बदललेल्या पावसानं खचतोय सह्याद्री...

गुजरातपासून सुरू होऊन दक्षिणेत केरळपर्यंत सुमारे सोळाशे किलोमीटर लांबीची डोंगररांग म्हणजे सह्याद्री. त्यालाच आपण पश्चिम घाट म्हणतो. महाराष्ट्रात ४४० किलोमीटर त्याचा विस्तार आहे.
बदललेल्या पावसानं खचतोय सह्याद्री...
Summary

गुजरातपासून सुरू होऊन दक्षिणेत केरळपर्यंत सुमारे सोळाशे किलोमीटर लांबीची डोंगररांग म्हणजे सह्याद्री. त्यालाच आपण पश्चिम घाट म्हणतो. महाराष्ट्रात ४४० किलोमीटर त्याचा विस्तार आहे.

कमी वेळेत प्रचंड पडणाऱ्या पावसाने कोणती संकटं कोसळतात, हे आपण आता वारंवार बघतोय; पण या बदललेल्या हवामानाचं मूळ हे बेसुमार वृक्षतोड, मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी शेतीची बदललेली पद्धती, दिवस-रात्र धूर ओकून हवा प्रदूषित करणारे कारखाने हे आणि असे वेगवेगळे घटक आपल्या पश्चिम घाटावर आघात करत आहेत. याचा नेमका काय, कुठे, कसा आणि कुणावर परिणाम होतोय, याची निरीक्षणं तज्ज्ञांच्या मदतीने जुलैपासून टिपली... त्याचा हा रिपोर्ताज...

राकट, कणखर, काळाकभिन्न सह्याद्री आपल्याला शतकानुशतकं साथ देत आलाय. सह्याद्रीने रानमेवा, विविधरंगी फुलं दिली. असंख्य पशू-पक्ष्यांना घर दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याला संरक्षण देण्यासाठी हाच सह्याद्री पुढे आला. याच सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर गडकोट उभे राहिले. हाच सह्याद्री मराठी मन आणि मनगटाची ताकद म्हणून पुढे आला. पण... हाच सह्याद्री आता खचतोय... कुठं कोसळतोय, दुभंगतोय... पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीवर, तेथील फळा-फुलांवर, राना-वनांवर, डोंगर-कपारींच्या कुशीत वसलेल्या गावांवर, गावातील माणसांवर आणि माणसांमधील हळव्या मनांवर याचा परिणाम होतो आहे.

गुजरातपासून सुरू होऊन दक्षिणेत केरळपर्यंत सुमारे सोळाशे किलोमीटर लांबीची डोंगररांग म्हणजे सह्याद्री. त्यालाच आपण पश्चिम घाट म्हणतो. महाराष्ट्रात ४४० किलोमीटर त्याचा विस्तार आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात ११० किलोमीटर तो पसरला. सहस्रावधी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून याची निर्मिती झाली. या निधड्या छातीच्या कातळांनी वर्षानु वर्षे ऊन, वारा, पाऊस, थंडी आपल्या अंगावर झेलली. त्या वेळी सह्याद्रीच्या कडेकपारी म्हणजे एकेका वनस्पती- प्राणी- कीटक यांचा अधिवास होता. सह्याद्री हाच अशा असंख्य सजीवांचा पोशिंदा होता. माणूसदेखील त्याला अपवाद नव्हता. गेल्या तीन-चार दशकांपासून माणूस बदलला, तो प्रगती करू लागला. सह्याद्रीचे डोंगर त्यात आडवे येऊ लागले. तो त्यांना फोडून रस्ते करू लागला. माणूस टोलेजंग इमारती बांधू लागला, त्यासाठी झाडं तोडू लागला. माणूस डोंगर पोखरू लागला, तेथे प्लॉटिंग करू लागला, तेथील पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बदलू लागला, मन मानेल तसं बांधकाम करू लागला.

