पुस्तकांसाठी घर बांधणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल 'या' गोष्टी माहित आहेत? मग, जाणून घ्याच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babasaheb Ambedkar

पुस्तकांसाठी घर बांधणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल 'या' गोष्टी माहित आहेत? मग, जाणून घ्याच..

सातारा : जागतिक पुस्तक दिन हा 23 एप्रिल दिवशी साजरा केला जातो. UNESCO सह जगभरातील साहित्य संबंधित संस्थांकडून दरवर्षी जागतिक पुस्तक दिनाचं सेलिब्रेशन केलं जातं. हा दिवस जगभरातील 10 देशांमध्ये साजरा केला जातो. आजच्या दिवशी जागतिक पुस्तक दिनासोबत World Book and Copyright Day देखील आजचं साजरा केला जातो. 'युनेस्को'कडून या दिवसाचं सेलिब्रेशन करताना William Shakespeare, Miguel Cervantes आणि Inca Garcilaso de la यांना आदरांजली म्हणून आजची तारीख निवडली गेली आहे. युनेस्कोच्या पॅरिसमधील सर्वसामान्य सभेमध्ये 1995 साली जगभरातील लेखक आणि पुस्तकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा करण्यास सुरूवात झाली, तर भारत सरकारने 2001 साली 23 एप्रिल दिवशी जागतिक पुस्तक दिन सेलिब्रेशनची घोषणा केली.

खरं तर पुस्तकप्रेमींमध्ये भारतीय इतिहासात प्रथमच कित्येक दशकांपूर्वी खास पुस्तकांसाठीच घर बांधणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना असलेले पुस्तकांवरील प्रेम हे जगजाहीर आहे. चला तर त्यांच्याबद्दल विशेष माहिती जाणून घेऊ... राजगृह हे मुंबईमधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी-बौद्ध व दलित जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. दररोज अनेक लोक राजगृहाला भेटी देतात. विशेषतः डॉ. आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी लक्षावधी आंबेडकर अनुयायी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात. शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी होण्यापूर्वीपासून दरवर्षी ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी अनुयायी या राजगृहाचे दर्शन घेण्यासाठी येत आले आहेत. याला राष्ट्रीय स्मारक करण्याची योजना होती. पण, काही कायदेशीर व तांत्रिक बाबीमुळे हे शक्य झाले नाही. राजगृह येथे बाबासाहेबांनी ५०,००० हून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता. ते त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय होते. सन २०१३ मध्ये राजगृहाचा समावेश वारसा वास्तूमध्ये (हेरिटेज) झाला. राजगृहात मराठी व इंग्रजी पुस्तकांबरोबर गुजराथी, उर्दू, फ्रेंच जर्मन, पारशी ग्रंथ असे सर्व मिळून ५० हजारांच्या जवळपास ग्रंथ असतील. या ग्रंथांमध्ये प्रामुख्याने राजकारणावर ३ हजार, इतिहासावर २ हजार ६००, कायद्यावर आधारित ५ हजार, धर्मशास्त्रावर २ हजार, चरित्रे १ हजार २००, इतर साहित्य ३ हजार, अर्थशास्त्र १ हजार, तत्व ज्ञान ६ हजार, युद्धशास्त्र ३ हजार व इतर ७ हजार ९०० असा आकडा होतो.

क्रेडिट कार्डवर कर्ज घेताय? मग 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठे नुकसान

इतिहासाची पाने चाळताना राजे-महाराजांनी कित्येक सुंदर कालाकृत्या बांधल्या, परंतु पुस्तकांसाठी घर बांधण्याचे स्वप्न, पहिले आणि शेवटचे एकाच व्यक्तीने बाळगले, ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. माणूस स्वत:ला राहण्यासाठी घर बांधतो. मात्र, ग्रंथांना जीव की प्राण मानणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आवडत्या ग्रंथांसाठी स्वत:चे राजगृह बांधले, पुस्तकांसाठी घर बांधणे हे केवळ त्यांच्या आयुष्यातील निव्वळ स्वप्न नव्हते, तर त्यांच्या आयुष्यातला तो एक मोठा संकल्प होता. बाबासाहेब परदेशात शिकायला होते, तेव्हा त्यांच्याकडे पुस्तके खरेदीसाठी पैसे नसत. तेव्हा ते ग्रंथालयात जाऊन ग्रंथालय जितका वेळ उघडं असेल तितका वेळ ते तिथे पुस्तके वाचत बसत. लंडन ते मुंबई अशा सलग ६४ तासाच्या बोट प्रवासात बाबासाहेबांनी ८ हजार पाने वाचून काढली होती. देवी दयाल लिखित 'डेली रुटीन ऑफ डॉ. आंबेडकर' या पुस्तकात याचा उल्लेख आहे.

