे. त्या-त्या ठिकाणच्या वैज्ञानिक वैशिष्ट्यांविषयी ललित शैलीत त्यांनी वर्णन केल्यामुळं ते आणखी रोचक झालं आहे.

भारतीय राज्यघटनेतील मूल्यव्यवस्था
प्रकाशक - सुनिधी पब्लिशर्स, पुणे (०२०-२४४५७११८)/ पृष्ठं - १७६ / मूल्य - १९५ रुपये

भारतीय राज्यघटनेतल्या मूल्यव्यवस्थेचं स्वरूप उलगडून दाखवणारं हे पुस्तक प्रा. डॉ. बी. आर. जोशी यांनी लिहिलं आहे. तत्त्वज्ञानातल्या मूल्यमीमांसा या शाखेचे ते अभ्यासक. त्या दृष्टीनं त्यांनी राज्यघटनेचा अभ्यास केला आणि त्यातून हे पुस्तक तयार झालं. स्वातंत्र्य, कर्तव्य, समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद अशा वेगवेगळ्या संकल्पनांचं विश्‍लेषण त्यांनी सविस्तरपणे केलं आहे. वेगवेगळी उदाहरणं देऊन त्यांनी हा विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

श्री छत्रपती शिवाजी गीतचरित्र
प्रकाशक - वर्डस्मिथ पब्लिकेशन्स, पुणे (०२०-२४२१७५७१) / पृष्ठं - २६४ / मूल्य - २७५ रुपये

छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र गीतांतून मांडण्याचा प्रयत्न नितीन शिंदे यांनी केला आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनातले वेगवेगळे प्रसंग, त्यांचे वेगवेगळे पैलू त्यांनी आपल्या गीतांतून मांडले आहेत. अतिशय सहज पद्धतीनं आणि त्या-त्या प्रसंगांनुसार शब्दांचा वापर करत शिंदे यांनी हे वेगळ्या प्रकारचं गीतचरित्र लिहिलं आहे.


दिशा बांधकाम नवनिर्मितीची
पृष्ठं - १९० / मूल्य - २४० रुपये

स्थापत्य अभियंते प्रकाश मेढेकर यांनी केलेल्या बांधकामविषयक लेखनाचं हे संकलन. बांधकामामागचं विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थकारण, तांत्रिक गोष्टी असे  वेगवेगळे पैलू त्यांनी उलगडून दाखवले आहेत. बांधकाम साहित्यामधले प्रकार, काँक्रीटचे वेगवेगळे प्रकार, बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या यंत्रप्रणाली, इमारतींसाठी उपयुक्त बांधकाम तंत्रज्ञान, शहरांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी उपयुक्त बांधकाम तंत्रज्ञान अशा गोष्टींची माहिती त्यांनी दिली आहे. वाळूपासून फ्लाय ॲशपर्यंत आणि फेरोक्रीटपासून सेन्सर पेल्व्हरपर्यंत सगळे पैलू त्यांनी अगदी सोप्या शब्दांत मांडले आहेत. अनेक तांत्रिक गोष्टी त्यांनी सर्वसामान्यांना समजतील अशा भाषेत समजावून सांगितल्या आहेत.

सकाळ करंट अपडेट्‌स
पृष्ठं - १३६ / मूल्य - १२५ रुपये

स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या ‘सकाळ करंट अपडेट्‌स’ या पुस्तकमालिकेची ही पुढची आवृत्ती. जानेवारी ते मार्च २०१७ या तीन महिन्यांतल्या घटना-घडामोडींची माहिती आणि विश्‍लेषणाचा त्यात समावेश आहे. प्रस्तुत काळात घडलेल्या राजकीय घडामोडी, केंद्र आणि राज्य सरकारनं घेतलेले निर्णय, न्यायालयीन निर्णय, आंतरराष्ट्रीय घडामोडी आदींची सविस्तर माहिती या पुस्तकात आहे. आर्थिक, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, क्रीडा आणि इतर क्षेत्रांत घडलेल्या घडामोडींवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार, महत्त्वाच्या निवडी, निधनं यांचीही माहिती त्यात देण्यात आली आहे. मुद्देसूद मांडणी, योग्य ठिकाणी नकाशांचा, छायाचित्रांचा वापर, सांख्यिकी विश्‍लेषण, प्रत्येक ठिकाणी नमूद केलेले स्रोत यांमुळं हे पुस्तक संदर्भासाठी उपयुक्त ठरेल.

फ्रॉम आउच टू उप्स
पृष्ठं - १५२ / मूल्य - १६० रुपये

रामजी वल्लत यांनी लिहिलेली ही प्रेरणादायी जीवनकहाणी. कुशाग्र बुद्धी, कष्टांच्या जोरावर एका बहुराष्ट्रीय कंप्युटर हार्डवेअर कंपनीत संचालक म्हणून काम करणाऱ्या वल्लत यांना अचानक स्नायू दुर्बल करणाऱ्या दुर्मिळ आजारानं ग्रासलं. सोपी कामं करणंही कठीण जायला लागलं. त्यातच त्यांची नोकरी गेली. या सर्वांवर वल्लत यांनी मात केली. निराशेच्या गर्तेत खचून न जाता त्यांनी सकारात्मक पद्धतीनं परिस्थितीला आपलंसं केलं. वेगळी वाट तयार केली. या सगळ्या प्रवासात त्यांचं स्वत-चं असं तत्त्वज्ञानही विकसित होत गेलं. या पुस्तकात वल्लत यांनी ते मांडलं आहे. अतिशय प्रांजळपणे वेगवेगळे प्रसंग मांडताना त्याच प्रसंगांकडं तटस्थपणे बघण्याचंही त्यांचं कौशल्य या पुस्तकात दिसतं. आ. श्री. केतकर यांनी अनुवाद केला आहे.  

सर्व पुस्तकांचे प्रकाशक - सकाळ प्रकाशन, पुणे
(०२०-२४४०५६७८/ ८८८८८४९०५०)


साभार पोच

  •   प्रांजळ / कवितासंग्रह / कवी - रवींद्र कामठे (९८२२४०४३३०)/ चपराक प्रकाशन, पुणे (९२२६२२४१३२) / पृष्ठं - ११२ / मूल्य - १०० रुपये
  •   वैश्‍विक प्राणशक्ती आणि बरंच काही... / रेकीविषयक माहिती, अनुभव / लेखक - दत्तात्रय नरवणे/ चेतक बुक्‍स, पुणे (९८२२२८०४२४) / पृष्ठं - ९६ / मूल्य - १४० रुपये
  •   शिवगंगा / कवितासंग्रह / कवी - रामचंद्र जुन्नरकर (९५५२५५३६१६)/ प्रेरणा आर्ट फौंडेशन, पुणे (८६०५०१२२८५) / पृष्ठं - ९० / मूल्य - १२० रुपये
  •   अनवट वाटा / कवितासंग्रह / कवी - अविनाश पाटील / साहित्य अभिरुची प्रकाशन, नवीन पनवेल, नवी मुंबई, जि. रायगड / पृष्ठं - ८७ / मूल्य - १०० रुपये
  •   ससोबाचा चांदोबा / बालकथा/ लेखिका - मानसी हजेरी / स्पर्श प्रकाशन, राजापूर, जि. रत्नागिरी (९९६०१३८२९०) / पृष्ठं - ३२ / मूल्य - ८० रुपये

Web Title: welcome new books