'सायकल ग्रुप'ची वाई मोहीम फत्ते; धोम-बलकवडी धरणाला प्रदक्षिणा!

'सायकल ग्रुप'ची वाई मोहीम फत्ते; धोम-बलकवडी धरणाला प्रदक्षिणा!

वाई (जि. सातारा) : वाई तालुक्याला निसर्गाचे कोंदण लाभले असून समोर सोनजाई, तर पाठीमागे पांडवगड, पश्चिमेला धोम बलकवडी धरण आहे. जांभळी खोरे तर प्रत्येकाला खुलवून टाकणार सौंदर्य!  या भागातून सायकलवरून रपेट करणे म्हणजे थोडं जिकरीचंच. मात्र, वाई येथील सायकल ग्रुपने तब्बल 71 किलोमीटरची धोम-बलकवडी ही प्रदक्षिणा आठ तासात पूर्ण केली आहे. लॉकडाउन काळातच ही मोहीम वाईच्या सायकल ग्रुपने पार पाडली. या पुढेही त्यांचा हा प्रवास असाच सुरु राहणार असल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले.

वाई शहराच्या पश्चिम भागाला निसर्गाची वेगळी झालर आहे. धोम धरणाच्या दोन्ही बाजूने रस्ता, तर अगदी तो रस्ता तीन नद्यांच्या खोऱ्यांचे दर्शन घडवतो. धोम-बलवडी धरण प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा मानस वाईच्या सायकल ग्रुपने व्यक्त करत प्रत्यक्षात या मोहिमेत आशिष ससाणे, आरती कोल्हापूरे, किर्ती ओसवाल, धनंजय कराळे, निखिल कराळे, साहिल वखारकर, अमर कोल्हापरे, ओंमकार जाधव, विक्रांत येवले आणि पूजा पंडित आदी सहभागी होऊन आपल्या सायकलसह पहाटे पाच वाजता जमले आणि मेणवलीच्या वेशी पासून सुरुवात झाली.

धोम, आसरे, जेधेवाडी असा घाट रस्ता, चढ-उतार चढत सायकली जांभळी खोऱ्यात पोहचल्या. जांभळी खोऱ्यात कमंडलू नदी, पुढे वाळकी नदी व बलकवडी धरण करत आकोशी वरून समोर कमळगड पाहून आणखी त्यांचा उत्साह वाढवत हा ग्रुप बोरगाव मार्गाने धोम धरणाच्या पलीकडच्या बाजूला निघाला. धोम धरणाचा जलाशय, पाखरांची कानी पडत असलेली किलबिलाट अशा वातावरणात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गणपती घाटावर सर्वजण पोहचले. सर्वांच्या मनात एक वेगळा आनंद होता तो म्हणजे धोम धरण प्रदक्षिणा पूर्ण केल्याचा. यामध्ये महिला ही सहभागी झाल्या होत्या.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com