निसर्गाशी जीवघेणा खेळ

भूकंप, भूस्खलन, हिमस्खलन, ढगफुटी, महापूर अशा एकामागून एक नैसर्गिक संकटांची मालिका उत्तराखंडाच्या जोशीमठ भागात गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे.
Joshimath Village Home
Joshimath Village HomeSakal
Summary

भूकंप, भूस्खलन, हिमस्खलन, ढगफुटी, महापूर अशा एकामागून एक नैसर्गिक संकटांची मालिका उत्तराखंडाच्या जोशीमठ भागात गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे.

भूकंप, भूस्खलन, हिमस्खलन, ढगफुटी, महापूर अशा एकामागून एक नैसर्गिक संकटांची मालिका उत्तराखंडाच्या जोशीमठ भागात गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे. त्यात नव्या वर्षी भर पडली ती जमीन खचल्याची. जोशीमठाच्या काही भागातील घरांना, हॉटेलांना तडे गेले. रस्त्यांना, जमिनीला भेगा पडल्या. निसर्गतः अस्थिर प्रदेशात मानवानं केलेल्या हस्तक्षेपाची किंमत मोजावी लागणाऱ्या जोशीमठावरील हा रिपोर्ताज...

देशातील उत्तराखंड या राज्याच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र. हिमालयाच्या हिमाद्री-रांगेवर समुद्रसपाटीपासून सहा हजार १५० फूट उंचीवर वसलेलं हे गाव. सातव्या ते अकराव्या शतकातील राजा कात्यूरी यानं हे गाव वसवल्याची माहिती इथले नागरिक देतात; पण खऱ्या अर्थानं जोशीमठाचं नाव पुढं आलं ते आदी शंकराचार्य यांच्यामुळे. त्यांनी चार दिशांना चार धाम स्थापन केले. पूर्वेला ओडिशातील जगन्नाथपुरीमध्ये गोवर्धनमठ, पश्चिमेला गुजरातमधील द्वारकेत शारदामठ, दक्षिणेला तमिळनाडू राज्यात रामेश्वरम् इथं श्रृंगेरीमठ आणि उत्तरेला जोशीमठाच्या जवळील बद्रिनाथमध्ये ज्योतिर्पीठधामची स्थापना त्यांनी केली. या गावाच्या मध्यवस्तीत ज्योतिर्मठ आहे.

तिथले साधक गोविंदराज म्हणाले : ‘हिवाळ्यात केदारनाथमध्ये आणि बद्रिनाथमध्ये मोठी बर्फवृष्टी होते. त्यामुळे शंकराचार्य तपश्चर्येसाठी जोशीमठात येत. याच ठिकाणी गुहेत तपश्चर्या करताना त्यांना दिव्य ज्योतीचं दर्शन झालं. त्यामुळे या जागेला ‘ज्योतिर्मठ’ असं म्हटलं जाऊ लागलं. कालांतरानं ज्योतिर्मठाचा अपभ्रंश होऊन, त्याला आता ‘जोशीमठ’ असं म्हटलं जातं.

केदारनाथला आणि बद्रिनाथला जाणारा प्रत्येक जण इथं थांबतो. आधी या भागात फक्त यात्रेकरू येत. आता यात्रेकरू कमी होऊन पर्यटक आणि गिर्यारोहकांची संख्या वाढली आहे.’’

अस्थिरतेची सुरुवात

जोशीमठ सर्वप्रथम अस्थिर झाला तो १९६० च्या दशकात. त्या वेळी पहिल्यांदाच जमिनाला भेगा पडल्याची घटना घडली. त्याचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी गढवालचे तत्कालीन आयुक्त महेशचंद्र मिश्रा यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. त्या समितीनं ता. सात मे १९७६ रोजी सरकारला अहवाल दिला. ‘जोशीमठ हे आधी झालेल्या मोठ्या भूस्खलनावर वसलेलं गाव असल्यानं इथं विकासकामं करू नयेत, मोठ्या प्रमाणात बांधकामं टाळावीत.