पुण्यातील सह्याद्रीच्या रांगांची ही धुळधाण सुरू असताना वैश्विक पातळीवर कार्बनचं प्रमाण बेसुमार वेगाने वाढत आहे. जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम पृथ्वीच्या ध्रुवांपर्यंत मर्यादित राहिलेले नाहीत, तर ही समस्या आपल्या दारापर्यंत आली आहे. त्यातून पावसाचं स्वरूप बदलल्याचं निरीक्षण हवामानतज्ज्ञ नोंदवितात. घाटमाथ्यावर दिवसेंदिवस संततधार पडत राहणारा मॉन्सून आता जाणवत नाही. कमी वेळेत पडणारा मुसळधार पाऊस आता दिसत आहे. सह्याद्रीवर होत असलेल्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी पश्चिम घाटातल्या पुणे जिल्ह्यातल्या भोर, वेल्हे, मावळ आणि मुळशी तालुक्यांत प्रवास केला, दुर्गम भागातल्या स्थानिकांशी बोललो. त्यातून सह्याद्रीवर होत असलेले परिणाम समोर आले. सह्याद्री हा जैवविविधतेने नटलेला असल्याने बदललेल्या या वातावरणाचा तेथील वनस्पतींवर, त्यांच्या अधिवासावर कोणता परिणाम झाला याची नोंद घेणे, बारकाईने अभ्यास करणे हादेखील या रिपोर्ताजचा एक भाग. त्यासाठी वनस्पतितज्ज्ञ आणि पर्यावरणाचे अभ्यासक डॉ. श्रीनाथ कवडे यांचं मोलाचं सहकार्य मिळालं.

सह्याद्रीची अस्वस्थ पर्वतरांग

गाडी भोरपासून एक-एक वळण घेत वरंधा घाटाच्या दिशेने निघाली. रस्ता सुरेख होता. अगदी एखाद्या निसर्गचित्रात दाखवलेल्या नागमोडी वळणांप्रमाणे! नीरा-देवधर धरणाची भिंत दिसली आणि समोरच्या हिरव्यागार डोंगरावरचा एक मोठा कडा कोसळल्याचं दिसलं. संपूर्ण गर्द हिरव्या डोंगराच्या त्याच भागावर नजर वारंवार जात होती. गाडी जसंजशी वरंध्याच्या दिशेने पुढे जाऊ लागली, तसं मन अधिकच अस्वस्थ होत गेलं. नजर जाईल त्या डोंगराच्या मोठमोठ्या कडा निळखल्या होत्या. या काही फार वर्षांपूर्वी निखळल्याचं वाटत नव्हतं. अगदी काही महिन्यांपूर्वीच घडल्याचं जाणवत होतं. पण, नेमकं काय झालं, कशामुळे दरडी पडल्या, हा मनातला प्रश्न कोन्धारी गावाजवळ भात लागण करणाऱ्या मारुती राजाराम पोळ या शेतकऱ्याला विचारला. ते म्हणाले, ‘गेल्या ५२ वर्षांपासून मी येथे रहातोय. ५० वर्षांमध्ये एकही दरड कोसळल्याचं मी बघितलं नव्हतं. आता दरवर्षी दरडी कोसळतात. गेल्या वर्षी तर जिथं मी गुरं चरायला घेऊन गेलो होतो, बरोबर तिथंच रात्री दरड कोसळली. ती सकाळी कोसळली असती तर मी नक्की त्याखाली गाडलो असतो.’ हे सांगताना दरड कोसळण्याची भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ‘पण हे का घडतंय, असं तुम्हाला वाटतं?’ या प्रश्नाचं नीटसं उत्तर त्यांना देता येईना.

पण, त्यांनी जे सांगितलं ते मला जास्त भावलं. ते म्हणाले, ‘मातीचा छोटा डोंगर करून त्यावर तुम्ही पाण्याची एक संथ धार लावली, तर तो वाहून जाणार नाही. पण, कळशीभर पाणी त्यावर बदा-बदा ओतल्यावर तो डोंगर राहील होय? तो वाहून जाणारच की.’’ या क्षणाला भोर-वरंध्यामधील दरड कोसळण्याच्या, भूस्खलनाच्या घटनांमागील भौगोलिक कारण समोर आलं. अत्यंत कमी वेळेत पडणारा प्रचंड मोठा पाऊस हे यामागचं मुख्य कारण असल्याचं निरीक्षण पोळ यांनी नोंदवलं होतं. या निरीक्षणाचा धागा धरून वरंध्याच्या दिशेने गाडी पुन्हा वळणं घेत जाऊ लागली. या दरम्यान ठिकठिकाणी डोंगरावरून मातीचे कडेच्या कडे वाहून आल्याचं विदारक दृश्य दिसत होतं. ठिकठिकाणी नैसर्गिक पाण्याचे प्रवाह त्यामुळे बदलले होते. एका बाजूला उंचच उंच डोंगरकडांवरून कोसळणारे धबधबे डोळ्यांचं पारणं फेडत होते. मात्र, त्याच वेळी दुसरीकडे, कोसळलेल्या कडा मनाच्या अस्वस्थतेत भर घालत होत्या.

