esakal | ...म्हणून पतीची भीती वाटु लागली अन्
sakal

बोलून बातमी शोधा

relation.jpg

...म्हणून पतीची भीती वाटु लागली अन्

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पतीविषयी भीतीच वाटते 
मी २८ वर्षांची नवविवाहिता असून, लग्नाला ५ महिने झाले आहेत. लग्नाअगोदर एक वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत आहोत, भेटत होतो. दोघेही डॉक्‍टर आहोत. सुरवातीपासूनच आमच्यात छोट्या-मोठ्या गोष्टीवरून वाद होत होते. प्रत्येक वेळी मी पतीला सांगितले होते, आपले एकमेकांशी जुळते किंवा नाही हे तपासून पाहूयात. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. आमचे पटत नाही ही तक्रार मी माझ्या व त्याच्या घरच्यांकडेही केली होती. त्यावर पतीची माफी व पुन्हा तसे न वागण्याचे वचन असे, त्यामुळे माझ्या आई-वडिलांनी याकडे दुर्लक्ष केले. लग्नाच्याआधी पतीने माझ्याकडे लैंगिक जवळकीची मागणी केली होती. परंतु मी नकार दिला. लग्नानंतर आमच्यातील वाद खूपच वाढले. त्यामुळे पतीची मला भीती वाटू लागली व माझे लैंगिक आकर्षण संपले. मी पतीकडून वेळ मागितला व आपण थोडे दिवस मित्र-मैत्रिणीसारखे राहूया व गैरसमज, वाद कमी करू. त्यावर पतीने नकार दिला व शारीरिक जबरदस्ती केली. त्यामुळे आता माझ्या मनात पतीविषयी घृणा निर्माण झाली आहे. घराविषयी ओढही कमी झाली. माझ्या आई-वडिलांकडे पतीने माझ्या तक्रारी सांगितल्या. त्यामुळे मला खूपच राग आला व मी पतीपासून वेगळे राहू लागले. माझ्या घरच्यांना आमचा संसार मोडू नये, असे वाटते. आमचे संबंध चांगले होण्यासाठी व मला लैंगिक आकर्षण तयार होण्यासाठी काय करावे. 
- सासर-माहेरचे यांना काय वाटते यापेक्षा तुमचे याबाबत स्वतःचे मत व दृष्टिकोन सर्वांत महत्त्वाचे आहे. तुम्ही दोघेही पती-पत्नी उच्चशिक्षित आहात, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहात. त्यामुळे नेमके तुमच्या दोघांमध्ये कोणत्या गोष्टीवरून वाद, भांडणे होतात याचा विचार करा. इतरांना त्या गोष्टी शुल्लक वाटल्या तरी तुमच्यात टोकाचे वाद होण्यामागे एकमेकांविषयी विश्‍वासाचा अभाव, स्वकेंद्रित वर्तवणूक, दुसऱ्याच्या भावना व गरजांचा विचार न करणे हे दोघांच्याही वर्तणुकीतील समस्या असू शकते. वर्तन व स्वभावात बदल करण्याचे प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. तरच वाद कमी होऊ शकतात. नवविवाहीत जोडप्यामध्ये असलेली जवळकीची तीव्र भावना यातून पतीने हक्क दाखविण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्‍यताही आहे. प्रत्येक व्यक्ती १०० टक्के आदर्श असू शकत नाही. परंतु विवाहापूर्वी केलेल्या मागणीस नकार दिल्यानंतर त्यांनी तुमच्या मनाचा आदर केला, हेही दिसून येते. तुमच्या स्वतःच्या जोडीदाराकडून जशा अपेक्षा आहेत, तसेच त्यांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे समजून घेऊन तुम्ही स्वतःत बदल घडविणे व ज्यात बदल करणे शक्‍य नाही, त्यांचा स्वीकार करता यायला हवा. कोणतेही नाते परिपूर्ण नसते. तसेच इतरांना बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडविण्याचे प्रयत्न यशाकडे नेतात. स्त्री व पुरुष यांच्यात शारीरिक व भावनिक गरजांच्या पूर्ततेला देण्याचा प्राधान्यक्रम स्वतंत्र, वेगळा असू शकतो. घृणा करणे, एकमेकांविषयी इतरांकडे तक्रारी करणे, यातून गैरसमज वाढतील ते टाळण्याचा प्रयत्न करावा. 

सोसायटीतील कुटुंबाचा त्रास 
मी सोसायटीत राहणारी ६० वर्षीय विधवा महिला आहे. १२-१५ वर्षे माझ्या डिप्रेशनने आजारी असलेल्या ४० वर्षीय मुलीचा सांभाळ करीत आहे. माझ्या सोसायटीत मला कल्पना न देता मॅनेजरने सोसायटीच्या मंदिराच्या मागे राहायला एक कुटुंब आणून ठेवले. त्यांच्याकडे सतत लोकांचे येणे-जाणे चालू असते. मोठ्याने बोलतात. त्यांना मी मोठ्याने बोलू नका, असे सांगितले. तर मलाच काहीही उलट बोलतात. एकदा माझी काहीही चूक नसताना कुटुंबातील स्त्रीने थोबाडीत मारली व तिच्या नवऱ्याने माझे हात पकडून ठेवले. मी मॅनेजरविरुद्ध कोठे तक्रार करून त्याला काढू शकते. त्या कुटुंबाचा आम्हाला खूप त्रास होतो आहे. 
- तुमच्या उतारवयामध्ये तुम्हाला मानसकि आजार असलेल्या मुलीला सांभाळावे लागत आहे. यामुळे तणाव निश्‍चतच येऊ शकतो. तसेच उतारवय, तणावामुळे सहनशक्तीही कमी होते. परंतु अधिक ताण वाढू नये यासाठी प्रयत्न करावेत. सोसायटीच्या कामासाठी मॅनेजरची नेमणूक केली असली तरी, तो स्वतंत्र कोणतेही निर्णय घेत नसतो. त्याला तो अधिकारही नाही. सदस्यांनी नेमून दिलेली कामे तो करतो. तुमच्या सोसायटीचे अध्यक्ष/सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडे तुम्ही लेखी तक्रार करू शकता. जे कुटुंब तुमच्या सोसायटीत कामासाठी ठेवले आहे, त्यांच्याव्यतिरिक्त इतरांना त्यांच्या घरी येण्यामुळे त्रास होतो, याबाबत इतर सदस्यांना सांगू शकता. तुमचा फ्लॅट मंदिराजवळ असल्याने इतरांना आवाज जात नसेल, तर तुम्हाला होणाऱ्या त्रासाची त्यांना कल्पना नसावी. या वयातील तुमच्यावरील जबाबदारी लक्षात घेता तुमचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे, यासाठी सामाजिक संस्थेची मदत घेऊ शकता. ‘रेनबो डे केअर सेंटर’ तरंग प्लॉट नं. 69, स्वेदगंगा सोसायटी, वारजे जकात नाक्‍यामागे, वारजे, पुणे ५८. ही संस्था जेष्ठ नागरिकांना स्वतःचे मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते. तेथे जरूर भेट द्या. 

loading image
go to top