नैसर्गिक पाण्याचे स्रोत आणि इथली झाडं यांचं संवर्धन करावं,’ असं या अहवालात अधोरेखित केलं होतं. मात्र, गेल्या ४७ वर्षांमध्ये सरकारनं या अहवालाकडे दुर्लक्ष केलं का, या प्रश्नाला इथले राजकीय नेते बगल देतात. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी ‘ऑफ द रेकॉर्ड’ म्हणतात : ‘या अहवालाची अंमलबजावणी न करणं ही प्रशासनाची मोठी चूक ठरली.’ डोंगर-दऱ्यांत वसलेल्या या गावाकडे, तिथल्या रचनेकडे प्रशासनानं गांभीर्यानं पाहिलं नाही. इथं घरांची संख्या बेसुमार वाढली. पर्यटक वाढल्यानं हॉटेल्स, ‘होम स्टे’ वाढले. गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात बांधकामं झाली. याकडे प्रशासनाचे लक्ष नव्हतं, हेदेखील अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं. निसर्गतः हिमालय हा अस्थिर प्रदेश आहे. त्यामुळे नैसर्गिक घडामोडींमुळे जोशीमठाच्या जमिनीला तडे जाण्याची शक्यता आहे, तसंच, अशा संवेदनशील भागात विकासाच्या नावाखाली माणसानं निसर्गाची भयंकर हानी केली आहे. जोशीमठ खचणं ही मानवानं पर्यावरणात केलेल्या हस्तक्षेपावर निसर्गानं दिलेली प्रतिक्रिया आहे, हे निश्चित.

जमीन खचण्याची नैसर्गिक कारणं

१. पृथ्वीवरील सर्वांत तरुण मानल्या जाणाऱ्या हिमालयाच्या हिमाद्री-रांगेवर जोशीमठ आहे. त्यामुळे साहजिकच हे गाव डोंगर-उतारावर वसलेलं आहे. त्याची रचना पायऱ्यांसारखी दिसते. या गावाच्या शेजारी शेकडो फूट खोल दरीतून अलकनंदा ही गंगेची उपनदी वाहते. हिमालयाच्या परिसरात सतत भूगर्भीय हालचाली सुरू असतात. त्यामुळे जोशीमठाचा भाग भूकंपप्रवण क्षेत्र (सिस्मिक झोन ५) आहे.

२. जोशीमठ ‘टेक्टोनिक फॉल्ट लाइन’वर वसलं आहे. या गावाच्या मागच्या बाजूला विष्णुप्रयाग इथं धौलीगंगा आणि अलकनंदा या नद्यांचा संगम असलेल्या विष्णुप्रयाग ‘पांडुकेश्वर थ्रस्ट’ (पीटी) आहे, तसंच ‘वैक्रिता थ्रस्ट’ (व्हीटी) आणि ‘मेन सेंट्रल थ्रस्ट’देखील (एमसीटी) जोशीमठाच्या अगदी जवळ आहेत. जिथं दोन भू-भाग जवळ येतात तो भाग अस्थिर असतो. तिथं भूस्खलनाची शक्यता सर्वाधिक असते.

३. या गावाच्या पूर्वेला कर्मनासा आणि पश्चिमेला ढाकनाला हे मोठे पाण्याचे प्रवाह आहेत, तसंच, दक्षिणेला धौलीगंगा आणि उत्तरेला अलकनंदा यांनी जोशीमठ वेढलेला आहे. या उपनद्या मध्य हिमालयातून वाहत असल्यानं हिमस्खलन होऊन या नद्यांना महापूर आल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

थोडक्यात, अत्यंत संवेदनशील अशा ठिकाणी जोशीमठ वसलं आहे; पण, जोशीमठ अस्थिर होण्याची सुरुवात आज झाली नसून, ४७ वर्षांपूर्वीच झाली आहे.

मानवनिर्मित कारणं

१. बेसुमार अनधिकृत बांधकाम

हडप्पा-मोहेंजोदडो या प्राचीन काळातही नगररचनेला प्राधान्य होतं. त्या वेळच्या मानवानं घरांचं बांधकाम, त्यातील सांडपाण्याची व्यवस्था या मूलभूत घटकांचं अचूक नियोजन केलं होतं ही बाब आता सर्वांनाच माहीत आहे. आधुनिक काळात माणूस प्रगत झाला. तंत्रज्ञानामुळे त्याचा विकास झाला; पण नगरनियोजनाचे पायाभूत सिद्धान्त बाजूला ठेवल्यास काय होतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे खचत असलेला जोशीमठ आहे.

