गर्भाशयाचं अंतरंग : भाग २

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ
अनावश्यक गर्भाशय काढण्यासाठीचे अजून एक कारण म्हणजे, पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे. सहसा मुले होईपर्यंत स्त्री ही समस्या सहन करते व एकदा कुटुंब पूर्ण झाले, की वारंवार या समस्येसाठी डॉक्टरांकडे फेऱ्या मारून कंटाळलेले नातेवाईक ‘काढून टाका एकदाचे गर्भाशय, आता त्याचा काय उपयोग?’ असा डॉक्टरांकडे हट्ट करतात. मुळात अशा समस्येसाठी फार-फार तर गर्भाशयाची पिशवी स्वच्छ करून त्यातील तुकडा काढून कॅन्सर नसल्याची तपासणी करून रुग्णाला गर्भनिरोधक गोळ्यांचा कोर्स दिल्यास बराच फरक पडतो, तसेच त्याशिवायही इतर औषधोपचार असतातच. तरीही गर्भाशयाची पिशवी काढण्याचा शॉर्टकट आम्हाला जास्त सोपा वाटतो. 

बऱ्याचदा गर्भाशयातील गाठी काढण्यासाठी गर्भाशयच काढले जाते, पण या गाठी छोट्या असल्यास फक्त या गाठी काढता येतात. बऱ्याचदा ओटीपोट दुखण्याचे कारण हे गर्भाशय व आजूबाजूच्या अवयवांना झालेला जंतुसंसर्ग बळावत जातो, हेही असू शकते. यासाठी प्रतिजैविके पुरेशी असताना, जंतुसंसर्गाचा हा राग गर्भाशयावर काढला जातो. मुळात या सगळ्या गोष्टींमागे एक गैरसमज म्हणजे, मूल झाल्यावर गर्भाशयाची गरजच नाही व त्यामुळे गर्भाशय काढण्याकडे संतती नियमनाच्या दृष्टिकोनातूनही पाहिले जाते. मात्र, खरे तर मूल झाल्यावर गर्भाशय कात टाकते व स्त्रीच्या आयुष्याला उभारी देण्यास नव्याने सज्ज होते. याची जाणीव प्रथमतः स्त्रीला असली पाहिजे.  

अंडाशय हे गर्भाशयाच्या साथीने शरीरात संप्रेरके स्रवण्याचे कार्य करते, ज्यामुळे हाडे व हृदय बळकट होतात व त्वचेचा तजेलपणाही टिकून राहतो. या गोष्टीचा विसर पडल्यामुळे तिशी व चाळिशीत गर्भाशय काढून टाकल्याने अनेक स्त्रिया अकाली वार्धक्याकडे झुकलेल्या दिसतात. या स्त्रियांमध्ये हृदयरोग, हाडे ठिसूळ होणे व संप्रेरकांच्या कमतरतेमुळे मानसिक समस्याही आढळून येतात.  

याची दुसरी बाजू म्हणजे आवश्यक कारणांची मीमांसा! उदाहरणार्थ, अंडाशयाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर व गर्भाशयाच्या कॅन्सरची पूर्वस्थिती असल्यास गर्भाशय काढावेच लागते. एकीकडे अनावश्यक कारणांचा अतिरेक होतो, तर दुसरीकडे आवश्यक कारणांकडे काणाडोळाही होताना दिसतो. एकीकडे वाढणारे वय हे आजच्या युगातील स्त्रीला अधिक प्रगल्भ बनवताना दिसते, पण दुसरीकडे अनावश्यक गर्भाशय काढणाऱ्या शस्त्रक्रियांसारखे प्रघात तिला मागे खेचताना दिसतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman Health Bharati Dhore Patil maitrin supplement sakal pune today