घाटवाटांचा आक्रोश

'आतापर्यंत पावसाळा आम्हाला रोजगार द्यायचा. पावसाळ्याच्या तीन-चार महिन्यांवर आमची आठ-नऊ महिन्यांची गुजराण व्हायची. गेल्या वर्षीपासून पोटाला खळगी पडली. या वर्षीही हॉटेलं सुरू झाली नाहीत....’ पवार बोलत होते. ‘‘वरंधा घाटात पडणाऱ्या पावसात असंख्य कोसळणारे धबधबे बघत भजी खाण्यासाठी पावसाळ्यात पर्यटक वरंधा घाटात गर्दी करायचे. आता दरडी कोसळत असल्याने घाट वाहतुकीसाठी बंद केला, पर्यटक बंद झाले, त्याचबरोबर आमच्या घरातील चूलही बंद झाली,’ हे बोलताना पवारांचे डोळे पाणावले होते. चाळिशीच्या आसपासचा हा उमदा तरुण. घाटातील वाघजाई मंदिराजवळील नऊ हॉटेल्सपैकी एक हॉटेल या तरुणाचं. आई-वडील, पत्नी, मुलं, नातेवाईक सगळे राबायचे या हॉटेलमध्ये. गावात लोकांना पावसाळ्यात काम मिळत नाही, ते हॉटेलमध्ये कामाला येत. आता सरकारी यंत्रणांनी हॉटेलवर ‘जेसीबी’ फिरवला, सगळी हॉटेलं तोडली. वाघजाई मंदिराजवळ कड्याचा मोठा तुकडा खाली कोसळला आणि हॉटेलवर ही कारवाई झाली.

‘पाऊस काय आम्हाला नवीन हाय होय,’ या वाक्याने पवार यांनी बोलायला सुरुवात केली. दाढीचे खुंट पांढरे झालेले, डोक्यावरचे विरळ झालेले केस, तोंडात तंबाखूचा बार, बहुतांश दंतपंक्ती उठलेल्या. बोलताना मधून लुकलुकणारा दात ओठांमध्ये पकडून बोलणारे किसन पवार म्हणाले, ‘आधी काय पाऊस पडत नव्हता काय; पण घाट बंद नाही व्हायचा. आता सगळंच बदललंय. पाऊस झाला की दरडी पडतात, त्यामुळे घाट बंद होतो. वाहतूक बंद झाली की रोजगार थांबतो, हाताला काम मिळत नाही. घाटात बसून फक्त दिवस काढायचा.’

अभिषेक पवार म्हणाले, ‘घाट बंद झाला की येथील वाड्या-वस्त्यांवरील मुलांना शाळांनाही जाता येत नाही. शिळीम, शिरगाव, दुर्गाडी, हिर्डोशी, वारवंड, उंभार्डे आणि उंभार्डेवाडी ही घाटाच्या जवळपासची गावं. या गावांतून पाचशे-सहाशे मुलं शाळेसाठी दररोज बाहेर पडतात; पण घाट बंद असल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक होत नाही, शाळा बुडते. काही मुलांचे पालक स्वतः गाडीवरून शाळेत सोडतात आणि परत आणतात; पण त्यांना हातातील सर्व उद्योग सोडून दिवसभर हेच काम करावं लागतं.’

‘माळीणमध्ये डोंगराचा कडा कोसळून दीडशे जीव गेले. आम्हीही रोजची रात्र जीव मुठीत धरून राहतो,’ तळही न दिसणाऱ्या दरीच्या पलीकडच्या डोंगराकडे बोट दाखवत तिशी-पस्तिशीतील सागर पवार म्हणाले, ‘त्या डोंगराच्या कड्या-कपारीत आमची दहा-पंधरा कुटुंबं आहेत. आतापर्यंत डोंगर कोसळेल अशी भीती वाटली नव्हती; पण माळीण दुर्घटना झाल्यावर दर पावसाळ्यात पोटात अक्षरशः गोळा येतो. घाटातील रस्ते खचतात. वरच्या डोंगरावरून रस्त्यावर वाहून आलेले मातीचे ढिगारे बघितले की हृदयाचा ठोका चुकतो.’