आपण महाराष्ट्रात घर बांधण्यासाठी त्याचा आराखडा मंजूर करण्यापासून ते वापराच्या परवान्यापर्यंतची प्रक्रिया करतो. जोशीमठ परिसरात ही कोणतीच प्रक्रिया होत नसल्याची धक्कादायक माहिती पुढं आली आहे. तिथं बहुतांश जमिनी वंशपरंपरेनं आल्या आहेत. त्यांवर घर बांधण्यासाठी कोणतीच प्रक्रिया रहिवाशांना करावी लागत नाही. आपल्या जागेत कसंही घर बांधलं तरी चालतं, असा समज इथल्या नागरिकांमध्ये असल्याचं त्यांच्याशी बोलताना जाणवलं.

मोहनबागमधील कमलेश चंद्रा म्हणाले : ‘पैसे मिळतील तसे ते साठवून घर बांधत गेलो. गेल्या आठ वर्षांमध्ये तीन मजली घर बांधलं होतं. त्यासाठी वीस लाख रुपये खर्च आला. तिथं पर्यटकांसाठी ‘होम स्टे’ची व्यवस्था केली होती.’

आपल्या जमिनीवर किती मजले असावेत, यासाठी कोणत्याही सरकारी बाबूकडे जाण्याची गरज इथल्या लोकांना वाटत नाही. त्यामुळे घरबांधणीचा कोणताच कायदा नाही, मग साहजिकच त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्नच येत नाही! अशी भयंकर व्यवस्था जोशीमठातील आहे.

जोशीमठामध्ये नेमकी किती घरं आहेत, त्यांची अचूक माहिती नगर परिषद, तहसीलदार यांच्याकडे नव्हती. इथं घरक्रमांक टाकण्याची पद्धत नाही. मालमत्ताकर हा प्रकार नाही. जोशीमठातील सरकारदरबारी फक्त एक हजार ८०० घरांची नोंद आहे. उर्वरित शेकडो बहुमजली घरं विनापरवाना उभी राहिली आहेत.

जोशीमठ हा चमोली जिल्ह्यात येतो. त्याचे जिल्हाधिकारी हिमांशू खुराणा यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले : ‘‘उत्तराखंडमध्ये बद्रिनाथ, अल्मोडा अशा काही भागांत बांधकाम-नियमावली आहे. तिथं प्राधिकरणातर्फे काटेकोर पालन होतं; पण या डोंगराळ भागात हे नियम गांभीर्यानं पाहिले गेले नाहीत. आता या भागासाठी बांधकामाची स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येत आहे. तोपर्यंत बांधकामं रोखण्यात आली आहेत.’

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या जोशीमठ शाखेचे व्यवस्थापक नीरज सिंह म्हणाले : ‘इथले खातेदार गृहकर्ज कधीच घेत नाहीत. एकतर वैयक्तिक कर्ज किंवा ‘कॅश क्रेडिट’ (सीसी) घेऊन घर बांधल्याची उदाहरणं आहेत. गृहकर्जासाठी आवश्यक जागेच्या कागदपत्रांची पूर्तता इथं होत नाही. त्यामुळे ते गृहकर्जाच्या मार्गानं न जाता इतर मार्गानं कर्ज घेतात.’

जोशीमठ नगरपरिषदेमध्ये एकूण नऊ वॉर्ड आहेत. त्यापैकी गांधीनगर, सिंहधार, मोहनबाग आणि सुनील या चार वॉर्डांमधील ८६३ घरांना तडे गेल्याचं दिसलं, तसंच जेपी, मारवाडी अशा परिसरातील भागांतही घरांचं मोठं नुकसान झालं आहे. जोशीमठ डोंगर-उतारावर पायऱ्या करून वसलेलं आहे. त्यामुळे वरच्या पायरीवरील घर धोकादायक झाल्यास ते खालच्या पायरीवर असलेल्या घरावर कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी धोकादायक झालेली घरं पाडण्यात येत आहेत. याबाबत अजित कप्रुवान हे ८४ वर्षांचे गृहस्थ म्हणाले : ‘‘जोशीमठात आतापर्यंत फक्त घरं उभी राहताना बघत होतो. तीच दिमाखात उभी राहिलेली घरं पाडताना बघून काळीज पिळवटून जातं. ‘मोठी घरं बांधू नका,’ असं सांगूनही त्या वेळी कुणी ऐकत नव्हतं. एकावर एक मजले बांधण्याची स्पर्धा सुरू होती. हे घरांचं ओझं या जमिनीला पेलवलं नाही.’’

