‘स्त्री’वादाचं वेगळं रूप

आज आपल्या भोवतालचं जग म्हणजे प्रभावशाली चर्चांचं व्यासपीठ बनलंय. जिकडं तिकडं मोठ्या प्रमाणात जोरदार वादविवाद चालू असतात.
maria just maria malayalam book
maria just maria malayalam booksakal

- अ‍ॅड. निखिल संजय रेखा, nikhil17adsule@gmail.com

आज आपल्या भोवतालचं जग म्हणजे प्रभावशाली चर्चांचं व्यासपीठ बनलंय. जिकडं तिकडं मोठ्या प्रमाणात जोरदार वादविवाद चालू असतात. लिंगभाव, जात, धर्म, वर्ग, वंश, संस्कृती - विषयांना अंत म्हणून नाही. परंतु या चर्चा पुढं पुढं अनिवार्यतावादी होत जातात. आपलंच मत सर्वत्र रुजलं पाहिजे आणि आपण म्हणतो तसंच जग बनलं पाहिजे अशी वृत्ती वाढू लागली आहे.

अशी चर्चा स्वमताग्रही तसेच वर्चस्ववादी बनते आणि व्यक्तीला दुय्यम स्थान देते. माणसं क्षुद्र ठरतात आणि परिणामांची पर्वा न करता विशिष्ट विचारांचं ओझे वाहायला त्यांना प्रवृत्त केलं जातं. स्त्रियांच्या प्रांतात या कथनांत पुरुष विरुद्ध स्त्री असं द्वैत उभं केलेलं दिसतं.

सगळ्या संकल्पनांमध्ये स्त्रीच्या अस्तित्वापेक्षा तिच्या बाईपण निभावण्याला अग्रक्रम दिला जातो. असे अग्रक्रम परिश्रमपूर्वक लादले जातात आणि सहज स्वीकारून आचरणात आणले जातात. अशा गृहीतकांचं मूळ आणि त्यांचं प्रभुत्व यावर शंका घ्यायला भाग पाडणारी नीटस मांडणी इटालियन स्त्रीवादी लेखिका लुईसा मुरारो यांनी यापूर्वीच केली आहे.

हा प्रश्न किती महत्त्वाचा आणि विरोधाभासानं भरलेला आहे, याची सर्वसाधारण कल्पना वरील विवेचनातून येईल. परंतु अज्ञानात रममाण असलेल्या आपल्या समाजात, अशा गोष्टी प्रत्यक्ष सुरू असताना त्यावर क्वचितच प्रश्न उपस्थित केले जातात. त्यासाठी कुठेतरी सेनेका फॉल्स परिषद भरावी लागते, मॅरी वालस्टोनक्राफ्टचा करार व्हावा लागतो, सावित्रीबाई फुलेंना पायाभरणी करावी लागते, ताराबाई शिंदेंचा निबंध यावा लागतो.

‘सिमॉन द बोव्हा’च्या संकल्पना समोर याव्या लागतात, बेल हूकचा स्त्रियांच्या विविध गटांसमोरचे भिन्न प्रश्न समोर आणणारा इंटरसेक्शनल फेमिनिझमचा वेगळाच दृष्टिकोन पुढे यावा लागतो. अशा अनेक गोष्टी घडतात तेव्हा कुठं आपल्या अज्ञानाच्या पडद्याला आव्हान मिळतं.

विद्रोही स्त्रियांच्या या बहुमोल रत्नमालेच्या खणखणाटात संध्या मॅरी नावाच्या आणखी एका वाङ्मयीन आवाजाची आता भर पडत आहे. ‘मारिया जस्ट मारिया’ असं शीर्षक असलेल्या त्यांच्या मल्याळम पुस्तकाच्या रूपानं ही भर पडली आहे. जयश्री कलाथील यांनी या पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. मारिया ही या पुस्तकातील एक काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. पण तिनं मांडलेले विचार आपण राहत असलेल्या जगातील क्षुद्रभेदांवर प्रश्न उपस्थित करतात.

