esakal | कऱ्हाड पालिकेची उद्याची विशेष सभा वादाच्या भोवऱ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Karhad Municipal Corporation

सभेच्या विषय पत्रिकेत केवळ ३६ विषयांचा समावेश आहे.

पालिकेची उद्याची विशेष सभा वादाच्या भोवऱ्यात

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा): येथील पालिकेची मासिक सर्वसाधारण सभा होऊन आठवडा होत नाही, तोपर्यंत पालिकेने विशेष सर्वसाधारण सभेचा घाट घातला आहे. त्यामुळे ही विशेष सभा वादाच्या भोवऱ्यात अडकणार आहे. विशेष सभा घेण्यावरूनच जनशक्ती व लोकशाही आघाडी भाजपला धारेवर धरण्याची शक्यता आहे. पालिका, महापालिकांच्या सभा ऑनलाइन घ्याव्यात, असा नगरविकास खात्याने आदेश जारी केल्याने पालिकेची बुधवारची (ता. सहा) विशेष सभाही पुन्हा एकदा गाजणार आहे. नगरविकास खात्याने दिलेल्या निर्देशामुळे पालिका प्रशासनाने ऑनलाइन सभा घेता येईल, असे लेखी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांना कळवले आहे. सभेच्या विषय पत्रिकेत केवळ ३६ विषयांचा समावेश आहे. विषय घेण्यावरूनही वादाचे फवारे उडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: कऱ्हाड: बाजार समिती, खरेदी-विक्री संघाने सोयाबीन खरेदी करावी

पालिकेच्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत इतिवृत्त बदलल्यावरून जोरदार खडाजंगी झाली होती. त्यावरून नगराध्यक्षा शिंदे यांना लोकशाही व जनशक्ती आघाडीने जाब विचारला. उपसूचनेतील काही शब्द बदलून झालेल्या ठरावांची इतिवृत्तातील नोंद लोकशाही व जनशक्ती आघाडीने फेटाळली होती. नगराध्यक्षा शिंदे यांच्या मानधनावरून तो विषय गाजला होता. नगराध्यक्षा शिंदे, उपाध्यक्ष जयवंत पाटील, विनायक पावसकर, फारुक पटवेकर, लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील, जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव, स्मिता हुलवान, विजय वाटेगावकर, हणमंत पवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. त्या सभेत फेटाळलेल्या इतिवृत्ताची नोंद घेतली का, याबाबत संभ्रम असतानाच अवघ्या आठ दिवसांतच दुसरी विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्षांनी बोलविली आहे. त्यामुळे विशेष सभेवरून वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

हेही वाचा: कऱ्हाड पालिकेत टक्केवारीला राजाश्रय?

सभा ऑफलाइन घ्यायची, की ऑनलाइन यावरून होणारे राजकारण पालिकेत सध्या तरी नगरविकास खात्याच्या आदेश दिल्याने ती चर्चा थांबली आहे. त्यामुळे सध्या तरी पालिकांच्या सभांना अद्यापि ‘ऑफलाइन’चा ग्रीन सिग्नल नाही. त्यामुळे पालिकेची बुधवारी होणारी विशेष सभा ऑनलाइन होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. विशेष सभा बोलावण्यामागच्या कारणावरूनच ती सभा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. विषयांच्या टिपण्णी भरपूर आल्या असताना केवळ मोजक्याच विषयांना स्थान दिले जाते. विशेष सभेची गरज काय अशा मुद्द्यांवरून भाजपला घेरण्याची तयारी जनशक्ती व लोकशाही आघाडीने केली आहे.

एकत्र बसण्याची नुसतीच चर्चा!

जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव, लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील व भाजपचे गटनेते विनायक पावसकर एकत्रित बसून गावाच्या भल्यासाठी विकासात्मक विषयांची निवड करून विषय अंतिम करण्याचे ठरले होते. मात्र, ते तिघेही एकत्रित बसलेच नाहीत. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या उपस्थितीत चर्चा करण्याचेही बैठकीत ठरले होते. मात्र, त्या बैठकीला अद्यापही यश आलेले नाही. वास्तविक त्याची केवळ वारंवार मासिक बैठकीत चर्चा होते. त्यानंतर सारेच ती चर्चा सोईस्कररीत्या विसरतात. हेच दिसते.

loading image
go to top