BEL Recruitment : देशभरातील 'या' राज्यांत 'बीईएल'कडून 268 जागांसाठी मोठी भरती

बाबासाहेब एकदा म्हणाले होते, "तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक. कारण, भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचं ते शिकवेल. आपल्या अभ्यासात बाबासाहेबांना व्यत्यय अजिबात आवडत नसे. जगातील अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेबांनी १४ दिवस खोलीला बाहेरून कुलूप लावून स्वतः ला कोंडून घेतले होते. एकदा परदेशातून त्यांनी एका बोटीतून अनेक पुस्तके पाठवली होती. पण, ती बोट दुर्दैवाने बुडाली. जेव्हा बाबासाहेबांना ही गोष्ट समजली तेव्हा ते पुस्तकांच्या विरहात दोन दिवस रडत होते.

बाबासाहेब तुमची सगळी पुस्तके विकत द्या.. 'तुम्ही माझा 'प्राण'च मागत आहात.'

  • एकदा पंडित मोहन मालवीय यांनी बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह बनारस हिंदू विद्यापीठासाठी मागितला होता. यासाठी बाबासाहेबांना दोन लक्ष रुपये द्यायला ते तयार होते.

  • पिलानी विद्यापीठासाठी घनश्यामदास बिर्ला यांनीही बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह मागितला होता. यासाठी ते बाबासाहेबांना सहा लक्ष रुपये द्यायला तयार होते. परंतु बाबासाहेबांनी त्यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला. कारण, ‘आपली पुस्तके मागणे म्हणजे आपला प्राण मागण्यासारखे आहे.' असे बाबासाहेबांना वाटत होते. इतके त्यांचे पुस्तकांवर प्रेम होते.

  • लोकांनी माझी अवहेलना केली, पण या पुस्तकांनी मला ज्ञान दिलं. म्हणून मी पुस्तकांच्या बाबतीत इतका जागरूक आहे. पुस्तक हेच माझे मित्र आहेत असे बाबासाहेब नेहमी आवर्जून सांगत असत. पुस्तकांसाठी घर बांधताना त्यांनी त्या संबंधी पुरेपूर अभ्यास केला होता. त्यांना हवे असणारे ग्रंथ क्षणार्धात मिळाले पाहिजेत, अश्या पद्धतीने त्यांनी ग्रंथालयाची बांधणी केली.

  • ग्रंथालयाची मांडणी त्यांनी न्यूयार्कमधील ग्रंथालायासारखीच केली तर मोठमोठ्या इमारती सारख्या खिडक्या, रोमन पद्धतीचे भव्य असे उत्तुंग खांब, भरपूर प्रकाश येईल अश्या विशिष्ट अंतराच्या खिडक्या, मोकळी जागा, भिंतींमध्ये बांधलेला सज्जाचा माळा, ही पुस्तकांसाठी बांधलेल्या राजगृहाची वैशिष्टे पाहताना रोम, न्यूयार्क, इंग्लंड, अमेरिका, या देशांमधील जगप्रसिद्ध वाचनालयातील उत्तर ग्रंथांचे प्रतिबिंब आतमध्ये उमटलेले दिसते.

  • शहाजहानने मुमताजसाठी ताजमहल बांधले; राजेमहाराजांनी राजवाडे, राजमहाल, शिशमहाल, सोनेरी महाल तर कोणी सोन्याच्या विटांनी कलाकृती साकारल्या. पण, जगातील एकमेव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी जागा कमी पडू नये यासाठी बंगला बांधावा असे ते एकमेव व्यक्ती होते.

  • आजचा जागतिक पुस्तक दिनाचा उत्सव कोणामुळे कशामुळे साजरा होतो याहीपेक्षा एका अस्पृश्य जातीत जन्मलेल्या व शिक्षणापासून दूर ठेवलेल्या जातीत जन्म घेऊन त्या व्यक्तीने पुस्तकांवर इतके प्रेम केले की पुढे जाऊन त्यांनी वाचलेल्या पुस्तकांमधून एवढी बुद्धिमत्ता मिळवली व अनेक पुस्तकेही लिहिली. त्यातील एका पुस्तकावर तर आज अख्खा देश चालतोय. आजचा पुस्तक दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाच अर्पण करायला हवा हे आमचे स्पष्ट मत आहे. कारण, पुस्तकांसाठी घर बांधणारे ते एकमेव 'महामानव' म्हणावे लागतील.