पंधराव्या वित्त आयोगाची कामे करा सुरू : नामदेव पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वित्त आयोग

पंधराव्या वित्त आयोगाची कामे करा सुरू : नामदेव पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : पंधराव्या वित्त आयोगाच्‍या निधीतून मंजूर झालेली विकासकामे अजूनही सुरू नाहीत. लोकांच्या सोयीसाठी तातडीने ती कामे सुरू करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांनी केली. दरम्यान, बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना सभापती प्रणव ताटे यांनी केल्या.

पंचायत समितीच्या सभेत बांधकाम विभागाचा आढावा उपअभियंता पाटील यांनी मांडला. त्या दरम्यान नामदेव पाटील यांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी संबंधित कामांना मंजुरी मिळूनही कामे सुरू नसल्यावर बोट ठेवले. त्यावेळी गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी तांत्रिक अडणच असून ती दूर होईल, असे सांगितले. सभापती ताटे यांनी बांधकाम विभागाने तातडीने कार्यकाही करावी, अशी सूचना केली. आरोग्य विभागाचा आढावा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कोरबू यांनी दिला. तालुक्यात पाच लाख ४८ हजार ३१० लोकांना लसीकरण केल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: नजर हटी दुर्घटना घटी

सध्या लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत असल्याने घरोघरी जाऊन लसीकरण सुरू करण्यात आले असून त्यास जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यावेळी सदस्या अर्चना गायकवाड यांनी कार्वे आरोग्य केंद्रास जागा उपलब्ध असूनही ग्रामपंचायत जागा उपलब्ध नसल्याचे सांगत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर डॉ. कोरबू यांनी ग्रामपंचायतीने तसे लेखी आदेश दिल्याचे सांगितले. एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अधिकारी सुप्रिया पोवार यांनी आढावा दिला.

त्यादरम्यान सदस्य सुहास बोराटे यांनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या जागा भरण्याबाबत जनजागृती केला नसल्याचा आरोप केला. त्याला सौ. पोवार यांनी ग्रामपंचायतीने दवंडी देत जनजागृती केल्याचे सांगितले. घरकुलाचा सर्व्हे करताना वंचित राहिलेल्या अनेक बेघरांना त्यात समावून घ्या, अशा सूचना सदस्य बोराटे यांनी केल्या. त्यावर गटविकास अधिकारी शिंदे यांनी त्यासाठी १६ नोव्हेंबरला ग्रामसभांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

पिंपरी गावातील स्मशानभूमीचा मोठा प्रश्न आहे. तेथील स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न तातडीने न सुटल्यास एखाद्याचा मृतदेह तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समितीमध्ये आणून ठेऊ.

- सुहास बोराटे, सदस्य, पंचायत समिती

loading image
go to top