हे पुस्तक वाचत असताना कधी हसू फुटतं, कधी रडू आवरत नाही, तर कधी वाटतं घुसावं आपणही या कथेत आणि मारियाला एक घट्ट मिठी मारावी. या पुस्तकाचं आणि त्यात पेरलेल्या विनोदाचं सामर्थ्य इतकं जबरदस्त आहे, की आपल्या समाजातील प्रचलित समजुती आणि चालीरितींमधील दोष दाखवून देत ते त्या सर्वांना थेट प्रश्न विचारते. केरळची अद्‍भुत भूमी हे या मारियाचं विश्व आहे आणि कथेतील सर्व प्रमुख घटना मुख्यत: तिच्या आजोळच्या पारंपरिक घरातच घडतात.

या पुस्तकाची सुरुवात मोठी विस्मयजनक आहे. स्थल-काल-अवकाश विषयक आपल्या कल्पनांनाच ती उलटीपालटी करते. एका मानसिक रुग्णालयात मारिया आपल्याला पडलेलं स्वप्न सांगत आहे, अशी या कथेची सुरुवात होते. आपल्याच काळात घडत असल्यानं ही कथा आपल्या मनाला अधिक भिडते. या काळाचं सूचन मारियाच्याच बोलण्यातून होतं. ती म्हणते, की अमेरिकेत पहिल्यांदाच कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष निवडून आलेत.

महाभारतातील एक संवाद घेऊन ती मृत्यूबद्दलचा तर्कवितर्क सांगत असते आणि सांगता सांगता शेवटी ती युधिष्ठिराच्या श्वानाशी बोलू लागते. हे मारियाचं जादुई-वास्तव जग आहे. कोणत्याही वेडाचारामागं कार्यकारणभाव असतो, या कल्पनेच्या आधारालाच आव्हान देत कथेची सुरुवात होते.

वेड या संकल्पनेबद्दलच्या रूढ समजुतींना छेद देणारं आपलं प्रतिपादन मारिया मांडते. शहाण्या जगाच्या सामान्य दर्जाच्या चर्चाविश्वावरच ती शंका उपस्थित करते. चला तर मग. मारियाच्या विश्वात तुमचे स्वागत असो!

मारियाचं हे विश्व खरोखरच सुंदर आहे. त्यात अनेक छान छान पात्रं आहेत. तिचे ज्ञानसमृद्ध पण मनात एक बाल्य जोपासणारे आजोबा आहेत आणि तिचा कॉम्रेड गीवर्गीज आहे. फक्त या गीवर्गीजलाच मारिया पूर्णपणे उमगलेली आहे. चंडीपती नावाचा एक बोलका, बदनाम कुत्राही आहे इथं. हा कुत्रा आपल्या समाजातील तऱ्हेतऱ्हेच्या माणसांचं प्रतिनिधित्व करतो.

काली नावाची एक कणखर बाई आहे. लैंगिकतेबद्दलच्या परंपरेने चालत आलेल्या साऱ्या कौटुंबिक आणि पितृसत्ताक नीतिनियमांना ती आव्हान देते. या विश्वात ताडी काढणारा केलन आहे. मारियाच्या भूमीतील तो पहिला कम्युनिस्ट बनतो आणि उच्चनीच भेद नसलेल्या समतावादी भूमीचे स्वप्न पाहतो. अत्यंत धाडशी अशी तिची वल्यामाचीही आहे या विश्वात.

तिनं तर चक्क बायबलचं पुनर्लेखन करायचं काम सुरू केलं होतं. मारियाचं पहिलं आकर्षण बनलेला बालमित्र कुट्टप्पाही या विश्वात आहे. तो खालच्या जातीचा आहे आणि रंगानं खूप काळा आहे. पण मारियाला विचाराल तर त्याच्याइतका सुंदर माणूस अख्ख्या जगात शोधून सापडला नसता. ती नेहमी वाट पाहत असते त्याची... पण ती गोष्ट त्याच्या लक्षात येणे दूरच, तो तशी कल्पनाही करू शकत नव्हता. कारण जात आणि जातीपायी आलेल्या उच्चनीचतेच्या काटेकोर नियमांनुसार अशी कल्पनाही करण्याला त्याला मज्जाव होता.

