तुमची पत्नी सतत शॉपिंग करते का? मग हे वाचाच

shopoholic.jpg
shopoholic.jpg

आर्थिक ओढाताणीत पत्नीचा हातभार नाही 
माझ्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झालेली आहेत. मला दोन वर्षांची एक मुलगी आहे. माझी पत्नी उच्चशिक्षित आहे. मी आयटी क्षेत्रामध्ये काम करतो. माझी पत्नी सक्षम असूनही कोणतीही नोकरी करत नाही. मी नोकरी करणार नाही, असे म्हणते. आम्ही नवीन घर घेतले आहे. गृहकर्जाचे हप्ते मोठे आहेत. माझ्या एकट्याच्या पगारामध्ये घरातील सर्व गोष्टी करणे मला अवघड जाते. माझी पत्नी काटकसरीने संसार करत नाही. ती सतत वेगवेगळ्या वस्तू खरेदी करत राहते. मॉलमध्ये गेल्यानंतर नको असलेल्या वस्तू ही भरमसाठ खरेदी करते. तिच्यासोबत राहणे मला अवघड होत आहे. परंतु एक मुलगी असल्यामुळे मी सर्व गोष्टी सहन करत आहे. तिच्या वागण्यात मी कसा बदल करू? 
- तुमची पत्नी सतत खरेदी करत राहते आणि नको असलेल्या वस्तूही भरमसाठ खरेदी करते, म्हणजे तिला वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्याचे व्यसन आहे. ही एक वार्तनिक समस्या आहे. अनेक व्यक्तींमध्ये ही समस्या आढळून येते. यामध्ये आपल्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता या व्यक्ती वस्तू खरेदी करतात आणि दिसेल ती वस्तू खरेदी केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. यासाठी बऱ्याच वेळा कर्जही घेतले जाते. वस्तू खरेदी केली नाही, तर त्यांच्या मनावरील ताण वाढतो आणि चिडचिड सुरू होते. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. तुमच्या पत्नीला अशा प्रकारची वार्तनिक समस्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण मानसोपचार करणाऱ्या समुपदेशकांकडे जाऊन तिची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तिची समस्या शोधून काढल्यानंतर तिच्यावर समुपदेशन उपचार करणे शक्य होईल. अशा प्रकारच्या वार्तानिक समस्या समुपदेशनानंतर कमी होऊ शकतात. फक्त तिला समुपदेशकांपर्यंत नेण्यासाठी तुम्ही कौशल्यपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. तुम्ही तिच्यावर चिडचिड न करता तिला उपचारांची गरज आहे, याचा स्वीकार करणे गरजेचे आहे. 
 

भावाने पाठवली घर सोडायची नोटीस 
मी ४६ वर्षांची अविवाहिता आहे. मी माझ्या आई-वडिलांसोबत राहत होते. मला एक मोठा भाऊ आहे. त्याने प्रेमविवाह केला आणि आंतरधर्मीय प्रेमविवाह असल्याने तो आमच्या कुटुंबापासून दूर राहू लागला. त्याचा असा प्रेमविवाह घरात कोणालाच मान्य नव्हता, त्यामुळे त्याच्याशी सर्वांनीच नाते तोडले होते, तो कधीही आई वडिलांना भेटायलाही आला नाही. त्यांच्या आजारपणातही आर्थिक खर्च आणि कष्ट मी घेतले. १५ वर्षे मी माझ्या आई वडिलांना सांभाळले. आता वडील गेल्यानंतर आईला भेटायला आला आणि काही दिवस आईला माझ्याकडे घेऊन जातो, असे म्हणून घेऊन गेला. आता मी राहते ते घर आईच्या नावाने असल्यामुळे त्या घरात आम्हाला राहायचे आहे, त्यामुळे त्या घराचा ताबा मिळावा आणि मी घर सोडावे अशी नोटीस त्याने मला पाठवली आहे. आईचे वय झाले असल्यामुळे आई त्याच्यापुढे काहीही बोलू शकत नाही. मला हे घर सोडायचे नाही आणि आईला माझ्याकडे घेऊन यायचे आहे, मला यातून मार्ग दाखवा. 
- संपत्ती मिळवण्यासाठी लोक नात्यालाही विसरतात, याचेच हे उदाहरण आहे. तू गेली १५ वर्ष या घरात आई-वडिलांचा सांभाळ केलास, भावाने कोणती आर्थिक मदतही तुला केलेली नाही. परंतु आता वडील गेल्यानंतर घरावर हक्क मात्र सांगतो आहे. तू अविवाहित आहेस आणि आईच्या घरात राहण्याचा तुझा हक्क आहे. तुला त्या घरातून कोणीही बाहेर काढू शकणार नाही. भावाने तुला कायदेशीर नोटीस पाठवली असल्यास तू त्याला कायदेशीर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उत्तर पाठव. तसेच कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत न्यायालयाकडे खटला दाखल करून तुला या घरातून कोणीही बाहेर काढू शकणार नाही, असा मनाई हुकुम तू घेऊ शकशील. आईशी भेटून तिच्यावर कोणता दबाव आहे, हे विचारून घे. ती तुझ्याकडे परत का येत नाही? तिला तुझ्याकडे यायचे आहे, पण भाऊ येऊ देत नाही असे आहे का? या बाबतची माहिती करून घे. ही कायदेशीर बाजू झाली. परंतु, नाती कायद्याने कधीच टिकत नाहीत. त्यामुळे आईला तुझ्याकडे आणून भावाचे आणि तुझे, तुझ्या कुटुंबीयांचे नाते सुधारण्याचा प्रयत्न कर. तू अविवाहित आहेस. आईच्या आणि तुझ्यानंतर ही संपत्ती त्यालाच मिळणार आहे, असे तुझ्या भावाशी बोलून तुमच्या नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी प्रयत्न कर. नाती टिकवणे याला प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. 

