...आणि आसाम अपराजितच राहिला

आसाममधल्या ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात अहोम राजवटीनं १२२८ ते १८२६ अशी ६०० वर्षं राज्य केलं. मुघलांनी जंग-जंग पछाडलं, तरी ते अहोम राजवट संपवू शकले नाहीत.
why assam remained unbeaten Ahom army Lachit Borphukan adopted highly skilled military tactics
why assam remained unbeaten Ahom army Lachit Borphukan adopted highly skilled military tacticsSakal

- अभिजित जोग

अहोम सैन्यापेक्षा मुघल सैन्य इतकं वरचढ होतं, की अहोम सैन्याचा निभाव लागणं कोणीही अशक्यच मानलं असतं; पण, अशावेळी ललित बोरफुकननं अत्यंत निष्णात लष्करी डावपेचांचा अवलंब केला. खुल्या मैदानात आपला निभाव लागणार नाही, हे ओळखून त्यानं मुघल सैन्याला गुवाहाटीजवळच्या डोंगराळ भागात येण्यास भाग पाडलं.

आसाममधल्या ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात अहोम राजवटीनं १२२८ ते १८२६ अशी ६०० वर्षं राज्य केलं. मुघलांनी जंग-जंग पछाडलं, तरी ते अहोम राजवट संपवू शकले नाहीत. शेवटी एकोणिसाव्या शतकात ब्रह्मदेशातून झालेल्या आक्रमणात अहोम राजवटीचा शेवट झाला आणि त्यानंतर सगळा आसाम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अमलाखाली आला. देवांचा राजा इंद्र आणि एक सामान्य स्त्री शामा यांच्या संयोगातून आपला वंश निर्माण झाला असून, आपण इंद्रवंशी क्षत्रिय असल्याचं अहोम राजे मानत असत.

मुघलांनी आसामवर स्वारी केल्यानंतर, अहोम-मुघल संघर्षाला १६१५ मध्ये सुरुवात झाली. पहिल्यांदा थोडी माघार घेतल्यानंतर अहोम सैन्यानं तिखट प्रतिकार करून मुघल आक्रमण परतवून लावलं. थोडा कालावधी शांततेत गेल्यानंतर शहाजहानच्या राजवटीत हा संघर्ष पुन्हा सुरू झाला. १६३९ मध्ये झालेल्या तहानुसार गुवाहाटीपर्यंतचा सगळा पश्चिम आसाम मुघलांच्या अमलाखाली आला; पण, शहाजहानच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांत राजगादीसाठी सुरू झालेल्या संघर्षाचा फायदा घेऊन अहोम राजा जयध्वज सिंघा यानं आसाम मुघलांच्या कब्जातून मुक्त केला.

लचित बोरफुकन

१६५९ मध्ये सिंहासनारूढ झाल्यावर औरंगजेबानं पुन्हा आसामवर स्वारी केली. या वेळी जयध्वज सिंघ याला अत्यंत अपमानास्पद अटींवर तह करावा लागला. त्याला आपल्या एका कन्येला मुघल जनान्यात पाठवावं लागलं आणि सगळ्या मुलखावर पाणी सोडावं लागलं.

या धक्क्यातून सावरता न आलेल्या जयध्वज सिंघाचा मृत्यू झाल्यानंतर चक्रध्वज सिंघानं आपलं राज्य पुन्हा जिंकून घेण्यासाठी कंबर कसली. त्यानं लचित बोरफुकनला आपला सेनापती नेमलं व सैन्याची पुन्हा बांधणी व पुनर्रचना केली.

लचित बोरफुकननं गेलेला प्रदेश झपाट्यानं परत जिंकून घ्यायला सुरुवात केली. गुवाहाटीचा मुघल सुभेदार फिरोज खान याला अटक केली आणि मुघलांचा ठिकठिकाणी पराभव करून त्यांची मोठी हानी केली.

या पराभवामुळे चिडलेल्या औरंगजेबानं मिर्झाराजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंग याच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठं सैन्य अहोमचा नि:पात करण्यासाठी रवाना केलं. शिवाजी महाराज आग्र्याला गेले, तेव्हा त्यांची जबाबदारी मिर्झाराजांनी याच रामसिंगावर सोपवली होती.

ब्रह्मपुत्रा नदी पार करून गुवाहाटीकडे येण्यासाठी सराई घाट ही सगळ्यात योग्य जागा होती; कारण, तिथं ब्रह्मपुत्रेचं पात्र कमीत कमी म्हणजे एक किलोमीटर रुंद होतं. मुघल तिथूनच नदी ओलांडणार हे ओळखून त्यानं तिथं सापळे लावले.

नौदल हा मुघलांचा कमकुवत दुवा होता, हे त्यानं ओळखलं होतं. गुवाहाटीपर्यंत व्यूहात्मक माघार घेऊन त्यानं मुघलांना नदी ओलांडून गुवाहाटीकडे येण्यास भाग पाडलं. पुढे येणाऱ्या मुघल फौजेला लचितच्या सैनिकांनी गनिमी काव्यानं हैराण केलं. तरीही सुरुवातीला नदीतील व जमिनीवरील युद्धात अहोम सैन्याला मोठं नुकसान सहन करावं लागलं.

