कश्शाला हवं शाळेत कॉम्प्युटरचं शिक्षण?

पाच वर्षांत आपण किती बदलांना सामोरं जातो...? लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाकडं राजकीय नजरेतूनच पाहायला नको; शैक्षणिक नजरेतून पाहायचा प्रयत्न करू.
Computer Education
Computer Educationsakal

पाच वर्षांत आपण किती बदलांना सामोरं जातो...? लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाकडं राजकीय नजरेतूनच पाहायला नको; शैक्षणिक नजरेतून पाहायचा प्रयत्न करू. उदाहरणार्थ : पाच वर्षांपूर्वीचा काळ घ्या... त्या काळी टीव्ही सुरू केला किंवा यूट्यूब ब्राऊज करायला सुरुवात केली तर कुठल्या स्वरूपाच्या जाहिराती दिसायच्या आठवून पाहा. सर्वाधिक जाहिराती असायच्या त्या तुमच्या मुलाला संगणक कोडिंग शिकवले पाहिजे, या विषयाच्या.

‘व्हाईट हॅट ज्युनिअर’ (व्हाईट हॅट जेआर) कंपनीच्या जाहिरातीतली छान छान मुलं-मुली कोडिंगबद्दल दिवस-रात्र सांगत असायची. त्यांचे शिक्षक कोडिंगचं महत्त्व सांगायचे. कोडिंगमुळं मुला-मुलींचं आयुष्य कसं बदलून गेलं, याबद्दल बोललं-लिहिलं-दाखवलं जायचं. हा काही फार जुना इतिहास नाही. अगदी अलीकडंपर्यंत, कोरोनाच्या लाटा ओसरत असतानाही, संगणकीय कोडिंग आणि शाळा यांबद्दल सर्वाधिक चर्चा व्हायची.

आरंभशूरपणा

लहान मुलांना कोडिंग शिकवणारी व्हाईट हॅट जेआर ही कंपनी मग ‘बायजूज्’ या कंपनीनं विकत घेतली. त्यासाठी दोन हजार २२३ कोटी रुपये मोजण्यात आले. त्याचीही मोठी चर्चा झाली. मागच्या वर्षभरात बायजूज् कंपनीपुढच्या अडचणी वाढल्या. सन २०२० मध्ये शिगेला पोहोचलेली शालेय अभ्यासक्रमातल्या कोडिंग शिक्षणाची चर्चा सन २०२१, सन २०२२ मध्ये कमी होत गेली. मागच्या वर्षात याबद्दल धोरणात्मक पातळीवर सन्नाटा आहे.

एखाद्या नव्या उपक्रमातला आरंभशूरपणा साऱ्या भारतभर पसरला आणि अवघ्या तीन वर्षांत त्यातला रस कमी होत नव्या चर्चेत आपण सारे रमलो. माहिती तंत्रज्ञानक्षेत्र रोजच्या जगण्याचा अविभाज्य घटक झाले असताना आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) दिवसेंदिवस नवी क्षेत्रं कवेत घेत असताना शालेय अभ्यासक्रमातल्या संगणकीय शिक्षणाबद्दल अधिकाधिक बोलायला हवंच.

राजकारणाबद्दलच्या चर्चा आपण जितका वेळ देऊन करतो, त्याच्या काही अंशी वेळ शालेय शिक्षणावर द्यायला हवा. कारण, या वयातल्या शिक्षणावर पुढची पिढी, देशाचं भविष्य आणि एकूण समाजाचं भविष्य अवलंबून आहे.

संगणकीय विचारपद्धती

भारतात काही शाळांमध्ये कोडिंग हा शालेय शिक्षणाचा भाग बनून आता तीन वर्षं होऊन गेलीयत. तरीही बहुतांश शाळांमध्ये अद्याप कोडिंग हा प्रकार नियमित शिक्षणापासून अत्यंत दूर आहे. बळजबरीनं मुलांना कोडिंग शिकवावं की नको ही चर्चा करण्यापूर्वी, आपण संगणकीय युगात राहतो आहोत, हे आधी मान्य केलं पाहिजे.

संगणकीय व्यवस्थापनानं जोडलेल्या जगात आपण रोजचे व्यवहार करतो आहोत हे समजून घेतलं पाहिजे. अशा युगात रोजच्या जगण्यातले प्रश्न संगणकीय विचारपद्धतीनं (कॉम्प्युटेशनल थिंकिंग) सोडवण्यावर भर दिला जातो. उदाहरणार्थ : अश्मयुगातल्या टोळीचं दिवसभराचं काम म्हणजे अन्न शोधणं. अन्नाच्या शोधात टोळी गुहेबाहेर पडत असे, तेव्हा बाहेर उपलब्ध अन्न किती आहे, याची कोणतीही कल्पना नसायची.

अन्न शोधायचं, शिकार करायची आणि मिळेल ते खायचं अशी तेव्हाची पद्धत. आजच्या शहरांमध्ये रोजच्या कामासाठी घराबाहेर पडतानाही लोकल ट्रेन, बस किती वाजताची आहे, स्वतःचं वाहन असेल तर कुठल्या चौकात किती वाजता वाहतूककोंडी असते, किती वेळात कामाच्या ठिकाणी पोहोचावं लागेल, कामाचं स्वरूप काय असेल इथपासून ते ते काम करून घरी किती वाजता परतायचं आहे, वाहतुकीची तेव्हाची परिस्थिती काय असेल याचं पूर्वानुमान घेतलं जातं.