‘पाचशे-सहाशे मिलिमीटर पाऊस दिवसभरात पडायचा. आता ढग येतात आणि जोरदार पावसाला सुरुवात होते. तासा-दोन तासांमध्ये तीनशे-चारशे मिलिमीटर पाऊस पडतो. इतक्या कमी वेळेत पडणाऱ्या पावसाचं प्रचंड पाणी वाहून येताना आपल्याबरोबर मातीचे ढिगारे आणतं, त्यामुळे पूर्वापार वाहणारे नैसर्गिक पाण्याचे प्रवाहदेखील बदलले आहेत. हवामानात झालेल्या बदलाचा परिणाम आता वरंध्यावर जाणवू लागला आहे,’ असं निरीक्षण अभिषेक पवार यांनी नोंदवलं.

घाटवाटांवर काय होतंय?

१. बेसॉल्ट या काळ्या खडकापासून तयार झालेला सह्याद्रीचा भाग वरंध्यात दिसतो. या काळ्या खडकावर वर्षानुवर्षं मातीचा मोठा थर तयार झालेला आहे. तेथील नैसर्गिक वनस्पती, गवत, स्थानिक रोपं यांच्या मुळांनी ही माती घट्ट धरून ठेवलेली असते. पण, वरंध्यात दरवर्षी उन्हाळ्यात लागलेल्या वणव्यांमुळे माती घट्ट धरून ठेवणाऱ्या वनस्पतींच्या प्रजाती जळून नष्ट होत आहेत. वर्षानुवर्षं हेच सुरू असल्याने माती धरून ठेवण्याची नैसर्गिक प्रक्रिया थांबत आहे. त्यातून डोंगरकडा कोसळणे, भूस्खलनाचे प्रकार वाढले असल्याचं दिसून येतं, अशी माहिती वनस्पतितज्ज्ञ डॉ. श्रीनाथ कवडे यांनी दिली.

२. खडकांवर माती तयार होण्याची प्रक्रिया हजारो वर्षांपासून सुरू असते. वळवाचा पाऊस पडला की, या मातीतील गवत, वनस्पती उगवतात, त्यातून पावसाळ्यापर्यंत या वनस्पतींची चांगली वाढ होऊन माती धरून ठेवण्यासाठी या वनस्पती उपयुक्त ठरतात. गेल्या काही वर्षांपासून मॉन्सूनपूर्व पाऊस पडत नाही. थेट जून-जुलैमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होते, त्यामुळे या वनस्पतींची वाढ होत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

३. पाऊस संततधार पडत असेल तर वाहून जाण्यासाठी पाणी वेगवेगळ्या वाटांनी जातं. असंख्य वर्षांपासून हे पाणी पावसाळ्यात याच मार्गाने वाहतं. पण, आता पावसाचा जोर वाढल्याने हे पाणी वाहणारे नैसर्गिक प्रवाह अपुरे पडत आहेत, त्यामुळे पाणी वेगाने वाट मिळेल तिथून वाहण्याचा प्रयत्न करतं, त्यातून मातीचा गाळ डोंगराच्या कड्यावरून वाहून आलेला दिसतो, असं डॉ. कवडे यांनी सांगितलं. त्यामुळे पावसाळा आला की वरंधा घाटात दरडी कोसळतात, घाट बंद होतो. हा केवळ पर्यावरण, माणसांची सुरक्षितता इतक्यापुरता मर्यादित विषय नाही. येथील सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीयदृष्टीने या संपूर्ण प्रश्नाकडे पाहण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

‘पार्टीवाले’...