२. सांडपाणीव्यवस्थापनाचा अभाव

प्राचीन काळी विकसित झालेल्या वसाहतींमध्येही सांडपाण्याची नियोजित व्यवस्था असल्याचे पुरावे पुरातत्त्व-उत्खननातून मिळतात; पण जोशीमठ हे असं ठिकाण आहे की तिथं कसल्याच प्रकारचं सांडपाणीव्यवस्थापन ७५ वर्षांमध्ये झालेलं नाही. परिषदेच्या काही भागांमध्ये सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था उभारण्यात येत होती; पण जमीन खचल्यानं तीदेखील उद्ध्वस्त झाली. हे सांडपाणी वर्षानुवर्षं जमिनीत मुरलं. तिथून जमिनीअंतर्गत पाण्याचे प्रवाह झाले. त्यांतून जमिनीची धूप झाल्यानं मोठ्या लोकसंख्येच्या भागात जमीन खचून तिला तडे गेल्याचं दिसतं, असा शास्त्रज्ञांच्या एका गटाचा दावा आहे. विशेषतः सुनील वॉर्डमध्ये जमीन खचण्यामागं हे एक महत्त्वाचं कारण असेल का, यासाठी संशोधनसंस्था त्या भागाचा अभ्यास करत आहेत. याबाबत खुराणा म्हणाले : ‘सांडपाणीव्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात आलं आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. सांडपाण्याचा प्रत्येक थेंब शास्त्रीय पद्धतीनं प्रक्रिया करून पुढं सोडला जाईल, अशी व्यवस्था उभारण्यावर भर दिला जाणार आहे.’

३. नैसर्गिक प्रवाहांना अडथळा

बर्फाचं वितळलेलं किंवा पावसाचं पडलेलं पाणी वर्षानुवर्षं एकाच मार्गानं जोशीमठाच्या डोंगर-उतारावरून वाहत होतं. इथं सिंहधार नावाचा एक वॉर्ड आहे. या भागातून पाण्याचा मोठा प्रवाह वाहत असल्यानं त्याला ‘सिंहधार’ हे नाव पडलं; पण आता तो प्रवाह नाही. त्या जागेवर आता टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत! त्यामुळे वाहणाऱ्या पाण्यानं पाण्याचे प्रवाह जमिनीअंतर्गत निर्माण केले. जेपी वीजनिर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या परिसरात गेल्या काही दिवसांपर्यंत संरक्षण भिंत होती. आता तिथून पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर पडत आहे. हे पाणी नेमकं आलं कुठून हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.

४. विकासप्रकल्पांचं बांधकाम

जोशीमठाच्या डोंगराच्या परिसरात एकाच वेळी रस्ते, बोगदे आणि जलविद्युत् प्रकल्पांचं बांधकाम सुरू आहे. चारधाम जोडण्यासाठी रस्त्यांची कामं वेगानं सुरू आहेत, तसंच, बद्रिनाथला जाण्यासाठी जोशीमठ बायपास करून, हेलंगवरून थेट विष्णुप्रयाग इथं जाणारा रस्ता ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’तर्फे तयार करण्यात येत आहे. त्यासाठी जोशीमठाच्या डोंगराजवळ बोगदा खणला जात आहे. त्यात मोठ्या प्रमाणात सुरुंग लावले जातात. त्याचा थेट फटका जोशीमठाला बसत असल्याचा एक मतप्रवाह आहे. मारवाडी भागातील नागरिक बीरू रघी म्हणाले : ‘‘इतक्या वर्षांत काही झालं नाही, आता पर्वतांना सुरुंग लावायला सुरुवात केल्यानं जमीन खचत आहे. निसर्गाचे असे लचके तोडणं बंद केलं तरच जोशीमठाचं संवर्धन करता येईल.’

‘तपोवन बिष्णुगड जलविद्युत प्रकल्पा’चं सुरू असलेलं काम आणि रस्त्यांच्या कामासाठी सुरू असलेली डोंगरफोड यातून निसर्गाचा समतोल बिघडत असल्यानं हे नैसर्गिक संकट उभा राहिलं आहे,’ असं इथले मीलन धर यांनी सांगितलं.