जिथं इंटरनेट-कनेक्टिव्हिटी आहे, तिथं गुगलसारख्या मोबाईल-अॅपमध्ये आधी वाहतुकीचा अंदाज घेणं आलं...रोजच्या रस्त्यावर काही अडचण असू शकेल किंवा कसं याची माहिती वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून घेणं आलं...अशी सगळ्या प्रकारची माहिती घेतल्यानंतर, बाहेर पडण्याची आणि परतण्याची एक सुयोग्य वेळ त्या माहितीमुळे निश्चित होते. आधुनिक जगातलं रोजचं जगणं असं वेगवेगळ्या माहितीवर प्रक्रिया करून निर्णयापर्यंत पोहोचणारं असतं.

उपयुक्त ठरणारे आविष्कार

आता, प्रश्नाची व्याप्ती वाढवून बघू. एखाद्या रस्त्यावरच्या वाहतूककोंडीचा प्रश्न घेऊ. या प्रश्नावर उत्तर शोधायचं असेल तर, खूप प्रकारची सर्वंकष माहिती (डेटा) गोळा करावी लागेल. तीमध्ये रस्त्याची लांबी, रुंदी, चौक, वाहतूकनियंत्रक, वाहनांची सरासरी संख्या, विशिष्ट वेळांना वाढणारी संख्या, आसपासची वस्ती, इंधनावर होणारा खर्च, खर्च होणारी वेळ अशा अनेक मुद्द्यांचा समावेश असेल. हे सारे घटक एकत्रित केल्यावर प्रश्नाची व्याप्ती लक्षात येते. प्रश्नाची व्याप्ती सर्वंकष माहितीतून समोर येते. अशा माहितीवर प्रक्रिया करणं संगणकीय विचारपद्धतीनं शक्य होतं.

ढोबळमानानं असं म्हणता येईल की, कोडिंग म्हणजे या विचारपद्धतीचा उपयोगी आविष्कार. कोडिंगच्या निमित्तानं विचारांची दिशा प्रश्नार्थकतेकडून उत्तरं शोधण्याकडं वळवता येते. वरकरणी कोडिंग रटाळ वाटत असलं तरी, त्याचं उपयुक्त आविष्कारात रूपांतरण अधिकाधिक नावीन्यपूर्ण संकल्पनांना जन्म देणारं असतं. यानिमित्तानं एकूणच डिजिटल-साक्षरता वाढते.

आजच्या युगाशी सुसंगत क्षेत्रात करिअरसाठी हा पाया ठरतो. वाहतूककोंडीच्या समस्येवर उपाययोजना शोधण्यासाठी सगळ्या प्रकारच्या माहितीवर प्रक्रियेची पहिली पायरी कोडिंग ठरते. किचकट आकडेवारी सुलभ स्वरूपात समोर मांडता येते. तीतून समस्येचा आकृतिबंध (पॅटर्न) लक्षात येतो. कल (ट्रेंड) समजतात.

टप्प्याटप्प्यानं समस्येची उकल करण्याचे पर्याय दिसतात. कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये सुचलेले उपाय आणि शास्त्रीय माहिती गोळा करून तीवर प्रक्रिया करून शोधलेले उपाय यांमध्ये मूलभूत फरक राहतो. शालेय वयात उत्तरांच्या दिशेनं बुद्धी वळवली तर भविष्यातल्या अनेक समस्या आजच रोखता येऊ शकतात.

पुढच्या काळासाठी...

कोडिंग शिकणं हा काही सगळ्या समस्यांवरचा एकमेव उपाय नव्हे; त्यानिमित्तानं विचारपद्धतीला दिशा देता येईल इतकंच. कोडिंग शिकलेल्या प्रत्येक मुला-मुलीनं माहिती तंत्रज्ञानक्षेत्रातच भविष्य घडवलं पाहिजे असाही काही दंडक नाही. शालेय शिक्षणात मिळालेलं मूलभूत ज्ञान पुढं आयुष्यभर कुठं ना कुठं उपयोगी पडतं; मग ती कविता असो किंवा नकोशी वाटणारी गणितं असोत.

मेंदू विकसित होण्याच्या वयाच्या या टप्प्यावर आवश्यक त्या शिक्षणामध्ये आर्थिक, मानसिक, व्यावहारिक शिक्षण अत्यावश्यकच. मानसिक तणावाचं व्यवस्थापन शालेय वयात शिकलं तर पुढच्या काळातली आव्हानं स्वीकारणं सोपं जात असतं. कोडिंगकडं यादृष्टीनं पाहायला हवं. उत्साहाची एक लाट म्हणून एखाद्या कंपनीनं केलेलं प्रमोशन इतकंच कोडिंगचं स्वरूप शालेय शिक्षणात राहिलं तर ते पुढच्या काळाच्या दृष्टीनं योग्य ठरणार नाही.

‘एआय’च्या कालखंडात समाजाची पहिली पावलं पडत असताना भविष्याच्या दिशा चर्चेत यायला हव्यात. ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२४’च्या रडतखडत चाललेल्या अंमलबजावणीकडं भविष्यातल्या पिढीच्या दृष्टिकोनातून पाहायला हवं. जगाच्या राजकारणाची काळजी वाहतानाच घरच्या भविष्यातंही डोकावायला हवं. आजच्या ‘चाहूलखुणां’चा इतकाच उद्देश...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com