esakal | पसरणी घाटातील अपघातात ठाण्याच्या महिलेचा जागीच मृत्यू; कारचा चक्काचूर
sakal

बोलून बातमी शोधा

पसरणी घाटातील अपघातात ठाण्याच्या महिलेचा जागीच मृत्यू; कारचा चक्काचूर

वाईतील पसरणी घाटात (बुवासाहेब मंदिराजवळ) सकाळी ११ वाजता स्वीफ्ट कार भरवेगात येऊन खोल दरीत कोसळली. त्यात कारचा चेंदामेंदा झाला असून यात एक महिलेचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत.

पसरणी घाटातील अपघातात ठाण्याच्या महिलेचा जागीच मृत्यू; कारचा चक्काचूर

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराच्या समोर दुसऱ्या वळणावर स्वीफ्ट कार कठडा तोडून अंदाजे दोनशे मीटर खोल दरीत कोसळली. आज (ता. २४) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास वाई-पाचगणी रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहचून मदत कार्य सुरू केले. 

नेहा महंमद चौधरी (वय २२) असे मृत महिलेचे नाव असून महंमद इर्शाद चौधरी (वय ३६ दोघेही रा. सकुन हाईट्स टॉवर फ्लॅट न. ७०५ मुंब्रा ठाणे), तसेच चालक सिराज हनिफ शेख (वय ३०) हे गंभीर जखमी आहेत. याबाबत घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोरोना महामारीच्या लॉककडाउन-५ मध्ये शासनाने सर्व पर्यटनस्थळे खुली केली असून पाचगणी व महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटातील वाहनांची वर्दळ वाढली आहे. 

पसरणी घाटात कार कोसळून एक ठार, तर दोघे जखमी

आज अशीच एक स्वीफ्ट कार (क्र. एमएच ०२ इ एच १२०८) पाचगणी येथून वाईच्या दिशेने येत असताना चालकाला घाट रस्त्याचा अंदाज न आल्याने डाव्या बाजूचा कठडा तोडून दोनशे मीटर खोल दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहाय्यक निरीक्षक आशिष कांबळे, उपनिरीक्षक राजेंद्र कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या पाचगणी व महाबळेश्वरच्या स्वयंसेवकाच्या मदतीने मृत व जखमी व्यक्तींना बाहेर काढले. स्थानिक युवकांनी मदत कार्यात मोठे सहकार्य केले. जखमींना मिशन हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली असून उपनिरीक्षक राजेंद्र कदम तपास करीत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image