अलकनंदा नदीवर धरणाच्या परिसरात काही वर्षांपूर्वी काम सुरू होतं. त्यात ‘टनेल बोअरिंग मशिन’ (टीबीएम) अडकलं. त्याबाबत अशी माहिती मिळाली की, बोगद्याचं काम केलं जात असताना या मशिनमुळे भूमिगत जलाशयाच्या साठ्याला (ग्राउंड अॅक्विफर) धक्का लागला. त्यातून शेकडो लिटर पाणी प्रतिसेकंदाला वाहू लागलं. प्रत्येक दिवशी किमान ६० दशलक्ष लिटर पाणी यातून वाया गेलं. महिनोन् महिने वाहूनही हा जलसाठा संपला नव्हता. भूगर्भातील पाणीसाठ्यात झालेल्या बदलाचा परिणाम नेमका कसा होईल, हे समजू शकत नाही; पण त्याचा जोशीमठाच्या या घटनेशी काही संबंध असेल का, हे शोधण्याचं काम शास्त्रज्ञ करत आहेत.

काय परिणाम झाला?

- पर्यटन थांबलं : जोशीमठ खचत असल्याच्या बातम्या संपूर्ण देशात वाऱ्यासारख्या पसरल्या. हिवाळ्यात इथं देशभरातून येणाऱ्या पर्यटकांनी पाठ फिरवली. जोशीमठ आणि औली या पर्यटनस्थळी अक्षरशः शुकशुकाट होता.

- अर्थव्यवस्था कोलमडली : उत्तराखंडाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. यातील बहुतांश पर्यटन जोशीमठ, औली या भागात होतं. त्यामुळे व्यापारी, हॉटेलं डिसेंबरपासून तेजीत असतात. या वर्षी भरलेला मालही घेण्यासाठी ग्राहक नाही. इथले व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नैनी भंडारी म्हणाले : ‘‘व्यापाऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.’’

- भीतीचं वातावरण : जोशीमठातील घटनेनंतर इथं कामासाठी आलेले नागरिक गाव सोडून गेले. गावातील नागरिकांनीही दिल्ली, डेहराडून, गौचर अशा शहरांचा आसरा घेतल्याचं दिसतं.

- विकासकामांना खीळ : ‘एनटीपीसी’चा जलविद्युत् प्रकल्प, हेलंग बायपास मार्ग, तसंच गावातील बांधकामांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

- बेरोजगारी वाढली : औली या बर्फाच्छादित प्रदेशात पर्यटकांची वाहतूक करणारे स्थानिक नागरिक एकेका दिवसाला दहा ते पंधरा हजार रुपये मिळवत; पण आता त्यांच्या हातांना काम राहिलं नाही.

जोशीमठामुळे रोजगाराच्या संधी

उत्तराखंड हे देशाला कामगार पुरवणारं राज्य होतं. आता इथल्या नागरिकांनी राज्यातील पर्यटनाचा भांडवल म्हणून वापर केला. देशात जिथं काम करत होते तिथून ते परत राज्यात आले. विशेषतः कोरोनानंतर हा बदल वेगानं झाला. बद्रिनाथ, केदारनाथ, हेमकुंटसाहिब, हृषीकेश, हरिद्वार, देवप्रयाग, कर्णप्रयाग अशा पर्यटनाच्या संधी आहेत. मोदी सरकार आता चार धामचे रस्ते मोठे करत आहे. हृषीकेशपासून ते कर्णप्रयागपर्यंत रेल्वेमार्गाचं काम वेगानं सुरू आहे. यातून पर्यटन वाढत असल्यानं इथल्या नागरिकांना त्यांच्याच गावात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. त्यातून जोशीमठ इथं स्थलांतर वाढतं.

सध्या काय सुरू आहे?

नवीन वर्षापासून जोशीमठाची जमीन सातत्यानं खचू लागली. इथल्या घरांना तडे गेले. रस्त्यांना भेगा पडल्या. या नैसर्गिक घटनेमागं नेमकं कोणतं कारण आहे याची माहिती घेण्यात येत आहे. त्यासाठी रुडकी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), ‘सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (सीबीआरआय), ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग’, ‘वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयीन जिऑलॉजी’ आणि ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉइल अँड वॉटर कॉन्झर्व्हेशन’ अशा विविध संस्था एकत्र येऊन जोशीमठ परिसराचा बारकाईनं अभ्यास करत आहेत. त्याअंतर्गत मुंबईच्या ‘जेनेसिस’ कंपनीतर्फे ड्रोन सर्व्हेक्षणदेखील करण्यात आलं आहे. या सगळ्या संस्थांनी दिलेल्या अहवालावर आधारित स्वतंत्रपणे सर्वंकष अहवाल राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणानं सरकारला दिला आहे.