‘पार्टीवाले आले होते काल मुंबईवरून. दोन-तीन दिवस सौदा सुरू होता. काय झालं कळलं नाय. सौदा काय, आज नाय झाला तर कवा न कवा तर होणारच की. पाच-पन्नास रुपये इकडे-तिकडे,’ भात खाचरांच्या बांधावर उभे असलेले धोंडिबा कचरे बोलत होते. ‘पार्टीवाले’ हा शब्द आता वेल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळाला. भोरमधून वेल्हे तालुक्यात प्रवेश केल्यापासून ते अगदी पानशेतपर्यंत ज्या-ज्या लोकांशी रस्त्यात थांबून, शेतात जाऊन, घरामध्ये डोकावून बोललो, त्या-त्या प्रत्येकाच्या बोलण्यात ‘पार्टीवाल्यां’चा संदर्भ येत होता, त्यामुळे रोजगारासाठी पुण्यात राहणारे आणि शेतीच्या कामानिमित्ताने गावाकडे आलेले, जेमतेम शिकलेल्या भगवान कचरे यांना ‘पार्टीवाले म्हणजे नेमकं काय,’ असा प्रश्न विचारला. ते म्हणाले, ‘‘वेल्हे तालुक्यात आता पुण्या-मुंबईचे लोक येऊन जमिनी घेऊ लागले आहेत. ही जमीन विकत घेणाऱ्या लोकांना आमच्याकडे पार्टीवाले म्हणतात. मोठमोठ्या गाड्यांतून ही माणसं तालुक्यात येतात. आमचा भाग चांगला होता. दहा-वीस वर्षांपूर्वी डोंगरावर मोठी घरं बांधली, त्यानंतर फार्महाउस उभे राहिले; पण आता प्लॉट पडायला लागले, त्यातून आमच्या जमिनी हळूहळू कमी होऊ लागल्या.’

पुण्यापासून अवघ्या ६५ किलोमीटर अंतरावरचं वेल्हे हे तालुक्याचं गाव. स्वराज्यातील पहिला किल्ला तोरणा हा या भागाचा मानबिंदू. निसर्गसौंदर्याची खाण असलेला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका. पुण्याला पाणीपुरवठा करणारी पानशेत, वरसगाव धरणं याच भागात आहेत, यामुळे वेल्हेचं निसर्गसौंदर्य अधिकच खुलल्याचं दिसतं. पण, हे निसर्गसौंदर्यच जणू आता या तालुक्यासाठी शाप ठरल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण होत असल्याचं येथील नागरिकांच्या बोलण्यातून सहजतेने जाणवतं. कधीतरी फिरायला गेल्यानंतर अत्यंत शांत, सुंदर दिसणारा हा भाग आतून किती धुमसत आहे, हे तेथील नागरिकांशी बोलल्यानंतर समोर येतं.

गाई चारणारे ७२ वर्ष वयाचे धोंडिबा कचरे म्हणाले, ‘जन्मापासून या भागात राहतोय. इथल्या दगडा-दगडाला ओळखतो; पण आता या भागाची ओळख पुसत चाललीय, त्याला कारण बाहेरून येणारे पार्टीवाले आहेत. उघड्या-बोडक्या माळावर डांब रोवायचे, प्लॉटिंग पाडायचे, रस्ते करायचे आणि बंगले बांधायचे, यातून आमचा भाग आम्हालाच ओळखायला येत नाही.’ त्यांचं हे बोलणं मध्येच थांबवून प्रश्न केला, ‘या भागाचा विकास तर होतोय. यापूर्वी कधी सिमेंटचे रस्ते होते का वेल्हे तालुक्यात? आता झाले ना? आणि इथल्या जमिनींची किंमतही वाढतेय की! मग वाईट काय आहे?’ या प्रश्नाने आतापर्यंत एका लयीत बोलणाऱ्या या आजोबांचा चेहरा बदलला, बोलण्याचा स्वर बदलला. ते म्हणाले, ‘जमीन विकून आलेले पैसे किती दिवस पुरवणार? ते संपले की नंतर जमीन नाही आणि पैसेही नाहीत. पुढच्या पिढीने करायचं काय? नातवंडं काय म्हणतील मला?’ या प्रश्नार्थक उत्तराने त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

दुभंगलेली जमीन

‘बरोबर ९६ वर्षांपूर्वी गाव पाण्याखाली गेलं... आता डोक्यावरची सावलीही गेली... जमीन दुभंगली... वर्षानुवर्षं राबलेल्या शेतात यापुढे कधीच नांगर घालता येणार नाही,’ हे बोलताना पाणावलेल्या डोळ्यांना जुनाट साडीचा पदर लावणाऱ्या सीताबाई मारुती वाघ यांचा चेहरा काही केल्या डोळ्यांपुढून जात नव्हता....

