esakal | औंध-पुसेगाव राज्यमार्गामुळे जाखणगावात 'अपघात'; बेशिस्त वाहनचालक ठरताहेत धोकादायक

बोलून बातमी शोधा

Accident
औंध-पुसेगाव राज्यमार्गामुळे जाखणगावात 'अपघात'; बेशिस्त वाहनचालक ठरताहेत धोकादायक
sakal_logo
By
राजेंद्र शिंदे

खटाव (सातारा) : औंध-पुसेगाव या राज्यमार्गामुळे जाखणगाव (ता. खटाव) येथील बस स्थानक चौक परिसरात वाहनांच्या वर्दळीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. भरधाव ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे हा 'स्पॉट' धोकादायक ठरू लागला आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे अलीकडच्या काळात अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने वरचेवर घडणाऱ्या या दुर्घटना स्थानिकांची डोकेदुखी बनत आहेत. त्यामुळे या ठिकाणी तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची गरज आहे.

औंध-पुसेगाव राज्यमार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या वेगाने लोकवस्ती, विविध प्रकारचे उद्योग, व्यवसाय वाढू लागल्याने हा परिसर सकाळपासूनच गजबजलेला असतो. शिवाय या मार्गाच्या दोन्ही बाजूला प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. जाखणगावच्या पश्‍चिमेला छोटी-मोठी अशी चार गावे व वाड्या वसलेल्या आहेत. पुसेगावच्या बाजूने तीव्र उतार आहे.

पुस्तकांसाठी घर बांधणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल 'या' गोष्टी माहित आहेत? मग, जाणून घ्याच..

नवीन वाहनचालकांना या ठिकाणाची माहिती नसल्यामुळे पूर्व, पश्‍चिमेकडून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात यापूर्वी घडले असूनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्न येथील स्थानिकांना पडला आहे. या राज्यमार्गाचे नव्याने डांबरीकरण झाल्याने अनेक दुचाकीस्वारांसहित इतर वाहनचालकही वाहने सुसाट वेगाने चालवत असतात. त्यामुळे येथील शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागते.

लॉकडाउनमुळे ट्रॅव्हल्सची चाके जाग्यावरच; प्रशासनाची पर्यटनावरही बंदी

औंध-पुसेगाव या रस्त्याने वाहनांची रहदारी वाढलेली आहे. शिवाय शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे संबंधित विभागाने वाढत चाललेल्या अपघातांचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी गतिरोधक, चारही बाजूंना चालकांना दिसतील अशा पध्दतीने सूचनाफलक आदी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची गरज आहे.

-सारिका सोमनाथ शिंदे, सदस्या, ग्रामपंचायत जाखणगाव

Edited By : Balkrishna Madhale