जोशीमठाच्या काही भागातील जमीन खचण्यामागं नेमकं कारण काय, याचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीनं सुरू आहे. वेगवेगळ्या संस्थांचं सविस्तर काम अजूनही सुरू आहे. त्यात भूगर्भातील पाण्याचा प्रवाह कुठं आहे, किती आहे, त्याची दिशा कोणती याची माहिती विविध अद्ययावत उपकरणं वापरून संकलित केली जात आहे. तडे पडलेल्या सुमारे १५० हून अधिक घरांच्या भिंतीवर क्रॅकोमीटर बसवण्यात आलं आहे. त्यातून या तड्यांमध्ये वाढ होते आहे का, हे तपासलं जात आहे. त्यामध्ये ज्योतिर्मठातील तड्यांमध्ये काही अंशी वाढ झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. अशा पद्धतीनं निरीक्षणं नोंदवून रेखांशाच्या आणि अक्षांशाच्या आधारावर अहवाल तयार करण्यात येत आहे.

व्यूहरचनात्मक स्थान

जोशीमठाचं स्थान व्यूहरचनात्मक आहे. कारण, तिथून बद्रिनाथला जाणारा रस्ता पुढं थेट चीनच्या सीमेवर जातो. जोशीमठ ते बद्रिनाथ हे अंतर साधारणतः ४५ किलोमीटर आहे. हा सगळा रस्ता नव्यानं तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर लष्कराच्या हालचाली वेगानं करणं शक्य होतं. यापूर्वी रस्ते खराब असल्यानं या हालचालींवर मर्यादा पडत होत्या.

काय केलं पाहिजे?

- जोशीमठमधील आपत्ती ही उत्तराखंडावर कोसळलेली पहिली आपत्ती नाही. केदारनाथप्रलय, धौलीगंगा नदीला आलेला महापूर या घटनांची शृंखला आता जोशीमठाची जमीन खचण्यापर्यंत आली आहे. त्यामुळे शाश्वत विकासाचं धोरण राबवण्याची नितांत आवश्यकता आहे.

- पर्यावरणपूरक विकासाची कास धरली पाहिजे.

- विकास करताना सर्वंकष विचार करण्याची वेळ आता आली आहे.

- पर्यटनविकासाच्या मध्यम आणि दीर्घकालीन योजना हाती घ्याव्या लागतील.

- हे ठिकाण भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्यानं बांधकामाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन होईल अशी व्यवस्था उभारणं.

‘या संकटात अडकलेल्या नागरिकांना घरं देण्याला प्राधान्य दिलं आहे. तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली जात आहे, तसंच मुलांच्या शाळेची, महिलांची आरोग्यसुविधा उपलब्ध करून देऊन या नागरिकांचं जीवन पूर्ववत् होईल अशी यंत्रणा उभारली आहे.’

- हिमांशू खुराणा, जिल्हाधिकारी, चमोली

‘या घटनेचा परिणाम एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या केदारनाथच्या आणि बद्रिनाथच्या यात्रेवर होऊ नये, याची काळजी घेण्यात येत आहे. या घटनेमुळे पर्यटकांच्या मनात भीती निर्माण होणार नाही, यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्यात येतील. कारण, कोरोनामुळे २०२० आणि २०२१ मध्ये यात्रा झाल्या नाहीत. त्याचा आर्थिक फटका येथील नागरिकांना बसला. गेल्या वर्षी भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. तसाच प्रतिसाद या वर्षीही मिळेल अशी अपेक्षा आहे.'

- अजेंद्र अजेय, अध्यक्ष, श्रीबद्रिनाथ-केदारनाथ मंदिर समिती

वर्ष........................ प्राणहानी

२००० ते २००९ ...... ४३३

२०१० ते २०२० ...... १३१२

२०२१ .................. ३००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com