मुळशी जलाशयाच्या काठावर वसलेल्या वाघवाडी रस्त्याच्या खड्ड्यांतून मार्ग काढत गाडी पुढे जात होती. पण, मन वाघवाडीत घुटमळत होतं...

वाघवाडी... सह्याद्रीच्या काळ्याकभिन्न कातळाच्या पायथ्याच्या वसलेली एक टुमदार वाडी. समोर मुळशी धरणाचा जलाशय आणि मागे सह्याद्रीचा उत्तुंग सुळका. या दोन्हीच्या बरोबर मध्यभागी वसलेली वाघवाडी. या वाघवाडीने १८ ते २० कुटुंबांना आधार दिलाय. तिथं राहणारी, त्याच मातीत राबणारी ही चौथी पिढी. टाटाने १९२६ मध्ये मुळशी धरण बांधलं. त्या पाण्यात वाघवाडीत राहणाऱ्या रहिवाशांच्या मूळच्या गावाने जलसमाधी घेतली. गावातील लोकांनी बिऱ्हाडं धरणाच्या काठावर आणली. तिथंच कच्ची-पक्की घरं बांधली. घरासमोरच भाताची खाचरं केली. मीठ-भाकरी-भात खाऊन तीन पिढ्या जगल्या. चौथ्या पिढीचा जगण्याचा संघर्ष सुरू असतानाच जमीन खचली.

जमीन खचल्याबद्दल माहिती देताना वाघ म्हणाल्या, ‘‘सोमवारचा दिवस होता. संध्याकाळचे सहा वाजलेले. त्याच वेळी शेताच्या बांधावरची दगडं पडण्याचा आवाज आला. काय झालं ते नेमकं कळायला तयार नाही. आम्ही म्हातारी माणसं, लवकर उठताही येईना. घरात असलेल्या पुतण्याला नेमकं काय झालंय ते बघून यायला सांगितलं. तो बघून आल्यावर म्हणाला, ‘आता काही करू शकत नाही, सकाळी बघू’ दुसऱ्या दिवसाचं तांबडं फुटताच आमचे दीर आणि पुतण्या बांधावर गेले. त्यांना सगळ्या जमिनीलाच भेगा पडलेल्या दिसल्या. सगळ्या शेताचीच ‘बाँड्री’ मारली होती. पार दोन-तीन किलोमीटरपर्यंत उभ्या-आडव्या भेगा पडल्या. सगळं रान अक्षरशः उकललं होतं. आम्हाला काहीच सुचेना. संध्याकाळपर्यंत आम्ही एकाच जागी होतो.’’

वयाच्या साठीच्या आसपास असलेल्या लक्ष्मीबाई रामभाऊ वाघ म्हणाल्या, ‘वावरात भात लावला होता, त्यात पाणी साचलं होतं; पण जमिनीलाच भेग पडल्याने त्यातून पाणी वाहून गेलं. त्यामुळे आता शेती करता येणार नाही. रोपं गेली; पण ते एक वर्षाचं नुकसान होतं. आता तर वावराला उभ्या-आडव्या भेगा पडल्याने नांगरदेखील घालता येणार नाही.’

‘शेतालाच नाही तर घरालाही तडे गेले. आमची घरं-दारं सगळी खचली. आता आम्ही तीन पिढ्यांनंतर पुन्हा निर्वासित झालो,’ डोक्यावर टोपी, त्यावर लटकवलेला रेनकोट आणि सुरकुतलेल्या चेहऱ्याचे नारायण हरिभाऊ वाघ सांगत होते. ‘‘आमच्या वाघ-पाटील वस्तीत वीस कुटुंबं राहत होतो. आता इथं आमची राहण्याची व्यवस्था नाही. आम्ही येथील बंद पडलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतरित झालोय. सिमेंटच्या घराच्या भिंतींना तडे गेले. इथं परत आम्ही रहायला येऊ अशी शक्यताच वाटत नाही. जमिनींना पडलेले तडे वाढत चालले आहेत. सुरुवातीला एक इंचाची फट होती, ती आठ दिवसांमध्ये दीड फुटापर्यंत खचली.’’

भात पीक कुजून गेलं...