त्यात स्वतः लचित बोरफुकनही आजारी पडला; पण, अशा मोक्याच्या वेळी त्यानं त्या परिस्थितीतही लढाईची सूत्रं आपल्या हाती घेतली व पायदळ आणि नौदलाला शत्रूवर तुटून पडण्याचा आदेश दिला. आजारी अवस्थेतही स्वतः आपला सेनापती आघाडीवर आलेला बघून अहोम सैन्यात वीरश्री संचारली व त्यांनी मुघल सैन्यावर भयंकर हल्ला चढवला.

विशेषतः अहोम नौदलानं मुघलांच्या नौदलाची पूर्ण वाताहत केली. या धक्क्यामुळे जमिनीवरील युद्धातही मुघल सैन्य टिकाव धरू शकलं नाही. अशारीतीनं संख्याबळ, शस्त्रास्त्र सर्वच बाबतींत कमजोर असलेल्या अहोम सैन्यानं केवळ लचित बोरफुकनच्या कुशल युद्धनेतृत्वाच्या बळावर मुघल सैन्याचा

अत्यंत दारुण पराभव केला व शेवटी आसाम आपल्या आधिपत्याखाली आणण्याचं मुघलांचं स्वप्न अपूर्णच राहिलं. जाणकार सराई घाटच्या युद्धाला लष्करी युद्धांच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान देतात, तसंच मुघलांच्या वर्चस्वासमोर मान न तुकवणाऱ्या सेनानींमध्ये लचित बोरफुकनला छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या बरोबरीचं स्थान देतात;

पण, आपल्या इतिहासात जेमतेम दोनशे वर्षं राज्य करणाऱ्या मुघलांचा ‘उदो उदो’ करण्यात आला, तर सहाशे वर्षं राज्य करणाऱ्या अहोम राजवटीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे आसामचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणाऱ्या लचित बोरफुकनचं नावही आपण ऐकलेलं नसतं.

ही झाली काही मोजकी उदाहरणं. या शिवाय मुघलांच्या सैन्याला एकदा धूळ चारणारा आणि दुसऱ्यावेळी पानिपतच्या युद्धात अकबर व बेहराम खानच्या सैन्याशी जिंकता-जिंकता दुर्दैवानं हरणारा हेमचंद्र विक्रमादित्य किंवा हेमू, बंगालचा सुलतान तुबारक खानचा सणसणीत पराभव करून त्याला ठार करणारा आसामच्या अहोम राजघराण्याचा सेनापती तोंखम बोरपत्र गोहेन,

मुघल फौजेचा सलग पाच वेळा पराभव करणारा शीख योद्धा बंदासिंह बहादूर या सारख्या अनेक पराक्रमी वीरांनी इस्लामी आक्रमकांशी कडवा संघर्ष शतकानुशतकं सुरुच ठेवला. या शेकडो, हजारो वीरांचा उल्लेख करणं शक्यच नाही; म्हणून काही मोजक्या नावांचा उल्लेख करून या अनाम वीरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न आपण गेल्या काही लेखांमधून केला.

विजयनगर साम्राज्यानं जवळपास तीनशे वर्षं दक्षिणेत भारताच्या स्वाभिमानाचा झेंडा फडकत ठेवला, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवशाहीनं मुघल साम्राज्याचा शेवटच केला.

दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केवळ राजे-रजवाड्यांनीच नव्हे, तर सामान्य जनतेनंही सतत उठाव करत इस्लामी आक्रमकांविरुद्ध संघर्ष सुरुच ठेवला. बादशाह जहांगीर त्याच्या ‘तारीख-ई-सलीम शाही’ या आत्मवृत्तात म्हणतो, ‘‘बंडखोरांची संख्या कधी कमी होताना दिसतच नाही.

संपूर्ण साम्राज्यात असा एकही प्रांत नसेल, जिथं कोणी ना कोणी बंडखोर उभा राहून बंडाचा झेंडा फडकवत नाही. यामुळे हिंदुस्थानात पूर्णपणे शांत असा कालखंड कधी आलाच नाही.’’ अकबराच्या दरबारातील इतिहासकार बदौनी लिहितो, ‘‘जंगलात लपून बसलेले हिंदू मुस्लिम सैन्याचे हल्ले परतवून लावतात.

जंगलात राहणारे हे लोक तिथलीच जंगली फळं, कंदमुळं व कधी मिळालं तर जाडं-भरडं धान्य खाऊन राहतात.’’ अशा रीतीनं इसवी सन ६३४ ते इसवी सन १२०६ पर्यंत इस्लामी आक्रमकांना भारतात आपली सत्ता स्थापन करता आली नाही.

तर, १२०६ ते १७५० पर्यंत सत्तेत असूनही संपूर्ण भारत कधीच आपल्या अमलाखाली आणता आला नाही. प्रेषितांच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या इस्लामी आक्रमणातील हा विरोधाभास महत्त्वाचा आहे. एका बाजूला आहेत,

इस्लामच्या झंझावातासमोर दोन-पाच वर्षांत पाल्यापाचोळ्यासारखी उडून गेलेली सीरिया, इराक, इजिप्त, इराण, उत्तर आफ्रिका, मध्य आशियातील बलशाली साम्राज्यं, तर दुसऱ्या बाजूला आहे, इस्लामशी सतत अकराशे वर्षं संघर्ष करणारा आणि पूर्णपणानं पराभव न स्वीकारणारा भारत.

सातव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतच्या सगळ्या कॅन्व्हासवर जर पाहिलं, तर या कालखंडातील भारताचा इतिहास हा पराभवाचा इतिहास नसून गौरवशाली संघर्षाचा इतिहास आहे, हेच स्पष्ट होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com