या विश्वात नंतर आयेशासारख्या मारियाच्या शहरी मैत्रिणी येतात. आयेशाचे आईवडील चळवळे होते. पण ती आपल्या वडिलांच्या दांभिकतेविरोधात बोलायची. इतरही अनेक मजेदार व्यक्ती या विश्वात आहेत. ते आणि त्यांची स्वभावलक्षणं यांची यादी बरीच लांबलचक होईल. या साऱ्यात मध्यवर्ती आहे ती आपली नायिका मारिया. खाली दिलेल्या तिच्या स्वत:च्या शब्दातूनच ती तुम्हाला नीट उमगेल.

‘‘एखाद्या पुरुषाला बऱ्यापैकी नोकरी असली की मूल नसलं तरी तो परिपूर्ण आणि यशस्वी मानला जातो. पण एखाद्या बाईनं नुसता मुलाला जन्म दिला की झालीच ती परिपूर्ण. बाई चंद्रावर किंवा अगदी प्लूटोवर का जाऊन येईना जोवर ती मुलांना जन्म देत नाही, तोवर ती परिपूर्ण स्त्री नाही म्हणजे नाहीच. खरं सांगते अम्माजी, मला नाही कळत तुमचं हे असलं जग आणि त्याची ही असली मोजमापं.’’

या पुस्तकाबद्दल जितकं बोलावं किंवा लिहावं तितकं कमीच. असं वाटतच राहतं की अजून थोडं सांगायचं राहिलंय, अजून थोडं उमगायचंही राहिलंय. रोजच्या जीवनातील साधे साधे विचार आणि कृती यांबद्दल प्रश्न विचारत हे पुस्तक व्यक्तिगततेचा आधार, समाजाचा ‘नागरीपणा’ आणि राष्ट्र ही कल्पना या सर्वांवर प्रश्नचिन्ह उभं करतं. नुकत्याच साजऱ्या झालेल्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर २०२४ मध्ये हे पुस्तक वाचत असताना आपल्याला आपल्या प्रजासत्ताकाच्या अभिवचनांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. या अभिवचनांची पूर्तता खरोखर झाली आहे का, असा प्रश्नही या वेळी आपल्याला नक्कीच पडेल.

स्त्री देहाचं विक्रययोग्य वस्तुरूप करणाऱ्या तऱ्हेतऱ्हेच्या पुरुषी नजरांची उलटतपासणी घ्यावी असं वाटेल. व्यक्तिशः मला विचाराल तर ‘मारिया जस्ट मारिया’ या पुस्तकानं माझ्या अस्तित्वाच्या आधारावरच प्रश्न उपस्थित केले. संत रविदास यांच्या कल्पनेतील जातिविहीन, वर्गविहीन आणि दुःखमुक्त शहर असलेल्या बेगमपुराचा शोध घेण्यासाठी स्त्रीवादानं - नव्हे विविध स्त्रीवादांनी मला शिकवलेल्या धड्यांशी या प्रश्नांचं नातं जुळवून घ्यावं असं मला वाटू लागलं. धन्यवाद मारिया. ‘मारियाच केवळ’ आणि ‘न्यायपूर्ण मारिया’ अशा दोन्ही अर्थांनी ‘जस्ट मारिया’च असल्याबद्दल मी तुझा फार फार ऋणी आहे.

अनुवाद : अनंत घोटगाळकर

anant.ghotgalkar@gmail.com

(लेखक हे आयआयटी-दिल्ली आणि सामाजिक न्याय मंत्रालय इथं वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com