येथील नागरिकांच्या स्वतःच्या नावावर ना जमीन आहे ना घर. जमिनीची मालकी कंपनीची, त्यांच्या मेहेरबानीने पूर्वापारपणे हे लोक शेती कसतात. त्यातून मिळेल त्या उत्पादनावर गुजराण करायची हेच त्यांचं आयुष्य. अशाच भादजकोंडा गावचे राघू गोरे. पावसापासून वाचण्यासाठी अंगावर घेतलेला प्लास्टिक कागद, हातात काठी आणि डाव्या हातावर पांढऱ्या डायलचं घातलेलं घड्याळ असा पेहराव करून ते रस्त्याने चालत होते. वार्धक्याकडे झुकलेल्या त्या गोरे यांना विचारलं की, ‘बाबा, शेती आहे का तुमची?’ त्यावर एका दिशेला हात करून ते म्हणाले, ‘कंपनीतच भात शेती आहे.’ (म्हणजे जमीन टाटा कंपनीची आहे. मात्र, त्यावर हे भाताची शेती करतात.) ‘या वेळी भात लावलाय का?’ या प्रश्नाने चेहऱ्यावरचे भाव बदलले. एक मोठा निःश्वास सोडून ते म्हणाले, ‘या वर्षी... या वर्षी... भाताचं पीकच कुजून गेलं. आठ दिवसांपूर्वी जोरात पाऊस झाला. रोप उगवायची वेळ आणि पाऊस पडायची वेळ एकच झाली, त्यामुळे भाताच्या पिकामध्ये जमिनीतून वर उगवण्याची ताकद नाही मिळाली. त्यातून ही रोपं जागेवरच कुजली. आता भात लागणीची वेळ गेली. आता रोप परत लावता नाही येणार. आता या वर्षी शेती होणार नाही. दोन-चार क्विंटलचा फटका बसला.’

हवामानाच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित असलेल्या पुण्यात बसून, ‘आता पावसाळा उशिरा सुरू होतो’ असं आपण हवा-पाण्याच्या गप्पा मारताना सहज म्हणतो. पण, याचा फटका इंद्रायणी तांदळाचं कोठार असलेल्या मुळशीला कसा बसतो, हे येथील शेतकऱ्यांशी बोलून स्पष्टपणे जाणवत होतं.

‘गेल्या वर्षी जूनमध्ये पाऊस पडलाच नाही. जुलैमध्ये जो पाऊस पडला त्याने सगळंच वाहून गेलं. या वर्षीही जूनमध्ये पावसाने दडी मारली. जुलैमध्ये पाऊस सुरू झाला; पण तोपर्यंत बऱ्यापैकी भाताचं पीक हातातून गेलेलं,’ असं दगडू गोरे सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसली.

शहरात राहणाऱ्या माणसांसाठी पाऊस फक्त आनंददायी असतो. पडणारा पाऊस हा मौजमजा करण्याचं एक निमित्त असतं. पण, आपल्यापासून ७०-८० किलोमीटरवर पाऊस जगणं किंवा मरणं ठरतो. समृद्धी की कर्जाचा डोंगर हे पावसावर अवलंबून असतं. आता पाऊस बदलतो. कमी वेळेत जोरदार पाऊस पडून सगळं शेत, बांध, खाचरं पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जातात, त्या वेळी शेतकऱ्याच्या डोळ्यांतील पाणीही पावसाच्या पाण्यात मिसळून वाहून जातं... ही जाणीव शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादातून झाली.

अतिवृष्टी, भूस्खलन आणि पर्यावरण ऱ्हास

अतिवृष्टी, भूस्खलनामुळे सह्याद्रीच्या भोर, वेल्हे, मुळशी आणि मावळ तालुक्यातील पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचं निरीक्षण वनस्पतितज्ज्ञ डॉ. श्रीनाथ कवडे यांनी नोंदवलं. त्यांनी नव्वदच्या दशकापासून वरंधा, ताम्हिणी, मढे, माळशेज अशा वेगवेगळ्या घाटमाथ्यांवर आणि या परिसरातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जाऊन तेथील वनस्पती, पर्यावरण, परिसंस्था यांचा बारकाईने अभ्यास केला. या वार्तांकनात त्यांनी नोंदवलेली निरीक्षणंदेखील महत्त्वाची ठरतात.

