5 वेळा नामांकन होऊनही गांधीजींना का नाही मिळाला नोबेल?

सूरज यादव
Friday, 2 October 2020

महात्मा गांधींपासून प्रेरणा घेऊन शांततेसाठी कार्य केले त्यांना नोबेल दिला गेला. जर सगळे जग त्यांच्या कार्याला सलाम करते तर मग नोबेल पुरस्कार देणाऱ्या समितीला त्यांचे कार्य दिसले नाही का?

20 व्या शतकात शांततेसाठी सर्वाधिक संघर्ष करणारी व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. नोबेल मिळाला नाही म्हणून त्यांचे कार्य लहान ठरत नाही. ज्यांनी महात्मा गांधींपासून प्रेरणा घेऊन शांततेसाठी कार्य केले त्यांना नोबेल दिला गेला. जर सगळे जग त्यांच्या कार्याला सलाम करते तर मग नोबेल पुरस्कार देणाऱ्या समितीला त्यांचे कार्य दिसले नाही का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

नोबेल पुरस्कार देणाऱ्या संस्थेलासुद्धा महात्मा गांधींना तो देता आला नाही याचे दुःख आहे. असेही म्हटले जाते की, त्यांना नोबेल मिळाले नाही याला समितीवर ब्रिटीशांचा दबाव कारणीभूत होता. कारण त्या काळात भारतावर इंग्रजांचे राज्य होते आणि महात्मा गांधी इंग्रजांविरुद्ध आंदोलन करत होते. पण एवढे एकच कारण त्यामागे नाही.

महात्मा गांधींचे 1937, 1938, 1939, 1947 आणि 1948 मध्ये नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाले होते. यात पहिल्यांदा नॉर्वेच्या एका खासदाराने गांधींच्या नावाचा प्रस्ताव पाठवला होता. पण पुरस्कार समितीने त्याकडे दुर्लक्ष केले. नोबेलच्या Website वरील एका लेखात गांधींना नोबेल देण्यात आलेल्या अडचणींबद्दल लिहले आहे. नोबेल समितीचे तत्कालिन सल्लागार प्रा. मुलर यांनी महात्मा गांधींचे कौतुक केले होते. मात्र, त्यांच्या व्यक्तित्वावर विश्वास नसल्याचे म्हटले होते.

हे वाचा - भारतीय नोटेवर गांधीजींचा फोटो का? जाणून घ्या

गांधींच्या महानतेवर कोणतीही शंका नाही. ते प्रसिद्ध आणि सन्मानिय आहेत. भारतात त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पण ते आपल्या धोरणांमध्ये वेगाने बदल करतात. त्याबद्दल कमी वेळा त्यांनी समाधानकारक उत्तर दिले आहे. गांधी एक स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रवादी असे आदर्श व्यक्तिमत्व असले तरी अनेकदा ते सर्वसामान्य राजकारण्यासारखे वागतात.’ असे मत मुलर यांनी 1937 ला नोंदवले होते. याशिवाय अनेक धक्कादायक अशी निरीक्षणे मांडली होती. ते म्हणतात की, गांधी हे पूर्णत शांततेचे उपासक नव्हते. त्यांना इंग्रजांविरुद्धच्या अहिंसेच्या मार्गाने चालणारे आंदोलन कधीही हिंसक वळण घेऊ शकेल याची काळजी नव्हती असेही मुलर यांनी म्हटले आहे. इतकंच काय पण गांधीजींची भूमिका भारतीयांपुरतीच मर्यादीत होती. त्यांचे दक्षिण आफ्रीकेतील आंदोलनही भारतीय लोकांच्या हितांपुरतेच होते. तिथल्या कृष्णवर्णीयांसाठी काहीच केले नाही जे भारतीयांपेक्षा वाईट आयुष्य जगत होते असं मुलर म्हणाले होते.

मुलर यांच्या विचारांना त्यांचे स्वत:चे दुर्भाग्य म्हटले पाहिजे कारण जर मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनिअर आणि नेल्सन मंडेला यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर या कामाची प्रेरणा गांधीजी असल्याचे म्हटले होते. १९३७ नंतर १९३८, १९३९ मध्येही त्यांचे नामांकन नोबेल पुरस्कारासाठी झाले होते. पण त्यांचे नाव शॉर्ट लिस्ट झाले नाही. १९४७ मध्ये गांधीजींना नोबेल मिळण्याची शक्यता होती मात्र तेव्हाही त्यांच्या नावाची घोषणा झालीच नाही. यात आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोठी भूमिका बजावली होती. भारताला स्वातंत्र्य मिळवताना जे काही केले गेले त्यात गांधीजींच्या आंदोलनांची महत्त्वाची भूमिका होती आणि त्यात त्यांचा विजय अन् पराभवही होता असे नोबेल समितीचे सल्लागार आणि जेन्स अरुप सीप यांनी म्हटले होते. त्यांनी लिहले होते की भारताला स्वातंत्र्य मिळाले पण फाळणीही झाली.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

१९४७ नंतर पुढच्याच वर्षी गांधीजींच्या नावाचा प्रस्ताव नोबेल पुरसकारासाठी पाठवण्यात आला होता. मात्र, दुर्दैवाने नामांकनासाठी अर्ज करण्याच्या दोन दिवस अगोदर गांधीजींची हत्या झाली. तसेच तोपर्यंत कोणालाही नोबेल पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला नव्हता. अपवादात्मक परिस्थितीत जरी दिला गेला असता तरी त्या पुरस्काराची रक्कम कोणाला द्यायची असा प्रश्न समितीसमोर होता. गांधीजींची कोणतीही संघटना, संस्था किंवा ट्रस्ट नव्हते. शेवटी १९४८चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणालाही देण्यात आला नाही.

गांधीजींच्या ७० व्या पुण्यतिथीनिमित्त नोबेल पुरस्कार समितीने ट्विट करुन त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं होतं की, गांधीजींच्या हत्येपूर्वी काही दिवस अगोदर पुरस्कारासाठी नामांकन झाले होते. त्यावर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा अशी व्यक्ती जिवंत नव्हती. यातून हेच दिसते की जर गांधीजी हयात असते तर निश्चितच त्यांना नोबेल मिळाला असता. १९८९ ला जेव्हा दलाई लामांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान केला गेला तेव्हा समितीने गांधीजींना पुरस्कार न देणे ही चुक असल्याचे मान्य केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why gandhiji not awarded by nobel peace prize know reason