मुलाला वाटते वडिलांची भीती 
माझ्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली असून, मला ६ वर्षांचा एक मुलगा आहे. मागील २ वर्षांपासून आम्ही पती-पत्नी विभक्त राहात आहोत. आमच्यामध्ये सतत वादविवाद होत होते आणि त्यावेळेस मुलासमक्ष त्यांनी मला मारहाणही केलेली आहे. आता मी घटस्फोट मिळवण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला असून पतीने मुलाचा ताबा आणि त्याची भेट मिळावी, असा प्रतिदावा केलेला आहे. माझ्या मुलाला वडिलांची खूप भीती वाटते, तो त्यांना आजिबात भेटायला तयार नाही, समोर वडील दिसले तरी त्याचे हातपाय थरथर कापायला लागतात. न्यायालयाने मुलाची भेट देण्याबाबत आदेश दिला तर भेट द्यावीच लागेल, असे वकिलांनी मला सांगितले आहे. अशा भेटीचा मुलावर परिणाम होईल, मुलाचा विचार करूनही भेट टाळता येणार नाही का? काय करावे लागेल? 
- पती-पत्नीच्या वादाचा मुलाच्या मनावर परिणाम होत असतोच. तुमची भांडणे बघून तो अतिशय घाबरलेला आहे. त्याच्या मनातून ही भीती काढणे खूप गरजेचे आहे. मुलगा वडिलांना भेटायला नाही म्हणतो, वडिलांना घाबरतो आणि त्यामुळे मुलाचा ताबा माझ्याकडेच राहील. वडिलांना त्याची भेटही मिळणार नाही, याबाबत तुम्हाला जिंकण्याचा आनंद मिळेलही. पण त्यातून तुमचा प्रश्न संपणार नाही. कारण या सर्व गोष्टीचा तुमच्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होणार आहे. वडील हे वाईटच असतात, अशी प्रतिमा त्याच्या मनात निर्माण होईल. पुढे त्याच्या आयुष्यातही तो तसाच वागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुटुंबाच्या वातारणावरच मुलांचे व्यक्तिमत्त्व घडत असते. त्यामुळे मुलाची भेट टाळण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्या मनातील वडिलांची भीती कशी जाईल, हा प्रयत्न करा. मुलांसमोर दोघांनीही आपले अहंकार बाजूला ठेवून मुलाला अधिक प्राधान्य देणे गरजेचे असते. त्याला दोघांच्याही सहवासाची, प्रेमाची गरज असते. त्यामुळे एकमेकांना स्वीकारून, माफ करून एकत्र राहणे स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक आहे. एकत्र राहणे शक्यच नसेल तरीही मुलांना दोघांचाही सहवास कसा मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मुलाला त्याचे आजी-आजोबा, मामा हे सर्व प्रेम देत असतीलही; परंतु बापाच्या प्रेमाची आणि सहवासाची भूक वेगळी असते. मुलाची ही भीती घालवण्यासाठी तुम्ही न्यायालयातील समुपदेशकांची मदत घेऊ शकता, अन्यथा स्वयंसेवी संस्थेमधील बाल समुपदेशकांची मदत घेऊ शकता. संपर्कासाठी - आधार समुपदेशन केंद्र, नारायण पेठ, पुणे फोन क्रमांक ८३०८३८२११५. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com