- पुणे परिसरातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये भूस्खलनाचा वेग सातत्याने वाढत आहे. १९९०-९५ पासून लहान-मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटना या भागात होऊ लागल्या. २०१४ मध्ये झालेली माळीण दुर्घटना ही भूस्खलन साखळीतील सर्वांत मोठी घटना ठरली. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे वरंधा घाटाच्या परिसरात जागोजागी भूस्खलन झालं, तसंच दरडी कोसळल्या.

- सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर गेल्या वर्षी २० ते २३ जुलै या दरम्यान अतिवृष्टी झाली. महाबळेश्वर, कोयनानगर, पन्हाळा येथे गेल्या सव्वाशे वर्षांतील पावसाच्या नोंदीचा विक्रम मोडला. तिथे हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. डोंगर-दऱ्यांच्या आडोशाने उभारलेल्या वाड्या-वस्त्यांना याचा फटका बसला. यात सर्वाधिक पडझड वरंधा घाटात झाली.

- कोकण आणि देश यांना जोडणाऱ्या घाटांमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं.

- डोंगरउतारावर माती घट्ट धरून ठेवणाऱ्या डोंगरमाथ्यावरील कारवीसारख्या वनस्पतींमुळे शेकडो वर्षांपासून येथे त्यांचा वेगळा अधिवास तयार झाला आहे. आता सह्याद्रीतील अनेक ठिकाणी या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक दुर्मीळ आणि महत्त्वपूर्ण वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कारवी ही वनस्पती वरंध्यात कमी होत आहे. मात्र, मुळशी आणि मावळ भागात या वनस्पतीचं प्रमाण चांगलं दिसतं. - मुळशी तालुक्यातील कुंडलिका व्हॅलीमध्ये अद्यापही जैवविविधता टिकून आहे. याला महत्त्वाचं कारण म्हणजे, माणसांचा मोठ्या संख्येने वावर इथे सुरू झाला नाही.

- पर्यटनाचा रेटा वाढल्याचा दुष्परिणाम मावळात प्रकर्षाने दिसून येतो. मुळशी आणि लोणावळा इथे पर्यटकांची प्रचंड गर्दी पावसाळ्यात होते, त्यामुळे आंदर मावळात पर्यटनाला प्राधान्य देत आहे. आता तिथे गर्दी दिसू लागली आहे.

- सह्याद्रीमध्ये फक्त महाराष्ट्राच्या रांगांमध्येच काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पती मिळतात, त्यांना वनस्पतिशास्त्राच्या भाषेत एडेमिक असं म्हणतात. याच प्रदेशात आढळणाऱ्या आणि ज्यांचं आयुष्य पावसाळ्यातील अवघे दोन ते तीन महिन्यांचं असतं, त्यांच्या जीवनचक्रामध्ये आमूलाग्र बदल झाल्याचं दिसून आलं आहे.

- पर्यावरणातील एक घटक नष्ट झाला की, त्याच्यावर अवलंबून असलेले आणि त्यांवर अवलंबून असलेले अशी सर्व जैवसाखळी विस्कळीत होते. त्याचा दूरगामी परिणाम पर्यावरणावर होतो.

नैसर्गिक कारणं...

सह्याद्री हा बेसॉल्ट या प्रकारातील अग्निजन्य खडकातून तयार झाला आहे. कोयनेला १९६७ मध्ये पहिला भूकंप झाला. या भागात पाचपेक्षा जास्त रिश्टर स्केलचे २० आणि चार रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचे सुमारे दोनशे भूकंपाचे धक्के बसले आहेत. यातून पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील मातीचा स्तर अस्थिर झाला. खडकांना तडे गेले, त्यातच कमी वेळेत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे सह्याद्रीचे कडे कोसळू लागले.

मनुष्यनिर्मित कारणं...

  • माणसाच्या जगण्याची गती वाढली, त्यासाठी चांगले आणि मोठे रस्ते आवश्यक झाले. त्यासाठी डोंगर फोडण्यात आले, त्या वेळी खडकांची नैसर्गिक रचना बिघडली.

  • औद्योगीकरणामुळे या भागातील जमीन घट्ट धरून ठेवणाऱ्या झाडा-गवतांवर दुष्परिणाम झाला, त्यातून भूस्खलनाच्या घटना वाढल्या.

  • बेसुमार जंगलतोड

  • प्लॉटिंग, अनधिकृत रस्ते, दगड खाणी यांतून सह्याद्री पोखरला गेला..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com